Skip to main content

पुन्हा सगुणोपासना

लेखक राही यांनी बुधवार, 01/01/2014 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम सर्व मिपाकरांना मिपावर हे वर्ष वाद-संवादाचे आणि बौद्धिक आनंदाचे जावो ही शुभेच्छा. मिपालाही शुभेच्छा. या वर्षी सुद्धा अनेक शतकी-द्विशतकी धागे निघोत, साद-प्रतिसादांनी मिपा समृद्ध होवो. तर पुन्हा सगुणोपासना. ही सगुणोपासना आम्हांला इतकी आवश्यक का वाटते? आत्मभान हा सोपा मार्ग आम्हांला का नको? आत्मज्ञान ह्या शब्दाच्या अर्थाविषयी पारमार्थिक आणि ऐहिक अशा दोन्ही पातळ्यांवर विवेचन करता येइल. सगुणोपासनेच्या आवश्यकतेचीसुद्धा दोन कारणे सांगितली जातात. एक म्हणजे भोळ्याभाबड्या जनतेला निर्गुण असे काही कल्पिणे कठिण जाते आणि दुसरे म्हणजे सगुणोपासना हे एक साधन आहे, पायऱ्या आहेत, आणखी कुठेतरी पोचण्यासाठीच्या. भोळीभाबडी जनता म्हणजे तरी कोण? आपण आंतरजालावर वादविवाद करू शकणारे प्रज्ञावंत खरोखरच भोळेभाबडे आहोत का? की तिसऱ्याच कोणाच्यातरी वतीने त्यांना गृहीत धरून आम्ही बोलतो आहोत? सगुणोपासना हे साधन मानता मानता साध्यच होऊन बसले आहे हे आमच्या लक्षात का येत नाही आहे? अमुक वेळा पारायणाचा, अमुक हजार नामजपाचा, वेगवेगळ्या नेमांचा संकल्प सोडायचा, आणि तो सिद्ध करायचा, असेच चालते ना? आणि ह्याचेच अवडंबर माजते ना? गणेशचतुर्थीसाठी एकच दिवस रजा असते. उत्सवाच्या उरलेल्या दिवसांत घाईघाईने पूजा आटपायची, मंत्रोच्चार, अथर्वशीर्ष, आरती, नैवेद्य सारे उरकायचे आणि 'हुश्श! झाले एकदाचे' म्हणून बाकीच्या कामाला लागायचे असेच बहुतेक सर्वत्र असते ना? म्हणजे पूजा-उपचार हेच साध्य. अष्टसात्त्विक भाव जागृत होतच नाहीत. कारण ते साध्य नसतेच. विपश्यनेमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करावयास सांगतात. दर क्षणीचा श्वास ही किती साधी गोष्ट. पण आपल्याला तिची जाणीव नसते. आपल्या देहव्यवहाराची, आपली स्वतःची जाणीव नसते. श्वासाचा कोहं-सोहं नित्य चाललेला असतो. हृदयाचा अनाहत नादही सदैव चालू असतो. हा आघाताविना होणारा नाद आम्ही ऐकतो का? सगळे सांगतात,' दिलकी सुनो'. आम्ही ऐकतो का? "नादबिंदू के पीछे जमया पानी..."(य.कु.ची आठवण येतेय) नादाचा केंद्रबिंदू म्हणजे हृदय बाष्पगद्गद झालेय‌. सद्गदित झालेय. अगदी सहज अवस्था. हे 'स्व'चे 'स्व'शी अनुसंधान कायम राखायचे, 'स्व'च्या आनंदात, निजानंदात तल्लीन व्हायचे. त्यासाठी कोणत्याच पायऱ्यांची आवश्यकता नाही. निज म्हणजे तरी काय? आत्म, स्व, निज सारे एकच. अध्यात्म म्हणजे आधी आत्म असे विनोदाने म्हणतात. पण अधि आत्म तर आहे? "आत्मा वा अरे द्रष्टव्यः, श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यः| आत्मनो वा अरे दर्शनेन, श्रवणेन, मत्या विज्ञानेन इदं सर्वं विदितम।" अरे, हा आत्मा पाहावा, ऐकावा, त्याचे मनन करावे. त्याच्या दर्शनाने, श्रवणाने आणि बुद्धीने जाणण्याने बाकी सर्व जाणले जाते. आत्मज्ञान हेच अंतिम ज्ञान होय. आपण हा स्व पाहत नाही. त्याला अनेक अवगुंठनांआड, मुखवट्यांआड लपवतो. सर्व मुखवटे, पटले, आवरणे दूर केली की स्व-रूप कळते. 'घूंघट के पट खोल रे, तोहे पिया मिलेंगे'. निखळ स्व-रूप हेच पिया आणि प्रेयसीही तीच. अद्वैतच आहे. आपण कशासाठी बाहेर शोधतो? एकदा का स्व-रूपाची ही जाणीव स्थिर झाली की सगळे लख्ख दिसू लागते असे संत सांगतात. 'कुणाचे हे घर? हा देह कवणाचा? आत्मा राम त्याचा, तोचि जाणे'. रम चा प्रधान अर्थ आनंदी असणे असा आहे. राम म्हणजे आनंददायक, रम्य, सुंदर. जिथे स्वतःच्या ठायी नित्य आनंद आहे, (तिथे) त्याने हे सर्व जाणले. आता या सर्व प्रक्रियेमध्ये मूर्तिपूजा, स्तोत्र, आरती यांचे स्थान कोणते? माणसामधला विवेक जागवणे हे साध्य या उपायांनी कधी तरी साध्य होईल का? उलट ती जनता एका गुंगीत राहील. आपण पूजाअर्चा करतो आहोत, यात्रा, व्रतेवैकल्ये करतो आहोत, काहीही करायचे बाकी ठेवीत नाही आहोत, ही ती गुंगी. ही भोळीभाबडी जनता साध्या आजारावरच्या औषधासाठी डॉक्टरकडे गेल्यावर साध्या,स्वस्त गोळ्यांनी समाधान पावत नाही . तिला महागडे इंजेक्शन हवे असते. जरूर नसताही लोकाग्रहास्तव इंजेक्शन देणारा डॉक्टर मोठा. साध्या गोळ्या देणारे छोटे आणि खोटे. ही जनता एका डॉक्टरचे ऐकत नाही, मग अनेक डॉक्टरांनी 'इंजेक्शनची जरूरी नाही' असे पुन्हा पुन्हा सांगायला नको का? (हे एक उदाहरण) भोळ्याभाबड्या जनतेला उच्चज्ञानप्राप्तीचा मार्ग सोपा व्हावा म्हणून सगुणोपासना चालू राहावी असे आपण म्हणतो तेव्हा सगुणोपासना ही अडाणी जनतेला दिलेली मुभा, सूट, सवलत आहे हे मान्य करतो. एके काळी अशी सवलत असेलही, पण आज दीडदोन हजार वर्षांनंतरही ती चालू राहावी का? शिवाय या सवलतीचा आज दुरुपयोग होऊ लागलाय. पाठ, सप्ताह, यज्ञ, तीर्थयात्रा यासाठी आज प्रायोजक मिळू लागलेत. हे आयते चालून आलेले प्रायोजकत्व राजकीय पक्षांनी न स्वीकारले तर नवल. सध्या मोफत किंवा अत्यल्प खर्चात (उदाहरणार्थ) शिरडी यात्रा घडवण्याची टूम आहे. मोफत बसगाड्या, मोफत निवास, मोफत जेवण. नंतर त्या बदल्यात काहीतरी मिळायचे/मिळवायचे असतेच. लोकांना गुंगीत ठेवण्याचा, मिंधे राखण्याचा, 'जैसे थे' राखण्याचा हा एक डाव आहे. इतरही अनेक क्षेत्रात असे होते पण तिथे बदलासाठी निवडणुका, पोलिस, कायदे इ. अनेक प्रकार उपलब्ध असतात. इथे मात्र विवेकाने मतपरिवर्तन हा एकच मार्ग. जनता गुंगीत राहणे हे काही जणांच्या फायद्याचे ठरू शकते हा एक लहानसा आणि गौण मुद्दा आहे. मुख्य मुद्दा हा आहे की जनतेने सदैव भोळे-भाबडे का राहावे? भोळेभाबडे असणे/रहाणे ही सगुणोपासनेसाठी पळवाट बनते आहे का? 'आम्ही बुवा अडाणी माणसे. आम्हाला आत्मज्ञान वगैरे काही समजत नाही' असा आम्ही सुशिक्षित लोक आव आणतो आहोत का? की वेड पांघरतो आहोत? विवेकाने येणारी प्रेम, त्याग आणि विश्वास ही त्रयी आम्हाला रोजच्या जीवनात नको आहे का? व्यावहारिक पातळीवरही हे आत्मभान आपल्याला कितीतरी मदत करू शकते. सवयीमुळे घडणाऱ्या क्षुल्लक अशा वाईट गोष्टी आपण टाळू शकतो. आपण काय करतो आहोत त्याची जाणीव असली तर रस्त्यात थुंकणे, कचरा टाकणे, विनातिकीट प्रवास करणे, भेसळ करणे, लाच देणे/घेणे, काम न करणे या गोष्टी आपल्या हातून होणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीचे आत्मभान जागृत होऊन एक 'राष्ट्रभान' बनू शकते. एक कल्याणकारी व्यवस्था निर्माण होऊ शकते. हा अखंड सावधानतेचा सोपा मार्ग आपणां प्रज्ञावंतांना का नको? ता. क. : या विषयावर सध्यातरी आणखी धागे काढणार नाही. मिपाकरांनी आश्वस्त राहावे.!

वाचने 21170
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

धन्यवाद. पण अहो ही साधीसुधी नेहमीची जिलबी नाहीय, इमरती आहे इमरती! - तोड्याची जिलबी!!

In reply to by धन्या

>>>> सगुणोपासनेच्या नावाखाली लोक कसे धूंदीत राहतात/ठेवले जातात याचे विश्लेषण आवडले. सहमत. -दिलीप बिरुटे

सगुणोपासनेचा फॉर्मॅट बनवता येतो. इतर उपासनांचा नाही. अल्लाला आठवायची (दिवसातून पाचवेळा) कडक अट नसती तर आज इस्लामच नसता. मजिदीतून परतणार्‍या मुसलमानाला काय केलं तिथे म्हणून विचारलं तर नमाज पढा म्हणेल. म्हणजे नक्की काय म्हणाल तर चटाई कशी टाकली, कसे वाकलो, काय शब्द बोललो हे सांगेन. ती पून्हा सगुणोपासनाच आहे. उपासना ही सगुणच असते. बाकी निर्गुण, निराकार परब्रह्माची उपासना हे शास्त्रीय संशोधन असते.

सगुणोपासनाच नाही तर कोणत्याही धर्मातल्या कोणत्याही उपासनेमधली कर्मकांडे पाहिली की पॉवलॉव्हच्या प्रयोगाची आठवण येते... तोच तो प्रयोग, ज्यात घंटी वाजवून नंतर खाणे देत राहिल्याने काही काळाने कुत्रा केवळ घंटीच्या आवाजाने लाळ गाळायला सुरुवात करतो. कारण केवळ घंटीच्या आवाजाने त्याला खाणे मिळाल्याचा "आभास" व्हायला लागतो ! कर्मकांडीचे काहिसे तसेच आहे. सुरुवातीला उदात्त विचारांनी निर्माण केलेली असली तरी एका ठाराविक काळानंतर सर्व कर्मकांडांचा ताबा मुख्यतः उपजिविका, अर्थकारण आणि सत्ताकारण करणार्‍यांकडे जातो अथवा काही कर्मकांडे ही तर केवळ भौतिक फायद्यासाठी मुद्दाम बनवलेली साधने असतात, हा इतिहास आहे. मग देव/सत्य शोधनाचा मूळ उद्देश आपोआप बाजूला पडून कर्मकांडांचे महत्व वाढत जाते / वाढविले जाते. थोडक्यात साध्य विसरले जाते, केवळ साधनाचे अवडंबर वाढते. कारण: १. यजमानातर्फे केलेया साधनाच्या प्रयोगाने कोणा ना कोणा मध्यस्थाचा भौतिक फायदा नक्की असतो. २. यजमानाचा (मृत झाल्यावर) अधिभौतिक फायदा होतो की नाही हे आजपर्यंत कोणाला कळले आहे काय?... आणि झाला तरी तो फायदा यजमानाचा, त्याचा मध्यस्थाला काय फायदा?... आणि नाही झाला तरी यजमान परत जिवंत होऊन थोडाच मध्यस्थाला जाब विचारायला येऊ शकतो? मग साध्याचा विसर पडला आणि साधनांचा गवगवा झाला तर आश्चर्य कसे काय? शेवटी आपण सर्व माणसेच ना !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मस्त प्रतिसाद! पॉवलॉव्ह चे उदाहरण अगदी झकास! श्रद्धा अंधश्रद्धांची मानसशास्त्रीय चिकित्सा करायची झाल्यास मेंदुचे अंतरंग समजावून घ्यावे लागते. आज मानसशास्त्रात अनेक प्रयोग चालूच आहेत. मेंदुच्या मनात- लेखक सुबोध जावडेकर, मेंदुतला माणुस - डॉ आनंद जोशी, सुबोध जावडेकर, मनात- अच्युत गोडबोले ही पुस्तके यासाठी उपयुक्त ठरतात. मनुष्य हा काही विवेकवाद, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्यवाद वगैरे यांचे प्रोग्रामिंग फीड केलेला जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला केवळ बुद्धी नाही तर भावनाही आहेत

In reply to by प्रकाश घाटपांडे

भावना तर आहेतच. पण विवेकाची कास धरा असे म्हणताना 'भावनावश न होता सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत' असे अभिप्रेत आणि अनुस्यूत असते. प्रगत मेंदू आणि प्रगत बुद्धी फक्त मानवाकडे आहे, मानवाने तिचा उपयोग करून घ्यावा. काम क्रोधादि विकार आहेतच, त्यांवर जमेल तेवढा विजय मिळवून बुद्धी शक्यतो स्थिर करावी असे म्हणायचे आहे. संपूर्ण निर्विकारी तर मानव बनू शकत नाही. मग संयत आणि सतत प्रयत्नाने जेवढे जमेल तेवढे करावे. शेवटी, आणखी काही लोक म्हणतात त्याप्रमाणे दैवताचे मानवीकरण (ह्युमनाय्ज़ेशन ऑव्ह गॉड) आणि मानवाचे दैवतीकरण (डिविनाय्ज़ेशन ऑव्ह हयूमन बिइंग्ज़) असे द्वंद्व आपल्यामध्ये चालत असतेच. कुठेतरी सुवर्णमध्य साधला गेला तर स्टेबल स्थिती निर्माण होऊ शकते.

In reply to by राही

... दैवताचे मानवीकरण (ह्युमनाय्ज़ेशन ऑव्ह गॉड) आणि मानवाचे दैवतीकरण (डिविनाय्ज़ेशन ऑव्ह हयूमन बिइंग्ज़) ... खरी गम्मत ह्यातच आहे. त्या दैवतीकरण झालेल्या मानवाला किंवा मानवीकरण झालेल्या दैवताला सगळे पूजतात, तिर्थ-प्रसाद खातात आणि दुसर्‍या क्षणापासून "व्यवहार" हे कारण" सांगून त्यांच्या शिकवणूकिंची आणि तत्वांची पायमल्ली करायला मागेपुढे पाहत नाहित. त्या महामानवांना किंवा दैवी अवतारांना अपेक्षित असलेली खरी पूजा-अर्चना त्यांच्या तत्वांचे, शिकवणूकींचे अनुसरण करणे आहे; हे किती जण "करतात"?... सुवर्णमध्य साधण्याऐवजी मध्यालाच शेवट समजले जाते !

आत्मभान ठेवणे हि देखील सगुणोपासना आहे. असो.

कोणताही शब्द (उदाहरणार्थ : आत्मभान) केवळ माहिती आहे म्हणून वापरणं आणि ती निराधार स्थिती आहे त्यासाठी कोणतंही आलंबन नसायला हवं हे समजणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
तुम्ही मूर्तीपूजेला विपश्यनेचा पर्याय सुचवतायं, ते आत्मभान नव्हे. ती ध्यानप्रणाली आहे. लेखात शेवटी तुम्ही आत्मभानाची वर्तनाशी सांगड घातली आहे (विनातिकीट प्रवास करणे, भेसळ करणे, लाच देणे/घेणे, काम न करणे वगैरे). पण परिस्थिती विपरित आहे, स्व गवसलेली व्यक्ती यथोचित वागत असली तरी वर्तणूक सुधारुन स्व गवसेल असं नाही. ती Behavioral Therapy आहे. स्व ही स्थिती आहे ती प्रक्रियेनं गवसू शकत नाही. स्व आणि आत्मभान या गोष्टींवर लिहीण्याचा प्रयत्न मी केला आहे पण संकेतस्थळाच्या बहुसंख्य सदस्यांची वृत्ती भक्त्तीमार्गी आहे. त्यात काही जण तर विषयाचा सुतराम गंध नसतांना इतके निम्न दर्जाचे प्रतिसाद देतात की विषय भरकटतो (ते तुम्ही पाहिलं असेलच) आणि ते इथल्या धोरणांच्या (बहुदा) आड येत नसल्यानं या विषयावर न लिहीण्याचा निर्णय मी (सध्या तरी) घेतला आहे. तस्मात तुम्ही ज्याला आत्मभान (किंवा स्व-स्मरण) समजता आणि लेखात व्यक्त केलंय तो सांख्ययोग नाही. थोडक्यात, देव या संकल्पनेचं निराकरण झाल्याशिवाय सगुणोपासना थांबत नाही, मग तुम्ही कशाही प्रकारे प्रबोधन करा.

In reply to by संजय क्षीरसागर

मी मूर्तिपूजेला विपश्यनेचा पर्याय सुचवलेला नाही. 'विपश्यनेमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगतात' या वाक्यातून तसे सूचित होत नाही. वर्तणूक सुधारून स्व गवसेल असे नाहीच. उलट स्व गवसला की वर्तणूक सुधारते असे आहे. खुल्या संकेतस्थळावर वेडेवाकडे किंवा कसेही प्रतिसाद येणारच हे गृहीत धरले आहे. प्रत्येकाची इंटर्प्रिटेशन्स वेगळी असू शकतात, किंबहुना असणारच. आपण आपला मुद्दा मांडावा, जमल्यास प्रतिसादाचे खंडन करावे.पण आपले खंडन समोरच्याला स्वीकारार्ह असेलच असे नाही, तेव्हा सोडून द्यावे अशी माझी भूमिका आहे. वाटल्यास भाबडेपणा म्हणा. खुल्या दिलाने दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by राही

तुम्ही आणि संक्षी ज्या "स्व" चा उल्लेख करत आहात ते स्व म्हणजे नेमकं काय? आणि ते गवसतं म्हणजे काय होतं? तुमच्याकडून उत्तर न देण्याचे बहाणे न ऐकता उत्तर मिळू शकेल म्हणून तुम्हाला विचारतोय. :)

विवेकाने मतपरिवर्तन हा एकच मार्ग
हा विवेक अलिकडे खूप दुर्मिळ झालाय...

In reply to by अर्धवटराव

साधारणतः स्वातंत्र्यपूर्व आणि उत्तर दहा वर्षांच्या काळात हा प्राणी भरतवर्षात अस्तित्वात असावा असा संशय आहे.a

@ धना, आत्मभान हा शब्द मी शक्यतो ऐहिक संदर्भात वापरायचा प्रयत्न केला आहे. कारण आत्मा, परमात्मा,ब्रह्म, परब्रह्म ह्या संज्ञा फार व्हेग, अंधुक, अस्पष्ट होत जातात आणि गोंधळ माजतो. स्वतःविषयीचे ज्ञान, स्वतःच्या देहव्यापाराचे, मनोव्यापाराचे ज्ञान आणि भान इतक्या सोप्या अर्थाने मी तो शब्द वापरला आहे.

In reply to by राही

ते आत्मभान नव्हे. ती निव्वळ सजगता (Self awareness) आहे. विपश्यनेत ती शिकवतात. जे. कृष्णमूर्तींच्या शिकवणीचा तो बेस होता. त्यानं मन एकदिशीय राहतं पण जाणीव सतत ओरियंटेड राहिल्यामुळे शेवटापर्यंत तो प्रयासच राहातो.
आत्मभान हा शब्द मी शक्यतो ऐहिक संदर्भात वापरायचा प्रयत्न केला आहे
आत्मभान ऐहिक नाही. ते ऐहिक व्यपणारं साक्षित्व आहे.
कारण आत्मा, परमात्मा,ब्रह्म, परब्रह्म ह्या संज्ञा फार व्हेग, अंधुक, अस्पष्ट होत जातात आणि गोंधळ माजतो.
आत्मभान आणि तुम्ही वापरलेल्या शब्दांचा काहीएक संबंध नाही त्यामुळे गोंधळ आहे.

थोडेसे स्पष्टीकरण जरूरीचे वाटते. आपली बुद्धी विकारांच्या आहारी गेली की आपल्याला आपल्या वागण्या-बोलण्याचे भान रहात नाही आणि चुकांवर चुका घडत जातात, आयुष्य दु:खमय होऊन जाते. आणखी म्हणजे आपल्या मर्यादा तसेच क्षमता आपण जाणल्या नाहीत तर आपण चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त होतो. पुन्हा दु:ख आलेच. आजूबाजूच्या अनेक गोष्टी आपल्यावर प्रभाव पाडत असतात. आपली बुद्धी स्थिर असेल, आपण आपल्या ठायी स्वस्थ असू तर आपल्याला या गोष्टींच्या आरपार पहाता येते, माणसांचे वागणे ओळखता येते. परिस्थितीचा त्वरित अंदाज घेता येतो. कुणाला न दुखवता हुशारीने मार्ग काढता येतो. सुखी माणसाचा सदरा असा सहज मिळून जातो. प्रत्येक क्षणी स्वत्व न विसरणे, सतत जागरुकता, अखंड सावधानता आणि सतर्कता बाळगणे हेच संतांनी सांगितलेले आत्मभान होय. स्वभान जागृत असले की श्वास स्थिर लयीत चालतो, हृदय लयीत चालते. एकतानता येते. आसमंतातली छोटीशी,सूक्ष्म हालचालसुद्धा जाणवू लागते. निसर्गातले बदल पटकन जाणवतात. सभोवतालाशी एकरूपता साधली जाते. अंतरात अतिशय शांत वाटते. एक असीम आनंद मनात उसळत रहातो.

In reply to by राही

पण या प्रतिसादात तुम्हाला क्रॉस करण्याचा हेतू नाही. तुमचा नेमका मुद्दा :
आपण आपल्या ठायी स्वस्थ असू तर...
हा आहे. आणि जोपर्यंत `स्व' म्हणजे काय हा उलगडा होत नाही तोपर्यंत तुम्ही वर्णन केलेल्या सर्व गोष्टी योग्य असल्या (श्वास स्थिर लयीत चालतो, हृदय लयीत चालते. एकतानता येते....निसर्गातले बदल पटकन जाणवतात.... सभोवतालाशी एकरूपता साधली जाते. अंतरात अतिशय शांत वाटते. एक असीम आनंद मनात उसळत रहातो...वगैरे) तरी साध्य होऊ शकत नाहीत.

In reply to by राही

संतवचनांचा परिपाक यापेक्षा वेगळा नसावा. आणि आत्मभान जागृत असले की 'स्व' सापडायला काहीच अडचण नाही ! ...संक्षी सरांनी शब्दांचा नाद सोडून भान जागृत करावे अशी नम्र सूचना.

In reply to by सस्नेह

आत्मभान जागृत होणं म्हणजे देह-मनाचं निरिक्षण नव्हे.

In reply to by स्पा

पण याविषयावर इतका उहापोह झालायं की आता लिहीण्याची इच्छा नाही. सदस्यांनी त्यांच्या मार्गानं जावं हे उत्तम. जिथे चूक वाटेल तिथे सांगण्याचा प्रयत्न करेन (उदा. केजरीवालांवरची पोस्ट, किंवा `त्रिगुणात्मक त्रैमूर्ती' वगैरे) त्यानं लोकांना वेगळी बाजू कळू शकेल. पण सत्य किंवा स्व या विषयावर सविस्तर लेखन (सध्या तरी) करणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

काय उमगलय ते सविस्तर येउंद्यात, कदाचित त्याने लोकांचे समज बदलीत ( तुम्हाला अनुकुल होतील) आणि चर्चा सुकर होइल

आत्मभान म्हणजे देहमनाचे निरीक्षण नव्हे हे एका अर्थाने खरे आहे कारण असे काही मुद्दाम निरखावे लागतच नाही. सगळे आपल्याला कळतेय अशी सहज अवस्था होते, सर्व ज्ञानेंद्रिये शार्प, धारदार, तरल रहातात, रिस्पॉन्सिव रहातात. जरा काही खुट्ट झाले, अगदी टाचणी पडली, तरी त्याचे कंप आपल्याला जाणवतात. आपण ते मुद्दाम निरखतो असे नाही. आपण ऑन-लाइन असलो की जगाचे व्यवहार आपल्यापर्यंत पोचत रहातात. ही सदैव तरल, सूक्ष्म, रेडी टु रेस्पाँड, रेडी टु अ‍ॅक्ट अवस्था म्हणजे (देखील) आत्मभान.

आत्मभान हा बराच शाब्दिक कसरतीचा विषय आहे. पण निजदेहभान अशी संवेदना असते हा शोध शेरिंग्टन नावाच्या मेंदुतज्ञाने लावला .आपला देह ही आपली प्रॉपर्टी आहे याची जाणिव. हा एक प्रकारचा वेगळाच सिक्स्थ सेन्स आहे.

१. उत्तमा सहजावस्था| मध्यमा ध्यानधारणा| तृतीया प्रतिमापूजा| तीर्थयात्रा अधमाधम|| - तुकाराम महाराज सह-ज : बरोबर जन्मलेलं. आपल्याबरोबर जन्मते ती (अवस्था). २. सगुणाचेनि 'आधारे'| 'निर्गुण' पाविजे निर्धारे| सारासारविचारे| संतसंगे|| - समर्थ रामदास सगुणाच्या आधारानं निर्गुणाची प्राप्ती हा विषय समर्थ मांडतात. ३. पहावे आपणासि आपण| या नाव ज्ञान|| -समर्थ रामदास ४. आपणिया आपणपै देखे - ज्ञानेश्वर महाराज वरील संतांनी हेतूतः सगुणाचा स्वीकार केला होता. बाकी सगुणोपासनेला मुळातच 'सकामता' नि 'यांत्रिकता' हे 'शाप' आहेत असं संत वचन आहे. वर अर्धवटराव म्हणतात त्या प्रमाणं शब्दाला गुण असतात. विचारालाही गुण असतात. ज्याला नाम आहे नि रुप आहे त्या प्रत्येकाला गुण असतात. ते असार (न टिकणारं आहे)आहे. निर्गुणा- सार गोष्टीचा- शाश्वता-चा साक्षात्कार करुन घ्यायला तुम्ही सांगताय त्या पद्धतीमध्ये शब्द या सगुणाची गरज आहेच. मूर्ती नि रिलेटेड हे 'ग्रॉस' आहे. शब्द हे 'सटल' आहे. आपण नवीन काही सांगत आहात असं वाटत नाही(अधिक्षेप नाही) नि सांगताय ते अत्यंत बरोबर सांगताय. मात्र ते संख्येनं फार कमी असलेल्या समुदायासाठी आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं इत्यलम.

In reply to by प्यारे१

अर्थ चुकीचे लावलेत
१. उत्तमा सहजावस्था| मध्यमा ध्यानधारणा| तृतीया प्रतिमापूजा| तीर्थयात्रा अधमाधम|| - तुकाराम महाराज
हे सही आहे पण त्याचा असा अर्थ :
"सह-ज : बरोबर जन्मलेलं. आपल्याबरोबर जन्मते ती (अवस्था)."
चुकीचा आहे. स्व जन्म वगैरे घेत नाही ती कायम स्थिती आहे. सहजचा अर्थ विनाप्रयास स्वरुपाशी एकरुपता असा आहे.
२. सगुणाचेनि 'आधारे'| 'निर्गुण' पाविजे निर्धारे| सारासारविचारे| संतसंगे|| - समर्थ रामदास
इथे संतसंगे हा अत्यंत महत्त्वाचा शब्द नजरेतून सुटला आहे. सगुणाच्या आधारनं निर्गुणाकडे जाण्याची मेथडॉलॉजी मूर्तीपूजा किंवा कर्मकांडं नाही. "संतसंग" म्हणजे ज्याला सत्य गवसलंय तोच (त्या पद्धतीविषयी) मार्गनिर्देश करु शकतो (अन्यथा सगुणोपासना निर्गुणाकडे नेणं अशक्य आहे). कारण प्रतिसादात तुम्हीच म्हटलंय : "सगुणोपासनेला मुळातच 'सकामता' नि 'यांत्रिकता' हे 'शाप' आहेत असं संत वचन आहे."
३. पहावे आपणासि आपण| या नाव ज्ञान|| -समर्थ रामदास
इथे "ज्ञान" हा शब्द वापरला आहे. ज्ञान म्हणजे माहिती, सत्य नव्हे. स्व-निरिक्षणानी जाणिव एकसंध होते आणि देह-मनाच्या क्रियांचं आकलन वाढतं असा अर्थ आहे.
४. आपणिया आपणपै देखे - ज्ञानेश्वर महाराज
या पेक्षा ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओळी : " अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुज ध्यान कळो आले; तुझा तुची देव तुची भाव...फिटला संदेह, अन्यासक्ती" जास्त समर्पक आणि मार्गदर्शक आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

:) बरोबर आहे. बाकी अनुभव नाही हे आम्हास ठाऊक आहेच. आठवण करुन दिल्याबद्दल आभार. ज्ञानेश्वर महाराजांच्या अनेक विराण्या आहेत ज्यामध्ये त्यांनी काय होतं ते सांगितलं आहे. सहज म्हणजे आपली जन्मावेळची स्थिती/ अवस्था. (सह म्हणजे बरोबर घेऊन जन्मलेला असा भाव) नवजात बालकाला द्वेष, मत्सर, राग, लोभ, स्पर्धा इ.इ.इ. काहीही नसतं. आप पर भाव नसतो. आत्यंतिक नैसर्गिक प्रेरणा तेवढ्या असतात. ही सहजावस्था उत्तम.

In reply to by संजय क्षीरसागर

इथे "ज्ञान" हा शब्द वापरला आहे. ज्ञान म्हणजे माहिती, सत्य नव्हे. स्व-निरिक्षणानी जाणिव एकसंध होते आणि देह-मनाच्या क्रियांचं आकलन वाढतं असा अर्थ आहे. ही पूर्ण ओवि अशी आहे ऐक ज्ञानाचें लक्षण| ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान |पाहावें आपणासि आपण| या नांव ज्ञान ||१|| दशक ५ समास ६ ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे इतकं स्वच्छ लिहिलं आहे !! तुम्ही म्हणता तसे ज्ञान म्हणजे माहीती नव्हे ! कृपया चुकीची माहीती इतक्या आत्मविश्वासाने लिहून दिशाभूल करु नये ही विनंती ! मुख्य देवास जाणावें| सत्य स्वरूप वोळखावें |नित्यानित्य विचारावें| या नांव ज्ञान ||२|| जेथें दृश्य प्रकृति सरे| पंचभूतिक वोसरे |समूळ द्वैत निवारे| या नांव ज्ञान ||३|| मनबुद्धि अगोचर| न चले तर्काचा विचार |उल्लेख परेहुनि पर| या नांव ज्ञान ||४||

In reply to by विटेकर

>>कृपया चुकीची माहीती इतक्या आत्मविश्वासाने लिहून दिशाभूल करु नये ही विनंती ! कुणाच्याही धंद्यावर गंडांतर आणू नये ही विणंती

In reply to by विटेकर

आणि दुसरं म्हणजे सत्य एकच असल्यानं त्याची गरजही नाही. ज्या प्रतिसादाला मी उत्तर दिलंय त्यात तो श्लोक आहे. एनी वे, आता तुम्ही म्हणतायं :
ऐक ज्ञानाचें लक्षण| ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान |पाहावें आपणासि आपण| या नांव ज्ञान ||१|
याविषयी वरच्या प्रतिसादात चर्चा झाली आहे. तुम्हाला निरिक्षणानं आत्मज्ञान होईल असं वाटत असेल तर जरुर चालू ठेवा.
कृपया चुकीची माहीती इतक्या आत्मविश्वासाने लिहून दिशाभूल करु नये ही विनंती !
जर निरिक्षणासारख्या सोप्या प्रक्रियेनं स्व गवसतो अशी तुमची माहिती असेल तर परिक्रमा कशासाठी असा प्रश्न येतो. यावर तुम्ही पुढच्या प्रतिसादात म्हटलंय :
परिक्रमा म्हणजे तीर्थयात्रा नव्हे , ती एक अंतर्यात्रा आहे.
मग स्व-निरिक्षणाचं प्रयोजन काय? ती अंतर्यात्रा नव्हे काय? जाणिवेचा रोख अंतर्मुख करण्यापलिकडे त्या प्रक्रियेचं प्रयोजन काय? माझ्याकडे माहिती नसली तरी अनुभव आहे आणि माझ्या विधानांच्या समर्थनार्थ तो पुरेसा आहे. पुढे जे काही ज्ञानाबद्दलचे श्लोक तुम्ही उधृत केलेत त्यावर तुम्हीच निरुपण करुन त्यातून "स्व" ही सनातन स्थिर अवस्था कशी प्राप्त होईल ते (वेळ झाल्यावर आणि इच्छा असल्यास) लिहावे. बाकी यानिमित्तानं ओशोंचं एक सुरेख वाक्य आठवलं, ते असं : "ग्यानी क्या बोलता है उसे सुनो और अज्ञानी क्या करता है उसे देखो! असो,... करा शांतपणे परिक्रमा!

In reply to by संजय क्षीरसागर

(वेळ झाल्यावर आणि इच्छा असल्यास) वेळ ही नाही आणि इच्छा तर अजिबात नाही,तस्मात आमचा पास ! आम्ही आमच्या अज्ञानात अत्यंत सुखी आहोत आपण आपले " देखो" चालू ठेवावे. आमचे काहीही म्हणणे नाही! एक शंका: "ग्यानी क्या टंकता है उसे पढो" असे ओशो नी म्हंटले आहे का ? तसे असल्यास जरुर सांगावे आम्ही आपले टंकन अतिशय लक्षपूर्वक वाचू. जमल्यास दोन्ही हात जोडून स्व-कडे बघत बघत अतिशय भक्तिभावाने .. पण वाचायचे असल्याने डोळे मिट्ता येणार नाहीत, ते चालेल का ?

In reply to by प्यारे१

हे निर्गुण म्हणजे इतर काहि नसुन शरणागती आहे. निर्गुण, निराकाला जाणण्याची शक्यताच नाहि. 'इथे माझी गुण जाणण्याची शक्ती संपली. आय सरेण्डर, आय क्वीट. नेती नेती.' निर्गुण म्हणजे गुणरहितता नाहि, निराकार म्हणजे आकाररहितता नाहि. तर ते आकाराबाधित गुणाच्या शक्यतेची समाप्ती आहे. त्यापुढे केवळ प्रेमाची शक्यता उरते...भक्ती.

सध्या सगुणात आनंद आहे .. तो टिकावा हीच इच्छा आहे . त्यामुळे पास ! उपासनेला दृढ चालवीन, भूदेव संतासी सदा नमीन सत्कर्म योगे वय घालवीन सर्वा-मुखी मंगल बोलवीन

In reply to by विटेकर

केसरी गुहेसमीप मत्त हत्ती मारला ! मत्त हत्ती मारला !!
आणि प्रतिसाद तर अजिबात वाचू नका कारण
उत्तमा सहजावस्था| मध्यमा ध्यानधारणा| तृतीया प्रतिमापूजा| तीर्थयात्रा अधमाधम|| - तुकाराम महाराज!

In reply to by संजय क्षीरसागर

१. माझ्या सहीचा अर्थ आपण लक्षात घ्यावा , श्री शिवाजीमहाराजांनी प्रतापगडावर खानाची आतडी बाहेर काढली असा तो अर्थ आहे.. त्याचा लक्ष्यांक्ष असाही आहे की .. आत्मज्ञान झालेल्या केसरीने म्हणजे सिंहाने काम-क्रोधादी मत्त हत्ती मारला.. आता तुम्हाला " अभ्यास वाढ्वा " म्हणणे म्हणजे पिंडिला पाय लावल्यासारखे होईल तेव्हा तसे म्हणत नाही ! २. परिक्रमा म्हणजे तीर्थयात्रा नव्हे , ती एक अंतर्यात्रा आहे.. जाऊ दे , साखरेची गोडी सांगून कळत नाही !ती अनुभवावी लागते ! ३. अधमाधम तीर्थयात्रा ही अतिअधमाधम अशा शाब्दिक अवडंबरापेक्षा बरी असे माझे वैयक्तिक मत आहे ! बाकी चालू द्या !

वाचतेय.. :)

हा हा हा

दुर्गुणॉपासने पेक्षा सगुणोपासना चांगलीच. निर्गुणोपासना करता आली तर उत्तम. बाकी चालू द्यात.

दासबोध दशक ६ समास ७ सगुणोपासना हा मूळातून वाचावा असे सुचवीन. तुमच्याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर समर्थांनी दिले आहे . शिष्य प्रश्न विचारतो आहे : ज्ञानें दृश्य मिथ्या झालें| तरी कां पाहिजे भजन केलें |तेणें काय प्राप्त झालें| हें मज निरूपावें ||१|| ज्ञानाहून श्रेष्ठ असेना| तरी कां पाहिजे उपासना |उपासनेनें जनां| काय प्राप्त ||२|| मुख्य सार तें निर्गुण| तेथें दिसेचिना सगुण |भजन केलियाचा गुण| मज निरूपावा ||३|| जें समस्त नाशवंत| त्यासि भजावें किंनिमित्त |सत्य सांडून असत्य| कोणें भजावें ||४|| असत्याचा प्रत्ययो आला| तरी मग नेम कां लागला |सत्य सांडून गलबला| कासया करावा ||५|| निर्गुणानें मोक्ष होतो| प्रत्यक्ष प्रत्यय येतो |सगुण काय देऊं पाहतो| सांगा स्वामी ||६|| सगुण नाशवंत ऐसें सांगतां| पुनः भजन करावेंम्हणतां |तरी कासयासाठीं आतां| भजन करूं ||७|| उत्तर आपण मूळ समासात वाचावे. इथे चिकटव्ल्यास अकारण धाग्याची लांबी वाढेल ! फक्त एक ओवी लिहण्याचा मोह आवरत नाही .. रघुनाथभजनें ज्ञान झालें| रघुनाथभजनें महत्ववाढलें |म्हणोनि तुवां केलें| पाहिजे आधीं ||३१||

हा दुवा बघा.सगुण, निर्गुण यातला फरक छान सांगितला आहे. बाकी आपल्याला स्व गवसला आहे, कळाला आहे हे कसे ओळखवे? स्व गवसण्यासाठी काय करावे?

संजय क्षीरसागर च्या पहिल्या २ प्रतिसादांशी सहमत . माझ्या मताप्रमाणे आत्मभान म्हणजे विवेकाने काय चांगले आणि काय वाईट हे समजणे आणि त्याप्रमाणे वागणे . 'स्व' समजणे म्हणजे आत्मानुभूती . मी कोण ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्व गवसणे . प्यारे१ ने ४ हि वचनांचे चुकीचे अर्थ लावलेत . त्यातला मुख्य शब्दच विचारात घेतला नाहीये.
सह-ज : बरोबर जन्मलेलं. आपल्याबरोबर जन्मते ती (अवस्था).
सहजावस्था म्हणजे कुठल्याही प्रयत्नाची गरज नसते . डोळे बंद केले कि किवा एका ठिकाणी चित्त एकाग्र झाला कि आपोआप समाधी लागणे .(समाधी लागण्याचा अर्थ काही लोक झोप लागणे वगेरे असं घेतात. समाधी अत्यंत उच्च आणि वेगळ्या प्रकारची स्थिती आहे. परंतु हा इथे विषय नसल्यामुळे टाळते )
सगुणाचेनि 'आधारे'| 'निर्गुण' पाविजे निर्धारे| सारासारविचारे| संतसंगे
सगुण आणि निर्गुणातला फरक संत संगामुळे लक्षात येतो असं अर्थ आहे.
पहावे आपणासि आपण| या नाव ज्ञान||
आपणिया आपणपै देखे
ह्या दोन्ही वाक्यांचा अर्थ आपणच आपल्याला जेव्हा दिसतो त्याला ज्ञान म्हणतात . आता काही जन म्हणतील आपण आपल्याला आरशात सुधा दिसतो. पण आरसा हा इथे माध्यम असतो. आणि त्यात फक्त बाह्यरंग दिसत . अंतरंग नाही. ह्या कुठल्याही माध्यमाशिवाय आपलं स्वरूप आपल्याला जेव्हा दिसत त्या स्थितीला ज्ञान म्हणलाय. सागुनोपास्नेचा इथ काहीही संबंध नाही

In reply to by म्हैस

अजून वाचतोय, शिकतोय. सांभाळून घ्या! आत्मज्ञान मिळालेल्या तरीही सगुणोपासक संतांचे दाखले देण्याचा प्रयत्न वरील चारी उदाहरणांमध्ये होता. त्यांनी ज्ञानोत्तर भक्ती अवलंबिली आहे. १. सहज चा अर्थ सह-ज असाही होतो. नवजात बालकाच्या स्थितीचा विचार आहे. ते वर लिहीलेलं आहे. २. निर्गुण पाविजे ही भाषा व्यवहार म्हणून वापरावी लागते. 'जुने ठेवणे मीपणे आकळेना' ह्या समर्थउक्तीप्रमाणं आपलंच आहे आपल्याला कळत नाही अशी स्थिती. नित्यप्राप्ताची प्राप्ती असंही म्हणतात. ३. 'संतसंगे' हा विचार घेतला नव्हता कारण सगुण निर्गुणाचा विचार हा लेखाचा विषय आहे. सगुणभक्ती मध्ये किंवा ध्यानप्रक्रियेच्या विचारामध्ये देखील (विश्वास ठेवा अन्यथा ठेवू नका) अशी व्यवस्था असते की ज्याद्वारे योग्य मार्गदर्शन मिळतं. घरबसल्या सुद्धा ते मिळू शकतं. 'अचानक' वाटू शकेल असा संतसंग होतो.

In reply to by प्यारे१

का प्यारे काका का ? किती चुकीचे ज्ञान आहे तुम्हास , तरी वाद घालटाय कधी शहाणे होणार तुम्ही , कधी येणार तुम्हाला आत्मभान - स्पाही

In reply to by स्पा

किती चुकीचे ज्ञान आहे तुम्हास , तरी वाद घालटाय कधी शहाणे होणार तुम्ही , कधी येणार तुम्हाला आत्मभान
कवितेतलं मीटर अन यमक हुकलेलं आहे. आधी ते सुधारा अन मग करा स्व-च्या गोष्टी!! -धृतराष्ट्र हस्तिनापूरकर.