✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दहा रूपयांची सत्ता

आ
आतिवास यांनी
गुरुवार, 11/13/2014 - 18:10  ·  लेख
लेख
पैशांना किती किंमत असते? हा प्रश्न तसं पाहायला गेल तर चमत्कारिक वाटतो. त्या त्या नाण्यावर किंवा नोटेवर जी काही किंमत लिहिली असेल ती - हे तर चिमुरडी मुलं- मुलीसुद्धा हसत हसत सांगतील. आपल्याच शहरात आपण वावरत असतो तेव्हा हे बरोबर असतं, पण जरा वेगळ्या जगात भटकायला गेल की सगळ चित्र बदलून जात. मी अर्थातच अमेरिका किंवा युरोपच्या सहलीविषयी बोलत नाही. विनिमयाच माध्यम बदललं म्हणून केवळ तिथे आपल्या पैशांची किंमत कमी होते अशातला भाग नाही. तो एक वरवरचा व्यावहारिक मुद्दा झाला. पण त्याच्या खोलात आत्ता नको जायला. आपल्याच देशात वावरतानासुद्धा पैशांची किंमत अनेक वेळा बदलत जाते या गोष्टीवर सहजासहजी कोणाचा विश्वास बसणार नाही हे मला माहिती आहे. माझा तरी कोठे होता विश्वास? उत्तर प्रदेशातील चित्रकूट भागात पहिल्यांदा गेले, तेव्हा राहण्याच्या ठिकाणापासून कामाच्या ठिकाणी रोज ये-जा कशा पद्धतीने करायची हा प्रश्न उपस्थित झाला. चित्रकूट तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असल्याने रस्त्यांवर गर्दी भरपूर, पण माणस तिथे क्वचितच एकटी येतात. माझ राहण्याच ठिकाण आणि कामाच ठिकाण यात किमान पंधरा किलोमीटरच अंतर असल्याने रोजचा प्रवास अटळ होता. इतकी गर्दी या शहरात असूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मात्र काहीच पत्ता नाही. लोकांनी आपली आपली काय ती व्यवस्था लावून घ्यावी, त्यातून जे काही हितसंबंध निर्माण होतील, त्यातून आपल्या बळावर मार्ग काढावा असं बहुधा शासनाच्या मनात असावं. लोकांनी पण याचा आनंदाने स्वीकार केला असावा असं दिसतं. कारण जिकडे तिकडे खांद्यावर बंदूक लटकवून लोक - म्हणजे पुरूषवर्ग - रोजच्या व्यवहारात मग्न असतात. बंदूक घेऊन चहा पीत बसलेले पुरूष, एका हातात बंदूक धरून एकमेकांना टाळी देत मनसोक्त हसणारे पुरूष , हे इथलं अगदी नेहमीचचं दृश्य! असल्या असुरक्षित वातावरणाची मला सवय नसेल असं वाटून तिथेले माझे सहकारी माझी फार काळजी घ्यायचे. सकाळी घ्यायला यायचे, संध्याकाळी सोडायला यायचे. पण तीस किलोमीटरचा फेरा म्हणजे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय असं मला सारखं वाटायला लागलं. तोवर खूप वेळा जाऊन माझ तिथलं पाहुणेपणही संपुष्टात आलं होतं. मग पर्याय निघाला सहा आसनी रिक्षांचा. अर्थात सहा आसनी हे केवळ म्हणण्यापुरतं झालं. या रिक्षात कमीत कमी पंधरा प्रवासी भरायचे, असा तिथला अलिखित नियम. एवढ्या गर्दीत विड्या, दारू, गुटखा यांचे वास अंगावर घेत प्रवास करणं जिवावर यायचं. कितीही अंग चोरून बसलं तरी सहप्रवाशांचे आगंतुक स्पर्श झेलावे लागायचेच. हे सगळं करून मी कामाच्या जागी थेट पोचायचे नाही. त्यासाठी पुन्हा काही अंतर सायकलरिक्षाने काटावं लागायचं. संपूर्ण अंतर सायकलरिक्षाने एकदा गेले, तर भरपूर वेळ लागला. शिवाय सायकलरिक्षावाल्याला लागलेला दम पाहून मला अपराधीपण आलं. स्थानिक प्रवासाच्या या प्रश्नावर उत्तर शोधण्याची मनाची नकळत बरीच धावपळ चालली असणार यात काहीच शंका नाही. एका सकाळी एका रिक्षावाल्या माणसाला मी धीर करून विचारलं, "पुढे तुम्ही किती माणसं बसवता?" त्याने जरा चमत्कारिक नजरेनं पाहिलं. तो म्हणाला, "आहे ना जागा, बसून घ्या." तरी पण मी तोच प्रश्न विचारल्यावर त्याने "तीन" असं उत्तर दिलं. प्रवासी फारसे नसल्यामुळे त्याला थोडा मोकळा वेळ होता. मला कुठे जायच आहे याची त्याने विचारणा केली. "पाच रूपये सीट, पाच रूपये सीट" असं ओरडत तो आणखी प्रवासी शोधू लागला. मी त्याला म्हटलं, "मी पुढे बसते. मी तुम्हाला तीन प्रवाशांचे पैसे देते. तुम्ही कोणालाही पुढे बसवू नका." तो चांगल्यापैकी गोंधळला होता. तीन- चार लोकांनी मिळून प्रवास केला तर वाद घालून कमी पैसे द्यायची इथली पद्धत. अशा स्थितीत कोणी एकटंच प्रवास करून तीन लोकांचे पैसे द्यायला का तयार होतं आहे, हे त्याला समजत नव्हतं. माझा हिशोब सोपा होता. दहा रूपये खर्च करून मी माझी सोय बघत होते. पण त्या भागात दिवसभराचा खर्च भागविण्यासाठी दहा रूपये जवळ असणं ही चैनीची परिसीमा आहे. अशा वेळी कोणी दहा रूपये असे हकनाक कशाला उडवेल? बराच वेळ मी त्याला तेच सांगत होते आणि तो नुसताच हसून दुर्लक्ष करत होता. मी त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारच्या विश्रामगृहात राहत होते. मी बराच वेळ रिक्षावाल्याशी बोलतेय हे पाहिल्यावर तिथला एक कर्मचारी धावत माझी मदत करायला आला. त्याने मग त्या रिक्षावाल्याला सांगितलं, " मुंबईच्या आहेत मॅडम." स्वत:च्या सोयीसाठी दहा रूपये खर्च करणं म्हणजे फार मोठी चैन झाली तिथल्या हिशोबाने. सहा आसनी रिक्षात मी पुढच्या सीटवर एकटीने बसून केलेला प्रवास हा लोकांच्या कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय झाला. दर दोन मिनिटांनी रिक्षा प्रवाशांसाठी थांबायची. पुढे मोकळ्या दोन जागा पाहून प्रवासी ऐटीत पुढे यायचे आणि रिक्षावाला त्यांना मागे जायला सांगायचा. पुढे मोकळी जागा असताना मागे का जावं लागत आहे हे त्यांना समजत नसे. मग मागे बसलेल्या प्रवाशांपैकी कोणीतरी स्पष्टीकरण देई, " मॅडम तीन सीट का पैसा दे रही है". माणस अवाक होत. मग आणखी कोणीतरी कुजबुजे," मॅडम बंबई से आयी है". मग हे नेहमीचचं झालं. रिक्षावाल्यांना पण ही व्यवस्था सोयीची होती, कारण त्यांना दोन प्रवासी कमी शोधायला लागायचे. एखाद्या रिक्षात पुढे कोणी प्रवासी बसले असतील तर त्यांना उठवू नका, अशी मी रिक्षावाल्यांना विनंती करायचे. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा दहा रूपये जास्त आहेत, हा केवळ सुदैवाचा भाग आहे याची मला जाणीव होती. मी दूरवर दिसले की ते पुढे बसलेल्या प्रवाशांना मागे बसवायचे. कधीच कोणा प्रवाशाने " मी उठणार नाही, त्यांच्याकडे पैसे जास्त असले म्हणून काय झालं?" असं प्रत्युत्तर दिलं नाही. "एवढी पैशांची मस्ती असेल तर स्वतःची गाडी घेऊन हिंडा" असा अनाहूत सल्लाही मला कोणी दिला नाही. चार साडेचार वर्षांच्या काळात किमान पंचवीस वेळा मी चित्रकूटला गेले असेन, त्या सगळ्या काळात स्थानिक प्रवास मी असाच केला. दहा रूपयांत घेता येईल तितकं सुख विकत घेण्याचा मी प्रयत्न केला. मी खरे तर दहा रूपयांची सोय घ्यायला गेले, दहा रूपयांच सुख मिळवायला गेले. ते तर मला मिळालच,पण त्याचबरोबर मिळाली दहा रूपयांची सत्तादेखील! ही काही अनिर्बंध सत्ता नव्हती, पण ती ठोस होती. पैशांची किंमत नोटेवरच्या आकडयावरच अवलंबून नसते. इतरांच्या तुलनेत पैसा तुम्हाला काय मिळवून देऊ शकतो, यावर पण ती अवलंबून असते तर! पैसे मिळवताना सत्तेची ही सुप्त प्रेरणा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात असणारच. म्हणूनच आपण सारे कदाचित पैशांच्या मागे धावतो. सुखाची प्रेरणा स्वाभाविक आहे, पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का? एकदा इतर व्यक्तींच्या मापाने आपण आपल्याला तोलायला लागलो की सुख आणि समाधान हाती लागण्याची शक्यता दुरावणारच....पैसा कितीही असला तरी! म्हणून आपल्यावर पैशांची सता चालणार की नाही हे आपल्यालाच ठरवावं लागतं ---- कितीही कठीण असलं तरी! * अन्यत्र पूर्वप्रकाशित
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
16561 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

आवडला !

कपिलमुनी
गुरुवार, 11/13/2014 - 18:23 नवीन
डिस्क्लेमर टाका ओ ! सत्ता , पैसा , सीट याचा सद्य राजकारणाशी संबंध लावून धागा हायजॅक करू नये :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद , पण

आतिवास
गुरुवार, 11/13/2014 - 19:01 नवीन
मिपाकर सूज्ञ आहेत असा आजवरचा अनुभव आहे त्यामुळे डिसक्लेमर टाकला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

पैसा, सत्ता आणि गुलामी...

एस
गुरुवार, 11/13/2014 - 18:25 नवीन
सुखाची प्रेरणा स्वाभाविक आहे, पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का?
सत्ता हे एक व्यसन असते. प्रत्येक सत्ताधार्‍याला फक्त एकच गोष्ट हवी असते, ती म्हणजे अधिक सत्ता. पैशाचे म्हणाल तर स्वतःचे प्रत्यक्ष मूल्य शून्य असूनही इतर सर्व गोष्टींचे मूल्य ठरवू शकणारा दुसरा कुठलाच घटक नसावा. साहजिकच पैशातून सत्ता आणि मग सत्तेतून पैसा ही हाव मानवी मनाला लागणे भागच आहे. मग ती सत्ता स्वकीयांवर असो, इतरांवर असो वा त्याबदल्यात स्वतःच्या मूल्यांचा, भावभावनांचा बळी देऊन अजाणतेपणी पत्करलेली त्याच सत्तेची गुलामी असो. बाकी आपले लेख नेहमीप्रमाणेच विचारप्रवृत्त करणारे असतात हेवेसांनल.
  • Log in or register to post comments

+१

बहुगुणी
गुरुवार, 11/13/2014 - 19:32 नवीन
बाकी आपले लेख नेहमीप्रमाणेच विचारप्रवृत्त करणारे असतात हेवेसांनल. सुखाची प्रेरणा स्वाभाविक आहे, पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का? हा कळीचा प्रश्न विचारून टोचल्याबद्दल धन्यवाद! असे लेख नियमाने वाचनात येत राहिले तर समाजाची मानसिकता बदलू शकेल असा (भाबडा?) आशावाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

+१

मधुरा देशपांडे
गुरुवार, 11/13/2014 - 20:15 नवीन
बाकी आपले लेख नेहमीप्रमाणेच विचारप्रवृत्त करणारे असतात हेवेसांनल.
+१ लेख आवडलाच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

हे आवडलं!

आतिवास
Sat, 11/15/2014 - 00:19 नवीन
पैशाचे म्हणाल तर स्वतःचे प्रत्यक्ष मूल्य शून्य असूनही इतर सर्व गोष्टींचे मूल्य ठरवू शकणारा दुसरा कुठलाच घटक नसावा. हे आवडलं. पण यावर अधिक विचार करावा लागेल मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

पैशाचे म्हणाल तर स्वतःचे

बॅटमॅन
Tue, 11/18/2014 - 17:48 नवीन
पैशाचे म्हणाल तर स्वतःचे प्रत्यक्ष मूल्य शून्य असूनही इतर सर्व गोष्टींचे मूल्य ठरवू शकणारा दुसरा कुठलाच घटक नसावा.
हाण तेजायला. एकच नंबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

छान लिहिलय!

अनुप ढेरे
गुरुवार, 11/13/2014 - 18:26 नवीन
छान लिहिलय!
  • Log in or register to post comments

वा वा!

आनन्दा
गुरुवार, 11/13/2014 - 18:31 नवीन
वा वा!
  • Log in or register to post comments

ताई,

जेपी
गुरुवार, 11/13/2014 - 18:49 नवीन
ताई, मी आजही लातुरात 11 किमीचा प्रवास एकटा 20 रु मध्ये करु शकतो.तिथे चित्रकुट सारख्या ठिकाणाचा काय पाड.
  • Log in or register to post comments

सहमत आहे. अशा प्रवासांत सोयी

आतिवास
गुरुवार, 11/13/2014 - 19:03 नवीन
सहमत आहे. अशा प्रवासांत सोयी नसतात, गर्दी असते; पण प्रवास करता येतो. २२-२५ लोक भरलेल्या 'जिपड्या' तून अनेकदा प्रवास केला आहे, त्याचीही आठवण तुमच्या प्रतिसादाने जागी झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

आवडलं. आधीही आवडलं होतं.

आदूबाळ
गुरुवार, 11/13/2014 - 18:50 नवीन
आवडलं. आधीही आवडलं होतं. (अवांतरः आधी कुठे वाचलं होतं?)
  • Log in or register to post comments

दुस-या संस्थळावर!

आतिवास
Sat, 11/15/2014 - 00:23 नवीन
दुस-या संस्थळावर प्रकाशित केलं होतं आधी. तेव्हा मी 'मिपा'कर नव्हते त्यामुळे तेव्हा इथं प्रसिद्ध केलं नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आवडलं.

राही
गुरुवार, 11/13/2014 - 19:20 नवीन
लेख आवडला. सुंदर शैली आणि मूलगामी चिंतन.
  • Log in or register to post comments

पुढे मोकळी जागा असताना मागे

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 11/13/2014 - 19:29 नवीन
पुढे मोकळी जागा असताना मागे का जावं लागत आहे हे त्यांना समजत नसे. मग मागे बसलेल्या प्रवाशांपैकी कोणीतरी स्पष्टीकरण देई, " मॅडम तीन सीट का पैसा दे रही है". माणस अवाक होत. मग आणखी कोणीतरी कुजबुजे," मॅडम बंबई से आयी है". हे वाचताना हसू आलं, पण डोळ्यांच्या कडा किंचीत ओलसर झाल्या. लेख आवडला (नेहमीसारखाच) हेवेसांन !
  • Log in or register to post comments

सुंदर लेख!!

मोहनराव
गुरुवार, 11/13/2014 - 20:15 नवीन
सुंदर लेख!!
  • Log in or register to post comments

पुन्हा वाचताना

सस्नेह
गुरुवार, 11/13/2014 - 20:17 नवीन
तितकेच भिडले (नेहमीप्रमाणेच) स्वतःबदद्ल अलिप्त होऊन परिस्थितीचे काटेकोर निरीक्षण हे तुमच्या लेखनाचे वैशिष्ट्य विशेष भावते.
  • Log in or register to post comments

हृद्य. फार टोचणारं आहे.

यशोधरा
गुरुवार, 11/13/2014 - 20:54 नवीन
हृद्य. फार टोचणारं आहे.
  • Log in or register to post comments

अंतर्मुख करणारे लिखाण!अावडलंच

अजया
गुरुवार, 11/13/2014 - 20:59 नवीन
अंतर्मुख करणारे लिखाण!अावडलंच.
  • Log in or register to post comments

कसंसं झालं पण लेखन आवडलं

रेवती
गुरुवार, 11/13/2014 - 22:49 नवीन
कसंसं झालं पण लेखन आवडलं. पैशांची किंमत नोटेवरच्या आकडयावरच अवलंबून नसते. इतरांच्या तुलनेत पैसा तुम्हाला काय मिळवून देऊ शकतो यावरच तर खरं रोजचे जीवन चालू असते असे वाटते. खूप उदाहरणे आपल्या आजूबाजूला रोजची आहेत पण तुमच्याइतक्या चांगल्या शब्दात मी मांडू शकणार नाही. असो, त्यानिमित्ताने एका गरीब बिहारी आईने १० रुपये महिना मोबदल्यात सावकाराकडे काम करून मुलाला कारकून बनेल इतके शिकवले व मुंबैत त्याला नोकरी मिळाल्यावर आईला आकाश ठेंगणे झाल्याचे त्या मुलाकडून ऐकल्याचे स्मरले.
  • Log in or register to post comments

हो.

आतिवास
Sat, 11/15/2014 - 15:56 नवीन
अशी खूप उदाहरणं समोर असतात. बचत गटाच्या एका बैठकीत एका आदिवासी स्त्रीने फक्त २५ रुपयांचे (फक्त पंचवीस) कर्ज मागण्याची घटना माझ्यासमोर घडली आहे - ती फार तर दहा एक वर्षांपूर्वी! खूप उदाहरणे आपल्या आजूबाजूला रोजची आहेत पण तुमच्याइतक्या चांगल्या शब्दात मी मांडू शकणार नाही. याच्याशी मात्र असहमत. प्रत्येकाची शैली वेगळी असते इतकंच. अनुभव महत्त्वाचा. त्यामुळे जरुर लिहा, मी वाट पाहतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

(No subject)

रेवती
Sat, 11/15/2014 - 19:01 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

+१

पिवळा डांबिस
Fri, 11/14/2014 - 01:25 नवीन
लिखाण आवडलं.
  • Log in or register to post comments

+ २

मुक्त विहारि
Fri, 11/14/2014 - 01:42 नवीन
नेहमीप्रमाणेच... मस्त लिखाण..
  • Log in or register to post comments

खुप खुप आवडला लेख!

आनन्दिता
Fri, 11/14/2014 - 01:51 नवीन
खुप खुप आवडला लेख!
  • Log in or register to post comments

खरंय ..

पहाटवारा
Fri, 11/14/2014 - 01:55 नवीन
तुमचे लेख नेह्मी विचार करायला लावतात.. काहि वेळा आपण केवळ कुणी आपल्याला फसवत तर नाहिये ना या भावनेने अटी-तटीवर येउन भांडतो अगदी थोड्या पैशासाठी .. त्याची किंमत तसे पाह्यला गेले तर फारशी नसतेहि, पण कदाचीत सवय म्हणा किंवा समोरच्या पेक्शा हि पैशाची सत्ता तुमच्या हाती जास्त असल्याने म्हणा, बरेचदा आपण टोकाचे वागतो. एक किस्सा आठवतो आहे बर्‍याच वर्षांपूर्वीचा, कडाक्याच्या थंडीतला, दिल्लीतला.. त्याकाळी नवी नोकरी लागली होती अन सर्वच मित्रांच्या हाती बर्‍यापैकी पैसे खेळू लागले होते. असेच एका रात्री कुणीतरी जेवण झाल्यावर त्या थंडीत आईस्-क्रीम खायला जायचा प्लान बनवला. थोड्या दूर जाण्यासाठी म्हणून २ सायकल्-रिक्शा करून आम्हि ३-४ जण गेलो. आम्च्या रिक्शावाल्याने जे पैसे सांगितले ते आम्हा दोघांपैकी कुणीतरी देउन टाकले तर दुसर्या रिक्शावाल्याबरोबर त्या रिक्शात आलेला एक मित्र हुज्जत घालू लागला कि इथे रोज येणे-जाणे आहे आणी तू २ र. जास्त मागतो आहेस, थंडी असली तर काय झाले, अंतर तर सारखेच आहे ना.. वगैरे.. आम्ही समजावून पण तो काहि ऐकेना. शेवटी कंटाळून रिक्शावाल्याने सोडून दिले (म्हणजे बघा त्याने किती हुज्जत घातली असेल !).. जेव्हा आम्हि त्याला नंतर विचारले कि तुला २ रु नी काय इतका फरक पडणार होता, तर त्याचे म्हणणे की हे लोक फसवतात. मनात विचार आला जरी २ पैसे जास्त मिळण्यासाठी हे हातावर पोट असणारे लोक फसवत/अडवत असले, तरी एवढ्या छोट्या रकमेने जर तुम्हाला फारशी झळ पोहोचणार नसेल तर काय हरकत आहे... -पहाटवारा
  • Log in or register to post comments

+११११११११११११

टवाळ कार्टा
Fri, 11/14/2014 - 08:32 नवीन
+११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पहाटवारा

+१

आतिवास
Sat, 11/15/2014 - 16:01 नवीन
मनात विचार आला जरी २ पैसे जास्त मिळण्यासाठी हे हातावर पोट असणारे लोक फसवत/अडवत असले, तरी एवढ्या छोट्या रकमेने जर तुम्हाला फारशी झळ पोहोचणार नसेल तर काय हरकत आहे... सहमत आहे. एक रूपयासाठी किती मनस्ताप करून घ्यायचा, किती हुज्जत घालायची ही अर्थात ज्या-त्या व्यक्तीची निवड असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पहाटवारा

अनुभवकथन आवडले

श्रीरंग_जोशी
Fri, 11/14/2014 - 02:50 नवीन
नेहमीप्रमाणेच विचार करायला लावणारे अनुभवकथन.
  • Log in or register to post comments

माताय!!

स्पंदना
Fri, 11/14/2014 - 04:30 नवीन
माताय!! खरच किती टोचणी लागते जीवाला असल्या साध्या साध्या गोष्टींची की सांगता सोय नाही. जयपुरमध्ये पहिल्यांदा सायकल रिक्षात बसल्यावर अक्षरशः उतरुन त्या माणसाला मदत करावीशी वाटत होती, काय सांगु किती लाज वाटली सुखासीनतेची!! मग दुसर्‍या दिवशी पेट्रोलच्या रिक्षातपण बसवेना, कोठेतरी आपण त्या माणसाची रोजीरोटी काढुन घेतोय अस वाटायला लागल.
  • Log in or register to post comments

सायकल रिक्षा'

आतिवास
Sun, 11/16/2014 - 11:18 नवीन
'सायकल रिक्षा' हा नेहमी एक द्वंद्वाचा मुद्दा असतो माझ्यासाठी - तुमच्यासारखाच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

छान लिहिलय

दिपक.कुवेत
Fri, 11/14/2014 - 07:06 नवीन
विचारप्रवर्तक लेख (जे नेहमीच तुमचे असतात)
  • Log in or register to post comments

सुरेख लेखन...

मदनबाण
Fri, 11/14/2014 - 07:24 नवीन
सुरेख लेखन... माझ्या मता नुसार या जगात फक्त ३ प्रकारचे लोक असतात... १} पैसा आणि सत्ता असणारे २} दरिद्री ३} या दोघ्यांच्या मधे सरपटणारे मध्यमवर्गीय.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }
  • Log in or register to post comments

मूळ लेख चिंतनीय आणि सुंदर..

नाखु
Fri, 11/14/2014 - 08:59 नवीन
आता बाणरावांशी सहमती आणी आमचे दोन पैसे: माझ्या मता नुसार या जगात फक्त ३ प्रकारचे लोक असतात... १} पैसा आणि सत्ता असणारे हे राजकारण-गुंडगिरी-सत्ता-गुंडगिरी-राजकारण असे चक्र आहे.म्हणून दोन्ही एकरूप झाली आहे २} दरिद्री हा वर्ग असाच रहावा असा सत्ताधार्‍यांचा एक कलमी प्रयत्न असतो (म्हणून सबसिड्या/मोफत ई. गोश्टी किमान शहरात देऊन कायम दरिद्री (विचाराने) राहतील याची पुरेपूर काळजी सत्ताधारी घेतातच्.पिं.चिं. मध्ये एकाही झोपडपट्टीची जागा रिकामी झाली नाही,नवीन घरे देऊनही!!) ३} या दोघ्यांच्या मधे सरपटणारे मध्यमवर्गीय हा वर्ग दरिद्रिंच्या समूर स्वतःला भाग्यवान समजतो तर पैसा आणि सत्ता असणारे समोर असहाय्य!! मूल्ये कोडगं बनू देत नाहीत तर जगण्याची धडपड बेडर!!! त्या मुळे सरपटणारे+फरपटणारे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

:-)

आतिवास
Sun, 11/16/2014 - 14:47 नवीन
'पैसा आणि सत्ता असूनही' अमुक आणि तमुक प्रकारचे, दरिद्री असूनही अमके...... वगैरे आणखी बरेच उपवर्ग त्यात सामील करता येतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

छान लेख!

समीरसूर
Fri, 11/14/2014 - 09:15 नवीन
खूप सुंदर लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

दर्जेदार व आशयघन लेख.

पगला गजोधर
Fri, 11/14/2014 - 09:29 नवीन
दर्जेदार व आशयघन लेख.
  • Log in or register to post comments

असाच अनुभव मला हळेबिडच्या

सुबोध खरे
Fri, 11/14/2014 - 09:36 नवीन
असाच अनुभव मला हळेबिडच्या मंदिरात आला. माणशी दहा रुपये भरायला नसल्याने १०० माणसे दर्शनाच्या रांगेत उभी होती. त्यांच्या कडे पाहून मला कणव आली पण १०० माणसांच्या रांगेत उभे राहण्यासाठी मला वेळी नव्हता किंवा तेवढा धीरही नव्हता. परंतु मुलांना मात्र मी हे समजावून सांगितले कि तुम्ही ४० रुपये खर्च करताय तेवढे पैसे नसल्याने हच माणसे दोन तास रांगेत उभी राहतील. तेंव्हा पैश्याची किंमत काय आहे ते समजून घ्या. दुसरा अनुभव मी चिपळूण हून मुंबईला येण्यासाठी सहकुटुंब निघालो चिपळूण स्टेशन वर सावंतवाडी दादर प्यासेंजरचे तिकीट काढले ३८ रुपये माणशी. स्टेशनावर प्रचंड गर्दी होती. शिवाय मागून नेत्रावती एक्स्प्रेस येणार अशी सूचना झाली. मी तिकिटाच्या खिडकीवर विचारले याचे तिकीट किती आहे तेंव्हा त्याने सांगितले कि १२५ रुपये. यावर मी माझे प्यासेंजरचे तिकीट रद्द केले आणि नेत्रावती एक्स्प्रेसचे स्लीपरचे तिकीट काढले. प्यासेंजरआली ती खच्चून भरली होती त्यात हि स्टेशनची गर्दी चढली. नंतर नेत्रावती एक्स्प्रेस ई तिच्यात मी टी सी ला विचारून आपला बर्थ राखीव करून घेतला. पुढे वीर ला नेत्रावती एक्स्प्रेसला पुढे पाठवले आणि आम्ही एक तास वाचवून अतिशय आरामात मुंबईत आलो. येताना मी मुलांना परत हेच सांगितले कि केवळ ३६० रुपये नाहीत किंवा वाचवण्यासाठी लोक किती कष्ट काढतात. नशिबाने तुम्हाला या गोशी सहज मिळतात तेंव्हा त्याची जाणीव ठेवा. पैसा कितीही मिळाला तरी तो डोक्यात( आणि डोक्यावर) चढू देऊ नका.
  • Log in or register to post comments

संस्कार

कपिलमुनी
Fri, 11/14/2014 - 18:43 नवीन
खुप छान संस्कार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

इतर वेळी मी पैसे देऊन सोय

आतिवास
Mon, 11/17/2014 - 14:48 नवीन
इतर वेळी मी पैसे देऊन सोय विकत घेते; पण देवळात मात्र मी तसं कधीच करत नाही. कदाचित मी भक्त नाही म्हणून असेल, कदाचित देवाच्या दारी तरी पैसे हा मुद्दा असू नये असं मला वाटतं म्हणून असेल ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

वेळ आणि सोय

कपिलमुनी
Wed, 11/19/2014 - 15:35 नवीन
कधी कधी पैसा हाच मुद्दा नसून वेळ आणि सोय हा मुद्दा असतो . खास करून लहान मुले , वृद्ध यांची गैरसोय , कमी वेळ असताना दर्शनाची आस असणे अशा प्रसंगी या सुविधेचा लाभ बर्‍याच जणांना होतो . ( आणि यातील उत्पनामुळे साउथची मंदीरे खुप स्वच्छ असतात. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

@आतिवास

सुबोध खरे
Wed, 11/19/2014 - 20:42 नवीन
@आतिवास मुळात १०० माणसांच्या रांगेत उभा राहून दर्शन घ्यावे एवढा मी भाविक नाही.( कुठल्याही रांगेत उभे राहावे हा माझा मुळात पिंडच नाही) म्हणून मी आजतागायत शिर्डी, तिरुपती, सिद्धिविनायक किंवा लालबागचा राजा येथे गेलेलो नाही. मी हळेबिड ला गेलो होतो ते एक उत्तम स्थापत्य शास्त्राचा आणि कोरीवकामाचा नमुना असलेले मंदिर म्हणून. मी सुद्धा त्या रांगेत उभा राहावे कि नाही या संभ्रमात होतो. पण माझे आणि मुलांचे कपडे पाहून तेथील एका माणसाने अशी सोय आहे हे सांगितले म्हणून मी ते भरले माणशी १०० रुपये असते तर ते भरले असते का हाही प्रश्न आहेच. मंदिर चारी बाजूनी पाहून परत आलो असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

काहीसा असहमत

विटेकर
Fri, 11/14/2014 - 10:00 नवीन
नेहमीप्रमाणेच तुमाचा लेख आवडला. तुमचा अनउभव खूपच बोलका आहे. ( तुम्ही नेमका काय व्यवसाय करता ? शक्य असेल तरच सांगा , उगाच कुतुहल म्हणून विचारले , कारण तुम्ही संवेदनाशील ही आहात आणि तुमच्या कामामुळे तुम्हाला फिरण्याची संधीही मिळती आहे, सह्सा असा संयोग असत नाही. मीही भारतभर फिरतो ,पण माझा असा थेट लोकांशी संपर्क येत नाही, आणि मला ते इतकया प्रवाहीपणे मान्डताही येणार नाही. त्या अर्थाने तुम्ही भाग्यवान आहात ! अस्तु , अवांतर पुरे ) काहीसा असहमत अशासाठी की पैशाने सत्ताच काय छोटी छोटी सुखे ही विकत घेता येत नाही. विशेषतः शारीरी सुखाला मर्यादा येतात. पहिल्यांदा जगन्नाथ पुरीला गेलो तेव्हा मधुमेहामुळे मिठाईचा स्वाद घेता आला नाही तेव्हा फार फार वाईट वाटले होते. आणि पैश्याने आयुष्यात जो सुसह्यपणा ( किंवा सत्ता) येतो , त्याच्या मर्यादा फार लवकर उघड्या पड्तात. its merely cotton candy feeling !
  • Log in or register to post comments

व्यवसाय खरं तर स्पष्ट होतो

आतिवास
Mon, 11/17/2014 - 14:52 नवीन
व्यवसाय खरं तर स्पष्ट होतो आहे वेगवेगळ्या लेखांतून. :-) केवळ हातात पैसे आहेत म्हणून शारीरिक व्याधी दूर होत नाही हे मान्य - पण पैसे असतील तर ती व्याधी सुसह्य पातळीवर राखण्याची संधी उपलब्ध असते. परंतु नेहमीच नाही - या तुमच्या मताशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

तसेच

विटेकर
Fri, 11/14/2014 - 10:09 नवीन
एखाद्या रिकशामध्ये जेव्हा खचाखच भरुन लोक जात असतात, किंवा एखादा सायकल रिक्शावाला जीव तोडून सायकल मारत असतो , त्याचे आपल्याला जितके वाईट वाटते तितके त्यांना वाईट वाटत नसते असे मला लक्शात आले आहे, शेवटी सुख आणि दु:ख या दोन्ही संकल्पना सापेक्ष आहेत. नो अब्सोलुट व्याल्यु ! आपण सारे तुलनेने सुखी किंवा दु:खी असतो. म्हणजे आपण त्यांच्याबाबत असंवेदनाशील असावे असे माझे मुळीच म्हणणे नाही. माझ्या बाबतीत मी हा प्रश्न सोडविला आहे. पुण्यात राहून देखील मी रिक्षावाल्याशी हुज्ज्त घालत नाही. भाजीवाल्याला कधीही रेट कमी करुन मागत नाही. आणि हे ही खरे आहे की कधी कधी ते मला फसवतात, ते ही मला कळते पण ते सोडून् देण्यात मला फारसे काही वाटत नाही. हरामखोर राजकारणी आमचे ट्याक्स चे लाखो रुपये वर्षानुवर्षे राजरोसपणे खिषात घालतात तेव्हा आम्ही काय करतो ?
  • Log in or register to post comments

खादा सायकल रिक्शावाला जीव

मदनबाण
Fri, 11/14/2014 - 10:34 नवीन
खादा सायकल रिक्शावाला जीव तोडून सायकल मारत असतो , त्याचे आपल्याला जितके वाईट वाटते तितके त्यांना वाईट वाटत नसते असे मला लक्शात आले आहे हे असं नक्कीच नाही, कित्येक वर्षांपूर्वी मी माझ्या माझ्या आई-वडिलां सोबत अश्या सायकल रिक्षा मधे बसलो होतो { बहुतेक उजैन सांदिपनी आश्रम { भगवान श्री कृष्ण यांचे शिक्षा स्थान} येथे जाताना} एका चढणावर त्या सायकल रिक्षावाल्याला दम लागु लागला आणि त्याला ती सायकल रिक्षा चालवणे कठीण होउ लागले, तेव्हा माझे वडिल त्या सायकल रिक्षातुन उतरले आणि त्या सायकल रिक्षा बरोबर बरेच अंतर { ते चढण संपे पर्यंत } धावत राहिले. त्यावेळी त्या सायकल रिक्षा वाल्याच्या डोळ्यातले भाव मी कधीच विसरु शकत नाही तसेच माझ्या वडीलांची ही कॄती सुद्धा. भाजीवाल्याला कधीही रेट कमी करुन मागत नाही. आणि हे ही खरे आहे की कधी कधी ते मला फसवतात, ते ही मला कळते पण ते सोडून् देण्यात मला फारसे काही वाटत नाही. हरामखोर राजकारणी आमचे ट्याक्स चे लाखो रुपये वर्षानुवर्षे राजरोसपणे खिषात घालतात तेव्हा आम्ही काय करतो ? एखादा व्यक्ती फसवणुक करतो म्हणुन दुसर्‍यानेही फसवणुक करण्याचे समर्थन कसे करता येइल ? जी वस्तू योग्य दरात घेणे शक्य असेल ती चढ्या दरात का घ्यावी ? आणि कोणताही विक्रेता त्याला होणारा नफा घेतल्या शिवाय व्यवसाय करणारच नाही { काही अपवाद वगळता}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

सुंदर लेख

मित्रहो
Fri, 11/14/2014 - 11:06 नवीन
आवडले बाकी पैशाने सत्ता मिळते हे जरी खरे असले तरी सत्तेमुळे पैसा मिळतो हेही तितकेच खरे आहे.
  • Log in or register to post comments

:-)

आतिवास
Mon, 11/17/2014 - 14:55 नवीन
सत्तेमुळे पैसा मिळतो हेही तितकेच खरे आहे.
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो

बाकी या लेखामुळे कधी इथेच

मदनबाण
Tue, 11/18/2014 - 09:27 नवीन
बाकी या लेखामुळे कधी इथेच लिहलेल्या पण नंतर उडवलेल्या माझ्या अनेक छोटेखानी लेखनापैकी एक फक्त ५ रुपयांसाठी आठवला होता.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

आवडला लेख

बोबो
Fri, 11/14/2014 - 11:07 नवीन
आवडला लेख
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा