Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेल्लाभट on Sat, 02/15/2014 - 21:57
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव
पुणेरी ढोल म्हटलं की कान न टवकारणारी माणसं क्वचितच भेटतील. त्यातून पुण्यात, ठाण्यात, डोंबिवलीत वगैरे तर नाहीच. त्याची मजा काय आहे, बाज काय आहे, तो रोमांच काय आहे हे अनेकांनी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पणे अनुभवलं असेल. विशेषतः गणपतीच्या दिवसात तर अ़ख्खं पुणं ढोल ताशांनी निनादत असतं. तीन वर्षांपूर्वी मी एक दिवस पुण्यावरून ठाण्याकडे येत होतो. अनंत चतुर्दशी चा दिवस होता. स्वारगेटवरून शिवनेरी पकडली होती आणि खिडकीतून ढगाळलेलं संध्याकाळचं आकाश बघता बघता माझा डोळा लागला होता. आणि मग जाग आली ती जाणवणा-या कंपनांमुळे. बसच्या काचेला, सीटला, आणि माझ्या छातीत एक तालबद्ध कंपनं जाणवायला लागली आणि मला जाग आली. बाहेर बघितलेलं दृश्य न विसरण्यासारखं होतं. मोठ्ठाले ढोल घेऊन चालणारे सुमारे ५० वादक. एका रांगेत; शिस्तीत. त्यांच्या मधोमध असलेला ताशावादकांचा चमू. आणि दोनही बाजूस भगवे झेंडे तालात नाचवणारे काही जण. काचेच्या आतून मागे वळून वळून बघतानाच ठरवलं, यात एक दिवस आपण असणार. त्यानंतर योगायोगाने एका पुण्यातल्या प्रसिद्ध ढोल पथकातला एक मुलगा माझ्या संपर्कात आला. त्याला मी दुस-यांदा भेटलो होतो तेंव्हाच विचारलं, की, ’मला ढोल पथकात वाजवायची जाम इच्छा आहे. तुमच्या पथकात घेतील का मला? मी तबला शिकलोय ३ वर्ष त्यामुळे अबकड पासून सुरुवात नाहीये ही खात्री देतो’ पण त्यानेही प्रामाणिकपणे सांगितलं, की बरेच महिने आधी प्रॅक्टिस सुरू होते, तू ठाण्याला आम्ही पुण्याला, तुला नाही शक्य व्हायचं. मग दोन वर्ष अशीच गेली. गणपती आले की पुन्हा उत्साह उफाळून यायचा, गणपती गेले की पुन्हा तो विचार विरून जायचा. चार महिन्यापूर्वी ठाण्यात एक फलक वाचला. पुण्याच्या धर्तीवर ठाण्यातही ढोल पथक तयार करण्याची ती योजना होती. दुस-याच दिवशी भेटायचं होतं. अर्थातच मी तिथे गेलो. पुण्यात न जाता ठाण्यातच मला माझी हौस पूर्ण करायची संधी होती. कल्पना जाणून घेतली, नाव नोंदवलं, आणि मग प्रॅक्टिस सुरू झाली. पहिल्यांदा त्या ढोलाची दोरी कमरेभोवती आवळली तेंव्हा जे वाटलं ते जाम भारी होतं. अंगावर शहारा आणणारं. इथे अनेक नवी माणसं भेटली, नवे मित्र भेटले. पुण्याच्या एका प्रसिद्ध ढोल पथकाचे संस्थापक आम्हाला शिकवायला येत होते. ते आले त्या प्रत्येक वेळी त्यांनी जागवलेली इंटेन्सिटी, शिस्त केवळ कमाल होती. टोटल इम्प्रेस आणि इन्स्पायर झालो मी त्यांना बघून. किंबहुना पथकातले सगळेच. हळू हळू प्रॅक्टिस वाढत गेली. मग एका तालात सगळ्यांचे ठोके पडायला लागले, ताशाची भाषा समजायला लागली आणि त्या एकत्र वादनातली खरी मजा यायला लागली. ’माघी गणेशोत्सवाच्या विसर्जनाला आपण वाजवणार आहोत’ असं आम्हाला सांगण्यात आलं, आणि अगोदरच वाढलेला उत्साह दुप्पट झाला. आता समोर निश्चित उद्दिष्ट होतं, डेडलाईन होती. इंग्रजीत म्हणतात त्याप्रमाणे, ‘द रेस्ट इज हिस्टरी’. झपाझप दिवस सरकले, पथकाचं बारसं झालं; ‘वीरगर्जना’. नावच इतकं कडक होतं की काय विचारा. तितकाच कडक लोगो बनला, प्रत्येकाला राजबिंडा करेल असा गणवेष ठरला, आणि तो दिवस आला. माघी गणपतीच्या विसर्जनाचा दिवस. नौपाडा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला ढोल-ताशे वाजवून गणेशाला निरोप देण्याचा मान वीरगर्जनाला मिळाला होता. a त्या दिवशी सकाळपासूनच जरा दडपण होतं. प्रॅक्टिस करताना एकमेकांसमोर वाजवणं वेगळं; परंतु शेकडो लोकांसमोर वाजवणं वेगळं, अशी धाकधूक होती. पथकातील सगळेजण जिथे गणपती बसले होते त्या ठिकाणी जमलो. वेशभूषा, केशभूषा झाल्या. डोक्यावर फेटे चढले, कपाळावर गंध चढला आणि मुहूर्ताचा नारळ फुटला. गणपती बाप्पा, शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष झाला आणि पहिल्या ठोक्यासहित माहोल थरारला. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी, नातेवाईक, मित्र आणि अनेक ओळखीचे, अनोळखी चेहरे आमच्या सगळ्यांकडे कौतुकाने बघत होते. टाळ्या वाजवत होते, शिट्या वाजवत होते. अत्युच्च आनंदाचा, आणि समाधानाचा तो अनुभव होता ज्याचं शब्दात वर्णन करणं कठीण आहे. तेंव्हा काही फोटो, आणि व्हिडियोची लिंक खाली देत आहे. बघून आपल्या प्रतिक्रीया जरूर द्या. बाकी, संयोजक सरांनी आणि बघायला आलेल्या नातेवाईकांनी ‘उत्तम वादन झालं’ म्हटल्यावर खरा आनंद झाला. तरीही, आम्हाला किती वरची पातळी गाठायची आहे हे मात्र आम्हाला ठाऊक आहे. वादनाची सुपारी द्यायची असल्यास सांगावे, मी संबंधित व्यक्तींचं नाव, त्यांचा फोन नंबर पुरवेन. a bb qq aaa
  • Log in or register to post comments
  • 15638 views

प्रतिक्रिया

Submitted by यशोधरा on Sun, 02/16/2014 - 18:01

Permalink

मस्त!

मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Sun, 02/16/2014 - 18:04

Permalink

वाह! मस्तचं

वाह! मस्तचं
  • Log in or register to post comments

Submitted by आरोही on Sun, 02/16/2014 - 21:55

Permalink

खरच खुप मस्त.........

खरच खुप मस्त.........
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 02/16/2014 - 22:40

Permalink

मस्त!

गेल्या वर्षी पुण्यातले एक ढोलपथक पाहिले/ऐकले होते. थोडा वेळ पाहणार्‍याला अद्भूत वाटते खरेच! मात्र प्रॅक्टिस कुठे आणि कशी करणार प्रश्नच आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Mon, 02/17/2014 - 09:19

Permalink

सानिका, यशोधरा, अद्वेय,

सानिका, यशोधरा, अद्वेय, ज्योती, धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Mon, 02/17/2014 - 10:44

Permalink

...

ढोल पथकाचे हे लोण मुंबईच नव्हे तर जम्मू-काश्मीरपर्यंत पोचणार आहे तसं मुळी ठरलेलच आहे
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 02/17/2014 - 10:52

Permalink

मला आवडतो हा प्रकार... नाशिक

मला आवडतो हा प्रकार... नाशिक ढोल प्रसिद्ध होताच, पण पुण्याची पथकही मस्त आहेत. बाकी यांच्या अभ्यासामुळे जवळ राहणार्‍यांना त्रास होत आहे ही बाब सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. ढोल आणि ध्वनिक्षेपक यांच्या अती आवाजाने सुद्धा त्रास होतोच !
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 02/17/2014 - 10:54

Permalink

पर्याय हवा

एकदा "संस्कृती" हे लेबल लागलं की त्याबद्दल लहानसा किंतुसुद्धा तुम्हाला संस्कृतीविघातक लेकाचे म्हणून बघायला पुरेशी ठरते. तरी विचारतोचः या ढोलपथकाच्या प्रॅक्टिसच्यावेळी एखाद्या लोकवस्तीपासून दूरच्या मोकळ्या जागी सराव करता येणार नाही का? ऐन लोकवस्ती जवळ असणार्‍या ठिकाणी ही प्रॅक्टिस करून संस्कृतीरक्षण कसे होते? तुमचे आमचे ठिके हो, कित्येक रुग्णांच्या, वृद्धांच्या, ऑटिझमसारख्या अधिक सेन्सिटिव्हीटी असणार्‍या आपल्यापेक्षा वेगळ्या नागरीकांच्या ताणाची कल्पना केली तर काहितरी पर्याय या ढोलपथकांनी शोधायला हवा असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 02/17/2014 - 10:56

Permalink

मस्त!

मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by विअर्ड विक्स on Mon, 02/17/2014 - 11:07

Permalink

गिरगावातील पथकांचा सराव

गिरगावातील पथकांचा सराव चौपाटी वरील मैदानांवर होतो… त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा बागुलबुवा नको आणि तसेही सरावाचा वेळेस ढोल पूर्ण शक्तीने बडवत नाही कारण ढोल फुटायची भीती असते.…. आमच्या तरी पथकात सर्व हौशी वादक आहेत व त्याचे कोणीही पैसे घेत नाही तर केवळ हौसेखातर वाजवतात आणि मिळालेली बिदागी विधायक कार्यांसाठी वापरतात…
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 02/17/2014 - 11:11

In reply to गिरगावातील पथकांचा सराव by विअर्ड विक्स

Permalink

होय. अ‍ॅक्च्युअली मी हा सराव

होय. अ‍ॅक्च्युअली मी हा सराव बघितला आहे आणि तो बघुनच "हे असे करणे शक्य आहे" हे पटले आणि त्यातून वरचा प्रश्न विचारला आहे. पथकांनी ठरवले तर त्रास न देताही ते असा सराव करू शकतात हे गिरगाव चौपाटीवरच बघितले. मुंबईत गिरगावातींल पथकांना समुद्र किनारा आहे ही पळवाट पुरेशी नाही असे वाटते. पथकांनी दुसर्‍या बाजुचाही विचार करून काहीतरी पर्याय शोधायला हवे असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 02/17/2014 - 11:25

Permalink

आवाजामुळे येणारी कर्ण बधीरता

आवाजामुळे येणारी कर्ण बधीरता यात लोकांच्या त्रासाबद्दलच्या बधीरतेचा(insensitivity to others feelings) अंतर्भाव नाही ही दोन प्रकारची असते १) सतत मोठा आवाज ऐकत रहाणे २) एकच जोरात झालेला स्फोटासारखा आवाज विजेच्या कडकडाटाचा आवाज हा १२० डेसीबेल असतो आणि पुण्याच्या उत्सवात ढोल ताशांचा आवाज ११५ डेसीबेल पर्यंत होता. खालील दुवे मुळापासून वाचावेत. http://www.punemirror.in/article/62/2013092020130920104813250b11530a5/Increase-in-decibel-levels-despite-dholtasha-curbs.html?pageno=1 http://www.dangerousdecibels.org/education/information-center/noise-induced-hearing-loss/ http://www.nidcd.nih.gov/health/hearing/pages/noise.aspx http://www.medicinenet.com/noise_induced_hearing_loss_and_its_prevention/page3.htm#how_loud_can_a_sound_get_before_it_affects_hearing
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Mon, 02/17/2014 - 12:39

Permalink

हो ना !

आणि अनेक पथकं ही काळजी निश्चित घेतात त्यामुळे सरसकट प्रतिक्रीया नसावी.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 02/17/2014 - 13:57

In reply to हो ना ! by वेल्लाभट

Permalink

सरसकट प्रतिक्रीया नाही

साहेब पहिला दुवा वाचावा पुण्याच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या सर्वेक्षणात दहा वेगवेगळ्या ठिकाणी रात्री बारा पासून ते सकाळी आठ पर्यंत दर १५ मिनिटानी आवाजाची पातळी मोजण्यात आली. याची सरासरी ११४.४ डेसीबेल आली
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Mon, 02/17/2014 - 13:45

Permalink

सुबोधसर्,एक गोष्ट विचारायची राहिली...

सैन्याएत बंदुकीचा अथवा तोफेचा आवाज किती डेसिबल असतो.आणी सरावाकरता एक सैनिक साधारण किती राउंड फायर करतो,त्याचा त्याच्या कर्णेंद्रीयावर काय परिणाम होतो.कारण मी पहिल्यांदा .३२ चे एक सहा सात राउंड सलग फायर केले तेंव्हा मला साधारण १५-२० दिवस कानात स्टेथो घालता येत नव्हता.नंतर मात्र सवय होत गेली.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 02/17/2014 - 14:06

In reply to सुबोधसर्,एक गोष्ट विचारायची राहिली... by बाबा पाटील

Permalink

http://www.freehearingtest

http://www.freehearingtest.com/hia_gunfirenoise.shtml बंदुकीच्या गोळी झाडण्याचा आवाज फारच मोठा असतो. त्यामुळे जेंव्हा प्रशिक्षण देतात तेंव्हा सैनिकांच्या डोक्यावर शिरस्त्राण असते त्यात कान झाकून त्यात आवाज कमी करणारे मफलर असतात. असे असूनही जेंव्हा सायंकाळी आपण परत येतो तेंव्हा कानात किं~~ असा आवाज येत रहातो(tinnitus). हा आवाज दुसर्या दिवशी नाहीसा होतो. नौदलात आम्हाला कानावर फिट बसणारे प्लास्टीक चे असे मफलर देत असत की ज्यामुळे समोरच्याचे बोलणे मुळीच ऐकू येत नसे. असेच मफलर विक्रांत च्या उड्डाण तळावर(फ्लाइट डेक) आम्ही वापरत असू. पण प्रत्यक्ष दहशतवाद्यांबरोबर होणार्या चकमकीत तुम्हाला आपल्या साथीदारचे बोलणे ऐकणे पण आवश्यक असते म्हणून अशा युद्धमान परिस्थितीत बर्याच वेळेस सैनिक हे मफलर वापरीत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Tue, 02/18/2014 - 12:05

In reply to http://www.freehearingtest by सुबोध खरे

Permalink

धन्यवाद...

माहिती बद्दल आभार...!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 02/17/2014 - 14:15

Permalink

आवाज /ध्वनी प्रदुषण या

आवाज /ध्वनी प्रदुषण या संदर्भात मध्यंतरी एक लेख माझ्या वाचनात आला होता... तो इथे देतो. दुवा :- The last place on Earth without human noise
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Mon, 02/17/2014 - 14:46

Permalink

वा

ढोल वाजवणे ही आवड "जपायची" पण त्याने दुसर्‍याची "झोपायची" अडचण होवु देवु नये ह्याचेही भान ठेवायचे. हाकानाका !
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 02/17/2014 - 15:46

Permalink

मस्तच की!!

मस्तच की!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 02/18/2014 - 14:05

Permalink

लै वेळा पाह्यली ती प्रॅक्टीस.

लै वेळा पाह्यली ती प्रॅक्टीस. कौतुक पण लै ऐकलं. सोलापुरात हजार हजार लेझीम वाल्यांना दोन ढोल अन तीन ताशेवाले पुरतेत. आम्हाला तेच भारी वाटत्येत. तुमचं कौतुक तुमच्यापाशी. आमचं आमच्यापाशी.
  • Log in or register to post comments

Submitted by माजगावकर on Tue, 02/18/2014 - 14:49

Permalink

तूनळीवरील व्हिडीओ पाहुन आणि

तूनळीवरील व्हिडीओ पाहुन आणि हे वाचुन
डोक्यावर फेटे चढले, कपाळावर गंध चढला आणि मुहूर्ताचा नारळ फुटला. गणपती बाप्पा, शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष झाला आणि पहिल्या ठोक्यासहित माहोल थरारला.
अंगावर शहारे आले! तुम्ही भाग्यवान आहात...
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 02/22/2014 - 21:46

Permalink

आज हा व्हिडीयो ऐकला :-

आज हा व्हिडीयो ऐकला :-
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन५८८ on गुरुवार, 03/12/2015 - 16:53

Permalink

पुणेरी ढोल ताशा मुळे कोणाला त्रास होत असेल तर .......

पुणेरी ढोल ताशा मुळे कोणाला त्रास होत असेल तर गणपतीच्या आधी १ महिने रजा घेऊन एकांतवासात जावे. आम्हाला कधी याचा त्रास होत नाही आणि होणार पण नाही, राहिले अभ्यास करणाऱ्याचे, एक तर गणपतीच्या दिवसात कोणतीच परीक्षा नसते मग अभ्यास करून कुठे दिवे लावणार, एकतर पोलिसांमुळे वेळ कमी मिळतो वाजवायला, त्यात असली कट कट… स्वताला वाजवता येत नाही म्हणून त्रास होतो असे स्पष्ट सांगावे. उगाच नको तिथे बोट घालून खाजून अवधान घेऊ नये.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com