कोकणात रबर लागवडीचा विचार आहे
मित्रहो,
आजच सुरू करण्यात आलेला 'तिसरी मुंबई' हा धागा पाहून मनात विचार आला की वर लिहिलेल्या (रबर लागवड) विषयावर मिपाकरांची मते घ्यावीत. ("गुंतवणूक" आणि "जमीन खरेदी" यापलिकडे या दोन विषयात काहीही समानता नाही हे आधीच नमूद करतो).
पार्श्वभूमी अशी:
नुकत्याच एका केरळीय मित्राकडून विचारणा झाली, "तुमच्या महाराष्ट्रात, कोकणात कुठेतरी रबर लागवड होत आहे असे ऐकले. खरे काय?"
मी कोकणातला असूनही मला याबद्दल केवळ ऐकीव माहिती होती. त्याचा या विषयातील रस पाहून उत्सुकता मात्र वाढली. मग असे ठरले की दोघानी यासंदर्भात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करायची. स्वत: या व्यवसायात शिरण्याचा विचार मात्र मी केला नव्हता.
नियोजित दिनी आम्ही दोघानी (शिवाय एक स्थानिक निकटवर्तीय स्नेही सोबत होते) सावंतवाडीला मध्यवर्ती ठेवून चहूदिशांना साधारण ६० किमीच्या परीघात शोध चालू केला. उत्तरेस आकेरी आणि दक्षिणेस दोडामार्ग अशी तीन दिवस निरंतर भटकंती केल्यावर या भागात केरळीय बांधवांनी किती मोठ्या प्रमाणात हा नवा व्यवसाय उभा केलेला आहे याचा अंधुक अंदाज आला.
*****
पुढे जाण्याअगोदर रबर या विषयाची काही पायाभूत माहिती देणे आवश्यक आहे. ही सर्व माहिती मला भटकंतीदरम्यान केरळीय मित्रांसोबत मारलेल्या गप्पांमधून मिळालेली आहे, त्यामुळे यात चुका असू शकतात. जाणकारांनी दुरुस्ती केल्यास स्वागतच आहे.
वर उल्लेखिलेल्या कोकणी भूभागात हजारो नसेल, पण नक्कीच काही शे एकर रबर लागवड केरळीय लोकांनी केलेली आहे. कोकणातील बराच (सगळा नव्हे) भाग या पिकास अनुकूल आहे असे मानले जाते. सावंतवाडीशिवाय कणकवली, राजापूर, दापोली या भागातही रबर लागवड करण्यात आलेली आहे. पण जसजसे उत्तरेकडे सरकावे, तसतसा जमिनीचा स्तर खालावतो असे मानले जाते.
रबर लावण्यासाठी जमीन ही अतिशय स्पेसिफिक प्रकारची असावी लागते. असेही म्हणता येईल की, माझ्या जमिनीत रबर उत्तम होत असेल, तरी बाजूला चार घरे टाकून रबर तेवढेच चांगले होईलच असे नाही.
- मध्यम उतार (तीव्र नाही, सपाटही नाही)
- लाल माती उत्तम
- जमिनीत सदोदित आर्द्रता असणे आवश्यक. म्हणजे शक्यतो - उन्हाळा वगळता - पाणी देण्याची गरज भासू नये अशी.
- पाण्याचा स्रोत असल्यास उत्तम (पाणथळ जमीन मात्र नको).
- किमान पाच एकर क्षेत्र असेल, तरच आर्थिकदॄष्ट्या किफायती.
- जमिनीची किंमत काय पडली हेही महत्वाचे. (पिढीजात जमीन असल्यास अर्थातच हा मुद्दा लागू नाही)
- लागवड करण्यापूर्वी यांत्रिक पद्धतीने जमिनीचे स्तरीकरण करावे लागते.
- रस्त्यालगत असणे आवश्यक नाही. (साटेली, दाणोली यासारख्या गावांमधून मल्याळी लोकांनी दुर्गम डोंगरमाथे साफ करून रबर लावलेले आहे. तिथे तासभर पायवाटा तुडवल्याशिवाय पोचणे अशक्य).
रबर या पिकाचे काही बरे-वाईट गुणधर्म:
- कीड-रोग यांचा त्रास कमी
- एकदा लागवड केल्यावर पुनर्वर्ती खर्च फार कमी.
- सात वर्षांनी उत्पादन सुरू होते.
- रबराची रोपे वाढत असेपर्यंत, पहिली तीन वर्षे आंतरपीक घेता येते. मसाले लावल्यास अधिक उत्पन्न मिळते, पण मनुष्यबळ जास्त लागते. शिवाय ते नाजुक पीक आहे. एकंदरीत आमच्या मर्यादांचा विचार करता, अननस हा पर्याय आम्हाला योग्य वाटला.
आर्थिक बाजू:
- पूर्वतयारी आणि लागवड या दोहोंकरिता बँका कर्ज देतात, ज्याची परतफेड सात वर्षांनंतर सुरू होते.
- रबर बोर्डाकडून सबसिडी मिळते. (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठे क्षेत्र रबर लागवडीखाली येऊ लागल्यामुळे रबर बोर्डाने आपले ऑफिस गोव्याहून सावंतवाडीला हलवले आहे).
******
खरेदीसाठी उपलब्ध असलेले अनेक जमीनतुकडे पाहिले. त्यापैकी काही लघुसूचित केले. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, रबर शेतीतील अनुभवी असा एक केरळीय व्यावसायिक तिकडून बोलावून घेतला आणि त्याचेही मत घेतले.
हे ज्ञानार्जन (आणि वाहनसारथ्य!) करत असताना हळूहळू मनातील "स्वतःची जमीन असावी" ही वर्षानुवर्षे सुप्त राहिलेली इच्छा उफाळून आली. शेतीव्यवसायाशी वैयक्तिकरीत्या कधीही संबंध आलेला नव्हता. रबर सोडाच, पण एकूण 'शेती' या विषयाचे आर्थिक गणित काय असते याची सुतराम कल्पना नव्हती. पण या, आणि अशा असंख्य कठीन प्रश्नांना मनातल्या मनात "होऊन जाऊ दे" हे एकच उत्तर दिले आणि जमीन घेण्याचा निर्णय घेतला. विसारा देऊन करारही केला. एकूण आम्ही तीन भागीदारांमध्ये ३० एकर जमीन घेणार आहोत. सध्या वकिलांकरवी जमिनीचा वारसतपास, फेरफार निरीक्षण इ. करवून घेत आहोत.
यापुढील विचार असा आहे:
- मार्च २०१५ मध्ये खरेदीखत करून जमीन ताब्यात घेणे, सोबत कर्ज मिळवण्यासाठी आवेदन करणे.
- मे महिन्यापर्यंत यंत्रसामग्री वापरून स्तरीकरण करून घेणे
- पहिला पाऊस होताच (१० जूनच्या आसपास) रबर लागवड करणे
- आंतरपिकाची (अननस) लागवडही सोबतच करणे.
- सबसिडीसाठी अर्ज करणे.
- लागवड होऊन रोपे जोम धरेपर्यंत तात्पुरता केरळीय नोकर ठेवणे. नंतर स्थानिक राखणदार नेमणे.
****
माहीतगारांकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे. आगाऊ धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शुभेच्छा
तुमच्या उपक्रमाला हार्दीक
वा!
ऑम्लेट
बेधडक नवीन क्षेत्रांत
असे म्हणू नका
आपण ह्या विषयात सीरीयस
फक्त रबर आहे मिपासारखे जास्त
शुभेच्छा
हो
चांगली माहिती वाटली . असे
अर्थकारण
शाब्बास रे मर्दा !!
वाचतिये. रबराच्या लागवडीबद्दल
काही प्रश्न
होय
धन्यवाद, माहीती यासाठी घेत
नकारात्मक लिहिण्यापासून (अगदी
वेगळ्या उपक्रमासाठी शुभेच्छा.
१ प्लुस
+गवि+
हे पहा
रबर रोपे नर्सरी
@चलत मुसाफिर, तुमचा रबराची
दापोली ला कोकण कृषी
काही गोष्टी आपण नजरेखालून घालावयात अशी विनंती
एक वेगळा प्रयत्न
कामगार ???
"शेतीमध्ये काम करणारे मजूर
घरात असलेली शेती निरनिराळ्या
कृषी विद्यापिठातली दाखवली