नको वाटणाऱ्या अलार्मच्या कर्कश्य आवाजाने त्याला जाग आली…तो उठून बसला…यांत्रिकपणे करायच्या पुढच्या सगळ्या हालचाली आता अंगवळणीच पडलेल्या. उत्तररात्रीच्या त्या अखेरच्या प्रहरात शुभ्र चांदणं पसरलेलं.
"थंडी आहे रे खूप…असुदे" म्हणत आईनं बळेच दिलेल्या गोधडीकडे पाहताना त्याला लहानपणीचा गारवा आठवला.
आई कधीचीच उठलेली आहे. स्वयंपाक घरातल्या पिवळट बल्बचा प्रकाश डोक्यावरून घेतलेल्या चादारीतूनही आत पाझरायचा. वडील बाहेरगावी जायचे असले कि त्यासाठी आईची लगबग चाललेली असायची. आपल्याला जाग येऊ नये म्हणून दबक्या चालीनच ती सगळी काम करायची.
कपबश्यांचा आवाज, आंघोळीचं पाणी काढल्याचा आवाज, एवढचं काय तर… चहाचं आधण ठेवलेलं त्याचाही आवाज ऐकू यावा इतकी नादमय शांतता.
त्या पुसट आवाजांची एक गुंगी चढायची.
कानाच्या पाळ्या आणि नाकाचा शेंडासुद्धा लाललाल करणाऱ्या त्या गारठ्यानं दारातला मोगरापण बिचारा पार गारठून जायचा.
पांढरी शुभ्र अशी, धुंद करून टाकणारी त्याची फुलं नंतर आई आणायची, पूजेला म्हणून…नुकत्याच फोडणी दिलेल्या भाजीचा वासही त्यात मिसळून जायचा.
कुठलसं स्तोत्रं म्हणणारी आज्जी बराच वेळ ते म्हणत राही. ऐकायला अगदी गोड वाटे.
"म्हणत जावं रे काहीतरी, देव चांगली बुद्धी देतो मग" आज्जी म्हणायची. आपण ऐकलच नाही कधी. जमलही नसत म्हणा!!!
अंगावर काटा आणणारा तसला पौषातला गारठा आता कुठला असायला? मोठेपणी आणखी 'मोठं ' व्हायच्या नादात तो सुखद गारठा आपण हरवून बसलोत या जाणिवेने डोळ्यातली चिपाडं तशीच ठेऊन तोंडही न धुता तो परत पांघरुणात शिरला.
असो!
वाचने
3373
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
असो! ?? का म्हणुन?
छान.फारच सेन्टी
चांगला प्रयत्न.
काहीतरी हरवलेलं आहे ते पुन्हा
In reply to चांगला प्रयत्न. by प्रभाकर पेठकर
+१
In reply to चांगला प्रयत्न. by प्रभाकर पेठकर
अहाहा !
आवडल .
द्विशतशब्दकथा आहे हो ती.
चांगली सुरुवात होती
छान ..
थोडकंच पण सुंदर लिहिलेय.. पार