९ नोव्हेंबर १९८९ - शेवटाच्या सुरवातीची पंचविशी!
९ नोव्हेंबर १९८९ जगाच्या नजरेत ऐतिहासिक दिवस. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे १९६१ साली पूर्व जर्मनीच्या साम्यवादी सरकारने बांधलेली बर्लीन वॉल ही त्या दिवशी कोसळली. नव्हे जनतेने पाडली. हाताची पाचही बोटांची उंची सारखी असावी असा हट्ट करणार्या खुळचट साम्यवादाची जाहीरपणे अखेर होण्याची ती सुरवात होती. जाहीरपणे म्हणायचे कारण इतकेच की त्या आधीच १९७८ साली (म्हणजे माओच्या मरणानंतर दोन वर्षाच्या आत) चायनीज प्रेसिडंट डेंग झिआओपेंग यांनी मुक्तअर्थव्यवस्था चायनिज स्टाईल, हळूहळू चालू केली. कम्युनिझमला आणि माओच्या तथाकथीत समतेच्या तत्वांना वरकरणी तिलांजली न देता ते म्हणाले होते, "मांजर काळी आहे का पांढरी याने काही फरक पडत नाही, मांजर उंदराला मारते का हा मुद्दा आहे." अर्थात हिंदीत, त्यांचा मतलब हा "आम खानेसे था!" असे म्हणावे लागेल. पण हे झाले उर्वरीत जगात...
भारतात, त्याच सुमारास (१९७७ साली), स्वातंत्र्यापासून काँग्रेसी समाजवाद हा जनता पक्षामुळे मोठे झालेल्या पुर्वाश्रमीच्या काँग्रेसी समाजवादी आणि त्यात मिळालेल्या कम्युनिस्टांमुळे अधिकच बळकट झालेला होता. भारतीय घटनेत इंदीरा गांधींनी सेक्यूलॅरिझम हा शब्द वापरून अजून भारतीय स्टाईल समाजवादाला आधीच गोंजारले होते. आधीपासूनच सुरू असलेला स्युडोसेक्यूलॅरिजम हा त्याच काळात वाढू लागला होता. राजीव गांधींच्या काळातील शहाबानो प्रकरणाने धार्मिक दुही अधिकच दृढ होऊ लागली होती. दुर्दैवाने जे स्वत:स अधुनिक आणि सुधारक (progressive) समजतात अशा समाजवादी धुरीणांनी या धार्मिक दुहीकडे दुर्लक्ष केले.
अर्थात या तत्कालीन घटनांच्या विरुद्ध बहुसंख्य जनतेस एकत्र करण्याच्या उद्देशाने एक निद्रीस्त चळवळ परत जागृत झाली. रामजन्मभूमी शिलान्यास समितीच्या रुपाने, रामजन्मभूमी च्या मागणीने राजीव गांधींच्या काळात जोर धरला. १९८९ च्या निवडणुकीच्या आधी राजीव गांधींनी (आणि त्यांच्या सल्लागारांनी) एक राजकीय खेळी म्हणून विश्व हिंदू परीषद आणि शिलान्यास समितीस अयोध्येच्या याच वादग्रस्त स्थानावर रामजन्मभूमी मंदीराची कोनशीला स्थापन करण्यास परवानगी दिली.
९ नोव्हेंबर १९८९ ह्या दिवशी कामेश्वर चौपाल या दलीत समाजातील व्यक्तीकडून पहीली वीट रचली गेली. नंतर सुप्रिम कोर्टाचा निकाल येई पर्यंत या संदर्भात काय काय घडत गेले हा एक वेगळा इतिहास आहे. एकंदरीतच रामजन्मभूमी विषयावर बरेच चर्विचर्वण झाले आहे. तेंव्हा येथे तो मूळ विषय नाही...
गेल्या पंचविस वर्षात या समाजवादी आणि विशेष करून त्यातील डाव्या विचारवंतांनी सर्व प्रकाराने आकांडतांडव केले. कितीतरी खोट्या गोष्टी रचून आपल्या ताब्यात असलेल्या माध्यमांकरवी जनतेच्या मनात भरवल्या. त्यांच्या दुर्दैवाने आधी जालीय माध्यम आणि त्यातही नंतर सोशल मेडीया नावाचे अजून वैशिष्ठ्यपूर्ण सामाजीक माध्यम अस्तित्वात आले आणि फासे उलटले. अर्थात यात एक लक्षात घेतले पाहीजे की यातील एक बाजू केवळ नकारात्मक प्रचारावर भर देत होती तर दुसरी त्याला उत्तर देताना ध्येयाचा विसर पाडून न देता जनतेमधे तळागाळात (ग्रासरूटवर) कामे करत होती. आजही सत्ता मिळाली तरी ती कामे चालूच आहेत.
पण या समाजवाद्यांचे काय झाले आहे? आज अशी अवस्था आहे की केवळ मोदी, मोदी भक्त, शिवसेना यांची पोरकट खिल्ली उडवणे इतकेच या विचारवंतांच्या हाती राहीले आहे. बाकी विकासावरून वगैरे बोलणे दूरच राहीले पण समाजवाद कुठे गेला, ह्यावर चर्चा नाही की आत्मपरीक्षण नाही...
सत्तेसाठी परत नक्कीच तेच ते समाजवादी गणंग प्रयत्न करतील, एकत्र येतील आणि स्वत:स विचारवंत समजणारे समाजवादी अशा प्रयत्नांचे, अगदी फोल आहेत हे समजले तरी टाळ्या वाजवून स्वागत करतील. पण येथे केवळ सत्तांतर अथवा त्याचा प्रयत्न हा मुद्दा नाही. तो प्रयत्न करणे हा कुठल्याही व्यक्तीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हक्कच आहे. पण त्याव्यतिरीक्त जर समाजाच्या / देशाच्या भल्यासाठी आपल्याकडे देण्यासारखे काही आहे, असे वाटत असेल तर त्याचा जोमाने वापर करणे महत्वाचे नाही का? तसे जर होत नसेल तर हा उरलासुरला समाजवाद पण गेल्या पंचविस वर्षात लयास गेला असे म्हणावे लागेल.
म्हणूनच, एका अर्थाने शिलान्यासाच्या निमित्ताने, पंचविस वर्षांपूर्वी या डाव्या समाजवादाच्या घराची पहीली वीट ढासळली असे आज म्हणता येईल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अजूनही डाव्या पक्षांच्या
पंचवीस वर्षांपूर्वी...
नक्की काय म्हणायचेय ते समजलेच
मुद्दे व्यव्स्थीत आहेत, पण
नाही आवडला
@विकास राव - लेख अपेक्षांवर
काही उत्तरे