शुभेच्छा संदेशांच्या विश्वात...
आजचा किस्सा तेंडुलकरचा... किंवा त्याच्याच मुळे आवडू लागलेल्या क्रिकेटचा... खरं तर एका शुभेच्छा पत्राचा...
जाऊ दे. वाचा आणि तुम्हीच ठरवा...
मराठी शुभेच्छा पत्रांच्या बहराचा तो काळ. मी एका कंपनीसाठी इनहाऊस रायटर म्हणून काम करत होते. या कामात तेव्हा फ्री लान्सिंगमध्ये उत्तम पैसे आणि बऱ्यापैकी नाव मिळत असलं, तरी मला त्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी व्हायला मनापासून आवडायचं. इनहाऊस रायटर म्हणून काम करतानाच ते शक्य व्हायचं. अर्थात पैसे त्यातही चांगले मिळायचे. दोन्हीतला फरक सांगू का? शुभेच्छा पत्रं कशी तयार होतात किंवा होत, ते आधी समजून घेऊ.
फ्रिलान्सिंग करताना तुम्हाला विषय दिले जातात, बहुतेक शुभेच्छापत्रं (तेव्हा) फ्लोरल अर्थात फुलांची अथवा निसर्गातील छायाचित्रं असणारी असायची. विषय म्हणजे - ५ - वाढदिवस, ६ - नात्यांचे वाढदिवस ( आई, बाबा, भाऊ, बहीण इ.), ४ - मैत्री, ५ - प्रेम वगैरे...वगैरे. तर विषयाला अनुरूप आणि चित्रांना (उपलब्ध असल्यास) साजेसा मजकूर लिहायचा आणि तो कंपनीकडे सोपवायचा. या प्रकारात वाईट गोष्ट अशी की आपण मारे एखादी उपमा किंवा विचार किंवा सुभाषित घेऊन शुभेच्छा संदेश लिहिलेला असो, त्यावर काम करणारी व्यक्ती किंवा मालक किंवा मार्केटिंगवाला अमराठी असला किंवा त्याला मजकुराची जाण नसली तर, मराठी में/बर्थडे में फ्लोरल चलता है, असं म्हणून कोणताही मजकूर फुलांच्या खाली छापला जायचा. कॉपी सोपवल्यानंतर, पैसे घेतल्यानंतर आणि नवं काम हाती घेतल्यानंतर तो मजकूर काहीसा विस्मरणात जातो न जातो, तोच आपल्या दुर्दैवाने एखाद्या दुकानात आपणच लिहिलेला मजकूर देखण्या चित्रांचं बोट धरून अचानक समोर यायचा. मजकूर आणि चित्र यांचा अजिबात ताळमेळ नसलेलं ते शुभेच्छापत्र केविलवाण्या नजरेने आपल्याकडे पाहताना दिसायचं.
इनहाऊस रायटर म्हणून काम करताना मात्र हे टाळता यायचं. अशा प्रकारे काम करण्यातली मला आवडणारी बाब म्हणजे संपूर्ण निर्मितीचा प्रत्येक टप्पा आपल्या नजरेसमोर उलगडत जातो. बरेचदा मजकुराला कोणती चित्र/दृश्य/प्रतिमा साजेशी ठरतील ते लेखक सुचवतात, त्यानुसार कलाकार चित्र आणि सुलेखन करून देतात, मग बॅकग्राउंडसाटी वापरायची डिझाईन्स, रंगसंगती, त्याबाबतची चर्चा आणि आकाराला येणारं ते शुभेच्छापत्र... खरंच... खूप छान अनुभव असतो तो...
तर... असे छान-छान अनुभव घेणं सुरू होतं. चित्रकार, सुलेखनकार आणि संगणकावर शुभेच्छापत्राला मूर्त रूप देणारे तज्ञ, अशी आमची सर्वांचीच एकमेकांशी छान गट्टी आणि भट्टी जमली होती. विश्वचषकाचे सामने सुरू होते. आम्ही सगळेच क्रिकेटप्रेमी. भारत- पाकिस्तान सामना सुरू होता. माझ्याकडे तेव्हा वॉकमॅन होता, प्रवासातला सोबती. दुपारी जेवणाच्या सुट्टीत सामन्याचं समालोचन ऐकलं आणि मी अस्वस्थ झाले. तेंडुलकर मस्त खेळत होता. जेवणाची वेळ संपली आणि वॉकमॅन बंद करून मी जागेवर बसले. कामात लक्ष नव्हतंच लागत.
कंपनीचे मालक पंजाबी. साधारण चाळीशीचे. उत्साही. मराठी फारसं कळत नसलं, तरी ही मंडळी उत्तम काम करताहेत, इतकं समजण्याइतके व्यावसायिक नक्कीच होते. त्यामुळे कामात सहसा ढवळाढवळ नसायची. त्यांच्याही एक-दोन फेऱ्या झाल्या. माझी अस्वस्थ चुळबुळ सुरूच होती. वाढदिवसाचा मजकूर - काही वेगळा कन्सेप्ट असणारा, लिहायचा होता. पण मन तर क्रिकेटच्या सामन्यात गुतलेलं. माझं अस्वस्थ असणं मालकांच्या लक्षात आलं. त्यांनी डोळ्यांनीच आमच्या चित्रकार महाशयांना "काय झालं" असं विचारलं. उत्तरादाखल ते फक्त हसले. त्यांच्यातली नेत्रपल्लवी मी पाहिली, पण प्रतिक्रिया मात्र नाही दिली. भलत्याच विचारात होते ना...
चित्रकार महाशय उठले, माझ्या जवळ आले. अगं, तुझा वॉकमॅन दे बघू... मी वैतागले... घ्या. स्कोअर ऐका आणि परत द्या. मला सांगू नका. मला तुकड्या तुकड्यात नाही ऐकायचं... त्यांनी हसत वॉकमॅन घेतला, तो चक्क संगणकाच्या स्पीकरला जोडला आणि समालोचन सुरू केलं. मला धक्काच बसला. पण तो क्षणभरच टिकला. तेंडुलकरच्या खेळाचं वर्णन ऐकणं जास्त महत्वाचं होतं. धक्का बिक्का बाजूला सारून आम्ही सगळेच समालोचन ऐकण्यात गुंग झालो. मध्येच कधीतरी मालकांची आणखी एक फेरी. माझी चुळबुळ थांबलेली आणि रायटिंग पॅडवर काहीतरी लिहित मी समालोचन ऐकण्यात मग्न. सगळ्यांवर एक नजर फिरवत काहिसे हसतच ते त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले. काम करत करत आम्ही सगळ्यांनीच समालोचन ऐकलं. तेंडुलकरचं शतक झालं नाही, पण त्याच्या खेळीमुळे भारतानं तो सामना जिंकला. माझ्यासह सगळेच हवेत. सामना संपला आणि त्याबद्दल चर्चा करत आम्ही पूर्णपणे कामाकडे वळलो.
पाचएक मिनिटांनी चित्रकार महाशय जागेवरून उठले आणि माझ्याकडे आले, माझ्या हातातल्या कागदांमध्ये डोकावले...
वाढदिवस म्हणजे आयुष्याच्या क्रीझवर नव्या इनिंगची दिमाखदार सुरूवात..शाबास... वाटलंच मला... चालू देत... इतकंच बोलून पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले. माझं विचारचक्र सुरूच होतं. मजकूर पाठ केलेला असावा, इतक्या सहजपणे मनातून कागदावर उतरत होता. लिखाण थांबवलं आणि चित्रकार महाशयांच्या हातात सोपवलं. त्यांच्या तोंडून, "अरे वा, मस्त" अशी दाद आली आणि आमच्या सुलेखनकर्तीने कागद हाती घेतला. संपूर्ण कॉपी मोठ्याने वाचून दाखवली तिने आणि सगळ्यांनीच उत्स्फूर्त प्रतिक्रीया देत आपापल्या सूचना सुरू केल्या. साधारण १५-२० मिनिटं चर्चा झाली आणि सगळेच पुन्हा कामाला भिडलो. एक जण कॅरेक्टर, एक जण बॅकग्राऊंड, एक जण सुलेखन, एक जण लेआउट आणि मी... मजकुरावरून दुसरा हात फिरवू लागले. तो दिवस संपला. दुसरा दिवस सुरू झाला आणि तासाभरात शुभेच्छापत्र आकाराला येऊ लागलं. मालकांनी शिरस्त्याप्रमाणे आमच्याकडे एक फेरी मारली.सुलेखनकर्तीच्या शेजारी उभे राहत त्यांचा प्रश्न, "ये बॅट-बॉल क्युं बना रही है तू?" पुन्हा एकदा पुढाकार घेत आमच्या चित्रकार काकांनी त्यांना शुभेच्छापत्र ऐकवलं आणि त्याच्या रचनेची कल्पना दिली. ते भरपूरच खुष झाले, "बढिया लिखा है मॅडम. अरे आप तो मॅच सुनते हुए भी काम के बारे में सोचते हो. बहुत बढिया. अब हम ये कॉपी हिंदी में भी बनाएंगे. आपका मराठी कार्ड रेग्युलर होगा, लेकिन हिंदी में हम फोर फोल्ड बनाएंगे. आप जरा हिंदी कॉपी भी देख लिजिए.." एवढं बोलून त्यांनी फोन उचलला, हिंदी लेखकाला बोलावून घेतलं आणि निघून गेले. आम्ही सगळेच पुन्हा कामात , चर्चेत रंगलो. त्याच दिवशी शुभेच्छापत्रं पूर्ण होऊन छपाईला गेलं आणि ताज्या लॉट बरोबर आठवडाभरात मार्केटमध्ये. क्रिकेटचे दिवस होतेच सुरू, त्यामुळे त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. आम्ही सगळे मात्र तोवर पुढच्या शुभेच्छापत्रांच्या तयारीत गुंग झालो होतो. अरे हो, ते शुभेच्छा पत्र असं तयार झालं...( क्षमस्व - छायाचित्र अपलोड करता येत नाही.) आणि हो, यथावकाश हिंदी शुभेच्छा पत्रही तयार झालं आणि दोन वेळा रि-प्रिंटही झालं. ( एक प्रिंट - ३००० प्रती)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान अनुभव, नविनच विश्वातला
मस्तच. वाचायला मजा आली.
मस्त अनुभव...
खूप छान,ही माहिती नविन आहे
आवडलं
मस्त अनुभव !!!
छान अनुभव! लेखन आवडले.
अवांतर पण महत्त्वाचा प्र्श्णः
तेंडुलकर
बहुतेक २०१११
दुपारी जेवणाच्या सुट्टीत सामन्याचं समालोचन ऐकलं आणि मी अस्वस्थ झाले. तेंडुलकर मस्त खेळत होता.आपण वर उल्लेखलेला सामन्यात त्याची (भारताची) फलंदाची संध्याकाळी होती, इथे दुपारचा उल्लेख असल्याने मागचाच २०११ विश्वचषकातील ८५ धावांची खेळी असावी.ते शुभेच्छा पत्र बघायला
+१
+७८६
धन्यवाद मंडळी...
वेगळ्या
बहारे फिर भी आयेगी ???
बहराचा काळ अशासाठी म्हटलं,
आर्ट हॅज न्यू वेज्
आर्चिज्?
अरे हा
नविन माहिती.लेखन आवडले.
मस्तच अनुभव !!
वा मस्तच!
वा!