Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आतिवास on Mon, 03/17/2014 - 22:04
भारतात सार्वत्रिक निवडणूक घ्यायची हे एक आव्हानात्मक काम आहे याची मला कल्पना आहे. निवडणूक आयोगाचं आणि निवडणूक प्रक्रिया नीट व्हावी म्हणून राबणा-या इतर यंत्रणांचही त्यासाठी कौतुक करायला पाहिजे. दर वेळी या निवडणूक प्रक्रियेतून आपल्यासारख्या सामान्य लोकांना बरंच काही शिकायला मिळतं. मला आठवतं – मी जेव्हा मतदान करायला ‘पात्र’ झाले त्यावेळी ‘पवित्र राष्ट्रीय कर्तव्य’ पार पाडण्यासाठी मी अत्यंत उत्सुक होते. पण बरीच वर्ष मी आणि मतदान यांचा पाठशिवणीचा खेळ चालला. दरवेळी मी नाव नोंदवायला गेले की आधी एक तर कागदपत्रांची अडचण यायची. मी रहिवासी असल्याचा कसलाही पुरावा माझ्याकडे नसायचा. त्यावर मात करून एक दोनदा नाव नोंदवलं; पण प्रत्यक्षात मतदानाची तारीख येईतोवर मी गाव बदलेलं असे किंवा त्याच गावात असले तरी राहण्याची जागा बदललेली असे. या सगळ्यातून मार्ग काढत अखेर २००४ मध्ये पहिल्यांदा मी मतदान करू शकले आणि त्यानंतर लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका अशा विविध निवडणुकांत मतदान करायचा अनुभव माझ्या गाठीशी जमा झाला. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्यामुळे मतदार यादीत माझं नाव असेल याची मला खात्री होती आणि सुदैवाने या मधल्या काळात माझा पत्ता बदलला नव्हता. सध्याच्या माझ्या सोयीच्या “ऑनलाईन” तत्त्वानुसार मी या पानाला भेट दिली. https://ceo.maharashtra.gov.in/marathi/FrmMainPage.aspx Chief Electoral Officer, Maharashtra Electoral Roll Search (मतदार यादीत नाव शोधणे) Prepared By : Chief Electoral Officer, Maharashtra Search In English मराठीत शोधा Id Wise Name Wise Go YOU ARE VISITER NUMBER : 3593901 तिथं काही माझं नाव मिळालं नाही. मग दुसरा पर्याय – नेहमीच्या भाषेत प्लॅन बी – ऑनलाईन नाव नोदणी. https://ceo.maharashtra.gov.in/Registration.aspx Chief Electoral Officer, Maharashtra Greater Participation for a Stronger Democracy Home PDF Electoral Roll (Partwise) Claims & Objections Online Voter Registration Online Complaints Contact Us CEO Maharashtra Online Voter Registration Form 6 Inclusion of names for residents electors Form 6A Inclusion of names for overseas electors Form 7 Any objection on inclusion of names) Form 8 Correction of entries in the Electoral Rolls Form 8A Transposition within Assembly आधी नावनोंदणी केली, मोबाईलवर पासवर्ड आला. अर्ज क्रमांक ६ उघडला – माहिती भरायला सुरुवात केली. एक फोटो, निवासाचा पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा जोडायचा होता. हे सगळे ‘पुरावे’ माझ्या संगणकात होते त्यामुळे अडचण येणार नव्हती मला. दुस-या पानावर गेल्यावर लक्षात आलं की पीडीएफ जोडून चालणार नव्हतं तर जेपीईजी इमेज जोडायची होती. मी निमूट अर्ज बंद केला आणि दुस-या कामाला लागले. दुस-या दिवशी डिजिटल कॅमे-यावर ते दोन पुरावे टिपले, संगणकात ते साठवले आणि पुन्हा ऑनलाईन अर्जाचा दरवाजा ठोठावला. पहिला अर्धवट अर्ज मला उघडता येत नव्हता – मग पुन्हा सगळी प्रक्रिया केली आणि एकदाचा अर्ज भरून झाला. तीन चार दिवसांनी पुन्हा नाव तपासलं – पण अजूनही ते नव्हतंच यादीत. मग वर्तमानपत्रात एका बातमीत टोल फ्री नंबरची माहिती मिळाली. प्रत्यक्षात १९५० हा फोन चालत नव्हता. दहा वेळा प्रयत्न केला आणि मग गप्प बसले. ९ मार्च रोजी मतदार यादीत नाव नोंदवायची अजून एक संधी होती. मतदान केंद्रावर जायचं; यादीत नाव आहे का ते बघायचं; असलं तर ठीकच – नाहीतर अर्ज भरून द्यायचा. मी फोटो आणि त्या दोन कागदांच्या फोटोप्रती घेऊन गेले शाळेत – म्हणजे आमच्या मतदान केंद्रात. तिथं चार जोडून ठेवलेल्या टेबलांच्या मागे चार लोक बसले होते. election 1 केंद्रात पन्नासेक लोक असतील. प्रत्येक गटाच्या हातात एकेक यादी होती आणि त्या यादीत लोक डोकावून पाहत होते. मीही एका गटात डोकावून बघितलं – मग लक्षात आलं की आपल्याला प्रभाग अथवा वॉर्ड क्रमांक माहिती नाही. election 2 मग तिथल्या कर्मचारी स्त्रीला माझ्या निवासस्थान संकुलाचं नाव सांगून यादी मागितली; तर त्या ‘प्रभाग सांगा’ म्हणाल्या. तो तर मला माहिती नव्हता. तोवर मला एकंदर इकडून तिकडे टोलवलं जाण्याचा कंटाळा आला होता. इतकं झंझट करत बसण्यापेक्षा ‘नवा अर्ज भरू’ असं म्हणत मी दुस-या कोप-यातल्या कर्मचा-याकडे गेले. तर तिथं अर्ज संपले होते. सकाळी साडेदहा वाजताच अर्ज संपले होते. “आम्हाला फक्त दहा अर्ज दिले होते, आम्ही काय करणार? तलाठी ऑफिसात जाऊन भांडा तिथल्या साहेबांशी” असा त्या बाई मला सल्ला देत होत्या आणि इतर तीन कर्मचारी त्यांना अनुमोदन देत होते उत्साहाने. रविवारी काम करायला लागल्याचा रागही त्यांनी व्यक्त केला. “नगरसेवकाच्या ऑफिसात मिळताहेत अर्ज, तिकडून घेऊन या”, दुस-या रांगेत उभ्या असलेल्या एका सद्गृहस्थांनी सल्ला दिला. आमच्या नगरसेवकाचं कार्यालय मला माहिती नव्हतं – पण ‘शोधा म्हणजे सापडेल’ या तत्त्वानुसार शोधल्यावर ते सापडलं. तिथं नमुना अर्जही मिळाला – तो घेऊन मी शाळेत परतले तर गर्दी (अपेक्षेप्रमाणे) अजून वाढली होती. लोक अधिकच वैतागले होते, कर्मचारी गर्दीला हाताळू शकत नव्हते, पुरेसे अर्ज नव्हते, प्रभागांचे नंबर लोकांना माहिती नव्हते – सगळा नुसता गोंधळ होता. मी अर्ज भरण्याच्या तयारीत होते तर मला सांगितलं गेलं की कागदपत्र नुसती जोडून चालणार नाहीत; ती कागदपत्र खरी असल्याचा सही शिक्का हवा. कुणाचा आणायचा असतो तो? तो कुठून आणायचा आता रविवारच्या दिवशी? मला त्या कर्मचा-यांची दया आली आणि माझ्यासकट तिथं आलेल्या इच्छुक मतदार लोकांचीही दया आली. निवडणूक आयोगासमोर काय प्रकारची आव्हानं असतात याची ही फक्त एक झलक! election 3 मतदान करणं – हा हक्क आहे, तर तो सहजी का मिळू नये? प्रत्येक वेळी हक्क मिळवण्यासाठी इतकी गुंतागुंतीची प्रक्रिया का करावी लागते? मुळात यादीत असलेली नावं गायब का आणि कशी होतात? निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काय होतंय याची माहिती कधी मिळते का? निवडणूक तयारीच्या बाबतीत ही माहिती देणारी यंत्रणा असते का? प्रश्नच प्रश्न! या सगळ्या गदारोळात एक गोष्ट ठळकपणे जाणवली; ती म्हणजे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अभाव. इथं इच्छुक मतदारांना मदत करायला कुणीच नव्हतं. नेते येतात तेव्हा कार्यकर्त्यांची गर्दी असते – इतर वेळी ते कुठे असतात कोण जाणे! बहुधा फेसबुकवर किंवा तत्सम सोशल मिडीयायामध्ये आपापल्या नेत्यांना “लाईक” देत बसले असतील – किंवा दुस-या पक्षांबद्दल अपप्रचार करत बसले असतील.
  • Log in or register to post comments
  • 36678 views
  • निवडणूक २०१४ अनुभवः २ केजरीवाल मुंबईत (१)
  • निवडणुक २०१४: अनुभव ३: केजरीवाल मुंबईत (२)
  • निवडणूक २०१४: अनुभव ४: दण्डकारण्य (१)
  • निवडणूक २०१४: अनुभव ५: दिल्ली: मतदानानंतर
  • निवडणूक २०१४: अनुभव ६: दण्डकारण्य (२)
  • निवडणूक २०१४: अनुभव ७: दण्डकारण्य (३)

Book traversal links for निवडणूक २०१४ अनुभव: १. नावनोंदणी

  • निवडणूक २०१४ अनुभवः २ केजरीवाल मुंबईत (१) ›

प्रतिक्रिया

Submitted by भाते on Wed, 03/19/2014 - 20:26

Permalink

काही शंका/प्रश्न

मतदार यादीत माझे नाव आहे. मला मतदार ओळखपत्र मिळाले (होते); होते कारण माझ्याकडुन ते हरवले आहे/मला सापडत नाही आहे. माझ्याकडे मतदार ओळखपत्र क्रमांक आहे. वर दिलेल्या दुव्याप्रमाणे (सुदैवाने) अजुनही माझे नाव मतदार संघात अस्तित्वात आहे. :) माझ्याकडे फोटो आयडी (पासपोर्ट/PAN Card) आहे. सध्या मी त्या पत्त्यावर रहात नाही आहे आणि आता मला मतदारसंघ बदलणे शक्य नाही आहे. महत्वाचे, आत्तापर्यंत मी प्रत्येक वेळी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी सुध्दा मला मतदान करायचे आहे. माझ्या मतदारसंघात जाऊन मतदान करणे मला सहज शक्य आहे. मग काय करावे लागेल मला?
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 03/19/2014 - 22:37

Permalink

माझा अनुभव असा. नवीन कार्ड

माझा अनुभव असा. नवीन कार्ड काढायचे होते. (हो, मीही अजून कार्डवंचितच आहे ! ) ९ मार्चला शेजाऱ्यांना विचारून भल्या पाहते अकरा वाजता जवळच्या शाळेत गेले. तिथे मोठ्ठे कुलूप. मग नगरपालिकेत गेले. तिथले दोनच हजर कर्मचारी म्हणाले अहो, आत्ता उघडेल मतदान केंद्र., आता जा. पुन्हा गेले. तर त्या शाळेत माझा प्रभाग नव्हता, असे समजले. दुसऱ्या शाळेत गेले. तिथेही शाळेला टाळे. बारकाईने पाहिल्यावर दूर झाडाखाली दोन खुर्च्या, एक टेबल अन दोन माणसे दिसली. जवळ गेल्यावर ते निवडणूक कर्मचारी असल्याचे समजले अन हुश्श झाले. चौकशी केल्यावर समजले की शाळेची किल्ली हेडमास्तरांकडे अन ते गावी गेले आहेत. फॉर्म मागितल्यावर एकजण माझ्याकडे पाहून म्हणाला, अहो, फक्त अठरा वर्षे झालेल्यांची नवीन नोंदणी घेतो. तुमची होईल का शंका आहे. संशयाचा फायदा घेऊन फॉर्म मिळवला, झेरॉक्स घेऊन परत केला. भरून फोटोबिटो लावून दिल्यावर म्हणाले तुमच्या शेजार्यांच्या प्रभागाचा नंबर आणा. पुन्हा शेजारी गेले. कार्डवर प्रभाग नंबर शोधला. मिळाला नाही. ज्याच्यापुढे अन मागे काहीच लिहिले नव्हते, असा एक बेवारस नंबर कार्डावर मिळाला, तो लिहून घेतला. शाळेत आले. तो नंबर प्रभाग नंबर नव्हता असे समजले. मग म्हटले यादीतले फोटो पाहून कुणी शेजारी आहेत का ते पहा. शेजारी सापडेनात. नि. कर्मचारी अन मी कंटाळून जेवायला गेलो. परत तीन वाजता येताना शेजार्यांच्या कार्डाची झेरॉक्स आणली. पण यादीत त्याचे नावच सापडेना. अखेर मुश्किलीने चार घरांपलीकडची एक नवतरुणी यादीत घावली. लगेच संदर्भ टाकला अन एकदाचा फॉर्म भरला ! कर्मचारीमहाशय म्हणाले नंतर नेटवर नव आले का ते पहा. पण अजून माझे लिंक उघडायचे धाडस होत नाही !
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Wed, 03/19/2014 - 22:53

In reply to माझा अनुभव असा. नवीन कार्ड by सस्नेह

Permalink

नागरिकांच्या उत्साहावर पाणी

नागरिकांच्या उत्साहावर पाणी फिरवणारी ही प्रक्रिया वर्षानुवर्षे बिनबोभाट चालू आहे हे वाईट ! इथल्या सगळ्या अनुभवांचा एक गोषवारा निवडणूक आयोगाला पाठवावा असं मनात येतंय - अर्थात २८ मे नंतर- त्याआधी त्यांना बरीच कामं आहेत!
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on गुरुवार, 03/20/2014 - 13:34

Permalink

माहिती..

फॉर्म मागितल्यावर एकजण माझ्याकडे पाहून म्हणाला, अहो, फक्त अठरा वर्षे झालेल्यांची नवीन नोंदणी घेतो.
चुकीची माहिती दिली त्यांनी तुम्हाला.. हा कँप ज्यांची नावनोंदणी झाली नव्हती त्या सगळ्यांसाठीच होता. हां, १८ ते १९ वर्षे ह्या "एज ब्रॅकेट"मध्ये असलेल्यांवर भर होता, हे खरंय. तसेच, कुठल्याही प्रकारच्या "स्युओ मोटो" डिलीशन्सवर (माफ करा. माझ्याकडे कार्यालयीन काम इंग्रजीत होत असल्याने मराठी "टर्म्स" वापरायची सवय नाहीये. :-( ) निर्वाचन आयोगाने बंदी आणलीय आणि आता निवडणूक जाहीर झाल्यावरतर डायरेक दिल्लीतून निर्वाचन आयोगाची परवानगी घेतल्याशिवाय कुणाचेही नाव खोडणे अलाऊड नाहीये. त्यामुळे यादीत नाव असेल, तर बटन दाबणारच यंदा तुम्ही.. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Sat, 03/22/2014 - 07:47

Permalink

आभार

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. माहितीत भर घालणा-या प्रतिसादकांचे विशेष आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Sat, 03/22/2014 - 22:28

Permalink

माझे कार्ड मिळाले आहे. त्यात

माझे कार्ड मिळाले आहे. त्यात पत्ता साफ चुकीचा आहे. वरील साईटवर माझे नावही आहे. पण कार्ड्वरील आनी साईटवरील दोन्ही आयडी नंबर वेगवेगळे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Sun, 03/23/2014 - 10:28

In reply to माझे कार्ड मिळाले आहे. त्यात by विलासराव

Permalink

आयडी क्रमांक वेगळे आहेत आणि

आयडी क्रमांक वेगळे आहेत आणि पत्ताही वेगळा असेल तर एकाच नावाच्या दोन व्यक्तींच्या या दोन वेगळ्या नोंदी असण्याची शक्यता अधिक दिसते आहे. तुम्ही कार्डवरचा आयडी देऊन संकेतस्थळावर शोध घेतलात तर कदाचित काय ते कळेल. तुम्ही हे करून बघितले असेल तर मग माहिती नाही मलाही!
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Sun, 03/23/2014 - 19:07

In reply to आयडी क्रमांक वेगळे आहेत आणि by आतिवास

Permalink

तुम्ही कार्डवरचा आयडी देऊन

तुम्ही कार्डवरचा आयडी देऊन संकेतस्थळावर शोध घेतलात तर कदाचित काय ते कळेल. कार्डवरचा आयडी टाकल्यावर नाव येत नाही. साईटवर आनी माझ्याकडे असलेल्या कार्ड्वर वार्ड एकच आहे. साईटवरचे नाव माझेच आहे. एकदा प्रत्यक्ष जाउनच पहावे लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sun, 03/23/2014 - 11:23

Permalink

मिळालं एकदाच नाव मतदार यादी

मिळालं एकदाच नाव मतदार यादी मध्ये Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Sun, 03/23/2014 - 11:27

In reply to मिळालं एकदाच नाव मतदार यादी by खटपट्या

Permalink

(No subject)

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Sun, 03/23/2014 - 16:53

Permalink

ऑफिस मधुन फॉर्म घेउन, ऑफिस

ऑफिस मधुन फॉर्म घेउन, ऑफिस मधल्याच एकाला भरुन दिला.. मग अतिवास ताईंचा लेखातुन लिंक घेउन नाव शोधलं.. मग आईला फोन करुन यादी नंबर दिला आणि आता आई माझे कार्ड घेऊन येते आहे..!! मागची अनेक वर्ष कार्ड मिळायला झगडल्या नंतर आता असं काहीही न करता घर बसल्या कार्ड मिळालं!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sun, 03/23/2014 - 21:46

Permalink

मज्जा :)

या सर्व झंझटीला पायबंद घालायला म्हणुनच तर सुशासन हवे आहे ;) ज्याप्रमाणे लायसन्स, पासपोर्ट वगैरे सेवाकेंद्र १२ महिने सुरु असतात तसच मतदान ओळकपत्रांबाबथि होत असावं ना. पण त्याकरता एक खास ऑफीस असावं. त्याचप्रमाणे या सर्व सेवा इंटीग्रेटेड असतील तर काय बहार येईल.. म्हणजे कसं, कि ज्याने लायसन्स काढलं त्याला परत पासपोर्टकरता अ‍ॅड्रेसप्रूफचि गरज नसावी. व लायसन्स, पासपोर्ट, पॅनकार्ड वगैरे बनवताना २ रु. जास्तिचे चार्ज करुन मतदार ओळखपत्र देखील देण्याची सोय असावी. येऊ दे एकदा सुशासन... मग बघा सगळं कसं येकदम टकाटक होतय :) अवांतरः इतक्या कटकटींना तोंड देत मिपाकर मतदारयादित आपलं नाव झळकवताहेत... इस चिकाटीका राज मिपावर न चुकता येणे तर नाहि ना? मिपाचा हा फायदा सरकारदरबारी नोंद घेण्यालायक आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुहासदवन on Tue, 03/25/2014 - 22:29

Permalink

माझे काम झाले.....

हा धागा वाचल्यावर माझ्या पत्नीचे नाव मतदान यादीत टाकण्यासाठी मी ह्या साईट वर जाऊन ऑनलाईन सर्व डिटेल भरले आणि आज त्यासाठीचे कन्फर्मेशन आले देखील कि तुमचे योग्य ते कागद पत्र घेऊन अमुक ठिकाणी अमुक वेळेत या. वाह काय सर्विस आहे… धन्यवाद…
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Tue, 03/25/2014 - 23:15

In reply to माझे काम झाले..... by सुहासदवन

Permalink

माझ्या आधीच्या ऑनलाईन अर्जावर

माझ्या आधीच्या ऑनलाईन अर्जावर काही उत्तर आलं नाही. तुमचा अनुभव वाचून पुन्हा एकदा अर्ज भरला (आणि तो स्वीकारला गेला, म्हणजे आधीच्या अर्जाचं काय झालं?) आणि तो मला दिसतो आहे. 'अमुक वेळी कागदपत्र घेऊन या' असा निरोप तुम्हाला यायला किती दिवस लागले? हे - म्हणजे निवडणूक आयोगाचं, मिपा नाही - संकेतस्थळ आध्यात्मिक दिसतंय - प्रत्येकाला त्याचे वेगवेगळे अनुभव येताहेत असं प्रतिसादांवरून वाटतंय :-)
  • Log in or register to post comments

Submitted by सुहासदवन on Fri, 03/28/2014 - 09:20

In reply to माझ्या आधीच्या ऑनलाईन अर्जावर by आतिवास

Permalink

५ कामकाजाचे दिवस

५ कामकाजाचे दिवस
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 03/28/2014 - 04:19

Permalink

https चालत नाही .तुमचा

https चालत नाही .तुमचा ब्राउजर अधिकृत डॉट जेएडी (जावा सर्टिफिकेट येस) असेल तरच रेजिसट्रेशन करताना (इमेल वगैरे लॉगिन) सिक्युअर कनेक्शन (= https) मिळते .नाहीतर http वाले .
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 03/28/2014 - 22:15

Permalink

मस्त लेख!

प्रतिसादातूनही बरीच माहिती मिळाली. कोणा सर्कारी कर्मचार्‍यांच्या कृपेने आमच्या अख्ख्या बिल्डिंगची नावे मध्यंतरी लिस्टातून गायब झाली होती, काहीजणांनी खटपट करून लावून घेतली. पण आमची नावे लावायची राहिली होती. यावेळी मुदत संपायच्या आधीच भाजपाच्या लोकांनी येऊन आमचे अर्ज भरून घेतले आणि आता नावे लिस्टात दिसत आहेत. तिथे आपले आधार कार्ड, मोबाईल आणि इमेल अपडेट करायची सोय दिसते आहे. इतर रेकॉर्ड मॉडिफिकेशन लिंकही दिसली.
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Mon, 06/09/2014 - 19:58

Permalink

मतदार यादीत नाव नसल्याने

मतदार यादीत नाव नसल्याने ज्यांना लोकसभा निवडणुकीत मतदान करता आलं नव्हतं, त्यांच्या माहितीसाठी - यादीत नाव आहे का, नसल्यास नोंदणीची संधी - मोहीम सुरु होत आहे. ज्यांचं नाव होतं त्यांनीही पुन्हा एकदा तपासून घेणं चांगलं!
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15

Pagination

  • First page « पहिले
  • Previous page ‹ मागे
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com