Skip to main content

पाकीट हरवते तेव्हा ......

लेखक विटेकर यांनी बुधवार, 17/09/2014 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
दि. १४ सप्टे. ला टि.म.वि. गुलटेकडी येथे काही कामानिमित्त गेलो होतो . दुपारी २ वाजता घरी आलो तर आपले पाकीट पडले आहे असा साक्षात्कार झाला ! पाकीटात ४-५०० रुपये , २ क्रेडिट कार्डे , २ डेबीट कार्डे आणि ड्रायविंग लायसेन्स असा ऐवज होता. भूक लागली होती म्हणून पहिल्यांदा जेवायला बसलो , जेवत असताना विटुकाकूने जे काही ऐकवले तेही निमूटपणाने गिळले. तिच्या मते मी ताबडतोब कार्डे रद्द करायला हवीत. मी शांतच होतो आणि पाकीट ज्याला सापडले ती व्यक्ती नक्की फोन करेल हा विश्वास होता. ( अशावेळी मी शांत असलो की विटुकाकू भयानक चिडते असा अनुभव असल्याने फक्त अस्वस्थ असल्याचे नाटक केले ) .. ब्यांकेचा फोन नम्बर सापडत नाही , फोन उचलत नाहीत असा काही टैमपास केला. थोड्यावेळाने विटुकाकूने "मरु दे" म्हणून फालोअप घेणे बन्द केले. ( तिची तेवढीच चिकाटी असते , त्यामुळे माझा दम अजून टिकून आहे ) पण माझा एक डोळा सतत फोनवर होता. कोणीतरी फोन करेल किंवा आणखी एक दुष्ट शंका - कार्डावर व्यवहार झाला की समस येईल ! अर्थात नवीन सुरु झालेली पिन ची अनिवार्यता माझ्या पथ्यावर होती. संध्याकाळी बिग बाजारला जायचे होते पण पाकीट्च नाही म्हणत टाळाटाळ केली, पण विटुकाकूने जोर धरला, तिलाही पिशव्या उचलायला माणूस हवे होते, आणि मी तरी घरी बसून काय करणार होतो ? नुस्त्याच पिशव्या उचलायच्या, पैसे द्यायचे नाहीत हाच त्यातल्या आनंदाचा भाग होता ! कशीबशी रात्र काढली , रात्रीत ही २-३ दा मोबाईल चेक केला , कुणाचा मिस कॉल नाहे ना ? कार्डावर व्यवहार झाला नाही ना ? याचसाठी ! सगळ्या उठल्यावर विटुकाकूने पुन्हा पिळायला सुरुवात केली, सकाळच्या चहाबरोबर ती मौक्तिके गिळली. खरेतर आता माझाही धीर खचू लागला होता. पाकीट हरवून आता १८ तासापेक्षा जास्त कालावधी गेला होता. गुलटेकडी ते कोथरुड या रस्त्यावर जर पा़कीट पडले असेल तर ते इतका वेळ रस्त्यावर पडून राहाणार नाही. आता एक वेगळीच शंका आली, मी विड्यापीठात जाताना खरेच पाकीट नेले होते का ? (असले संदेह निर्माण करण्यात विटुकाकूचा हात कुणी कुणी धरु शकणार नाही , भल्या- भल्यांच्या आत्माविश्वासाला ती पाणी पाजू शकते!) तिच्याच मदतीने सारी कपाटे उपसली,सगळ्या प्यांटा चेक केल्या , त्यातल्या एका प्यांट्चा खिसा फाटल होता , त्यावरुन पुन्हा एकदा ऐकून घेतले ! असे खिसे असतील तर पाकीट हरवेल नाही तर काय ? वास्तविक जन्मात पहिल्यांदा माझे पाकीट हरवले होते.पण प्रतिवाद करण्याची ही वेळ नव्हती, "पिंजर्‍यामध्ये वाघ सापडे | बायकां पोरे मारती खडे ||" अशी अवस्था ! एव्हाना मुले उठली होती , त्यांच्याही लक्षात आले की बाबाने पाकीट हरवले आहे,ती ही माझ्याकडे सहानुभूतीने पाहू लागली आणि कपाटे उपसायला मदत (?) करु लागली ( ती उपसलेली कपाटे अजून लावायचीत, या विकान्ताच्या यादीत हे एक काम आहे ) पार्किन्ग मध्ये जाउन कार चेक करुन आलो. मग ठरवून टाकले , हरवले ते हरवले ! पुढे आणिक मेळवावे, तेव्हा चलो हापिस ! आणि हापिसात गेल्या- गेल्या पहिले काम कार्डे रद्द करुन टा़कू. ज्याला मिळाले त्याला लखलाभ ! मनातल्या या विचाराचे प्रकटीकरण केल्याबरोब्बर , तरी मी तुला कालच सांगत होते .. हा अपरिहार्य डायलॉग आलाच ! पराभूत मानसिकतेतच गाडीत बसलो, अजूनही कोठेतरी आशा वाटत होती, की कुणाचातरी फोन येईल.. पा़कीट हरवले त्यापेक्षा ज्याला सापडले त्याचा फोन येत नव्हता याचा जास्त त्रास होत होता . त्याला कारण ही तसेच होते . बरोब्बर ४ आठवड्यापूर्वी बालशिक्षण समोर आमच्या चिरंजीवाना एक पा़कीट सापडले , त्याने ते घरी आणून माझ्याकडे दिले होते , पाकीटात ४- ५ कार्डे , १७०० रुपये पण ज्याचे पाकिट आहे त्याचे बिजनेस कार्ड नव्हते ! मी कार्डावरील नाव वाचून त्या ब्याण्केला फोन केला ( स्टेट ब्यांक ) त्यांनी सांगितले की हे कार्ड संबंधित ग्राहकाने रद्द केले आहे ! सबब या संदर्भात काहीही करता येणार नाही. फोन कट ! मग आय सी आय सी फोन केला. त्यांचे ही कार्ड रद्द केले होते , आणि त्यांनी ग्राहकाची अशी माहीती देता येणार नाही असे सांगितले, नग मी माझा फोन नम्बर त्या ग्राहकाला द्या असे सान्गितले .. तेव्हा ३-४ मिनिटे होल्ड करुन ठिक आहे आम्ही तुमचा नंबर संबंधित ग्राहकाला देऊ असे सांगतले ! ( प्रत्यक्षात दिला नाहीच !) हे पाकीट त्या सदगृहस्थापर्यन्त पोहोचवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे ड्रायविन्ग लायसेन्स ! ते मुंबै चे होते. (ड्रायविन्ग लायसेन्सवर फोन नंबर का लिहित नाहीत राम जाणे ! ) उद्या - परवा त्या पत्त्यावर कुरियर करणे हा एक मार्ग होता. आता मोर्चा त्याच्या प्यान कार्ड कडे वळविला. कल्याण ला माझा एक मित्र इन्कम ट्याक्स मधे आहे , त्याला विचारले की प्यान नंबर वरुन माणूस शोधता येईल का ? असे विचारल्यावर " काय सांगता येणार नाही रे , तू आपला सरळ पोलिसांच्याकडे जा " असा खास सरकारी सल्ला दिला ! आणि मला कोणत्याही परिस्थितीत पोलिसांच्याकडे जायचे नव्हते ! आता ट्रू कोलर वर नाव टाकून पाहीले ! उत्तर इल्ले ! चेपु वर त्याच नावाची / ततसद्रुष्य ४-५ नावे होती , त्यांना " तुमचे पाकीट हरवले आहे का असा फेस्बुक मेसेज टाकला. उत्तराची वाट पाहू लागलो. यात दिवस गेला. दुसर्‍या दिवशी सहज गूगल ला नुसते नाव टायपले , पहिल्याच सर्चवर क्लिक केले तर ते नाव एका डिलरशिपचा ग्राहक संपर्क क्रमांकाचे होते . ताबडतोब फोन लावला तर " साहेब मिटिंग मध्ये आहेत" हे उत्तर ! कालपासून वैतागलो होतो , जरा जोरात बोललो , "त्यांच्याशी पर्सनल काम आहे, ताबडतोब फोन द्या " मग महाराज फोन वर आले ! पहिला प्रश विचारला , पाकीट हरवले आहे का ? " हो" ..उत्तर आल्यावर एक दिर्घ श्वास घेतला आणि कालपासूनचे सारे सारे डाऊनलोड केले. संध्याकाळी महाराज सहकुटुंब घरी आले , येताना मिठाई घेऊन आले होते ...! या सगळ्या पार्श्व्भूमीवर आपले पाकीट मात्र मिळत नाही याचा खूप त्रास होत होता. नुक्ताच इस्पिक एक्काच्या धाग्यावर प्रामाणिक पणा - चारित्र्य , चांगल्या कामाचे चांगले फळ वगैरे ठासून सांगितले होते. पैसे हरविल्याचे दु:ख वेगेळेच पण आपल्या चांगल्या वर्तणुकीचे चांगले फळ आपल्याला का मिळत नाही याचा अधिक त्रास होत होता. अशा विचारांच्या गर्तेत चांगला हिण्जवडी पर्यन्त आलो आणि फोन वाजला, मिस कोल करुन क्षणात बंदही झाला. ताबडतोब डायल केले, " सायेब तुमचं पाकीट सापडलयं, हिथचं वर्ग झाडत होतो , बाकाखाली पडलेले सापडलं " " आपण कोण बोलताय ?" "मी जयवन्त पवार , हितं प्युन आहे , मी ३ वाजेपर्यन्त असतो , तेज्या अगुदर घिउन जावा " फोन बन्द ! मी गाडी बाजूला लावली , दोन्ही हात वर करुन स्वतः कडे खेचले आणि " या..हू" असा जोरात ओरडलो. ताबडतोब विटुकाकूला फोन लावला, माझ्या उत्साहित स्वरावरुन तिने काय ते ओळखले ! पाकिट आणायला तिलाच पिटाळले ... श्री. जयवंत पवार यांनी बक्षिशी स्वीकारली नाही . माझा चांगुलपणवरील विश्वास अधिक दृढ झाला . ( या दोन्ही घटना खर्‍या आहेत , दिनांक ही खरा आहे आणि श्री. जयवंत पवार ९६०४६०१२७० हे नाव ही !)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 15009
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

विटुकाकू सारख्या काकू सगळ्याच्याच पाचवीला पूजलेल्या आहेत हे वाचून खूप बर वाटल .. दुसर्याचे दु:ख पाहून माणसाला जरा समाधान वाटते ! म्हणून गर्दित माणूस सुखी होतो ! आणि पाचवी चे काय घेऊन बस्लात ? ती भानगड त्या जन्माची असते ! ही सात जन्माची भानगड आहे , आणि हा चालू आहे तो कितवा माहीत नाही ! घाला बोटे !

In reply to by विटेकर

>>>> घाला बोटे ! हे काही आवडले नाही बुवा! *smile* . *smile* . *smile*

In reply to by प्रभाकर पेठकर

पु. लं च्या "म्हैस" मधले वाक्य आहे ते ! "हातखंब्यास यष्टीने कोंबडी मार्ली न तं चार तास गेले, हित तर आख्खी म्हैस आहे म्हैस ! कोंबडीस ४ तास तरं म्हशीस किती ?
घाल बोटे !
काय समजलास?"

खुमासदार लेख. सहजशैली आवडली. अनुभवाचा शेवट गोड झाला हे उत्तम. श्री. पवार यांचे विशेष कौतुक वाटले. पण अन्य वाचकांनी सुचवल्याप्रमाणे पुढील मनस्ताप टाळण्यासाठी कार्ड ब्लॉक करणे उत्तम. हे फक्त खबरदारी म्हणून करावे.

माझा चाव्यांचा जुडगा कोठेतरी पडला राव,पण त्याच्यावर नाव नंबर नसल्याने कोन परत देणार बरे ?

छान अनुभव! असे पैसे बियसे बरेचदा जातातही पण ते सगळं कृष्णार्पण म्हणून गप्प बसावं.

In reply to by पैसा

छान अनुभव! असे पैसे बियसे बरेचदा जातातही पण ते सगळं कृष्णार्पण म्हणून गप्प बसावं. कृष्णाच का? गंगा ,गोदावरी चालेल का? अरबी समुद्र......?

In reply to by विटेकर

तो कॄष्ण .. परमात्मा ,.. कंस चाणूर मर्द्नम वाला! बरं मंग ख्रिस्त, महंमद, राम्,शंकर...........गुरु नानक, कबीर चालतील काय? आनी साईबाबा?

In reply to by विलासराव

बागेत वाळत घातलेले कपडे आत आणून कॉटवर टाकल्यानंतर त्यांचा जो ढीग तयार व्हायचा त्याला आमच्या मातु:श्री 'अरबी समुद्र' म्हणायच्या, ते आठवले. टीपः कन्नडमध्ये अरबी/अरिबी = कपडे.

don't keep wallet in pants pocket असा सर्च मारा अन इमेज/ टेक्स्ट दोन्ही पहा/वाचा. हे पण पहा. http://imanassal.blogspot.in/2012/01/dont-sit-on-your-wallet.html माझ्यावालं पाकीट एस्टीत चढतांना मागल्या खिश्यातून मारलं गेलं तवापासून पाकीटफिकीट वापरत नाय. ज्या काय नोटाफिटा आसत्यात त्या मागल्या खिशात बिनधास्त ठिवतो. उधारपत्रे, गाडी चालवायचा परवाना, कायम खातं क्रमांक, (हे सम्दं वर्जीनल), प्रदूशन न कर्नारी गाडी आसल्याचं प्रमानपत्र, द्येवाचा छोटा फुटो, रेवूनू स्टाँप, मेडीकलचे बिलं, पाच-धा रूपायाची एखांदी नोट, कान कोरायाची कापसाची काडी, चश्मा पुसायचा छोटा कपडा (दोन्हीबी आत्तापोत्तोर वापारल्येले नाय), उधारपत्रावर प्रेटोल भरल्याच्या पावत्या, लायब्रीकार्ड, बाकी सटरफटर कागदं - एवढा सगळा माल सदर्‍याच्या पुढल्या खिशात लोकलमदी विकायला येतं त्या प्लाश्टीकच्या पाकीटात ठिवतो. हालताध्वनीबी तिथंच ठिवतो. द्येवकृपेने आतापोत्तोर काय धोका झाल्येला नाय. इटेकर सायेबांचा नशिब लय जोरावर दिसतंया म्हनून त्येंच्यावालं पाकीट परत गावलं. उधारपत्र हारवल्यास लगेच बंद करनं एकदम चांगला उपाय हाये. बाकी प्रेटोलपंपावर म्या कधीबी पीन दिलेला नाय. बाकी लोकांना द्यावा लागतो का काय?

पाभे ! उत्तम माहीती आहे ! बाकिच्यांचे अनुभव वाचायला आवडतील.

मी बारावीत असतांना थिएटरला पिक्चर पाहायला गेलो होतो. तिथेच पाकिट पडले. पाकिटात पंधरा रुपये, कॉलेजचे आय कार्ड आणि आवडत्या हिरवणिचा, काजोलचा, एक फोटु आणि काही सुटे पैसे असा ऐवज होता. घरी आलो तरी लक्षात आले नाही. थोड्या वेळाने चुलत भावाचा फोन आला. काय रे पाकिट कुठे तुझे? म्हंटले ह्याला काय करायचे? मग पुन्हा आवाज चढवुन विचारले की कॉलेजला न जाता चोरुन पिक्चर ला जातोस का? (मनात: चायला ह्याला कसे माहित?) मग लक्षात आले की पाकिट हरवले आहे. आणि कदाचित थिएटरातच असतांना हरवले आहे. मग कळाले की थिएटरातला एक जण त्याचा ओळखीचा होता, त्यानेच आडनाव पाहुन माझ्या भावाला कळवले. आणि अखेर माझे पाकिट मला मिळाले. त्यावेळी त्या थिएटरातल्या भल्या माणसाला बक्षीस देण्याचे मात्र राहुन गेले.

सुंकलं काढून नवी भिकबाळी घातल्यानंतर सुंकलं आणि सोन्याची चीप असलेली पिशवी राह्यली होती उसाच्या रसवाल्याकडे!! तासाभराने लक्षात आलं, पण दोन्ही वस्तु होत्या तशा परत मिळाल्या.