✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक विलक्षण अनुभव

स
सुबोध खरे यांनी
Sun, 05/25/2014 - 00:21  ·  लेख
लेख
आताच दोन आठवड्यापूर्वी जे इ इ मेन चा लागला. मुलाचा निकाल फारसा चांगला आला नाही. तो आय आय टी च्या मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरला. आम्ही सुद्धा दोन दिवस बर्यापैकी निराश होतो. पण यात आपले नैराश्य बाजूला ठेवून मुलाला धीर देण आवश्यक होते त्यामुळे चेहेर्यावर तसे काही दिसू न देता आम्ही त्याला पुढच्या परीक्षांसाठी उत्तेजन देत होतो. तीन चार दिवसात गाडी रुळावर आली. मुळात आयुष्यात अपयशी होण्याचा मला चांगला अनुभव असल्याने मी जास्त शांत होतो.आणि मी शांतपणे मुलाला जवळ घेऊन सांगितले की तू काही सलमान खान सारखा दारू पिऊन लोकांच्या अंगावर गाडी घालण्यसारखा गुन्हा केलेला नाहीस. जे झाले ते झाले आयुष्यात असे प्रसंग येत राहतात.मुळात त्याने आयुष्यात काय करावे हे त्याचे त्याने ठरवायचे आहे.आईबाप काही आयुष्याला पुरत नाहीत आणि तुम्ही फारतर मुलाला थोडे फार मार्गदर्शन करू शकता. गमतिची गोष्ट म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या सुरस आणि चमत्कारिक होत्या की मला आश्चर्यच वाटले. १) तुम्ही दोघे डॉक्टर असून मुलाला इतके कमी मार्क कसे मिळाले?. २) आता मुलाचे कसे होणार? ३) त्याला इंजिनियरिंग झेपणार नाही त्याला बी एस सी ला टाका ४) तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. भरपूर डोनेशन भरून प्रवेश घ्या. ५) त्याला परत बारावीला बसावा गमतीची गोष्ट हीच आहे कि लोक फुकटचे सल्ले देण्यात एकदम पुढे असतात. हा सल्ला दिल्यावर त्याचा परिणाम काय होईल याचा जरासुद्धा विचार न करता ते बोलत होते. जे जवळचे मित्र होते त्यांनी फार मोलाचे सल्ले दिले. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला माझ्या वडिलांनी दिला.जेंव्हा मी त्यांना म्हटले कि लोक सांगत आहेत कि त्याला अभियांत्रिकी झेपेल का ते पहा. त्यांनी एकच सांगितले कि तो इंजिनियर झाल्यावर त्या विषयातच काम करेल असे आज कसे सांगता येईल? जर त्याने उद्या व्यवस्थापन विषय घेतला ( एम बी ए किंवा तत्सम केले) किंवा एखाद्या व्यवसायात शिरला तर त्याला बारावीत किंवा अभियांत्रिकीत किती गुण आहेत त्याचा तो पुढे काय करणार आहे याच्याशी काय संबंध असेल. त्याला अभियांत्रिकीत किती गुण आहेत या पेक्षा त्याला अभियांत्रिकीचे मुलभूत ज्ञान आहे एवढे बस आहे. जर तो सॉफ्टवेअर मध्ये गेला तरीही तो मेकानिकल अभियांत्रिकीच्या ज्ञानच शून्य वापर करेल आणि जर त्याने एम टेक वाहन( ऑटोमोबाइल) किंवा वैमान शास्त्र (एरोनौटीक्स) या विषयात केले तर त्याच्या चार वर्षाच्या अभियांत्रिकी ज्ञानापैकी फार तर २० टक्के ज्ञानाचा उपयोग होईल. तो आयुष्यात पुढे काय करणार आहे हे तुम्हाला कुठे माहिती आहे? एका परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले म्हणून आयुष्यात काहीही फरक पडत नाही. आमच्या वडिलांनी जमनालाल बजाज येथून व्यवस्थापनाची पदविका घेतलेली आहेत. हे वाचून मला खूप हुरूप आला. मी इतके दिवस जो विचार करीत होतो त्याला वडिलांचाचआधार मिळतो आहे हे पाहून मला बरे वाटले.माझे एक मत मी पुष्कळ वेळा व्यक्त केले आहे कि शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते. मी जेंव्हा इतर बर्याच लोकांशी बोललो तेंव्हा अशी बरीच पोळलेली माणसे मला भेटली ज्यांनी स्वतः किंवा त्यांच्या मुलांना उज्ज्वल यश मिळालेले नव्हते आणि त्या सर्वांनी मला हेच सांगितले. मुळात माझ्या मुलाने जेवढे प्रयत्न करायला पाहिजे होते तेवढे केलेले नव्हते हे मला स्वतःला माहित होते. त्याला आम्ही एक वर्ष अगोदर शाळेत टाकले असल्याने त्याला आपण अभ्यास करावा असा परिपक्व पणा( maturity ) आलेलाच नाही. हे अर्थात समर्थन होऊ शकत नाही हे मलाही माहित आहे कारण काही मुले त्याच्याच सारखी कमी वयाची आहेत आणि त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आणि उत्तम गुण मिळवले. पण प्रत्येक मुल वेगळे असते हे मला माहित आहे. माझ्या मुलाच्या मित्रांपैकी काही खरच हुशार असलेली मुले या परीक्षात फारशी चमकू शकली नाहीत अशा काही मुलांच्या घरात एखादा मृत्यू झाला असावा अशी अवकळा पसरली होती. एक मुलगा भिंतीवर डोके आपटून घेऊ लागला. या मुलाच्या बापाचे वजन कमी झाले म्हणून त्याच्या बायकोने त्याला माझ्याकडे पाठविले तेंव्हा मला असे लक्षात आले कि बाप सुद्धा अत्यंत तणावाखाली आहे. त्याला पाहते ४ वाजता जाग येते आणि नंतर झोपच लागत नाही. हे दोघे आईबाप स्वतः अभियंते आहेत. एका आईने सांगितले कि BITS( बिर्ला इन्स्टीट्युट) ची परीक्षा होई पर्यंत मी थांबले आहे. ती झाल्यावर मुलीच्या दोन मुस्कटात मारणार आहे. एवढ्या सगळ्या सुखसोयी देऊनही परीक्षेत हा निकाल कसा मिळू शकतो हेच मला कळत नाही? या बाई स्वतः आर्किटेक्ट आहेत.या बाईना मी एकच सांगितले कि तुमची मुलगी एखाद्या पान्वाल्याचा हात धरून पळून गेली असती तर? तिला एका परीक्षेत कमी गुण मिळाले तर एवढे अकांड तांडव कशासाठी? जर सुख सोयी किंवा सुविधा दिल्या तर गुण मिळत असते तर अंबानींची मुले आय आय टी मध्ये पहिल्या दहात आली असती. या दोन्ही आईबापाना मी विश्लेषण करून सांगितले कि एक गोष्ट फार महत्त्वाची आहे कि आपल्या मुलाचे शैक्षणिक यश हा आपण प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत आहात. आपली प्रतिष्ठा मुलाच्या परीक्षेतील यश अपयश यावर अवलंबून असू नये. हे त्यांना पचवणे फार जड गेले. हि गोष्ट मी मुळात मान्य केली असल्याने (माझी प्रतिष्ठा माझ्या मुलांच्या शैक्षणिक यशावर मुळीच अवलंबून नाही हे मी मुलांना पहिल्यापासून सांगत आलो आहे) तूमच्या मुलाला कमी गुण कसे मिळाले यावर मी शांतपणे त्यांना सांगितले कि अहो तो ढ आहे काय करणार? अशा कितीतरी घरात मी सुतकी वातावरण बघत आहे जेथे मुलाला चांगले गुण मिळालेले नाहीत. किंवा मुलाने काहीतरी गंभीर गुन्हा केला असल्यासारखे आई बाप त्यांना वागवत आहेत. मुळात आय आय टी मध्ये १४ लाख मुलांपैकी केवळ २००० मुलांना आपल्या आवडीचा विषय मिळतो बाकी दोन ते तीन हजार मुले आवडीचा विषय मिळाला नाही तरी आय आय टीच्या शिक्क्यासाठी तेथे मिळेल तो विषय शिकत असतात. मग आय आय टी मध्ये प्रवेश मिळाला नाही तर आयुष्य फुकट गेले असे लोकांना का वाटत राहते? आज प्रत्त्येक बस, रेल्वे गाडी, ट्रक वर आय आय टी किंवा वैद्यकीय परीक्षेच्या क्लास ची जाहिरात दिसत आहे. हा स्वप्नांचा बाजार मुलांना कुठे घेऊन जाणार आहे ? कोटा येथे किंवा नारायण इन्स्टीटयुट हैद्राबाद किंवा फिट जी किंवा टाईम अकादमी येथे मुलांना आठवीपासून सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत पूर्ण वेळ आय आय टी च्या क्लास साठी जुंपले जाते. ( आता हेच क्लास सहावी पासून चालू होणार अशी जाहिरात पाहिली) म्हणजे मुलांना तेराव्या वर्षापासून आईबाप या चक्रात ढकलत असतात पाच वर्षे ढोर मेहनत करून शेवटी हातात एक डिग्री पडेल किंवा न पडेल पण त्यात मुलांचे कोवळे वय मात्र नक्कीच नसून चालले आहे. मी माझ्या मुलाला सांगितले होते किया अभियांत्रिकीत तुला प्रवेश नक्की मिळेल पण तुला नक्की काय व्हायचे आहे हे तुला ठरवावे लागेल.पदवी मिळाल्यावर एक वर्ष तू काहीही केले नाहीस तरी चालेल. नुसता हातात कैमेरा घेऊन भारतभर फिरलास तरी चालेल. त्यात तुला आयुष्य जगायचे शिक्षण मिळेल ते तुला आयुष्यभर उपयोगी ठरेल. एकदा नोकरीला लागला कि माणूस त्या चरकात पिळून निघतो मग थोडे थांबून सिंहावलोकन करायचे असेल तर त्याला उसंत मिळत नाही. ( मी सहा महिने सुट्टी ( चार महिने भरपगारी आणि दोन महिने अर्ध पगारी) घेऊन कोणताही आजार नसताना नुसते घरी बसून काढले आहेत त्यामुळे त्याची किंमत किती अमुल्य आहे हे मला पूर्ण माहिती आहे. जाता जाता -- माझी पत्नी पुण्यातील एका प्रथितयश खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया काय आहे ते जाणण्यासाठी जाऊन आली होती तेथे तिला एक कागद भरून दिला. आणि तेथे आम्ही दोघे डॉक्टर आहेत हे पाहून त्यांनी सतरा लाख रुपये रोख असा दर सांगितला यातील अर्धे पुढच्या चार दिवसात आणून द्या. गम्मत म्हणजे बारावीचा निकाल अजून लागलेलाच नाही. यावर तिने त्यांना विचारले कि तुमच्याकडे अभियांत्रिकी केल्यावर "प्लेसमेंट" कितीची मिळते त्यावर ते म्हणाले कि चार लाख वार्षिक. यावर मी शांतपणे पत्नीला म्हटले कि मुलाला जेथे मिळेल तेथे प्रवेश घेऊ. चार वर्षे मुलगा घरी बसला तरी चालेल एक लाख रुपये तरीही वाचतील(व्याज वेगळे). विस्तारभयास्तव येथेच थांबतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
57574 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

उत्तम लेख आणि उत्तम प्रतिसाद.

बहिरुपी
Tue, 06/03/2014 - 17:35 नवीन
उत्तम लेख आणि उत्तम प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

१०० कराच

टवाळ कार्टा
Wed, 06/04/2014 - 17:25 नवीन
१०० कराच :)
  • Log in or register to post comments

१००

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/04/2014 - 17:29 नवीन
१०० अनेक केवळ काडी टाकायची म्हणून काढलेल्या अनेक धाग्यांनी शंभरी गाठलेली पाहिली आहे. या पार्श्वभूमीवर या उत्तम धाग्यावर हा १०० वा प्रतिसाद द्यायला अभिमान वाटत आहे. :) *clapping*
  • Log in or register to post comments

काका लेख . आणि तुमचे विचार

अद्द्या
Sat, 06/07/2014 - 11:38 नवीन
काका लेख . आणि तुमचे विचार खूप आवडले . माझी बारावी राहिली होती . तेव्हाचे आमच्या "जवळच्या नातेवाईकांचे "एक एक विचार ऐकून एवढा राग यायचा . . काही उदाहरणे देतो . . १) कॉलेज सोडवा त्याचं . तुमच्या बरोबर तुमच्या कारखान्यात घेऊन जा . पैसे तरी कमवेल . २) आजपर्यंत च्या तुमच्या मेहनतीला आणि पैश्याला वाया घातलंय त्याने . . घरातून काढून टाका . आणि इतरही असेच अनेक . . मुख्य म्हणजे हे लोक . असं सगळं बाबांना बोलायचे . . . किती राग आला तरी काही करू शकत नवतो . . त्या २-३ दिवसात बाबांना रडताना बघितलं होतं मी रात्री . . आता वेळ अशी आहे . कि हेच नातेवाईक मला फोन करतात . . "आमच्या मुलासाठी नोकरी मिळते का बघ न . त्याने पुढे काय करावं हे सांग ना . . इंजिनियरिंग करून घरीच बसलाय रे . . वर्ष झालं आता. . " किती म्हटलं तरी ह्या लोकांच्या तोंडी वाक्यं ऐकली कि बरं वाटतं काही वेळेला .
  • Log in or register to post comments

जबरदस्त

मुक्त विहारि
Sat, 03/09/2024 - 23:17 नवीन
वाखुसा
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा