Skip to main content

हिमालय..

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 24/01/2014 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय. त्याचं वेड लागतं. नशीबाची साथ असेल तर नेहमीचं चाकोरीबद्ध आयुष्य जगताना कधीतरी तुम्हांला हिमालयाच्या परिसरात चलण्याची संधी मिळते. ट्रेकसाठी. सोबत कोणी असेल की नाही, आपल्याला जमेल की नाही, सुट्ट्या मिळतील की नाही, बाकी घरी आपण नसताना काही अडचण तर होणार नाही, हे आणि असे अनंत व्यर्थ प्रश्न मनात उभे राहतात. खरं तर कोणाचंच काहीच अडत नसतं, पण तरीही हिमालयापेक्षाही अडचणींचे पहाड पार करुन जाणं कठीण वाटायला लागतं.. तरीही अखेरीला सर्व काही जमून येतं आणि हिमालयाचं प्रथम दर्शन होतं! आणि मग हिमालयाचं वेड लागतं. हिमालय. भव्य हा शब्दही खुजा वाटेल, असं त्याचं रुपडं. जणू काही एखादा भव्य दिव्य ध्यानस्थ पुराण पुरुष. एकदा हिमालयाच्या वाटा चालल्या की तिथून मन काढून घेणं महाकठीण. कधी खळाळत वाहणारे झरे, कधी घनगंभीर नाद करत वाहणारे जलप्रपात, ऐसपैस पसरलेली हिरवीगार पठारं, त्यांचं सौंदर्य वाढवणारी रानफुलं, एकाच वेळी मनात धडकी भरवणारे आणि त्याचबरोबर रौद्र रुपाची भुरळ घालणारे करकरीत कडे आणि पहाड. घनदाट जंगलं. खोल दर्‍या. कधी मैलोगणती केवळ मोठमोठ्या पत्थरांचे मार्ग. झुळझुळणार्‍या झुळूका, सोसाटणारा बोचरा वारा, हिमवादळं. सणाणणारा पाऊस! सोनेरी पहाटवेळा, अंगार ओकणार्‍या दुपारवेळा. हळूहळू सभोवताल शांतवत येणार्‍या आणि आसमंतावर आपल्या स्निग्ध, चंदेरी प्रकाशाची चादर ओढणार्‍या रात्री. आकाशगंगेचं दर्शन. तुटणारे तारे. पहाडाच्या टोकावर जाऊन जरासा हात उंचावला, तर हाताला लागेल असा भला मोठा चंद्र. आभाळाच्या भाळावरचा चंदेरी टिळा.. इतकं पुरेसं नाही म्हणून ह्या सार्‍याला व्यापून उरणारी आणि तरीही अजूनही थोडी उरणारी प्रगाढ शांतता. अनेकविध रुपं दाखवत हिमालय चकित करुन सोडत राहतो. घेत असलेला अनुभव अजब वाटावा, तोवर पुढचा अनुभव अर्तक्य वाटत राहतो. हिमालयाची वाट चालता, चालता हळूहळू पण सातत्याने अंतर्मन हे सारं सारं टिपत जातं आणि सभोवतालच्या भव्यतेच्या जाणीवेने विनम्र बनत जातं. थोडसं दबतं, क्वचित घाबरतंही. स्वतःच्या नगण्यतेची जाणीव होते. हिमालयाला शरण जाण्याखेरीज पर्याय नसतो. एका कोणत्या तरी क्षणी हिमालयाशी आपली नाळ जुळते. खूण पटते. हिमालय त्याच्या भव्य दिव्य, क्वचित विक्राळ रुपासकटही आश्वासक भासू लागतो. आपलासा वाटतो. ह्याचसाठी तर सगळा अट्टाहास केलेला असतो! अजून काय हवं? त्याच्या सान्निध्यात काही दिवस फार फार सुखात जातात. कसल्याही चिंता आठवत नाहीत, भेडसावत नाहीत. आनंदडोह भरुन वाहतो. तुम्हीं हो बंधू, सखा तुम्हीं हो... शब्द सरतात. सगळं नुसतं पहायचं आणि अनुभवायचं. बस्स! आणि कधीतरी हे आनंदपर्वही संपुष्टात येतं. नेहमीच्या चाकोरीत परतायचा दिवस समोर येऊन वाकुल्या दाखवतो. नको, नको वाटतं. इलाज नसतो. डोळे पाणावल्याशिवाय रहात नाहीत. सुरु असलेल्या आनंदपर्वातून एकदम धाडकन फेकून दिल्यासारखं वाटतं! भिरभिरलेली अवस्था असताना कधीतरी लक्षात येतं की हिमालय कधीचाच मनात वस्तीला आलेला असतो. हिमालयापासून दूर जाण्याची भीती आता इतकी भेडसावत नाही. नेहमीच्या रुक्ष जगात परतण्याचा त्रास जरासा कमी होतो. कळतं, हे परतणं तात्पुरतं आहे, पुढल्या भेटीचा योग येईतोवरच. हिमालय नक्कीच पुन्हा साद देणार असतो. साद ऐकू आली की पुन्हा एकदा नगाधिराजाच्या दर्शनाची तीच बेचैनी उरी घेऊन ह्या पंढरीची वाट चालू लागायची.. अजून काय.... “There is no such sense of solitude as that which we experience upon the silent and vast elevations of great mountains. Lifted high above the level of human sounds and habitations, among the wild expanses and colossal features of Nature, we are thrilled in our loneliness with a strange fear and elation – an ascent above the reach of life's expectations or companionship, and the tremblings of a wild and undefined misgivings.." ***** सप्टेंबर २०१३ मध्ये मी काश्मीरमध्ये सोनमर्गच्या पुढे हिमालयामध्ये एक ट्रेक केला, त्या दरम्यान काढलेल्या प्रकाशचित्रांपैकी काही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 43222
प्रतिक्रिया 116

प्रतिक्रिया

In reply to by सखी

तुम्हाला उंचीवर जाण्यासाठी काही खास गोष्टी घ्याव्या लागल्या का? - एक स्वेटर, एक जॅकेट. थर्मल्स. लेयर्स मध्ये कपडे घालायचे. म्हणजे २ टीशर्ट्स - त्यावर स्वेटर वगैरे असे. बाकी ग्लोव्ज, लोकरी टोपी. लोकरी पायमोजे. रेनकोट किंवा पाँचो. www.indiahikes.in.

एकदम सही फोटो आले आहेत सगळे.. लॅपटॉपचे वॉलपेपर शोभतील असे.

एकदम सुंदर फोटो आणि वर्णन! “There is no such sense of solitude as that which we experience upon the silent and vast elevations of great mountains..." या वरून मला, मला वाटते कवी अनीलांची एक कविता आहे, ती आठवली: "अशाच एखाद्या तळ्याकाठी बसून रहावेसे मला वाटते, जेथे शांतताच निवारा शोधत थकून आलेली असते" अशा काहीशा त्या ओळी होत्या. येथे नुसते तळे अथवा पाणीच नाही तर सभोवताल असा मिळत असेल. अजून वर्णन वाचायला आवडेल. धन्यवाद!

In reply to by विकास

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत उगीच उसळी मारुन मासळी, मधूनच वर नसते येत पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते! - अनिल

In reply to by यशोधरा

अरे वा! धन्यवाद! तुम्ही काढलेली छायाचित्रे बघताना आणि वर्णन वाचताना आज अनेक वर्षांनी ही कविता आठवली. जालावर पटकन शोधायचा प्रयत्न केला पण कदाचीत चुकीचे शब्द घातल्यामुळे असेल पण मिळाली नव्हती! :)

In reply to by यशोधरा

अप्रतीम कविता.. लेख.. फोटू.. अन् अनेक अव्यक्तही.. __/\__ राघवा.. इथं जीव ओवाळावा असा हिमालय.. वर्णन करणार यशो.. अन् बधीर तू! मायो, तुझ्या पावलांचे फोटू काढून पाठवून दे कसे जरा... नमस्कार घालावा म्हणतो..! स्वगतः छ्या... हे काही बरोबर नाही हां राघवा.. असे कसे इतके छान धागे सुटतात तुझ्या नजरेतून.. :(

हिमालयाचे सौंदर्य, भव्यता छायाचित्रांद्वारे डोळेभरून पाहता आले आणि शब्दांनी आंजारुन-गोंजारुन मनपक्षास रोमांचित केले. चवथ्या छायाचित्रात डोंगर उतारावर कांही दगड पडताना दिसत आहेत ते काय आहे?

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकरकाका, तो फोटो गडसर पास चढताना काढलेला आहे. किशनसरपासून वर चढताना. खुरटं गवत आणि छोटे मोठे दगड. लोक वर चढताना दिसत आहेत. मध्येच तलावात पत्थर आहेत. वरुन फोटो काढल्याने लहान वाटत आहेत, प्रत्यक्षात मोठे आहेत.

In reply to by यशोधरा

छायाचित्रे पाहताना छायाचित्राचा वरचा भाग संगणकाच्या कक्षेबाहेर गेला. उर्वरित भाग न्याहाळताना ते आकाशाचे प्रतिबिंब आहे हे लक्षात आले नाही. आता पुन्हा पाहिल्यावर भ्रमनिरास झाला. धन्यवाद.

In reply to by विटेकर

देवतात्मा >> अगदी, अगदी :)अगदीच त्रिवार सत्य. हिमालय केवळ दगडा मातीचा बनलेला नाही. त्याला स्वतःचं अस्तित्व आहे आणि हिमालयातून फिरताना ते खरंच जाणवतं. ही माझी हिमालयात दुसरी खेप होती आणि ह्याहीवेळी मी हाच अनुभव घेतला आहे.

म्हणून तर हिमालयाला भारतमातेचे मस्तक म्हटले आहे. . . . . . मस्तकपर हिमराज विराजित उन्नत माथा माता का | चरण धो रहा विशाल सागर देश यही सुंदरता का ||

अप्रतिम प्रकाशचित्रे. शब्दचित्रेही सुंदर, पण फोटोज़ कणभर सरसच.

_/\_ _/\_ _/\_

In reply to by यशोधरा

ओके धन्यवाद! दुसय्रा। साइटवर तीन एमबीचे असले तरी इकडे ते 640x480 होऊन आले की फारच सामान्य होतात परंतू तुमचे फोटो फारच स्पष्ट आणि सुरेख दिसताहेत.

निव्वळ अप्रतिम सगळच आवडलं लेख ही आणि फ़ोटो ही..... तुमच फ्रेम सिलेक्शन मस्तच आहे....

काय सुरेख धागा आहे यशो. फोटोज चं, लेखाचं, तुझ्या सैनिकांवर्च्या प्रतिसादांचं कशा कशाचं कौतुक करु? पहिल्यांदा वाचला तेंव्हा आवर्जुन प्रतिसाद देत नव्हते. आता हा एवढा चांगला धागा वर काढल्याशिवाय राहवत नाहीये.

यशो, खरेच हेवा वाटतो ग या बाबतीत मला तुझा. मी कधी त्या हिमालयाचे दर्शन घेईन काय माहित? पण तुझ्यामुळे चित्ररूपाने का होईना ते सौंदर्य पाहायला मिळाले. खूप सुंदर धागा आणि फोटो.

सुंदर प्रकाशचित्रे आहेत!! हिमालयाबद्दल तुम्ही मांडलेले भाव मला तंतोतंत पोचले! कारण तुम्ही अकादमी मधे वाचले असेलच! हिमालय प्रथम पाहिला की अक्षरशः हरखून जायला होते, पण हळू हळू त्याचा कल्पनेपालिकडला अवाका लक्षात यायला सुरुवात होते. २००३-०७ दरम्यान युथ हॉस्टल एसोसिएशन ऑफ़ इंडिया समवेत कैंप लीडर म्हणून काम केले आहे मी,त्याचे प्रशिक्षण हिमाचल मधे सेवबाग़ मधे झाले होते, त्या ट्रेनिंग ला ट्रेनर ने सांगितलेले वाक्य आजही मनावर कोरलेले आहे त्याने खड्या आवाजात पहिलेच वाक्य उच्चारले होते ते म्हणजे "Leaders, always remember , mountains are not luxury" ये बात हमेशा के लिए अपने दिल में छाप लो!. एकंदरित हिमालय भुरळ घालणारा प्रकार आहे फार जास्त एखाद्या क्लियर दिवशी एखाद्या vantage point वर बसल्यास आपला पर्वत त्याच्या पलीकडे अजुन एक मग अजुन एक पलीकडे एक असे किती डोंगर दिसतात देव जाणे! शब्दातीत अनुभव असतो तो!! टाळी लागते संध्याकाळी !

अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः ...... तुमच्या शब्दांमध्ये आणि चित्रांमध्ये चढाओढ आहे हो, एकापेक्षा एक सरस !

In reply to by अनिंद्य

धन्यवाद हा धागा वर काढल्याबद्दल. मन प्रसन्न झालं यातील फोटो पाहून आणि वर्णन वाचून. यशो, तु नुकतीच जाऊन आलेल्या ट्रीप बद्दल पण लिही याच धाग्याचा दुसरा भाग म्हणून..

@यशोताई, अ प्र ति म आलेत सग़ळेच्या सगळे फोटो.

हिमालयात ट्रेक ला जाण्यासाठी वाजवी किम्मत असलेले उत्तम बूट कुठले? केचुआ सीटीआर - कोस्टर्स युनिस्टार वेन्ब्रेनर वूडलेंड की आणि कुठ्ले? हे अर्थात बजेट पर्याय समजावेत.