Skip to main content

......आणि आमची पितरं जेवली.

लेखक भिंगरी यांनी शुक्रवार, 19/09/2014 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
. पितृपक्षात पितरांना जेवायला घालतात. एक पिढी गेली कि पुढच्या पिढीचा नंबर...... माझे सासूसासरे असताना आमच्याकडे द्वादशीला पितरं असत. ते दोघेही गेल्यानंतर (सासरे चतुर्दशीला व सासूबाई पितृपक्षात नवमीला गेल्या.)श्राध्द कोणत्या दिवशी घालावे हा प्रश्न पडला. कारण प्रत्येकवेळी वेगवेगळे करणे सगळ्यांच्या दृष्टीने सोपे नव्हते.म्हणुन ब्राह्मणाने अष्टमीला दोघांचे एकत्र करायला सांगितले .त्याप्रमाणे १९९८ च्या पितृपक्षात अष्टमीला केले. आम्ही वेगळे राहत असलो तरी सासू-सासरे आमच्याकडे राहत असल्याने सगळी कार्ये आमच्याकडेच होतात.त्याप्रमाणे हेही कार्य झाले. दरवेळी द्वादशीला आणि आता अष्टमीला,थोडं वेगळंच वाटत होतं. आमच्या भागात पावसाळ्यात खूप पाणी साचते. त्या वर्षी (१९९८)खूप पाऊस झाला आणि पूर आला. आम्ही जेथे राहतो तेथे खाली तळमजल्यावर इस्पितळ होते. त्या स्त्रीरोगतज्ञ डॉ.आणि माझे खूप चांगले सबंध आहेत. त्यांनी सकाळीच विचारले की जास्त पाणी आले की रुग्णांची रहायची सोय तुमच्याकडे होऊ शकेल का?आम्ही होकार दिला फक्त त्यांना अंथरुणे मात्र तुमचीच द्या असे सांगितले. सकाळी १० नंतर पाणी चढू लागल्याने इस्पितळाची उपकरणे आमच्या मोठ्या गच्चीत ठेवली. पत्र्याचे आच्छादन असल्याने भिजण्याचा प्रश्नच नव्हता. नंतर एक एक रुग्ण येऊ लागले .एकंदरीत १० बायका होत्या. त्यातील ८ बाळंत झालेल्या होत्या त्यांची ८ छोटी बाळे २ शस्त्रक्रिया झालेल्या,आणि प्रत्येकीबरोबर कुणाची आई किंवा सासू अशा १० बायका ३ पुरुष तसेच डॉ.व त्यांच्या परिचारिका असे ३४ जण आमच्याकडे आले. घर मोठे असल्याने सगळ्यांची सोय झाली बायकांना दिवाणखान्यात,माझे पती व मुले मुख्य शयनकक्षात तर डॉ. व मी दुसऱ्या शयनकक्षात तर परिचारिका स्वयंपाकघरात अशी व्यवस्था केली.पुरुषांना मात्र जिन्याजवळच्या मोकळ्या जागेत बसण्याची सोय केली. पाणी ७ फुटापर्यंत वाढले होते. सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. आम्ही रुग्णांसाठी दुपारच्या जेवणात वरण भात व भाजी बनवले. त्यांना जेवू घातल्यावर आम्ही जेवलो.संध्याकाळी चहा दिला तेव्हडे दूध घरात होते. पाणी चढल्यामुळे वीजप्रवाह खंडीत केलेला होता. दूरध्वनी बंद होते.(त्यावेळेस आमच्याकडे मोबाईल नव्हते.) संध्याकाळी अंधाराचे साम्राज्य पसरले होते. भयाण शांततेत फक्त पाण्याचा आणि कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येत होता . संध्याकाळी आमच्या इमारतीतील वरच्या मजल्यावरील कुटुंबाने रुग्णांसाठी वरण बनवून दिले आम्ही भात व टोमाटो बटाट्याची भाजी बनवली, सगळे पोटभर जेवले. आम्ही न झोपता पाण्याची पातळी पाहत होतो. अखेर पहाटे ३ नंतर पाणी ओसरू लागले. सकाळी ६ वाजेपर्यंत सगळे पाणी ओसरून गेले. परंतु इस्पितळाची स्वच्छता होईपर्यंत रुग्ण नेता येत नव्हते.त्यामुळे सकाळचा चहा व पाव त्यांना आम्ही दिला. ६ नंतर पाणी ओसरल्याने त्यांचे नातलगही येऊ लागले होते. दुपारी रुग्ण पुन्हा इस्पितळात गेले. त्यांच्या नातलगांनी त्यांना जेवण आणले.सर्वजण गेल्यावर घर साफसूफ केले. आमचेही नातलग आम्हाला भेटायला आले. आमच्या दिराचे सहजच दिनदर्शिकेवर लक्ष गेले आणि ते म्हणाले, अरे काल तर द्वादशी होती म्हणजे आपली सगळीच पितरं जेवली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8273
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

वाचता वाचता डोळे भरुन आले. तुमचे पितर नक्कीच समाधान पावले असतील. दरवर्षी भटाब्राह्मणांना बोलावून दक्षिणा देण्यापेक्षा असे कांही करा.

बर्‍याच वेळा पाणी आले,पण शक्य तेव्हढ्या रुग्णाना घरी पाठवून दिले जात असे त्यामुळे २ ते ३ रुग्णच सांभाळावे लागले.उपकरणे मात्र प्रत्येक वेळी येत असत.आता त्यांनी ६ वर्षापुर्वी इस्पितळाची जागा बदलली आहे.

छान केलेत ! खरेतरं श्राद्ध -पक्ष न करता ( किंवा फारसे अवडंबर न करता ) सामाजिक संस्थाना मदत करावी , हे खरे पुण्याचे काम ! समर्थांनी म्हंटले आहे ... मेले माणूस भोजना येते | या नांव भ्रम !

In reply to by विटेकर

भस्मिभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः|| खूपच छान कार्य घडले तुमच्या हातून.

ग्रेट अनुभव! मी विचार करतेय, इतक्या लोकांना एकवेळ घरात बसू देईन, पण जेवण तयार करून वाढणे शक्य होईल का मला? त्यात ती लहान नवजात बाळं म्हणजे घर स्वच्छ तर ठेवलेच पाहिजे!

In reply to by भिंगरी

झाssलंssss? मस्तपैकी आरामात बसून जेवणाची लज्जत लुटायला मिळणार अशी आशा पल्लवित होत नाही तोच.........!

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकरकाका तुम्हाला आराम देउ,आणि फुंटीलाच कामाला लावू.

In reply to by शिद

नकीच गल्ली चुकली आहे त्यांची. ज्याला ते चुक म्हणताहेत तो शहाणपणा आम्ही तीस वर्षांपूर्वी केला होता. (असं लिहावं लागतं. ह्यांचा कांही भरवसा नाही. दाखवतीलही ही पोस्ट काकूंना.)

खरंच उत्तम काम केलेत ! जर तुमचे पूर्वज हे जाणू शकत असतील तर पितृपक्षातल्या जेवणाच्या ताटापेक्षा तुम्ही केलेल्या या कृतीमुळे त्यांना तुमच्याबद्दल अधिक प्रेम आणि सार्थ अभिमान वाटला असणार !

एक उत्तम सामाजिक काम केलेत.

खूपच छान. परंपरा नुसत्याच पाळण्यापेक्षा त्या मागचा हेतू समजून घेऊन कालानुरुप बदल करत चांगले बदल हळू हळू घडवता येतात ह्याचं प्रात्यक्षिक म्हणावं असं उदाहरण!

इतक्या लोकांची आयत्यावेळी उत्तम सोय करणे, त्यात बाळं, बाळंतिणी, खरच फारच सुरेख काम केलंत. खरा धर्म हाच की.

सहिच भिंगरी तै!

@अरे काल तर द्वादशी होती म्हणजे आपली सगळीच पितरं जेवली.>>> ह्या भावनेला सलाम!

हे सर्व करण्यासाठी माझ्या पतीनेही परवनगी दिली माझा मोठा मुलगा त्यावेळेस मलेरियाने आजारी होता.मी रुग्णांचे करत असताना त्यांनी मुलाची व्यवस्थित काळजी घेतली. आणि आजही त्यांच्या नंतर मुलेही मला अशा कामांना सहयोग देतात म्हणुनच हे शक्य होतं.

तुम्हाला केलेला माझा हा नमस्कार माझ्या सर्व पितरांसाठी. शक्य असल्यास, तुमच्यासारखे वागायचा प्रयत्न करायला मलाही आवडेल.

तुमच्याविषयीचा आदर वाढला.

सम्द्यांचे प्रतिसाद वाचून बिन्गरीताय लय खुश झालीय ...आभार कसे मानावेत हेच तिला कळना..एक शब्दही तिच्यान टंकवेना बघा....तवा बिन्गरीताय्च्या पिर्माच पर्तिक म्हणून समद्यांना जेवाय बोलवील हाय...कवा ते बिन्गारीताय डिक्लेअर करतीलच...

भिंगरीताईंना सलाम! व
अरे काल तर द्वादशी होती म्हणजे आपली सगळीच पितरं जेवली
अगदी पॉझिटीव दृष्टीकोन आहे हा.!

खरोखर कौतुकास्पद काम केलेत तुम्ही. तुमच्या घरच्यांना आणि तुम्हालाही साष्टांग दंडवत. (अशा प्रसंगी आपण कसे वागु याचा विचार करणारा) पैजारबुवा,