मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शाही अंडा मसाला

स्वाती दिनेश · · पाककृती
साहित्य- ४/५ अंडी उकडून, २/३ टोमॅटो किवा १ वाटी तयार टोमॅटो प्युरे, २/३ मध्यम कांदे, १ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट, १ चहाचा चमचा कसूरी मेथी, १तमालपत्राचे पान ७/८ काजूबिया, साधारण अर्धी वाटी सुके खोबरे, १ मोठा चमचा हेवी क्रिम किवा साय,२ मोठे चमचे तेल,१चमचा बटर, मीठ चवीनुसार, १/२ चहाचा चमचा साखर थोडी कोथिंबिर गार्निशिंग साठी. कॄती- खोबरे किंचित लालसर कोरडेच भाजून घ्या व बाजूला ठेवा. एक चमचाभर तेलावर चौकोनी चिरलेले कांदा व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला, तिखट, धनेजिरे पूड घालून परता, कसूरी मेथी घाला आणि काजूतुकडे घाला व थोडे परता. खोबरे व ह्या सर्व मिश्रणाची मिक्सर मधून पेस्ट करा.सिल्किश टेक्श्चर येईल. कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यात ही कांदा टोमॅटो इ.ची पेस्ट घाला.थोडे पाणी घालून सरसरीत करुन घ्या म्हणजे चांगली ग्रेव्ही होईल. एक तमालपत्राचे पान घाला. उकळू द्या. बटर घाला. आता उकडलेली अंडी चार भाग करुन घाला व दोन तीन उकळ्या येऊ द्या. हेवी क्रिम किवा साय घाला. मीठ व साखर घाला. १/२ चमचा साखर घालून ग्रेव्ही गोड होत नाही,तर किंचित गोडूस चव येते. ती नको असेल तर साखर घालू नका. कोथिंबिरीने सजवा.(केवळ कोथिंबिर आणण्यासाठी ५ ,६ किमी जायचा कंटाळा केल्यामुळे फोटोत कोथिंबिर नाहीये..) अंड्याऐवजी बटाटे,पनीर किवा आपापले डोके लढवून इतर काही घालून अंडेविरहित व्हर्जन करता येईल.
.

वाचने 9870 वाचनखूण प्रतिक्रिया 20

पैसा Mon, 07/14/2014 - 00:00
कसली भारी पाकृ आणि फोटो! बरेच दिवसांनी स्वातीकडून एक मस्त पाकृ आली!

रेवती Mon, 07/14/2014 - 00:47
वाह! फोटू व कृती आवडली. मी अंडे खात नसले तरी बाकीच्यांना करून घालता येईल. शिवाय ही पाकृ अंडे न घालता कशी करायची त्याबद्दलही सुचवण्या आहेतच!

प्रभाकर पेठकर Mon, 07/14/2014 - 12:15
चविष्ट पाककृती. अंडी फोडून न घालता, सोलून तशीच आख्खी घालावित आणि कसूरी मेथी आधी न घालता सर्वात शेवटी त्याची पावडर वरून घालावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा Mon, 07/14/2014 - 13:08
सहमत फार तर उकडलेल्या अंड्याला काट्याने टोचे मारुन घ्यावेत. पाकॄ आवडली हे वेसांनल.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुनील Mon, 07/14/2014 - 14:04
किंबहुना रटरटणार्‍या रश्शात अंडी फोडूनच घालावीत. एक वेगळा प्रकार. बाकी पाकृ मस्तच!

In reply to by सुनील

गणपा Mon, 07/14/2014 - 14:19
सुनीलराव मलाही लाल-तिखटजाळ रश्यात अंडी फोडुन घातलेलीच आवडतात. इथे काजु-क्रिम असे गोडुस पदार्थ असताना फोडुन घातलेली अंडी कशी दिसतील/लागतील बरं?

नंदन Mon, 07/14/2014 - 13:16
पाकृ. ग्रेव्ही अगदी रिच, चविष्ट दिसते आहे.