कविता कशी उपभोगावी

शरद's picture
शरद in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:10 am

कै. इन्दिरा संतांनी म्हटले आहे " कूकर लावून शिटी होईपर्यंत कथा वाचून होते. जेवण झाल्यावर लोळत लोळत कादंबरी वाचून बाजूला करता येते पण कवितेचे वाचन असे करता येत नाही. कथा-कादंबरी वाचनानंतर पुस्तकातले तरंग दूर होतात. पण कवितेचे तसे नाही. मनरंजनाबरोबर काव्यात आणखी काहीतरी सामावलेले असते " कवयित्री म्हणून त्यांनी काव्याला झुकते माप दिले आहे कां ?

मी कविता करत नाही तरीही मला तरी तसे वाटत नाही.. शालेय कविता ( त्यातल्या आजही बर्‍याच पाठ आहेत) सुरेख होत्या पण त्या भावकविता नव्हेत. भावकविता गेली साठएक वर्षे वाचत आहे व आज मला वाटते कीं कविता उपभोगावयाची असेल, खरा आनंद मिळवावयाचा असेल तर तुम्हाला त्याची किंमत मोजलीच पाहिजे.

किंमत मोजावयाची म्हणजे काय ? कोणीही कबूल करेल की आजची सर्वात महाग गोष्ट म्हणजे वेळ. मल्टीप्लेक्समध्ये एक सिनेमा पहावयाला जो खर्च येतो त्यात तुम्ही दोन कवितासंग्रह विकत घेऊं शकता तेव्हा पैशाचे सोडा, तो गौण आहे. घेतलेला संग्रह तुम्ही कसा वाचता हे महत्वाचे. लोकलमध्ये, गर्दीत धक्के खात खात "चारोळ्या" वाचू शकता; भावकविता नाही.

असे बघा

लिलीची फुले
तिने एकदा
चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले ... !

लिलीची फुले
आता कधीही
पाहता, डोळां
पाणी हे साकळे ... !

ही कविता अशा ठिकाणी वाचून तुम्हाला काय मिळणार ? तर तुम्हाला काव्य वाचावयास वेळ काढला पाहिजे.

ही वेळही अशीच पाहिजे की तुमच्या भोवती चार माणसांची ये जा नाही. निरव शांतता हवी असे म्हणत नाही, शहरांत ते अशक्यच आहे पण निदान खोलीत टीव्ही चालू नसावा. थोडक्यात रात्री दहा साडेदहा नंतरची वेळ. पहाटे वाचणे उत्तमच पण ..द्या सोडून. अशी वेळ जर काढता आली तर तुम्ही पहिला टप्पा पार पाडलात.

दुसरी गोष्ट चांगली कविता निवडता आली पाहिजे. या करिता तुमचे वाचन वाढलेले असले पाहिजे. सुरवातीला सगळ्या कविता वाचा. हळुहळु तुमच्या लक्षात येईल काय चांगले काय टुकार. या बाबतीत मान्यवर टीकाकारांची मदतही घेता येईल. पण ते फार महत्वाचे नाही.अभ्यासू माणुस कसा विचार करतो एवढे त्यातून कळेल. तुम्हाला तुमची जाण वाढवावयाची आहे. चांगले वाईट ही वैयक्तिक निवड आहे. तुम्हाला आवडेल ते तुमच्या करिता उत्तम.

ही जाण येण्याकरिता मनाची तयारी करावी लागते. कुठलाही पूर्वग्रह मनात बाळगू नका. मान्यवर कवींची सगळी कविता चांगली असतेच असे अजिबात नाही. एखाद्या संग्रहात ५-१० कविता चांगल्या वाटल्या तरी मी खूश असतो. नवीन कवीही चांगले काव्य लिहू शकतो. भिकार सिनेमातही उत्तम कविता, गीत मिळू शकते.

कवितेचा आनंद मिळवण्यासाठी कवितेशी समरस व्हावयास पाहिजे. म्हणजे काय ? कवी कविता लिहतो तेव्हा त्याला काही तरी सांगावयाचे असते. नाही तर तो काही लिहणारच नाही. तर त्याला काय सांगावयाचे आहे ते शोधावयाचा प्रयत्न करा. हे का करावयाचे ? कवी त्याच्या प्रतिभेनुसार काव्य करतो. त्याला काय म्हणावयचे हे कळले तर त्याने ते कसे मांडले आहे इ. दिशांकडे आपल्याला वळता येईल. अभ्यासाच्या दृष्टीने हे महत्वाचे असले तरी एक लक्षात ठेवा. कवीच्या मनात काय होते ते तुम्हाला कळले पाहिजेच असे अजिबात नाही. कवीची कविता तो लिहतो तेव्हा त्याची; ती तुमच्या हातात पडते तेव्हा ती तुमची होते. तुमचा अर्थ तुमच्या पुरता खरा. दुसर्‍याला दुसरा अर्थ लागला तर तो त्याच्या पुरता खरा. बरोबर कोण ? दोघेही. आणि आज तुम्हाला जे वाटले ते उद्या वाटलेच पाहिजे असेही नाही. श्रेष्ठ साहित्याचे लक्षण हे की ते तुम्हाला विचार करावयास लावते व अर्थांच्या निरनिराळ्या लहरी समोर उभ्या करते. हा सर्व आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा.

समरसतेचा दुसरा भाग म्हणजे अर्थात न शिरता कवीच्या मनात शिरण्याचा प्रयत्न करा. एक उदाहरण घेऊ.

यशोमती मैयासे बोले नंदलाला
राधा क्युं गोरी मै क्युं काला !!

कवीला लिहतांना त्याच्या समोर गोकुळ आले, त्यातला नंदाचा वाडा आला, तेथील यशोदा व बाळकृष्ण आले व त्यांचे वर्णन करतांना त्याने एक नाट्यमय प्रसंग उभा केला. तुम्हाला गोकुळात जाता आले ,यशोदा-कृष्णाला भेटता आले तर तुमच्या समोर येईल सावळा कृष्ण, हा रागाने गोरामोरा झाला आहे व बाहेरून धावत धावत येत, आईच्या कुशीत शिरून धुसपुसत तो आईला, ती एकटीच त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते, विचारत आहे " मै क्युं काला?" हे तुम्ही डोळ्यासमोर उभे केलेत तर तुम्ही कवितेशी समरस झालात, ती तुमचा आनंद शतपट करेल. इथे रागारागाने गोरामोरा झालेला कृष्ण कवीने वर्णन केलेला नव्हे, ती तुमची निर्मिती आहे व हीच मला म्हणावयाची आहे ती समरसता. तुमच्या नकळत तुम्हीही कवी झाला आहात. कागदावर काहीही न लिहता. कादंबरी व कविता यात हाच फरक आहे. कादंबरीकार तुम्हाला फारसा वाव देत नाही. तो सगळे लिहून मोकळा होतो. कवी दोन ओळींमध्ये मोकळी जागा सोडतो व हा रंगफलक तुम्ही रंगवावयाचा आहे. विसरू नका, मी भावकवितेबद्दल बोलत आहे. श्रावणमासी या सुंदर कवितेत तुम्हाला हा वाव नाही. ती सुंदर कविता आहे, भावकविता नाही.

आता पुढचा मुद्दा. शब्द. सगळे कवी गदिमा वा शांता शेळके यांच्याइतके शब्दप्रभु नसले तरी धरून चाला की त्यांची शब्दसंपत्ती तुमच्यापेक्षा बरीच जास्त आहे व ते शब्दा-शब्दांमधील अर्थछटांचे अर्थ जास्त जाणतात. आपण जर थोडा विचार केला की इथे कवीने हा शब्दच कां वापरला असावा ? तर तुमच्या आकलनशक्तीत वाढ होईल. पुढचा भाग म्हणजे आपणच कवीने वापरलेल्या शब्दा ऐवजी दुसरा शब्द वापरण्याचा प्रयत्न करावयाचा. या फरकाचा एकंदरित कवितेवर काय परिणाम होतो हे पाहणे मजेशीर असते.

याने काय होते? तुम्ही कवितेत गुंतत जाता. हे फार महत्वाचे आहे. वर सांगितल्याप्रमाणे कविता कवीची नाही तर तुमची आहे, ही कविता आता तुम्ही गुंतत चालला की जास्त जास्त "तुमचीच" होते. कविता उपभोगणे म्हणजे ती तुमची स्वत:ची करणे. आणि भवभूती सारखा महान कवीही अशा समानशील, समानधर्मा व्यक्तींच्या शोधातच असतो ! तो म्हणतो

उत्पत्स्यते मम कोsपि समानधर्मा ! कालोह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी !!

आणखी एक बाब लक्षात ठेवा. कविता वाचल्या नंतर तिच्या जवळची, त्या तर्‍हेच्या भावना व्यक्त करणारी दुसरी कविता आठवते का याचा शोध घ्या. याचे फायदे दोन. पहिला एकच भावना गुंठित करणार्‍या कवितांचा संच (group) मनात तयार होतो. दुसरा फायदा विस्मरण कमी होते. माझ्या सारख्यांना कसोशीने लक्षात ठेवावी लागणारी गोष्ट.

हा झाला गाभा. इतरही गोष्टींचा विचार कवितेच्या संदर्भात करावयास पाहिजे. कवितेतील शब्दालंकार तुम्ही जाणले पहिजेत. भले तुम्ही अचूक नाव सांगु शकला नाहीत तरी बिघडत नाही. पण ते तुमच्या ध्यानात आले पाहिजेत. अलंकारांचा अट्टाहास करण्याचा मोरोपंतांचा काळ गेला हे खरे पण चांगल्या काव्यात ते असतातच. पाहिजेतच कां? तसे नाही. गौरवर्ण, नितळ कांतीच्या युवतीच्या सौंदर्यात लाल कुंकु, काळी पोत व हिरवी बांगडी भरपूर भर घालते. वृत्त-छंद कळत असतील, छान. नाही कळत, बिघडले नाही. पण एक गोष्ट काळजीपूर्वक शोधा. " लय ". प्रत्येक कवितेला एक लय असते व कविता त्या लयीत वाचली की आनंद वाढतो. एखादी सो सो कविताही लयीमुळे लोक प्रिय होते. जराशी अतिशयोक्ती करावयाची तर म्हणता येईल की आजच्या तरुणाईच्या गाण्याला लय, ठेका असेल तर शब्द नसले तरी चालतात.

आता एक कविता घेऊन तिचा विचार करू. पु.शि.रेग्यांची ही कविता.

लिलीची फुले
तिने एकदा
चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले ... !

लिलीची फुले
आता कधीही
पाहता, डोळां
पाणी हे साकळे ... !.

पहिल्या चार ओळीत एक प्रसंग वर्णला आहे. बहुधा, एका बागेत, गर्दी नसतांना, कवीने तिला पाहिले. कोण ती? माहीत नाही; कवीलाही. तिच्या नकळत तो बघतो आहे. तिने लिलीची फुले चुंबली आणि त्या वेळी तिचे डोळे पाण्याने ओथंबून आलेले होते. लांबूनही कवीला ते जाणवले आहे.

या क्षणचित्रात ती धूसर आहे. तिच्या बद्दल कोणतीही माहिती कवी देत नाही. काय कारण असावे? तिची कृतीही क्षणिक आहे. हातातील लिलीच्या फुलांचे चुंबन. पण त्यावेळी तिचे डोळे मात्र भरून आलेले आहेत. आता धुके थोडेथोडे सरकत आहे. ती दु:खी आहे. व तिच्या दु:खाचे कारण आपल्याला कळत नसले तरी लिलीच्या फुलाचे चुंबन आपणास प्रतिकाचा उलगडा करावयास मदत करते. फुल हे प्रीतीचे प्रतिक असते. पण लिली तर क्षणभंगूर फूल. तिची प्रीतीही अशीच अल्पजीवी तर नव्हे ? आता प्रीत मावळंणार हे कळून चुकल्यामुळे तर तिचे डोळे भरून आले नाहीत? आणि ही लिली तिची अबोल प्रीती, तिची असहाय्यता व चुंबन तिची दुखावलेली आर्त भावना यांचे प्रतिक म्हणावयास काय हरकत आहे? काहीही असो, ती अतिशय दु:खी आहे व लिली हे तिच्या वेदनांचे प्रतिक आहे एवढे आपल्या हाती लागते.

दुसर्‍या कडव्यात तिचा उल्लेख नाही. आहे फक्त कवी. हा कवी संवेदनाशील आहे. त्याला जेव्हा जेव्हा लिलीचे फूल दिसते तेव्हा तेव्हा तिचे भरलेले डोळेच त्याच्या समोर येतात त्या आठवणीने त्याचे स्वत:चे डोळे भरून येतात. दुसर्‍याच्या, अनोळखी व्यक्तीच्या, दु:खाने हृदयात खोल जखम होणारे हे हळवे मन आपल्याला संतांचीच आठवण करून देते. अशीही माणसे जगात आहेत ही आजच्या स्वार्थी समाजात एक दिलासा देणारी गोष्ट आहे.

आपण कवितेच्या घाटाबद्दल बोलावयाच्या आधी शब्द या विषयावर बोलू. ईन मीन १८ शब्दांची कविता. द्विरुक्ती सोडली तर हातात शब्द येतात फक्त १४. रेगे शब्दांच्या काटकसरी बद्दल प्रसिद्धच होते. पण १४ म्हणजे अंमळ ..... संस्कृत सूत्रांची आठवण करून देतात ना? पुढच्या पंडितांना आपले ज्ञान दाखविण्याची उत्तम संधी. तर प्रथम "लिली "बदल बघू. बदलून बघा. गुलाब, चाफा मोगरा..पण ही तर सगळी सुगंधी फुले तिच्या गंधहीन जीवनाशी सर्वथ: विसंगत, लिली तिच्या भावविश्वासारखी कोमल व तेवढीच स्वल्पजीवी. उच्चारही ललित. लिलीला पर्याय मिळत नाही. एकमेव! दुसरा मला भावलेला शब्द " साकळे " आपण हा शब्द रक्ताबरोबर वापरतो.रक्त साकळते, थिजते. इथे कवीच्या डोळ्यात अश्रु थिजले आहेत, पाणी भरून आले पण खाली पडणार नाही. ते तेथेच साचून राहणार. हृदयातील सल कमी होणार नाही. इंग्रजी कविता आठवते? She must weep or she will die! खैर!

आता घाटाबद्दल बोलू, अरेच्या,... घंटा वाजली वाटते? चला. शरद सरांचा तास संपला. मागच्या बाकांवरील मुलांनी जागे व्हावयास हरकत नाही

शरद

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

21 Oct 2014 - 1:30 pm | आयुर्हित

शरद म्हणजेच नीलकांत!!!!

अजया's picture

22 Oct 2014 - 1:34 pm | अजया

अतिशय आवडला लेख.

कवीच्या मनात काय होते ते तुम्हाला कळले पाहिजेच असे अजिबात नाही. कवीची कविता तो लिहतो तेव्हा त्याची; ती तुमच्या हातात पडते तेव्हा ती तुमची होते. तुमचा अर्थ तुमच्या पुरता खरा. दुसर्‍याला दुसरा अर्थ लागला तर तो त्याच्या पुरता खरा. बरोबर कोण ? दोघेही. आणि आज तुम्हाला जे वाटले ते उद्या वाटलेच पाहिजे असेही नाही. श्रेष्ठ साहित्याचे लक्षण हे की ते तुम्हाला विचार करावयास लावते

नक्कीच!

वेल्लाभट's picture

22 Oct 2014 - 2:52 pm | वेल्लाभट

मस्तच! मस्तच! खरंच कविता ही गोष्टच वेगळी आहे

पैसा's picture

22 Oct 2014 - 10:07 pm | पैसा

केवळ सुंदर! साठ वर्षेतरी भावकविता वाचताय! आणखी काही आम्ही बोलण्यासारखं आहे का? एक अखखं आयुष्य कवितेचा अभ्यास करता आहात! फक्त मनापासून नमस्कार करते!

रंगत चाललेल्या कार्यक्रमात दूरदर्शनची 'व्यत्यय'ची पाटी यावी तसं वाटलं. लेख पूर्ण करा ही आग्रहाची विनंती.

कवीने वापरलेला एखादा शब्द बदलून पाहायचा, आणि त्याच भावाच्या जवळपास जाणारी कविता आठवून पाहायची हे दोन्ही फार रोचक वाटलं. या त-हेने कविता वाचून पाहिन यापुढे.

कवीला अभिप्रेत असलेला अर्थ आणि आपल्याला जाणवणारा अर्थ हे भिन्न असू शकतात हे अनेकदा अनुभवलं आहे. पण एकाच कवितेने पूर्णतः परस्परविरोधी अर्थ दाखवावेत हा अनुभव 'केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली' या कवितेने दिला आहे..! तो अनुभव अजूनही नेमक्या शब्दात मांडणं जमलेलं नाही. दोन्हीही अर्थ दरवेळी तितक्याच ताकदीने खेचून नेतात.

लेख आणि कविता या दोन्हीतला फरक सांगायचा तर लेख म्हणजे इस्त्री करून नीट घडी केलेला कपडा. तर कविता म्हणजे सळसळणारा रेशमी स्कार्फ.. हाती लागणारं टोक दरवेळी नवं अन् चटकन निसटेलसं..

पैसा's picture

23 Oct 2014 - 11:21 am | पैसा

प्रतिसाद आवडला!

बेसनलाडू's picture

26 Oct 2014 - 4:04 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

कवितानागेश's picture

27 Oct 2014 - 9:41 pm | कवितानागेश

अतिशय सुंदर लेख आणि छान प्रतिसाद.
इनि,
तुझी उपमा अशी लिहिता येइल ना,

तलम रेशमी शब्द,
सळसळले,
-लकाकून निसटले.

इनिगोय's picture

29 Oct 2014 - 10:17 am | इनिगोय

:-) :-)

सुहास झेले's picture

23 Oct 2014 - 7:39 am | सुहास झेले

खरे सांगायचे तर कविता ह्या प्रकाराला मी फार बिचकून असतो... ;-) वाटायचे काही कळलेच नाही आपल्याला किंवा आपल्या आकलनशक्तीच्या बाहेरचा प्रकार असावा... पण हा लेख वाचून एका वेगळ्या दृष्टीकोनातून कविता वाचण्याचा नक्की प्रयत्न करणार. ह्यावर अजून लेख येऊ द्यात :)

प्रास's picture

24 Oct 2014 - 6:39 pm | प्रास

कविता हा साहित्यप्रकार कशाप्रकारे आस्वादित करावा हा अनेक वर्षांपासून पडलेला प्रश्न, तुमच्या या लिखाणामुळे, काही प्रमाणात तरी नक्की सुटला आहे, असं नम्रपणे नमूद करू इच्छितो.

या पुढे, कृतीची जोड लागेल, बघू कसं जमतंय ते....

सुंदर लेखन.

धन्यवाद!

बेसनलाडू's picture

26 Oct 2014 - 3:51 pm | बेसनलाडू

लेख आवडला. कवितेशी समरस होणे, एखाद्या शब्दयोजनेविषयी अधिक विचार करणे, कवीच्या मनात काय चालले असेल, याविषयी अंदाज बांधणेयाहे मुद्दे विशेष पटले.
(मुद्देसूद्)बेसनलाडू

प्रभाकर पेठकर's picture

26 Oct 2014 - 9:41 pm | प्रभाकर पेठकर

>>>> कथा-कादंबरी वाचनानंतर पुस्तकातले तरंग दूर होतात. पण कवितेचे तसे नाही. मनरंजनाबरोबर काव्यात आणखी काहीतरी सामावलेले असते.

इंदिरा संत ह्यांच्या सारख्या मोठ्ठ्या कवियित्रीने म्हंटले असल्यामुळे त्यावर मी कांही भाष्य करावं एव्हढी माझी योग्यता आणि त्यांच्या इतका साहित्याचा सर्वांगिण अभ्यास माझा नाही.
माझ्या अनुभवाच्या शिदोरीच्या भरवशावर चटकन एव्हढंच लक्षात आलं की चिवि जोशी, पुलं देशपांडे, बाबासाहेब पुरंदरे, नासी फडके, नास इनामदार, वपु, आचार्य अत्रे, लक्ष्मण माने, व्यंकटेश माडगुळकर, दमा मिरासदार, शंकर पाटील ह्यांच्या, मी माझ्या शाळकरी जिवनात वाचलेल्या कथाही आज तागायत माझ्या मनात ताज्या आहेत. त्या कथांमधील पात्रे, संवाद आजही मला पाठ आहेत. आजही मला ती पात्रं, संवाद रिझवतात. त्यांनी माझे जीवन समृद्ध केले आहे. एक प्रेरणा दिली, संघर्षासाठी मानसिक बळ दिलं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कांही अमुल्य संस्कार माझ्यावर केले आहेत.

कवितांचे महत्त्व आहेच, त्यातील तरलता, भावभावनांशी मांडलेले सप्तरंगी खेळ, कवीचं व्यक्त होणं आणि रसिक वाचकांची त्या भावनांशी नाळ जुळणं अत्यंत स्वाभाविक आणि अतूट वाटतं पण कवितेचे मोठेपण अधोरेखित करण्यासाठी कथाकादंबरी प्रकाराला न्यूनतेचा दर्जा देणं हे कवियित्रीच्या कोमल आणि तरल भावनांच्या विपरीत आहे. असो.

प्रत्येकाचे विचार, एखाद्या कलाकृतीकडे बघायचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. मी माझा दृष्टीकोन मांडला आहे.

एस's picture

26 Oct 2014 - 10:45 pm | एस

लेख आवडला. पुताप्र.

स्पंदना's picture

27 Oct 2014 - 8:31 am | स्पंदना

लिहीणारा लिहुन जातो
अन त्या शब्दांत वाचणारा अडकुन रहातो.
आता हे लिहीणं जरा सव्विस्तर, मोकळ ढाकळ, उलगडुन दाखवणारं असेल तर त्याला ललित म्हणता येइल, अन नेमका घाव घालणार्‍या शब्दात उतरलं, तर कविता म्हणता येइल.
शरद सर कवितेशी तुमच नातं अधिकच उलगडलं या लेखात.

रुपी's picture

17 Aug 2017 - 3:47 am | रुपी

छान! लेख आवडला.

चाणक्य's picture

17 Aug 2017 - 11:56 am | चाणक्य

हा वाचलाच नव्हता. धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.