पुणेरी.......
लेखनप्रकार (Writing Type)
पुणेरी????????????? ह्ये काय म्हणायचं हो आता तुमचं नविन??? नेहेमीचं पुणं..पुणं..नावाचं नवं रडगाणं? कि बघा आमच्या पुण्याचं हे ठिकाण...म्हणून वाजवलेलं पिपाणं? की आणखि काही?
तर नाही बरं का तसलं काही. पुणेरी हे आमच्या पुण्याच्या आत्म्यात वसलेलं एक छोटेखानी सूखं होतं. आणि होतं म्हणायचं म्हणजे अता त्याला बंद होऊन चार वर्ष झाली. तुंम्ही म्हणाल कित्ती छळ करताय आढे आणि वेढे घेऊन..? सांगा कि लवकर काय ते!? तर सगळं कळायला जरा तुंम्हाला माझ्या वेदपाठशालिन(किंवा कालिन!) जीवनात घेऊन जातो. (आलं कि नै ..पहिलं पुणेरी श्टाइलचं वाक्य! चवथ्या मिनिटाला? ) तर..मी जेंव्हा तांबड्या जोगेश्वरीजवळच्या पुणे वेदपाठशाळेत शिकायला होतो. तेंव्हा या खर्या पुणेरी ठिकाणाची मला ओळख झाली. एखादे दिवशी पाठशाळेत शिकवणारे आमचे गुर्जी आले नाही तर,सकाळच्या भुकेच्या वेळी आंम्ही हळूच खादाडीला जायचो,त्या तिन/चार ठिकाणांपैकी हे ही एक. तसं पुणे वेदपाठशाळेचं (परंपरासिद्ध ) अधिकृत खादाडी ठिकाण म्हणजे गणपति चौकातल्या काकाकुवा मेनशन इमारतीच्या दारातला सकाळी ७ ते ११ असणारा शंकरराव वडेवाला! त्याच्याकडे चरलेला नाही...असा पुणे वेदपाठशाळेतला माझ्यासह गेल्या दोन पिढ्यातला एकही पुणेरी गुर्जी या पुण्यं'चराचरात तुंम्हाला सापडायचा नाही.(अता तो वडेवाला आहे.पण त्याची चव साफ गेलीये! )
पण एक दिवस शंकरराव नव्हता आणि आम्ही एक दोघे जणं "चला आता आपट्याकडली उपासाची मिसळ नायतर रतनकडले सामोसे/कचोरी असं कायतरी चरू.." या विचारात असताना,पलिकडनं आमच्या अट्टल पुणेरी गुरुजींपैकी एक बापमाणूस( सदर व्यक्ति,हे एक चित्रच आहे,एकदम बहुढंगी आणि रंगी सुद्धा! सांगेन कधितरी सवडीनी.) तिथनं चालला होता..आणि तो ही त्याच्याहून सवाई दोस्ता बरोबर. (हे ही प्रकरण खत्तरनाक आहे! ) त्यांनी आंम्हाला एक कचकाऊन हाक दिली.
ते:-काय रे? ..आज गुर्जी आलेले नै दिसत पाठाला?
आंम्ही:-(घाबरलेल्या अवस्थेत..) हो...म्हणजे नाही!
ते:- तरीच चरायला पालथे* पडलात इकडे! (हे या माणसाचं *नॉर्मल बोलणं आहे हां लोकहो! :D )
आंम्ही:- ..... (ओळखिच्या पोलिसाकडून दम-बसल्यासारखे - गप्प!!! )
ते:-आणि आज शंकरराव नै वाट्टं आलेला!?
आंम्ही:- (त्याच...गप्प'च्या हबिनयात! :D )
ते:- मग चला आज..आमच्या अण्णांकडे..नै तरी आमचं आजचं दुपारचं श्राद्ध चुकलेलच आहे!!!(??? :-/ )
आंम्ही:- (लॉटरी लागल्याच्या आनंदात,परंतू तो आनंद मिळावा म्हणून त्याच सुतकी पोझ मधे..) हो..येतो..चला.
पण आंम्हा तिघा पोरांपैकी २ जणं गुरुजिंना कळेल, या (नाहक) भितीपाई आले नाहित.आणि मीच एकटा त्यांच्यासह गेलो.आधी तुळशीबागेतून मंडईमधे.आणि नंतर तिथून मंडईच्या (१२महिने १३काळ फेम..) समाधान हॉटेलावरून पुढे गेलं..की उजव्या हताला वळल्यावर ज्ञानेश्वरी वाचन मंदिरा आलिकडे होतं. ते आमचं हे पुणेरी!.. पुणेरी हे ठेवलेलं नाव मुळीच नाही. तर ते त्याचं खरच असलेलं नाव होतं. तिथे मिळणार्या नाष्ट्याच्या पदार्थांवरुनही ते सिद्ध व्हायचं. म्हणजे इतर कोणत्याही साध्या उपहारगृहात उपासाची म्हणून फारतर खिचडी-ठेवलेली असते.आणि फारतर शेंगदाण्याचा लाडू! पण पुणेरी मधे उपासाच्या पदार्थांचाही साज असायचा. म्हणजे साबुदाण्याची खिचडी/शेंगालाडू तर असणारच.पण त्याशिवाय उपासाची बटाट्याची भाजी,अख्ख्या शेंगदाण्यांची आमसुल सारात केलेली ऊसळ, वेगळं(काढलेलं) दही, बटाटा चिवडा..हे ही सगळं असायचं. शिवाय पोहे,उप्पीट,सामोसे,इडली हे तर असायचच.पण पुणेरीची खासियत म्हणजे यातल्या हव्या त्या पदार्थांचं काँम्बिनेशन इथे जसं मिळायचं तसं मी तरी फारसं कुठे पाहिलं नाही. म्हणजे हल्ली पोहे सांबार हे मिश्रण बरेच ठिकाणी दृष्टीला पडतं. पण पुणेरी ते पुणेरीच! असं म्हणावं अशी त्याची अफलातून चव असायची.
झालं...... उपहारगृहाबद्दल खूप बोललो.पण आता (मुख्य) सांगायला पाहिजे ते हॉटेल चालवणार्या आमच्या अण्णांबद्दल. हो..चालवणार्याच! कारण मला ते त्यांच्या वागण्यातून तिथे कधीही मालक असल्याचे जाणवले नाहीत.नेहमी-चालकच! त्या जागेचे ते मालक होते का नाही? हे मला आजही माहित नाही.पण अण्णा ते हॉटेल खरच चालवायचे! (तिथले पदार्थांचे क्वॉलिटी लक्षात घेता असलेले दर ज्यांनी पाहिलेत त्यांना तर हे सहज पटेल.) एरवी आपण पुणेरीपणाचे लाख्खो किस्से ऐकत असतो. किंबहुना त्यावरच (हयात असलेलं)पुणेरीपण टीकून आहे,असं म्हणलं तरी बिल्कुल अतिशयोक्ती होणार नाही. पण अण्णांचं वागणं म्हणजे याचं दुसरं टोक! आतिथ्यशीलपणा हा शब्द मला जर कधी आठवला,तर त्याला १०० टक्के मॅच होणारा माणूस म्हणून मला अण्णांचं व्यक्तिमत्वच आठवेल! आणि हे सुरवातीलाच सांगून ठेवायला पाहिजे की हा काही अण्णांचा व्यावसाईक-स्वाभाव नव्हता. म्हणजे मला तरी तो तसा कधिही वाटला नाही.हॉटेलाशिवायही इतरत्र तुमची त्यांची भेट झाली. तरी अगदी हात हतात घेऊन...या हो..काय म्हणताय..बरेच दिवसांनी भेटलात! अशी अत्यंत आगत्यानी चौकशी करून मगच हा माणूस आपल्याशी बोलणार. मला व्यक्तिशः त्यांचं नावगाव काय? वगैरे काहिही माहित नाही. माझी त्यांची अगदी जानपेहेचानंही नाही. आणि मला त्याची कधी गरजही वाटली नाही. पण माणूस असा आहे...की खट्टकन लक्षात रहाणारा!!!
तांबुस परंतू दाट गोरा वर्ण,जाडही नाही नी सडपात्तळही नाही असा बसका देह.(आणि देहबोली सुद्धा) आवाजात जन्मजात विनम्रपणा असं साधारण त्यांचं वर्णन करता येइल. सकाळच्यावेळी ८ च्या पुढे पुणेरीत आपण गेलो की काऊंटरच्या भोवतीनी ..ही गर्दी उसळलेली असायची. मागनं अण्णा आणि त्यांच्या (मला वाटतं) भावाचे संयुक्त आवाज येत असायचे. पण हा भाऊ म्हणजे मात्र अगदी नेहमीचं पुणेरी रूप! त्यामुळे त्याचा सूर हा नेहमी हॉटेलच्या गर्दीला वैतागलेला असाच! इकडे अण्णा म्हणजे :- "या हो..या..! काय खिचडी देऊ? उसळ टाकयची का दही नुस्तं? मागे तुम्हाला सामोसा मोडून पाहिजे का? सांबारशेव टाकायची ना?" पलिकडे नोकराला..."एssss पाणि आणायला जा.. आणि वर उप्पीट पाठवायला सांग" असं सगळं चाललेलं असायचं आणि हे भाऊ साहेब म्हणजे..त्यांच्या इनबिल्ट वैताग मोड मधे किंचितश्या नाकातल्या आवाजात:- "एं ssssssssss अरें ती तांटली उचल नां तिथनं!" हे नोकराला..आणि ग्राहकांशी :- "आओं थांबा हो..देतो ना पोंहें...कितीं घाई लागलीये तुंम्हाला???" "चटणी संपली..नुस्ता सामोसां आंहें" अता चटणी संपली,म्हणजे कायमची नव्हे!!! तर वर ज्या घरातनं या तयार पदार्थांचा सप्लाय होतोय..तिकडनं अजून आलेली नाही...इतका त्यात दडलेला गहन आशय त्या बिच्चार्या गिर्हाइकाला कसा कळणार??? मग गिर्हाइकंही चिडूनः- "हाssssssssss...चटणी संपली तर काय नुसता सामोसा देता का?..आयला..पैशे तर सगळे घेनार!!!" असं सुरु व्हायच...पण हेच अण्णा असतील तर??? त्याच माणासाला:- " सामोसा चटणी का?..बसा हं पाच मिनिटं.चटणी येतीचे..आणायला गेलाय माणूस..बसा" असं करून त्या माणसाला आसनस्थ करायचे.
मला ज्या दिवशी त्या आमच्या गुरुजिंनी तिथे नेलं.त्या दिवसापासून मी ४ वर्षांपूर्वी हे उपहारगृह बंद होइपर्यंत अनेकदा तिथे खायला गेलो. पण वाड्याच्या जुन्या जागेतनं नव्या अपार्टमेंटच्या इमारतीत हे दुकान आलं..तरी पहिल्या नजरेत ओळखू येइल अशीच आतली मांडणी जुन्या धाटणीची राहिलेली होती. सर्व काहि साधं आणि सहज हा या उपहारगृहाचा स्वभावधर्म. मग ती तिथल्या पोहे/उप्पीटाची चव असो किंवा सामोसा सांबार शेवचा लज्जतदारपणा असो! उपासाच्या पदार्थांना मी माझ्या ह्या भटजी'च्या धंद्यामुळे विटलेला असल्यामुळे मी तिथे त्यांची चव कधिही घेतली नाही..पण एकदा ती शेंगदाण्याची (आमसुल रसातली) उसळ खाल्ली होती.कारण ती नेहमीच्या आंम्हाला दिल्या जाणार्या उपासांच्या पदार्थांना ऑफबीट,आणि त्यादिवशी बाकिचे बिगरौपासी पदार्थच संपलेले होते..म्हणूनही मी ती खाल्ली.पण माझ्या तिथल्या आवडणार्या दोन डीश मात्र १ नंबर होत्या. पहिली सामोसा(मोडून)त्यात सांबार+शेव आणि दुसरी उप्पीट डबल-सांबार शेव.(उप्पीटातल्या हिरव्यागार मस्त मटारासह!) चव साधी पण अंतरमनात रहाणारी.तिथे येणारी लोकंही अनेक प्रकारची कॉम्बिनेशन करूनच तिथे खात असत.अण्णाही त्यांना सुचवत असावे. म्हणजे साबुदाण्याची खिचडी,दही आणि त्या शेंगदाण्याच्या उसळचा नुसता रस्सा! (हे कॉम्बिनेशन खाणारे लोक तर कमीत कमी दोन प्लेट तरी उडवत असत) पोहे/सांबार शेव ..दही पोहे शेव..सांबार उप्पीट शेव..अनेक प्रकार ..पण चव अगदी A1
आणि हा चवीबरोबरच उपहारगृहातलाही साधेपणा मुद्दाम आज सांगायचं कारण म्हणजे,...हल्ली पुण्यात हॉटेलं आणि अश्या छोट्या उपहारगृहांना जाणूनबुजुन सांस्कृतीक नाव द्यायची आणि आतलं ईंटी-रियर करायची,आणि त्याहून भयानक मिनु छापायची...जी गाढव चढा-ओढ लागलीये...ते!!! आणि ते पहाता हे ही सांगायला हवं की संस्कृतीची खूण किंवा ओळख ही नुसती नावं देऊन होत नाही..आधी तिचे दोन/चार थेंब आपल्या अंतरीही रुजलेले असायला लागतात. तेंव्हा ती संस्कृती तुमच्या हॉटेलात आणि नावात असल्याची जाणवेल. (टिव्ही वरच्या तथाकथीत कौटुंबिक आणि सांस्कृतीक मालिकांची नावं..हा देखिल एक असलाच अचरट्पणा आहे. आणि पंचतारांकित हॉटेलांमधून तर मी चमचे पुसयचीही पद्धत पाहिलेली आहे.यांच्या संस्कारीत-सेवा-शि'क्षणात त्या वेटरवर्गाला ग्रहकांशी हसायलाही बहुधा शिकवत असावेत!... सर्व काही कृत्रीम आणि अभिनय संपृक्त!)
आज आण्णा आणि त्यांचं उपहारगृह तुमच्या समोर मांडण्याची बुद्धी झाली.कारण गेल्या अठवड्यात आंम्ही इथलीच काही दोस्त मंडळी एका पुस्तकाच्या दुकानात असताना,मला तिथे अण्णा भेटले.(त्यांच्या त्या भावासह! )
यातले पहिले अण्णा(पांढरा शर्ट) आणि शेजारी तो (निळ्या शर्टात्)त्यांचा भाऊ.
मी त्यांना पाठमोरं पाहिलं पण त्या वात-अनुकूलीत दुकानात मोठ्ठ्यांदी सोडाच,पण साधी हाक मारायलाही बिचकलो. (हे आवाजाचं सोवळं..तसल्या दुकानांमधे पाळायलाच लागतं!) मग म्हटलं जरा फिरु द्यावं त्यांनाही आणि मग हळूच जवळ जाऊन 'आवाज द्यावा'.मग काहि मिनिटं गेल्यावर मी त्यांच्या मागे जाऊन उभा राहिलो. पण त्यांचं ते ही कादंबरी ते पुस्तक असं चाललं होतं. मग जरा वेळानी त्याच दुकानाच्या एका भागात फिरताना.. मला योग्य वेळ वाटली आणि मी जवळ जाऊन (मागून)म्हणालो.. नमस्कार अण्णा एका क्षणात (त्यांच्या स्वत:च्याही नकळत) ते वळले आणि अगदी माझे हात हतात घेऊन..."अरे...!!या हो या... बोला काय म्हणताय?" असे सहज ओपन झाले.मग मी ही त्यांना "नाही..मित्रांबरोबर जरा पुस्तकं वगैरे घेतोय" असं पहिलं (काहिच न सुचल्यामुळे) वाक्य टाकून जरा बोलायची तयारी केली.वास्तविक मला त्यांनी पुणेरी..हे रिटायर्डमेंटच्या वयात ते आल्यामुळे,त्यांनी ते बंद केलय,असा अंदाज आलावता पण तरिही मी न रहावून त्यांना:- "आण्णा आपलं पुणेरी बं...दच ना आता?" असं बोललो. माझ्या प्रश्नातलं जे ओळखायचं ते ओळखून त्यांनी तितक्याच सहजतेनी आणि त्यांच्या निसर्गदत्त विनम्रपणानी सांगितलं..."हो...आता बंदच!!!" हा बंद शब्द मी इतका आशयपूर्ण बरेच दिवसानी ऐकला. त्या बं....द'तला एक जिवंत फुल...स्टॉपही अनुभवला...मनात साठवलाही.आणि पुढचा कुठलाही..."चला भेटू परत" अश्या आशयाचा औपचारिक डायलॉग न होता.. ते ही पुस्तकांकडे वळले..आणि मी ही!
....................................................=========================......................................................
मी त्यांना पाठमोरं पाहिलं पण त्या वात-अनुकूलीत दुकानात मोठ्ठ्यांदी सोडाच,पण साधी हाक मारायलाही बिचकलो. (हे आवाजाचं सोवळं..तसल्या दुकानांमधे पाळायलाच लागतं!) मग म्हटलं जरा फिरु द्यावं त्यांनाही आणि मग हळूच जवळ जाऊन 'आवाज द्यावा'.मग काहि मिनिटं गेल्यावर मी त्यांच्या मागे जाऊन उभा राहिलो. पण त्यांचं ते ही कादंबरी ते पुस्तक असं चाललं होतं. मग जरा वेळानी त्याच दुकानाच्या एका भागात फिरताना.. मला योग्य वेळ वाटली आणि मी जवळ जाऊन (मागून)म्हणालो.. नमस्कार अण्णा एका क्षणात (त्यांच्या स्वत:च्याही नकळत) ते वळले आणि अगदी माझे हात हतात घेऊन..."अरे...!!या हो या... बोला काय म्हणताय?" असे सहज ओपन झाले.मग मी ही त्यांना "नाही..मित्रांबरोबर जरा पुस्तकं वगैरे घेतोय" असं पहिलं (काहिच न सुचल्यामुळे) वाक्य टाकून जरा बोलायची तयारी केली.वास्तविक मला त्यांनी पुणेरी..हे रिटायर्डमेंटच्या वयात ते आल्यामुळे,त्यांनी ते बंद केलय,असा अंदाज आलावता पण तरिही मी न रहावून त्यांना:- "आण्णा आपलं पुणेरी बं...दच ना आता?" असं बोललो. माझ्या प्रश्नातलं जे ओळखायचं ते ओळखून त्यांनी तितक्याच सहजतेनी आणि त्यांच्या निसर्गदत्त विनम्रपणानी सांगितलं..."हो...आता बंदच!!!" हा बंद शब्द मी इतका आशयपूर्ण बरेच दिवसानी ऐकला. त्या बं....द'तला एक जिवंत फुल...स्टॉपही अनुभवला...मनात साठवलाही.आणि पुढचा कुठलाही..."चला भेटू परत" अश्या आशयाचा औपचारिक डायलॉग न होता.. ते ही पुस्तकांकडे वळले..आणि मी ही!
....................................................=========================......................................................
प्रतिक्रिया
बुवा, पुण्यातल्या खाण्याच्या
A1 लेखन! शेवट तर क्लास!!
संस्कृतीची खूण किंवा ओळख ही
+१ छान लेखन.
बुवा, अतिशय छान लिहिलंय
एकच नंबर!
छानच
बुवा जायला लागले आनी हळूहळु
अपना घर असं हिंदी नाव असलेला
भावलं शब्दचित्र. किती सहज
सुरेख लेखन.
@बोका-ए-आझम
काय सांगताय काय?
(No subject)
सुंदर लेख... भावपूर्ण शेवट !!
हृद्द्य आठवणी...
किती छान लिहिलय्त गुर्जी
अतिशय सुंदर, सहज, ओघवते लिखाण गुर्जी!!
लेख आवडला.
फर्मास लेख.
छानच ओळख करुन दिली आहे
मस्त, मजा आली वाचून.
मिपावरील सर्व ठि़काणी
अर्रे वा.. आमाला पण ती लिष्ट
सुंदर लेख!
@ अप्रतिम चव! >>> येस्स!
लेख आवडला...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reformsलेख आवडला. हे तुळशीबागेतले
तेच ते.
मिसळीत पोहे असलेलं ना? ते
पोहे टाकतात का नाही ते नीटसं
हम्म...
रस्सा अजून हवा असेल तर
हायला.
आईग्ग! मी फक्त ती एकच गोडसर
सुंदर लेख.आवडला.
ओके
+१
छान..
अतिशय समर्पक ओळख
महानाझ अजूनही चालू आहे ओ.
अरे वा!
त्या एवढ्याशा गल्लीला नाव
त्या एवढ्याशा गल्लीला नाव
त्यात काय?
अवांतर
@धन्यवाद आत्मु गुरुजी.>>
+१
क्या बात है!
मस्त लेख
Pagination