मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मैत्रीण

विवेकपटाईत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
(पात्र: ताई: उमेश ची मोठी बहिण, उर्मी: उमेशची बायको, उमेश) उर्मी: वन्स, तुम्ही समजवा न उमेशला, तुमच ऐकेल तो. मी पुष्कळ प्रयत्न केला माझं ऐकतच नाही. एकच रट लाऊन बसला आहे, पहिले मुलगा पाहिजे, मुलीचं नंतर बघू. वन्स, लग्नानंतर पहिल्यांदा गर्भार राहिली आहे मी. पहिले मुलगी झाली तर काय झालं. मी त्याला म्हंटले, पुन्हा गर्भात मुलगी आली तर मी नाही म्हणणार नाही गर्भपाताला. भावाला बहिण पाहिजेच. मग बहिण मोठी असेल तर काय फरक पडतो. ताई: पुष्कळ फरक पडतो, तुला माहित आहे, बाबांनी माझ्यासाठी इंजिनिअर मुलगा बघितला. सालंकृत कन्यादान केल, सव्वा लाख हुंडा दिला वर २० तोळे सोन ही. त्याच वेळी उमेशला इंजिनीरिंग मध्ये अडमिशन साठी २ लाख पाहिजे होते. वडिलांनी नकार दिला. त्याच इंजिनीअर व्हायचं स्वप्न, स्वप्नच राहिलं. तू, तुझ्या जिद्दीपायी त्याच्या होणाऱ्या मुलाचं स्वप्न ही भंग करणार का? कदाचित त्याला मुलगी नकोच असेल. कालच उमेशचा फोन आला, होता. तुला समजवायला सांगितल आहे. तुला इथे सोडून, तो वात्सल्य क्लिनिक मध्ये गेला आहे, अपॅाइंटमेन्ट घेण्यासाठी. उर्मी: ताई मोठ्या आशेने मी इथे आले होते, पण तू सुद्धा, तुला पटतयं का, हे?. मी गर्भपात करणार नाही, माझा पक्का निश्चय आहे. ताई: तुझ्या या जिद्दीपायी उद्या उमेशने तुला सोडून दिले तर तू काय करेल? आधी आपल्या आई-बाबांना विचार या बाबतीत. उर्मी: (काहीच बोलत नाही) ताई: तू त्यांना विचारल असेलच. त्यांनीही तुला म्हंटल असेल, उगाच बाऊ करू नको, शुल्लक गोष्टीचा. अरे, संपूर्ण आयुष्याची कमाई खर्च करून त्यांनी तुझे लग्न लाऊन दिले. पुन्हा मुलगी, शुल्लक कारणावरून माहेरी आली, त्यांना कसं चालेल? उर्मी: मी नौकरी करेन, कुणी आसरा नाही दिला तर एकटी राहेन. पण गर्भपात करणार नाही. ताई: मूर्खासारखे बडबड करू नकोस. हे जग लांडग्यांनी भरलेल आहे, एकट्या स्त्रीला लोक फाडून खातात. असला विचार डोक्यात मुळीच आणू नको. उर्मी: (मोठ्याने) ताई, तुला कळत कसं नाही, चार महिन्याची गर्भार आहे मी. तिची हालचाल पोटात जाणवते. रात्री स्वप्नात येऊन बोलतेय ही. कालच रात्री स्वप्न बघितल, ती विहरीत पडली आहे, आई वाचवा म्हणून हाक मारतेय. मी हात पुढे केला, सगळं पुसट झाल. दचकून उठले. घामाघूम झाले होते. मी कसं मरू देऊ आपल्या पोटच्या पोरीला. तुला कसं कळणार ताई, ज्याच्यावर वेळ येते. तोच सांगू शकतो. नुसत्या गर्भपात शब्द म्हंटला तरी अंग शहारून येत. मनाला किती यातना होतात तुला कसं कळेल. (काही क्षण शांतता, ताई सोफ्यावर ठेवलेल्या बाहुली कडे बघते. हळूच अलगद बाहुलीला कडेवर घेते, पुन्हा उर्मी कडे वळून) ताई: उर्मी ही बाहुली बघ, अक्षय सहा महिन्याचा होता, तेंव्हा घेतली होती. खेळणं म्हणून. (चेहर्यावर हास्य आणत). तुला आमच एक गुपित सांगू, अजून कुणालाच नाही माहित. तुलाच सांगते, ही बाहुली नाही, माझी छकुली आहे. (बाहुली कडे बघत) आहे नं ग राणी, मी किती धांटरट आहे, तुझी दुधाची वेळ लक्षातच नाही राहिली. सॉरी हं, बघ कोण आलंय आपल्या कडे, तुझी मामी आली आहे, गुड मार्निंग म्हण तिला. गुड मार्निंग मामी! (बाहुलीचा हात हलविते). उर्मी, आपण नंतर बोलू, छकुलीला भूक लागली आहे. ताई सोफ्यावर जाऊन बसते आणि बाहुलीला मांडीवर घेऊन तिला पाजायचे नाटक करते. उर्मी स्तब्ध होऊन एकटक पाहतच राहते. ती भांबावून गेली आहे, काय बोलावे तिला काहीच कळत नाही. काही वेळ काही वेळ शांतता. ताई: (बाहुलीशी) पोटोबा भरलं वाटत, राणी साहेब झोपा आता आम्हाला जरा कामच बोलायचं आहे, तुझ्या मामीशी. (ताई बाहुलीला अलगद सोफ्यावर निजवते). ताई: झोपली एकदाची, उर्मी तुला माहित आहे, कालच स्वप्नात आली होती. म्हणाली कशी, आई एवढचं प्रेम होत माझ्यावर तर मला का मारलं. तिला कसं सांगणार, किती दुबळी आणि असहाय होते मी. वाचवू नाही शकले तिला. म्हंटल, छकुली, अपराधी आहे तुझी, तुला पाहिजे ती शिक्षा कर मला. ती काय म्हणाली, सांगू! आई, मी तर सुटले, मुक्त झाले, पण तू जन्मठेप भोगते आहे. तुझी दशा पाहून मला ही चैन मिळत नाही. या बाहुलीत माझा ही दम घुटमळतो. लवकर ये नं. उर्मी, तिला त्रास होत ग. पण मी कशी जाऊ संसार सोडून. नवरा आहे, पोटचा गोळा अक्षय आहे, त्यांच्या साठी जगावं लागणार. रोज रात्री गळ्यातगळे घालून आम्ही रडतो ग. झोपेच्या गोळ्या घेते आजकाल. या जगात स्त्रियांना भोग भोगावेच लागतात... (ताई रडू लागते, उर्मी जवळ जाऊन ताईच्या खांद्यावर हात ठेवते. काय बोलावं तिला काहीच कळत नाही आहे, तेवढ्यात दारावरची वेळ वाजते, ताई डोळे पुसत, दरवाजा उघडते, उमेश आत येतो) उमेश: (उर्मीकडे पाहत) काय म्हणता बाईसाहेब! उर्मी: (काही क्षण चूप राहते), जशी, तुमची इच्छा. उमेश: आनंदाने, देटस लाईक अ गुड गर्ल. (ताई कडे पाहत) मला माहित होत, ताई ही तुझ जरूर ऐकेल. थेक्स. (उर्मीकडे पाहत) तुझ्या जिद्दी मुळे आधीच उशीर झाला, आज सर्व निपटले पाहिजे ताई: चहा घेणार का? उमेश: नंतर कधी, आज आधीच उशीर झाला आहे, चल उर्मी निघू या. उर्मी: ताई येते हं(तिचा चेहरा भावशून्य आहे, एखाद्या कसाई कडे जाणार्या गाई सारखा) दोघ बाहेर पडतात, ताई दरवाजा बंद करते. ताई: (बाहुलीला हातात उचलत) छकुली, एक आनंदाची बातमी सांगू का तुला, तुझी मामी, तुझ्याच सारखी बाहुली आणायला गेली आहे. छान, मस्त, मैत्रीण भेटणार आहे तुला, खेळण्यासाठी, हा! हा! हा!........

वाचने 4537 वाचनखूण प्रतिक्रिया 14

दिपक.कुवेत Tue, 08/26/2014 - 12:04
पटलं नाहि. उर्मीच्या तोंडि एक डायलॉग टाकता आला असता: "ताई हाच मुलीच्या गर्भपाताचा विचार तुम्हि पोटात असताना तुमच्या आईने केला असता तर आज तुम्हि बाहुलीशी खेळायला तरी राहिला असतात का?"

In reply to by दिपक.कुवेत

विवेकपटाईत Tue, 08/26/2014 - 12:39
भयाण सत्य कधीच पटत नाही. दिल्लीत तरी ९०% टक्के मध्यम वर्गात हेच घडत आहे. एकच मूल आणि तेही मुलगा असलेले परिवारांची संख्या वाढत चालली आहे. एकांकिकेचा उद्देश्य सत्य परिस्थिती दाखविणे आहे आणि गर्भपात केल्या मुळे स्त्री ला किती मानसिक त्रास होतो हे ताईच्या पात्रा द्वारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

दिपक.कुवेत Tue, 08/26/2014 - 12:45
मनाच्या राहिल्याच नाहियेत. हां कथा ग्रामीण भागात घडली असती तरी एक वेळ मान्य केलं असतं आणि जी उर्मी एकटि राहण्याचा, नोकरी करुन मुलीला पोसण्याचा निर्णय घेण्याईतपत क्षमता ठेवु शकते ती ह्या दबावाला (भावनीक) बळि पडेल हेच पटत नाहि.

दिपक.कुवेत Tue, 08/26/2014 - 12:49
स्वप्न आणि त्याच्या मुलाचं स्वप्न ह्याचा संबंधच कळला नाहि. म्हणजे उद्या तो इंजीनीअर असता तर मग त्याला मुलगी चालली असती का?? उर्मीला पाठिंबा मिळाला असता का??

In reply to by दिपक.कुवेत

विवेकपटाईत Tue, 08/26/2014 - 17:06
ताईच्या लग्नासाठी पैसा लागणार म्हणून इंजिनीअर प्रवेशासाठी डोनेशन तिच्या वडिलांनी दिले नाही. उमेश इंजिनीअर असता तरी त्याला मुलगी चालली नसती. त्याला जर पहिली मुलगी झाली असती तर सर्व पैसा मुलीच्या लग्ना साठी जमवावा लागला असता. मग आपल्या मुलाला चांगल्या प्राईवेट शाळेत कसं शिकविता आलं असत. शिक्षणासाठी डोनेशन कसं देणार.त्या संदर्भात "त्याच इंजिनीअर व्हायचं स्वप्न, स्वप्नच राहिलं. तू, तुझ्या जिद्दीपायी त्याच्या होणाऱ्या मुलाचं स्वप्न ही भंग करणार का? " पुन्हा एकदा वाचा संदर्भ व्यवस्थित लागतील.

विवेकपटाईत Tue, 08/26/2014 - 12:58
ग्रामीण भागात पोरी जिवंत राहतात. उच्चभू लोकांमध्ये आणि जिथे श्रीमंती आली आहे सर्वात जास्त स्त्री भ्रूण हत्या होते.उदा. दक्षिण दिल्ली (पोरी सर्वात कमी), सर्वात श्रीमंत राज्य हरयाणा (सर्वात कमी पोरी), प. उत्तर प्रदेश हीच परिस्थिती. दुसरी कडे छत्तीसगड (मागासलेलं राज्य) पोरींची संख्या त्या मनानी जास्त. ही कथा सामान्य मध्यमवर्गीय स्त्रीची आहे जिच्यात परिस्थितीशी झुंज देण्याची क्षमता नाही. तिने दबावाला न पडता खंबीर पणे निर्णय घ्यावा किंवा ताई सारख्या अवस्थेला समोर जाणे दोन पर्याय आहेतच. मला ही असे वाटते तिने खंबीर पणे निर्णय घेतला पाहिजे पण सध्या ८०% स्त्रिया तरी परिस्थिती समोर शरण जातात. माझ्यास उच्चभ्रू नातेवाइकांमध्ये कित्येकांच्या घरी एकाच मुलगा आहे. तुम्ही ही आपल्या नवीन पिढीतल्या नातेवाइकांच्या लिस्ट पुन्हा एकदा नजरे खालून घाला. कदाचित ही परिस्थिती दिसून येण्याची संभावना नाकारता येत नाही.

In reply to by रेवती

बॅटमॅन Wed, 08/27/2014 - 11:16
मुली = आदरयुक्त शब्द अन पोरी = हिडीसफिडीस, अनादरयुक्त शब्द असे काहीसे समीकरण आपल्या डोक्यात आहे का? असल्यास बदलावे, इतकेच म्हणतो. ग्रामीण भागात सर्रास वापरला जाणारा हा शब्द आहे. शहरी कानांना ऑड वाटणारा शब्द असला म्हणून असा बदलायचा आग्रह करू नये.

In reply to by बॅटमॅन

प्रभाकर पेठकर Wed, 08/27/2014 - 14:37
बॅटमॅन साहेब, असे अनेक ग्रामीण शब्द प्रचलित आहेत. पण आपण आपल्या रोजच्या संभाषणात वापरतो का? जसे, ग्रामीण: 'माजा बाप आल्ता का हिथं?' किंवा 'माजा बा आल्ता का हिथ?' आपण वापरतो: 'माझे वडिल आले होते का इथे?' ग्रामीणः 'आज रंग्याचा बा गचकला.' आपण म्हणतो : 'आज रंग्याचे वडील वारले/निवर्तले.' ग्रामीण विशेषणं तर काय वर्णावीत... ग्रामीण : 'माजी आय लहान मुलाच्या पातळ हग्या सारकं पिटलं करायची.' (उपरा: लक्ष्मण माने) आपण म्हणतो : 'माझी आई पातळ पिठलं खूप छान करायची.' अनेक जाती, उपजाती, भटक्या विमुक्त जाती, आदिवासी वगैरे वगैरे जनसमुदायात अनेक शब्द असे आहेत जे आपण रोजच्या संभाषणात वापरत नाही. बरोबर की चुकीचं हा प्रश्न नाही. कानाला ते वेगळे वाटते. 'बदलाच' असा आग्रह नाही. पण बदलल्यास वाचणे सुसह्य होईल इतकेच. असो. मर्जी प्रत्येकाची.

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन Wed, 08/27/2014 - 14:42
यात तारतम्य वापरणं गरजेचं आहे. शहरी सेन्सिबिलिटीज़ जरा जास्तच आक्रमक आहेत. तुमच्या प्रतिसादात ग्रामीण = अनादरदर्शक आणि शहरी = आदरयुक्त अशी सरळसरळ ओव्हरसिम्प्लिफाईड मांडणी केल्यावर ग्रामीण शब्दांचे समर्थन कोण कशाला करेल? पण ही मांडणी चतुर असली तरी तर्कदुष्ट आहे इतकंच सांगतो. तूर्त पोरगी व्हर्सेस मुलगी यात कुठलाही शब्द अनादरवाचक वाटत नाही. आणि हा शब्द तुम्हाला वाटते त्यापेक्षा अनेक वाईडस्प्रेड आहे इतकेच सांगतो. ग्रामीण म्हणजे नक्की काय याबद्दल अशा टोकाच्या कल्पना पाहून वाईट वाटलं. असो.

बहुगुणी Wed, 08/27/2014 - 01:18
पटाईत साहेबः नेमका काय हेतू होता ही एक-प्रवेशिका लिहिण्याचा? एकच मूल आणि तेही मुलगा असलेल्या परिवारांची संख्या वाढत चालली आहे हे वास्तव दाखविणे हा उद्देश आहे म्हणता, पण मग ते साध्या चार-आठ ओळीच्या धाग्यात लिहिता आलं असतं, त्या साठी एकांकिका लिहून ही कथा आहे असं म्हणत असाल तर मला मुळात कथाच नाही पटली, प्रारंभ आणि मध्यापर्यंत थोडी तरी believable असलेली कथा नंतर एकदमच अविश्वसनीय वाटली. एकीकडे (एकांतात नाही तर) दुसर्‍या स्त्री समोर उघडपणे बाहुलीशी गप्पा मारण्याचा, तिला दूध पाजण्याचं नाटक करण्याचा 'वेडसर'पणा करणारी ताई, दुसरीकडे (स्वतःचं गर्भपाताचं दु:ख विसरून जाऊन आणि) so-called 'सामाजिक वास्तविकतेचं भान ठेवून' वहिनीला गर्भपाताचा सल्ला देण्याची वडिलकी दाखवते (आणि सुरूवातीला खंबीर असणारी धाकटी वहिनी तो मान्य करते) हे अजिबात पटलं नाही. मला ही असे वाटते तिने खंबीर पणे निर्णय घेतला पाहिजे असं मत तुम्ही नंतर प्रतिसादात व्यक्त केलंत, पण एकांकिकेत मात्र अखेर अयोग्य निर्णयाचाच 'विजय' (??) होतो असं दाखवलंत. मुळात (समस्या अगदी खरी आहे हे मान्य करून देखील) तुम्ही अशी एकांकिका लिहून समस्येमागच्या चुकीच्या कारणांची भलामण साधता आहात (perpetuating the stereotype) असं नाही का वाटत?

In reply to by बहुगुणी

विवेकपटाईत Wed, 08/27/2014 - 09:48
लिहिण्याचा उद्देश्य १. गर्भपात मुळे स्त्रियांना होणारा मानसिक त्रास (कदाचित वर्णन अतिरंजक असेल, पण 'मानसिक त्रास' हे सत्य आहे. २. सामान्य मध्यमवर्गीय स्त्रियांमध्ये विद्रोह करण्याची क्षमता नसते, ताई पासून तिला मोठी आशा होती, पण तिची मानसिक अवस्था पाहून ऊर्मीचे ही अवसान गळून पडते. अर्थात तिच्या नशिबी ही हा मानसिक त्रास आला. स्वत:ला खंबीर समजणाऱ्या मुलीसुद्धा अश्यावेळी हतबल होतात कारण त्यांना त्यांच्या माहेर कडून ही सहारा मिळत नाही. मुलगी नसेल तर तिच्या लग्नाचा खर्च वाचतो, शिवाय लग्न होई पर्यंत आई वडिलांना तिचे 'शील' ही जपावे लागते. मग कशाला मुलगी. ३. आपल्याच ओळखीच्या लोकांमध्ये कित्येक स्त्रियांनी आपल्या मुलींना गर्भात मारले (गर्भपात), स्वत: पहिले आहे. अर्थात बातम्या लपत नाही किती ही डोक्यावर पांघरून घातले तरी. ४. सत्य परिस्थितीची जाणीव करून देणे उद्देश्य