✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

योगी पावन मनाचा

ध
धन्या यांनी
Tue, 01/07/2014 - 17:41  ·  लेख
लेख
मुक्ता, नावाप्रमाणेच मुक्त असलेली निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपानाची ही सर्वात धाकटी बहिण. वयाने धाकटी असली तरी मोठमोठयांचा नक्षा आपल्या ज्ञानाच्या अधिकारावर क्षणात उतरवून टाकणारी ती तेजस्वी मूर्ती होती. अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १२०१ साली शुक्रवारी म्हणजेच इ. स. १२७९ ला जणू काही आदिशक्ती मुक्तेच्या रुपाने इंद्रायणीतिरी सिद्धबेटावर जन्माला आली. ज्ञानाने लखलख करणारी आकाशीची वीजच जणू चांदण्यांचा शीतल साज लेवून आपल्या ज्ञानी भावंडांना साथ देण्यासाठी भूतलावर अवतरली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता या चार भावंडांमध्ये मुक्ता सर्वात धाकटी. परंतू आळंदीच्या ब्राम्हणांच्या सांगण्यानूसार जेव्हा त्यांच्या आई बाबांनी त्रीवेणी संगमात देहत्याग केला, तेव्हापासून या असाधारण कुटुंबाचे गृहिणीपणाची जबाबदारी मुक्तेवर पडली. त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या बालवयातच मुक्ताई प्रौढ गंभीर, सोशिक समंजस बनली. हळव्या निरागस वयात जीवनाच्या वास्तव सत्याकडे आणि कठोर स्वरूपाकडे निर्लीप्तपणे पाहण्याचे प्रगल्भ प्रौढत्व तिच्यात आले. मुक्तेने आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. म्हणुनच तर पाठची बहीण असूनही जगावर रुसुन बसलेल्या आपल्या ज्ञानदादाला तिने अधिकारवाणीने समजावले. संत कोणाला म्हणावे, संताची वागणूक कशी असावी हे ज्ञानदादाचा मनावर बिंबवले. ही समजूत घालत असताना मुक्तेने उस्फुर्तपणे जे अभंग गायले तेच पुढे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले. ताटीच्या अभंगात मुक्तेचे हळुवार, समंजस, प्रसंगावधानी, उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे. त्यात मुक्तेने जी संतत्वाची लक्षणे सांगितली आहेत ती मूर्तिमंत तिच्या व्यक्तित्वात दिसून येतात. -- १ -- संत जेणें व्हावें । जग बोलणे साहावें ॥ तरीच अंगी थोरपण । जया नाही अभिमान ॥ थोरपण जेथे वसें । तेथे भूतदया असें ॥ रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वदेशी ॥ ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- २ -- योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ॥ विश्व रागें झाले वन्ही । संती सुखें व्हावें पाणी ॥ शब्द शस्त्रें झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥ विश्व पट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ३ -- सुखसागरी वास झाला | उंच नीच काय त्याला ॥ अहो आपण जैंसे व्हावें | देवें तैसेंचि करावें ॥ ऐसा नटनाटय खेळ | स्थिर नाही एकवेळ ॥ एकापासुनी अनेक झाले | त्यासी पाहिजे सांभाळिले ॥ शून्य साक्षित्वें समजावें | वेद ओंकाराच्या नावें ॥ एकें उंचपण केले | एक अभिमानें गेलें ॥ इतकें टाकुनी शांती धरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ४ -- वरी भगवा झाला नामें | अंतरीं वश्य केला कामें ॥ त्याला म्हणूं नये साधू | जगीं विटंबना बाधू ॥ आपआपणा शोधून घ्यावें | विवेक नांदे त्याच्या सवें ॥ आशा दंभ अवघें आवरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ५ -- संत तेचि जाणा जगीं । दया क्षमा ज्यांचे अंगी ॥ लोभ अहंता न ये मना । जगी विरक्त तोची जाणा ॥ इह परलोकीं सुखी । शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखीं ॥ मिथ्या कल्पना मागें सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ६ -- एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले? ॥ उठे विकार ब्रह्मी मूळ । अवघे मायेचें गबाळ ॥ माय समूळ नुरे जेव्हां । विश्व ब्रह्म होइल तेव्हां ॥ ऐसा उमज आदिअंतीं । मग सुखी व्हावे संती ॥ चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ७ -- ब्रह्म जैसें तैशा परी । आम्हा वडील भूतें सारी ॥ अहो क्रोधें यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥ जीभ दातांनी चाविली । कोणें बत्तीशी तोडीली? ॥ मन मारुनी उन्मन करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ८ -- सुखसागर आपण व्हावें । जग बोधें निववावें ॥ बोधा करुं नये अंतर । साधू नाहिं आपपर ॥ जीव जीवासी पैं दयावा । मग करुं नये हेवा ॥ तरणोपाय चित्तीं धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ९ -- सांडी कल्पना उपाधी । तीच साधूला समाधी ॥ वाद घालावा कवणाला । अवघा द्वैताचा हो घाला ॥ पुढे उमजेना काय । उडत्याचे खाली पाय ॥ एक मन चेष्टा करी । भूतें बापुंडी शेजारी ॥ अवघी ईश्वराची करणी । काय तेथें केलें कोणीं ॥ पुन्हा शुद्ध मार्ग धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- १० -- गिरीगव्हारे कशासाठीं । रागें पुरवीली पाठी ॥ ऐसा नसावा संन्यासी । परमार्थाचा जो कां द्वेषी ॥ घर बांधिलें डोंगरीं । विषया हिंडे दारोदारीं ॥ काय केला योगधर्म । नाही अंतरी निष्काम ॥ गंगाजळ ह्रदय करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ११ -- अहो क्रोधे यावें कोठें । अवघे आपण निघोटे ॥ ऐसें कळलें उत्तम । जन तेची जनार्दन ॥ ब्रीद बांधिलें चरणीं । नये दावितां करणीं ॥ वेळे क्रोधाचा उगवला । अवघा योग फोल झाला ॥ ऐशी थोर दृष्टी धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- १२ -- अवघी साधन हातवटी । मोलें मिळत नाही हाटीं ॥ शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ॥ कोणी कोणास शिकवावें । सार साधुनिया घ्यावें ॥ लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुदल ठायीचे ठायीं ॥ तुम्ही तरुनी विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ ज्ञानियांच्या राजाची समजूत घालण्याच्या निमित्ताने ताटीच्या अभंगांमधून जगाला ईतका मोलाचा संदेश देणारी चिमुरडी मुक्ता तेव्हा जेमतेम नऊ दहा वर्षांची असेल. मुक्ता अतिशय स्पष्टवक्ती होती. एकदा ज्ञानदेवादी भावंडं पंढरपूरला गेली असताना तिथं त्यांना संत नामदेव भेटतात. त्यांना ज्ञानदेव नमस्कार करतात पण नामदेव त्याना नमस्कार करीत नाहीत. आपण ज्येष्ठ भक्त असल्यानं ज्ञानदेवांनी आपल्याला नमस्कार करणं योग्यच आहे, असं नामदेवाला वाटतं. ही गोष्ट मुक्ताईला रुचत नाही. ती नामदेवाला म्हणते - अखंड जयाला देवाचा शेजार । कां रे अहंकार नाही गेला? मान अपमान वाढविसी हेवा। दिवस असतां दिवा हातीं घेसी।। परब्रह्मसंगे नित्य तुझा खेळ। आंधळ्याचे डोहळे का बाट जाले? कल्पतरुतळवटी इच्छिली ते गोष्टी। अद्यापि नरोटी राहिली कां? घरी कामधेनू ताक मागूं जाये। ऐसा द्वाड आहे जगामाजी।। अशी नामदेवांची कानउघाडणी करुनच मुक्ताई थांबत नाही तर नामदेवांना भक्तीचं खरं मर्मच कळलं नाही, त्यासाठी योग्य गुरुपाशी जाऊन उपदेश आणि मार्गदर्शन घ्यायला हवं असा सल्लाही ती देते - झालासी हरिभक्त तरी आम्हा काय? आंतुली ती सोय न ठाउकी। घेउनि टाळदिंडी हरिकथा करिसी। हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणे।। गुरुवीण तुज नव्हेचि गा मोक्ष। होशील मुमुक्षु साधक तूं। तुझ रुप तुवां नाही ओळखिलें। अहंतेतें धरिले कासयासी? मुक्तेने केलेल्या या कानउघाडणीनंतर नामदेवरायांचा अहंकार निवला. त्यांनी विसोबारायांना आपला गुरु केले. जी गत भक्तराज नामदेवांची, तीच गत योगिराज चांगदेवांची. योगसामर्थ्याने चौदाशे वर्ष जगणार्‍या चांगदेवाचं कोरं पत्र पाहताच ती उद्गारली, "अरेरे... एव्हढी चौदाशे वर्ष जगूनही हा चांगदेव योगी कोरडाच राहीला.". याच कोर्‍या कागदावर ज्ञानदेवांनी पासष्ट ओव्या लिहून चांगदेवाला पाठविल्या. आणि या चौदाशे वर्ष म्हातार्‍या बाळाने चिमुरडया मुक्ताईला आपला गुरु केलं. मुक्तेने केलेल्या अभंगांची संख्या मोजकीच असली तरी तिची अभंगरचना अतिशय प्रासादिक आणि रसाळ आहे. तिच्या अभंगांच्या ओळीओळीतून, शब्दाशब्दांमधून तिचा अध्यात्मामधील अधिकार, तिचे योगसामर्थ्य, तिची प्रौढ आणि प्रगल्भ जाण, तिचा आत्मविश्वास जाणवतो. इ. स. १२९६ मध्ये ज्ञानदेव आणि सोपानांनी एकामागोमाग समाधी घेतल्यानंतर निवृत्तीनाथ आणि मुक्ताई व्याकुळ झाले. दोघेही तिर्थाटनास निघाले. उत्तर महाराष्ट्रात तापी नदीच्या तीरावर मेहून येथे ते आले असताना सोसाटयाचे वादळ आले. जोराची वीज कडाडली आणि निवृत्तीनाथांची सर्वात छोटी बहीण मुक्ताई गुप्त झाली. आदीशक्ती आपल्या मुळ स्वरुपात विलीन झाली.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
33266 वाचन

💬 प्रतिसाद (139)

प्रतिक्रिया

सुंदर!!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 01/07/2014 - 17:44 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments

_/\_

मूकवाचक
Tue, 01/07/2014 - 17:45 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

निरुपण ईज भावुकली सुंदर !!

सुहास..
Tue, 01/07/2014 - 17:47 नवीन
निरुपण ईज भावुकली सुंदर !! ( नान्या आठवला !! )
  • Log in or register to post comments

शतशः आभार आहेत धन्या तुझे!

प्यारे१
Tue, 01/07/2014 - 17:59 नवीन
शतशः आभार आहेत धन्या तुझे! साष्टांग नमस्कार मुक्ताईला नि तुलापण. वाचनखूण साठवतो. आवश्यक तेव्हा (कदाचित रोजच) वाचावं लागेल. :)
  • Log in or register to post comments

+१

अनिरुद्ध प
Tue, 01/07/2014 - 18:54 नवीन
+१ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

वाचनखूण साठवली आहे.

सूड
Tue, 01/07/2014 - 18:50 नवीन
वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments

धनाजी,

संजय क्षीरसागर
Tue, 01/07/2014 - 18:51 नवीन
अत्यंत सुरेख लेख लिहीलायंस. लेखनातली संगती आणि भाषा मनाला स्पर्शून गेली. मनःपूर्वक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अखंड जयाला देवाचा शेजार । कां

बर्फाळलांडगा
Tue, 01/07/2014 - 21:10 नवीन
अखंड जयाला देवाचा शेजार । कां रे अहंकार नाही गेला? मान अपमान वाढविसी हेवा। दिवस असतां दिवा हातीं घेसी।। परब्रह्मसंगे नित्य तुझा खेळ। आंधळ्याचे डोहळे का बाट जाले? कल्पतरुतळवटी इच्छिली ते गोष्टी। अद्यापि नरोटी राहिली कां? घरी कामधेनू ताक मागूं जाये। ऐसा द्वाड आहे जगामाजी।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

धन्या, भारी!

यशोधरा
Tue, 01/07/2014 - 18:58 नवीन
धन्या, भारी!
  • Log in or register to post comments

सुंदर

प्रचेतस
Tue, 01/07/2014 - 19:03 नवीन
सुंदर :)
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

आतिवास
Tue, 01/07/2014 - 19:18 नवीन
लेख आवडला. या निमित्ताने मुक्ताबाईंचे अभंग एके ठिकाणी वाचायला मिळाले. आणखी अभंग कुठे आहेत? दुवा असल्यास किंवा पुस्तकाचं नाव माहिती असल्यास जरुर सांगा.
  • Log in or register to post comments

अप्रतिम रे

स्पा
Tue, 01/07/2014 - 19:19 नवीन
अप्रतिम रे
  • Log in or register to post comments

फार छान लिहीले आहे.

शुचि
Tue, 01/07/2014 - 19:30 नवीन
फार छान लिहीले आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर!

पैसा
Tue, 01/07/2014 - 20:12 नवीन
अगदी छान आठवण करून दिलीस. साक्षात ज्ञानियांच्या राजाला समजावणारी मुक्ताई, तिचा अधिकार काय असेल! @आतिवास, मुक्ताबाईंच्या नावावर "मुंगी उडाली आकाशी" इ. कूटे आहेत. तिचे इतर अभंग http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/abhang/muktabai/index(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4.%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%87.%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97).aspx इथे उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments

सुरेख.

बर्फाळलांडगा
Tue, 01/07/2014 - 20:37 नवीन
अभंगकलेचे गारुड मनावर नेहमीच आहे... राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सुंदर !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/07/2014 - 20:16 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

संतसाहित्याचा गाढा अभ्यास आहे

किसन शिंदे
Tue, 01/07/2014 - 20:29 नवीन
संतसाहित्याचा गाढा अभ्यास आहे तुझा, या चारही भांवडावर तु एक छान लेखमालिका लिहू शकशील. फक्त मुक्ताईवरच लिहून थांबू नको. ब्रम्हगिरीला ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना जेव्हा गुरू केलं त्या प्रसंगाचं तुझ्या तोंडून ऐकलेलं वर्णन चांगलं आठवतंय. त्याच्यावरही एक लेख लिहीच. :)
  • Log in or register to post comments

+१ टू किस्ना! __/\__

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/08/2014 - 01:56 नवीन
+१ टू किस्ना! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

क्लास.

अर्धवटराव
Tue, 01/07/2014 - 20:56 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

sundar lihile aahe.

रेवती
Tue, 01/07/2014 - 21:40 नवीन
sundar lihile aahe.
  • Log in or register to post comments

बेष्टंय हे!!!

बॅटमॅन
Tue, 01/07/2014 - 21:53 नवीन
बेष्टंय हे!!!
  • Log in or register to post comments

मुक्ताइनगर

अशोक पतिल
Tue, 01/07/2014 - 22:32 नवीन
जळगाव जिल्ह्यातील पुर्वीचे एदलाबाद हे तालुक्याचे ठिकाण ( आताचे मुक्ताइनगर ) येथे संत मुक्ताइ मंदिर ( समाधि ) तापी-पुर्णा संगमावर आहे .
  • Log in or register to post comments

मुक्ताईनगरला पुण्याहून कसे

धन्या
Tue, 01/07/2014 - 22:47 नवीन
मुक्ताईनगरला पुण्याहून कसे जायचे? आळंदी (ज्ञानदेवांची समाधी),) त्र्यंबकेश्वर (निवृत्तीनाथांची समाधी) आणि सासवड (सोपानदेवांची समाधी) येथे दोन तीन वेळा जाऊन आलो आहे. मात्र मुक्ताईनगरला जायचा योग अजून आलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अशोक पतिल

असे

इरसाल
Wed, 01/08/2014 - 14:18 नवीन
पुणे ते भुसावळ रेल्वेने मग तिथुन बर्‍याच बस मिळतील मुक्ताईनगरला/एदलाबादला जायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

बस मार्ग.

अशोक पतिल
Wed, 01/08/2014 - 23:18 नवीन
तुम्ही पुणे ते जळ्गाव्/भुसावळ व्हाया ऑरंगाबाद्,सिल्लोड मार्गे येवु शकतात् व भुसावळ येथून मुक्ताइनगर ( ३० कीमी ) जावु शकतात. जर पुने ते रावेर ने आलात तर भुसावळ ला उतरावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

छान लिहीले आहे.....

मुक्त विहारि
Tue, 01/07/2014 - 22:39 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

सुंदर !!

प्रसाद गोडबोले
Tue, 01/07/2014 - 22:55 नवीन
सुंदर !! धनाजी राव सुंदर लिहिलय बरकां !
रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वदेशी ॥ ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
क्या बात है !!
  • Log in or register to post comments

__/\__

कवितानागेश
Wed, 01/08/2014 - 01:07 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

सुरेख जमलंय, धन्या _/\_

लॉरी टांगटूंगकर
Wed, 01/08/2014 - 07:37 नवीन
सुरेख जमलंय, धन्या _/\_
  • Log in or register to post comments

धनाजी रसाळ निरूपण..

नाखु
Wed, 01/08/2014 - 09:11 नवीन
ईतकी चांगली प्रतीभा (पुरचुंडीत) का व्यर्थ खर्च करता?????
  • Log in or register to post comments

सुरेख !

मारकुटे
Wed, 01/08/2014 - 09:40 नवीन
सुरेख !
  • Log in or register to post comments

अप्रतिम.............

सुकामेवा
Wed, 01/08/2014 - 09:48 नवीन
अप्रतिम............. एवढा एकच शब्द सुचतो आहे सध्या
  • Log in or register to post comments

योगी पावन मनाचा

भ ट क्या खे ड वा ला
Wed, 01/08/2014 - 09:56 नवीन
सुंदर रवींद्र भट यांच्या लिखाणाची आठवण आली.
  • Log in or register to post comments

प्रचिती आल्यासारखी वाटली

वासु
Wed, 01/08/2014 - 10:06 नवीन
खुपच सुरेख... छान वाटल वाचुन... प्रचिती आल्यासारखी वाटली :-)
  • Log in or register to post comments

एक प्रश्न मला नेहमी पडतो

बर्फाळलांडगा
Wed, 01/08/2014 - 12:42 नवीन
हे अभंग लिहले मुक्ताईने साक्षात ज्ञानेश्वरांसाठी.. तो त्यांचा अधिकार सांगितली गीता श्रीकृष्णाने अर्जुनासाठी...तो ही त्यांचा अधिकार तुम्ही आम्ही हे का वाचतो अन वरून छान आहे म्हणतो... ? थोडक्यात सांगणारा अन ऐकणारा ज्या भावावस्थेत आहे त्याचा संदर्भ नसूनही आपण त्याला अनुमोदन देतो. कारण मोठी गुंता गुंत आहे. उदा.. जोकपाल हिशोबनिस समजतो तो ज्ञानेश्वर आहे अन मिपाकर त्याला छळणारि जनता म्हणुन तत्वज्ञान न पटुनहि तो फार छान आहे म्हणतो. काय विरोधाभास आहे.... प्रत्येकाचे कारण वेगळे आहे पण लिहणारा अन वाचणारा दोघेही चान चान म्हणत आहेत शंका येते ही तीच जमात का जी याच क्षणात तत्वापेक्षा अस्तित्व महत्वाचे म्हण्त जगणार आहे?
  • Log in or register to post comments

'तत्त्वापेक्षा अस्तित्त्व

कवितानागेश
Wed, 01/08/2014 - 13:45 नवीन
'तत्त्वापेक्षा अस्तित्त्व महत्त्वाचं' हेच सगळ्यात सुरक्षित 'तत्त्व' आहे भाऊ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

मला वाटतय आपण माझा प्रश्न व्यवस्थित समजुन घेतला नसावा

बर्फाळलांडगा
Wed, 01/08/2014 - 13:55 नवीन
असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

नीट सांगते. 'तत्त्वापेक्षा

कवितानागेश
Wed, 01/08/2014 - 18:33 नवीन
नीट सांगते. 'तत्त्वापेक्षा अस्तित्व मोठं' हीच गोष्ट एकदा तत्त्व म्हणून स्विकारली की, अस्तित्व राखण्याचा फायदा पण मिळतो आणि तत्त्व पालन केल्याचा आनंद (पक्षी: स्वतःचं कौतुक!) देखिल होतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

सिलेक्टिव रीडिंग पुन्हा पुन्हा का करताय?

बर्फाळलांडगा
Wed, 01/08/2014 - 20:20 नवीन
काय स्विकारायचे हच फ़क्त पुन्हा पुन्हा तुम्ही ठरवणार तर विरोधी तत्वाग्यानाला माना का डोलावता ? आणि खात्री देणार काय की तुमच्या अस्तित्वाचे तुम्ही निसंधिग्द मालक आहात.... याची ? लक्षात घ्या जेवायचा स्वतंत्र विभाग चालवणे इतके सोपे नाही आहे हो ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मला वाटतं

पैसा
Wed, 01/08/2014 - 14:05 नवीन
तुम्ही आम्ही हे का वाचतो अन वरून छान आहे म्हणतो... ?
त्या क्षणी मुक्ताई, ज्ञानदेव, श्रीकृष्ण अन अर्जुन यांचा परीसस्पर्श वाचणार्‍या अन लिहिणार्‍या प्रत्येकाला होत असतो.
प्रत्येकाचे कारण वेगळे आहे पण लिहणारा अन वाचणारा दोघेही चान चान म्हणत आहेत शंका येते ही तीच जमात का जी याच क्षणात तत्वापेक्षा अस्तित्व महत्वाचे म्हण्त जगणार आहे?
याचं एकमेव कारण म्हणजे आपण सामान्य आहोत भाऊ! आपलं तत्त्व आणि अस्तित्त्व एकच असतं तर आपण ज्ञानोबांच्या जवळ पोचलो असतो ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

क्या बात

स्पा
Wed, 01/08/2014 - 14:28 नवीन
आपलं तत्त्व आणि अस्तित्त्व एकच असतं तर आपण ज्ञानोबांच्या जवळ पोचलो असतो ना!
वा वा पैसा माउली __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

त्या क्षणी मुक्ताई, ज्ञानदेव,

बर्फाळलांडगा
Wed, 01/08/2014 - 14:30 नवीन
त्या क्षणी मुक्ताई, ज्ञानदेव, श्रीकृष्ण अन अर्जुन यांचा परीसस्पर्ष वाचणार्या अन लिहिणार्या प्रत्येकाला होत असतो
इन सच केस जिवन भाउंचे लिखाण वाचताना त्यांचा स्पर्शहीआपल्याला होत असतो असे तुम्ही मानता काय? तसेच तुम्ही सामान्य आहात तर असामान्यत्वा चा मोह आणि टिका एकाच वेळी कशी करू शकता ? सामान्य असणे चालुपणाचे लायसंस आहे काय ? जर आहे तर असामाँन्यत्वाचा सोस का पडला आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

इन सच केस जिवन भाउंचे लिखाण

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/08/2014 - 15:21 नवीन
इन सच केस जिवन भाउंचे लिखाण वाचताना त्यांचा स्पर्शहीआपल्याला होत असतो असे तुम्ही मानता काय? हो तर ! त्यांच्या लिखाणाचा स्पर्श झाल्याशिवाय गुदगुल्या होउन तुम्हाला हसू येणं शक्य होतं का? :) माणसे तितक्या प्रकृती हे तर खरे आहे ना? मग प्रत्येक शब्दाचा परिणाम प्रत्येक माणसावर प्रत्येक वेळी सारखाच कसा होईल. ज्ञानदेव आणि अर्जुन ही पण माणसेच होती त्यांना त्यांच्या परिस्थितित त्यांच्यापरिने काही कळले-उमगले असेल. पण त्या शब्दांत इतरांनाही बोध देण्याची ताकद आहे म्हणून ते लिहिले गेले आणि अनेक शतकांनंतरही इतरांनाही बोधपर होत आहेत / भावत आहेत म्हणून आजवर टिकून राहिले आहेत. आता वाचणार्‍याच्या-ऐकणार्‍याच्या सामान्य-असामान्यत्वाचा प्रश्न जरा असा सोडवून सुटतो का ते बघा: बीज (शब्द आणि त्यांचा भावार्थ) सकस आहे... पण तितकंचंपुरेसं नाही. ते बीज रुजतं की रुजत नाही आणि रुजलं तरी कितपत बहरतं हे ज्या जमिनीवर ते पडलंय तिच्या कसावर अवलबून असतं. आणि जर ते कातळावर पडलं तर काय होणार ते काय सांगाला हवंच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

सामान्य माणसा

बर्फाळलांडगा
Wed, 01/08/2014 - 15:52 नवीन
कोणती गोष्ट परिस आहे अन कोणती निव्वळ लिखाण हे तुम्ही कोण ठरवणार ? आपण सामान्य आहोत हे एकदा मान्य केले की हां अधिकार आपण गमावत नाही काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

:)

पैसा
Wed, 01/08/2014 - 17:40 नवीन
तुमचा पहिला प्रश्न प्रामाणिक वाटला म्हणून माझ्यापुरतं उत्तर द्यायचा प्रयत्न केला. प्रत्येकाचं उत्तर तेच असेल असं नव्हे.
कोणती गोष्ट परिस आहे अन कोणती निव्वळ लिखाण हे तुम्ही कोण ठरवणार ?
हे विधान मात्र बरंच आक्रमक आहे. मुळात तसा अधिकार मला किंवा इस्पीकचा एक्का यांना आहे असा दावा आम्ही कोणीच केला नाही. त्यामुळे तो अधिकार गमावायचा प्रश्न येत नाही. आपण सामान्य आहोत हे मान्य करण्यात कोणताही कमीपणा नाही. तसाच असामान्य व्हायचा सोस निदान मला तरी नाही. मात्र प्रत्येक सामान्य माणसातही थोडातरी असामान्यत्वाचा अंश असतो, दुसर्‍यात असेल तर त्याला तो जाणवतो. कृष्णाने किंवा मुक्ताईने सांगितलेली एखादी गोष्ट चांगली आहे हे कळायला माणूस ज्ञानदेव किंवा अर्जुन असला पाहिजे असं अजिबात नाही. (अवांतरः शब्दांचे खेळ खेळण्याची आणि पोकळ वाद घालण्याची सवय असलेला एकजण मिपावर होता. तुम्हाला भाऊ म्हटलं तर आवडलं नाही. मग ताई म्हणू का? ते केवळ एक संबोधन आहे. तुम्ही माझे शत्रू आहात असं मला अजूनतरी माहिती नाही. तसं समजायला काही कारण आहे का? का तुम्हाला आत्मशून्य/ग्लिफ/अग्निकोल्हा/सिवाजी-द-बॉस यापैकी काही म्हणू? :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

+१

यशोधरा
Wed, 01/08/2014 - 18:16 नवीन
मात्र प्रत्येक सामान्य माणसातही थोडातरी असामान्यत्वाचा अंश असतो, दुसर्‍यात असेल तर त्याला तो जाणवतो. >> वेल सेड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

जे बोलतो ते पोकळ वाटत असेल तर माझा नाइलाज आहे....

बर्फाळलांडगा
Wed, 01/08/2014 - 19:41 नवीन
कारण याधाग्याला ड़ोलावलेली मान पोकळ आहे हे वास्तव आहे बाकी तुमच्या व्यक्तिगत क्रोनिकल्समधे मला रस नसलेले विश्य्याला सोडुन इतर मुद्यांवर लिखाण करायचे प्रयोजन मला दिसत नाही म्हणून आपल्या इण्टुक शेप्ट्यापरमाने मी कोम्प्ली मेंट देत नाही म्हणुन मी आपला शत्रु ठरतो अथवा आपल्याला तुमी भाऊ मनाल्या चा राग आहे वगैरे गैरसमज दूर करने मला प्रायोजित वाटत्त्त नाही _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तसेच आक्रमक विधान असा गैरसमज स्वत:चा व स्त्रियांचा

बर्फाळलांडगा
Wed, 01/08/2014 - 20:58 नवीन
करू देण्यापुर्वि ते विधान सामान्य माणसाला आहे हे स्पष्ट असून पुन्हा त्या प्रतिसादाचे सिलेक्टिव रीडिंग का करताय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

तुम्ही भलतेच विनोदी ब्वॉ!

पैसा
Wed, 01/08/2014 - 22:24 नवीन
गैरसमज स्वत:चा व स्त्रियांचा
इथे स्त्रिया अचानक कुठून आल्या? मी तर स्त्री हा शब्दच कुठे लिहिला नाही!! :ROFL:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

ROFL

बर्फाळलांडगा
Wed, 01/08/2014 - 22:45 नवीन
:) तुम्हाला विनोद कळतात ही फार चांगली गोष्ट आहे अन फक्त विनोदच कळतात असे असेल तर फार मोठे दुर्दैव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा