एक उदासीचा महौल, बहादुरशा जफ़रचा सिद्धहस्त कलाम, आणि मेहदी हसन साहेबांची पेशकश!
नकोनकोशी वाटणारी उदासी देखिल किती कलात्मकपणे मांडता येते, याची कमाल म्हणजे ही ग़ज़ल. पावसाळी कुंद हवेत या ग़ज़लची जादू असा काही रंग घेते की इन्शाल्ला, आपण नि:शब्द होऊन जातो!
संदीप म्हणतो :
बरा बोलता बोलता स्तब्द्ध होतो,
कशी शांतता शून्य, शब्दात येते.
आताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते ।
ती शून्य शांतता, तो असहाय्यतेचा, बेकसीचा रंग, बोलणं मुश्कील झालं असतांना, ते शब्दात उतरवणं, ही उस्ताद बहादुरशा ज़फ़रची कमाल. आणि ती स्वरसाज़ चढवून, तो मूड आपल्या हृदयात परावर्तीत करणं, म्हणजे मेहदी हसनजींची नज़ाकत!
एकेक शब्दाचं मुलायम उच्चारण ऐकत राहावं असं आहे. ग़ज़ल पहिल्या ओळीत हृदयाला स्पर्शून जाते, कारण ती प्रत्येक संवेदनाशील मनाला, केव्हाना केव्हा आलेला अनुभव, शब्दात मांडते -
बात करनी मुझे मुश्किल, कभी ऐसी तो न थी
जैसी अब है तेरी महफ़िल, कभी ऐसी तो न थी ।
_________________________________
तुझ्या मैफिलीचा रंग आज काही वेगळा आहे. सखी आज अकारण नाराज आहे. तिचा तो नूर बघून प्रियकर म्हणतो, तुझ्याशी सारखं बोलत राहावं असं वाटणार्याला देखिल, आज सुरुवात कशी करावी ते उमजत नाही. आणि दोघं इतके एकदिल आहेत की, प्रियकर स्वत:लाच विचारतो, तुझं स्वास्थ्य कुणी हिरावलं, इतकी बेक़रारी तर तुला कधीच नव्हती.
ले गया छीन के कौन आज तेरा सब्र-ओ-करार
बेक़रारी तुझे ए दिल कभी ऐसी तो न थी
आणि दुसर्या अर्थानं, तीच त्याचं हृदय आहे...तो प्रियतमेलाच म्हणतोयं की, ‘बेक़रारी तुझे `ए दिल' कभी ऐसी तो न थी’!
________________________
माझा वेध घेणारी तुझी नज़र क़ातिल तर आहेच. आणि एका नज़रेत ती मला तुझा करते म्हणून, माझी वैरीणही आहे...पण आज तुझी नज़र इतकी कातिलाना झालीये, विकल झालीये, की... मला बोलणंच मुश्कील झालंय.
चश्म-ए-क़ातिल मेरी दुश्मन थी, हमेशा लेकिन
जैसे अब हो गई क़ातिल, कभी ऐसी तो न थी ।
__________________________
पुन्हा तोच माहौल, पण वेगळ्या अंगानं; माझ्या रंगात तुझा रंग इतका मिसळलायं की, तुझ्या नज़रेच्या या (उदास करणार्या) जादूनं, मी देखिल उदास (माइल) झालोयं.
उनकी आँखों ने खुदा जाने, किया क्या जादू
के तबीयत मेरी माइल, कभी ऐसी तो न थी ।
__________________________
मनाच्या कला चंद्राशी संलग्न असल्यानं, पुनवेच्या रात्री तरलतम मनाचा हेलकावा, कोणत्याही बाजूची सीमा गाठू शकतो. सखी शशीवदनेच्या मोहक चेहर्याचं केवळ प्रतिबिंब (अक्स-ए-रुख-ए-यार), प्रियकराचा मूड प्रकाशमान करतं. पण हे सखे-पौर्णिमे (माह-ए-कामिल), आज तुझ्या चेहेर्यात जी दाहकता (ताब) जाणवतेयं, ती तशी कधीच जाणवली नाही.
अक्स-ए-रुख-ए-यार ने, किस से है तुझे चमकाया
ताब तुझ में माह-ए-कामिल, कभी ऐसी तो न थी ।
_____________________________
हा शेवटचा शेर तर अप्रतीम आहे.
क्या सबब तू जो बिगड़ता है, ज़फर से हर बार
खू तेरी हूर-ए-शमाइल, कभी ऐसी तो न थी
प्रियकर तिला विचारतो, तू अशी माझ्यावर (सतत) नाराज का असतेस? तू इतकी अंतर्बाह्य लावण्यवती आहेस की, तुझा स्वभाव (खू तेरी), एखाद्या स्वर्गातून उतरलेल्या परीसारखा (हूर-ए-शमाइल) आहे.
तुझ्या रुपासारखंच तुझं मन सुद्धा इतकं उमदं आहे की तुझ्यासमवेत असणार्यासाठी ही दुनिया जन्नत आणि तू हूर आहेस.
अश्या तुझ्या सहवासात (तेरी महफ़िल), मला बोलणं मुश्कील व्हावं (बात करनी मुझे मुश्किल), असं.... आजपर्यंत कधीही झालं नाही. आणि ही उदासी इतकी लोभसपणे काव्यात उतरते:
बात करनी मुझे मुश्किल, कभी ऐसी तो न थी
जैसी अब है तेरी महफ़िल, कभी ऐसी तो न थी ।
________________________
वाचने
3595
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुजरा स्विकारा.
ग़ज़लची जादू असा काही रंग घेते की इन्शाल्ला..
इन्शाल्ला म्हणजे घटना अजून घडायचीये
In reply to ग़ज़लची जादू असा काही रंग घेते की इन्शाल्ला.. by उन्मेष दिक्षीत
मस्त लेखमालेतील अजून एक
र्हदयस्पर्शी
नियतीला प्रेयसी मानणारा जगात फक्त एकच पंथ आहे : सूफ़ी !
In reply to र्हदयस्पर्शी by चित्रगुप्त
सर्व प्रतिसादकांचे
बात करनी मुझे मुश्किल
सह्ही.