Skip to main content

भुरका / तिखटी

भुरका / तिखटी

लेखक मितान
Published on मंगळवार, 06/05/2014
ठेचा खर्डा यांच्या नातेवाईकांमधला अजून एक पदार्थ .... आमच्या मराठवाड्यात विशेषतः परभणी-बीड या भागात भुरका फार आवडीचा. शिळी भाकरी असो की रसाचे जेवण, भुरक्याचे एक बोट चाटले की जिभेवरचे सगळे शेवाळ गेलेच पाहिजे.नव्या घासाच्या नव्या चवीसाठी जीभपण नवी! या प्रकाराला काही ठिकाणी 'तळलेले तिखट ' असेही म्हणतात. हा चटणीचा एक प्रकार आहे. करायला सोपा. तिकडे नुसते तिखट वापरून करतात. मी थोडा सौम्य करावा म्हणून थोडा बदल केला आहे. वेळ : ५ ते ७ मिनिटे साहित्य : पाव वाटी लाल तिखट पाव वाटी पोहे २ चमचे दाण्याचा कूट लसूणपाकळ्या १०-१२ पाव वाटी तेल जिरे-मोहरी-मीठ कृती : छोट्या कढईत तेल तापत ठेवा. एका वाटीत तिखट आणि मीठ एकत्र करा. तापलेल्या तेलात मोहरी जिरे टाका. मग सोलून पोह्यांसारखा चिरलेला लसूण टाका. लसूण गुलाबी रंगाचा झाला की गॅस बंद करा. मग त्यात पोहे टाका. पोहे लगेच तळले जातील. हे मिश्रण वाटीत ठेवलेल्या तिखटावर ओता. मग त्यात भाजलेल्या दाण्याचा कूट घाला. चांगले मिसळा. भुरका तयार. ही चटणी १५ दिवस चांगली टिकते. ( खाऊन संपली नाही तर.. ! ) वर सांगितल्याप्रमाणे पोळी, भाकरी, ब्रेड, नुसता भात याबरोबर मस्त लागते. पोहे टाकल्याने छान कुरकुरीत चव येते. भारताबाहेरील मंडळीना विशेष उपयोगी. कारण ज्यांना तिखट खायला आवडते त्यांना पिझ्झा, बर्गर, पांचट सँडविच, फ्राइज यासोबत सहज खाता येते. एखाद्या तयार पदार्थाचा तिखटपणा वाढवण्यासाठीपण ही खूप सोयीची आहे. तिखट तळलेले असल्याने री-फोडणीची गरज नाही. भाजी आमटीत नुसती चमचाभर मिसळा. सूचना : पोट अतिसंवेदनशील असणार्‍यांनी ही चटणी एका जेवणात १/८ चहाचा चमचा एवढीच खावी. अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याच्या तयारीने खावे. फोटोसाठी (नुसता फोटो चढविता येईना आणि फोटोशिवाय पाकृ सहन होईना म्हणून ब्लॉग ) bhurka

याद्या 12463
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

मस्तच. आणी मी प य ला (मराठवाडी) जेपी

वर्णन वाचून मेले. bhuraka आणि हा तुझ्या ब्लॉगवरचा फोटो.

पाव वाटी लाल तिखट
हे वाचूनच फेफरं आलं. पोट अतिअतिसंवेदशील असल्याने फोटो पाहून नी पाकृ वाचूनच समाधान मानावे लागेल.

मस्त आहे... झणझणीत तिखटाची केली तर अजून मजा. दाणे चांगले भाजलेले हवेत आणि पोहेपण अगदी कुरकुरीत. आम्ही मोहरी लसणाची फोडणी दिलेले तिखट साध्या मुगाच्या खिचडीवर घेतो. हा त्याचा अजून पुढचा प्रकार.

In reply to by निनाद

>>>>आम्ही मोहरी लसणाची फोडणी दिलेले तिखट साध्या मुगाच्या खिचडीवर घेतो. आयला, मी हेच करतो. तेल तापवून बारीक चिरलेला लसून चरचरीत तळून झाला की गॅस बंद करून तिखट आणि मिठ टाकायचं झालं तिखट तयार. खिचडीवर अत्तिशय मस्तं लागतं. मला वाटायचं मीच शोधून काढलेली ही पाककृती आहे. आज भ्रमनिरास झाला, निनाद.

आम्ही करत असतो अधून-मधून. शिळ्या भाकरीसोबत हा भुरका बेस्ट लागतो. तोंडी लावायला कोवळा कांदा. वा वा... और इस दिल में क्या रखा है, भुरका, चिकन, औरSS ठेचा हैं...खीर को देखा, हलवा भी खाया...भाकरी-भरीत पे दिल बेचा हैं... असं आहे सगळं...

"जीभेचं शेवाळं" व्वा!! क्या बात है! हे वाचताना मी त्या शेवाळावरुन जी घसरले ती डायरेक्ट त्या चटणीत. *mamba* धन्यवाद मितान!! प्रकरण भलत म्हणजे भलत्च कड्क दिसतय!!!

साधारण असच दिसणारे एक लसणाचे तिखट असतं, तेपण टिकतं बर्‍यापैकी. तेल तापवून त्यात आधी जिरे, मोहरी, आणि लसूण तुकडे करुन टाकायचा लसून तळला जायला लागला की लाल तिखट, शेन्ददाण्याचे कूट आणि तीळ घालायचे. मग कढीलिम्ब घालायचा. सगळं क्रिस्पी झालं की गॅस बन्द करुन मीठ घालायचं. हा माझ्यासारख्या oversensitive लोकांसाठी असलेला सौम्य प्रकार आहे. :)

In reply to by कवितानागेश

कच्चा लसूण, सुके खोबरे, भाजलेले शेंगदाणे आणि तिखट मीठ एकत्र कुटून करायचं कच्चं लसनीचं तिखट माहित होतं. आज नवीन प्रकार कळले.

In reply to by पैसा

आम्ही हे शेंगदाणे न घालता करतो. प्रत्यक्ष जेवताना (भरपूर) चटणीवर (भरपूर) शेंगदाणा किंवा करडई तेल ओतून, गरमागरम पोळी/भाकरी बरोबर खायचं. साथीला अर्थातच बुक्की मारून कांदा.

हा प्रकार माहित आहे आणि कधी मधी आवडतो. फक्त आम्हि त्यात पोहे घालत नाहि.

तायडे, प्रत्यक्ष तुझ्या हातचा भुरका खाल्ला होता त्याची जाम आठवण झाली, काय खतरनाक प्रकार आहे राव.. लाळेरं लावायची वेळ आलिये.

ह्याला लसणीचं तिखटही म्हणतात. माझ्या नागपुरकर मैत्रीणीने एकदा केले होते, फक्त त्यात तिने पोहे घातले नाही. डाळ-तांदुळाची खिचडी, लसणीचं तिखट व ताक असे काँबी बेस्ट लागतं :) मितानताई फोटो पाहून तोंपासु व घाम फुटला ;) +११११११

आम्ही हा तीळ घालुन करतो...मस्त लागतो...माझा आवडता *ok*

वा वा … मला इथे आल्यापासून अळणी खायचा अगदी कंटाळा आलाय . पोहे कोणते वापरायचे? पातळ लवकर तळले जातात पण ते लवकर soak पण होतील नं ?

तुम्च्या ... तुम्च्या! काय रोज उठून चालिवलंय गं आक्कांनो! जरा उसंत घिऊन द्या की. हिर्वी मिर्ची आनि लाल मिर्ची! शिमगा झाला न्हवं मागच्या म्हैन्यात? आनि काहून बोंबलाय लावायलाय...

हे 'तोंडी लावणे' तोंडी लावणे केवळ अशक्य!!! अवांतर: आपला ब्लॉग पाहिला. वाचनीय आहे. पण, त्याचे back ground फार गडद वाटते आहे. वाचताना डोळ्यांना त्रास होतो आहे. काही करता आले तर पहावे.

भारी प्रकार आहे. नक्की करून बघणार.

केला होता मी हा भुरका. जोरदार आहे...एकदम झणझणीत