ससा आळसाने आणि आपल्या वेगाच्या घमेंडीने झाडाखाली झोपला आणि मागाहून आलेल्या कासवाने शर्यत जिंकली. ससा जागा झाला तसा कासवाने शर्यत जिंकलेली पाहून वास्तवाचा स्वीकार करण्याऐवजी संतापला. कासव जलचर आहे आणि आम्हा वनचरांच्या वनात येऊन आमच्यावर कुरघोडी करण्याचा त्यांना कांही एक अधिकार नाही असा घोष करू लागला. या वनावर आम्हां वनचरांचाच केवळ हक्क आहे. जलचरांनी येथून हद्दपार झाले पाहिजे असा डंका पिटू लागला. त्याच्या गर्जनांनी सगळे जंगल दणाणून गेले. वाघ,सिंह, लांडगे, कोल्हे सशाच्या गर्जनांचा आपापल्या परीने विचार करू लागले. पण नुसतेच विचार करीत राहिले. जलचरांना हद्दपार करावे हे ठीक असेलही पण कसे करावे हे कुणाच्या ध्यानांत येत नव्हते. शर्यत हारल्याचे शल्य बोचत होतेच. कासव हे कांही केवळ जलचर नव्हते. तसे ते उभयचर होते. पण आता ते जलचर आहे आणि परप्रांतीय आहे हा मुद्दा अधिक सोय़ीचा आणि प्रक्षोभक होता. सशाच्या संतापाला प्रक्षोभ हाच एक उतारा आहे असे त्याला वाटत होते.
सशाने एल्गार पुकारला. वाघ, सिंह, लांडगे, कोल्ह्या, या सगळ्यांना सशाची भूमिका जरी फारशी समजली नाही तरी, एल्गाराचे फलित कांही होवो, निदान या धामधुमीत आपली शक्ती किती पणाला लागते ते तपासून घेऊ या सूज्ञ विचाराने ते सशाच्या भूमिकेचा फायदा कसा उचलता येईल याचा विचार करू लागले. गर्दी जमा होते आहे हे पाहून सशाला आणखी चेव आला. मग सशाने संतापाच्या भरात जंगलाची तोडफोड करायला सुरुवात केली. माकडे झाडावरून ही गंमत पहात होते. त्यांच्यासाठी ही सारी केवळ गंमतच होती. वनचर काय नि जलचर काय, माकडांना कशाचेच सोयरसुतक नव्हते. त्यांना हवा होता एक दंगा. त्यांच्या माकडचाळ्यांना वाट मिळण्यासाठी. दंगा सुरूच झाला. माकडांनी दगडांची फेकाफेक सुरू केली. कुठे तरी दगडावर दगड आपटून एक ठिणगीही उडाली. मग माकडांनी ती आग शिताफीने पसरवायला सुरुवात केली. या धामधुमीत हरणे, कोकरे मोर, लांडोर आणि कांही ससेही होरपळू लागले. लांडगे, कोल्हे लगेच सरसावाले. त्यांना या होरपळणार्यांचे मांस आयतेच, विनासायास खायला मिळणार होते. हती, गेंडे यांनी कासवाची बाजू घेतली कारण ते उभयचर असले तरी स्वत:ला जलचर घोषित करणे त्यांना फायद्याचे आहे असे त्यांना वाटले. मग सुरू झाला तो केवळ दंगा.
आणि होरपळले गेले ते बिचारे गरीब, शक्तीहीन प्राणी.
शर्यत जिंकलेले कासव मात्र डोगराची उतरण शांतपणे धिम्या गतीने उतरत होते. जसे सारेच दंगे यथावकाश शमतात, तसा हा दंगाही यथावकाश शमेल, तोपर्यंत षठपूजेची वेळ येइलच ती शांतपणे पार पडेलच, या ठाम विश्वासाने.
कारण त्याच्या पाठीशी हत्ती आहे हे त्याला माहिती होते.
वाचने
4983
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा!
अप्रतिम ...
ससा आणि कासव
ससा आणि कासव
एक नंबर
राज कारण
राज कारण
लेख आवडला
निव्वळ एकांगी
एकांगी नाही.
In reply to निव्वळ एकांगी by मराठी_माणूस
कासव
In reply to एकांगी नाही. by महेश हतोळकर
कासव
In reply to एकांगी नाही. by महेश हतोळकर
कासव उपाशी
परिस्थितीचे सुरेख विश्लेषण
धन्यवाद