Skip to main content

मॉरिशस सफरनामा (1) – प्लॅनिंग आणि प्रस्थान

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 13/11/2013 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
डिप्लोमाला असताना, त्यावेळची ‘दिल की धडकन’, शिल्पा शिरोडकर, आमच्या विरारचा छोकरा गोविंदा, ‘टारझन’ फेम किमी काटकर, अभिनयसम्राट अमिताभ बच्चन आणि दस्तूरखुद्द रजनीकांत असा सगळा मसाला ठासून भरलेला हिट चित्रपट, हम, त्यावेळी कैक वेळा पाहिला होता. खास आकर्षण अर्थात ‘दिल की धडकन’, शिल्पा शिरोडकर. त्यात एक गाणे आहे ‘सनम मेरे सनम...कसम तेरी कसम’ . त्यावेळी, ते गाणे बघताना शिल्पा शिरोडकरच्या तोडीस तोड आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे निळेशार समुद्र आणि सफेद रेतीचे किनारे असलेला सुंदर मॉरिशस. हम सिनेमाने ह्या सुंदर मॉरिशसची पहिली भेट तारुण्य सुलभ वयात घालून दिली. त्यावेळीच ह्या देशात जायचे हे मनाशी ठरवले होते फक्त तो योग कधी येणार ते गुलदस्त्यात होते.
मॉरिशस (Ile Maurice)

ह्या वर्षी तो योग जुळवून आणायचा प्लान केला. दिवाळीच्या सुट्टीत सुंदर मॉरिशसला जायची ऑनलाईन तयारी सुरू केली. माझ्या प्लानप्रमाणे फक्त मी आणि बायको असाच दौरा करायचा होता. सर्वात मोठी अडचण, मुलांना घरी ठेवून जाण्यासाठी बायकोला तयार करणे, ही होती. एक दीड महिना प्रयत्न करून पाहिला काही वाटाघाटींना यश आले नाही. मग मी डायरेक्ट बुकिंग करून टाकले आणि त्याची कॉपी बायकोच्या मेलवर फॉरवर्ड केली. त्यातला नॉन रिफंडेबल अमाउंटचा आकडा बघितला की बायकोचा होकार येणार असे गृहीत धरले होते. खरेतर जुगारच होता तो. आता त्याचे काय दान पडते ते पाहायचे होते.

मेल वाचल्यावर बायकोचा फोन आला, “मी आधीच सांगितले होते जमणार नाही! आता ते पैसे कसे परत घ्यायचे ते बघ!” मी, “आता ते पैसे परत मिळणार नाहीत. त्यांच्या ‘Terms and Conditions’ ना हो म्हणून पैसे भरले आहेत.” समोरून एकदम शांतता. चला, एकंदरीत टाकलेला डाव यशस्वी होणार ह्याची लक्षणे दिसू लागली. “बुडू देत पैसे!”, बायको. आता आली का पंचाईत. मग जरा वेगळा डाव टाकून अर्थशास्त्रीय भाषेत समजावून सांगितले आणि कसाबसा होकार मिळवला. होकार मिळाल्यावर लगेच खरीखुरी उरलेली रक्कम भरून टाकली. (बायकोला फॉरवर्ड केलेले मेल मी एडीट केलेले होते :) आता काय भिती, मेलेले  कोंबडे आगीला भीत नाही!) भाऊबीजेच्या दुसर्‍या दिवशी सकाळी भल्या पहाटेचे विमान होते पण ते मुंबईतून. त्यामुळे पुण्यातून रात्रीच निघावे लागणार होते. के. के. ट्रॅव्हल्सच्या वेबसाइटवरून एअरपोर्ट ड्रॉप साठी गाडी बुक केली. के. के. ट्रॅव्हल्सची सर्विस एकदम चोख. ड्रायव्हर सांगितलेल्या वेळेवर हजर, युनिफॉर्ममध्ये. कुठे कुठे पिक अप आहेत, किती वाजता आहेत आणि फायनली एअरपोर्टवर गाडी किती वाजता पोहोचेल हे सांगून त्याने कूच केले. मी ही मग डोळे मिटून निद्रादेवीची आराधना करू लागलो. अहो आश्चर्यम! डायरेक्ट एअरपोर्टवरच जाग आली, ड्रायव्हर निष्णात होता याची ती पावती होती. पण ह्या निष्णात ड्रायव्हरमुळे आम्ही वेळेच्या बर्‍याच आधी पोहोचलो होतो. चेक इन काउंटर अजून उघडला नव्हता. पण त्या काउंटर समोर भला मोठा क्यू मात्र होता. भल्या पहाटे, वेळेच्या बर्‍याच आधी पोहोचूनही ‘आलिया भोगासी’ असलेल्या क्यू मध्ये निमूटपणे जाऊन उभा राहिलो. रांगेत बहुतेक सर्व गुज्जुभाइ अने गुज्जुबेन. मला गुजराथी कळत असल्याने एकदम करमणुकीचा कार्यक्रमच चालू झाला माझ्यासाठी. त्यामुळे चेक इन काउंटर कधी उघडला हेच कळले नाही. काउंटर वरच्या बाबाने बोर्डिंग पास हातात ठेवले ते 7C आणि 7E. त्याला म्हटले अरे घोळ झालाय तिकिटे बाजूची नाहीयेत. मला वाटले की 3 X 5 X 3 अशा सीट्स असतील त्यामुळे 7C आणि 7E बाजूच्या सीट नाहीयेत. पण तो बुकिंग क्लार्क म्हणाला की सीट्स 2 X 5 X 2 अशी आहेत. विमानात गेल्यावर 7ड वाल्याला रीक्वेस्ट करून सीट अ‍ॅडजस्ट करून घ्या. मी जरा हुज्जत घालायचा प्रयत्न केला पण तो, “Sir, Flight is overbooked and this is what the BEST I can do!” असे म्हणाल्यावर मी गुपचूप ते बोर्डिंग पास घेऊन सिक्युरिटी चेक साठी निघालो. सिक्युरिटी चेक आणि त्यानंतर ड्यूटी फ्री शॉपमधली विंडो शॉपिंग यात बराच वेळ गेला आणि बोर्डिंगची अनाउंसमेंट झाली. 7ड वर कोण भेटणार ह्या चिंतेत आमच्या सीट्स कडे जाऊन स्थानापन्न झालो. 7ड वर एक चायनीज काका होते. त्यांना रीतसर ‘नी हांव’ केले आणि सीट अ‍ॅडजस्ट करून घ्यायची रीक्वेस्ट केली. ते तयार झाले. मग त्यांना ‘शें शें’ असे म्हणून आभार प्रगट केल्यावर त्यांचा पीतवर्णी चेहरा ‘झिरोच्या’ बल्बप्रमाणे प्रकाशमान झाला. मग त्यांना मी शांघाय मध्ये काही दिवस राहिलो होते ते सांगितल्यावर ते खूश झाले. त्यांची गाडी अपेक्षित गप्पांच्या रुळावर जाणार असे वाटत होते तोच एक गुज्जुभाई आणि गुज्जुबेन, एकदम गुज्जु स्टाइलमध्ये ओरडू लागले, ”सीट खाली करो! ये हमारा सीट है ‘7C, 7D और 7E’. तुम ऐसा देखे बिना दुसरे के सीट पे कैसे बैठ सकता है?” त्यांचा आवेश आणि तोरा इतका लाउड होता की मला त्याही परिस्थितीत हसू येत होते. (कारण बहुतेक डबल बुक झालेल्या सीटवर मी प्रथम बसलो होतो आणि मला कोणीही उठवू शकणार नव्हते) त्या बेननी लगेच आवाज करून सगळे विमान कर्मचारी गोळा केले. मी माझे तिकिट त्यातील एका कर्मचार्‍याच्या ताब्यात दिले. 5-7 मिनिटांनी एक एअर होस्टेस आली आणि चायनीज काकांना दुसर्‍या सीटवर जाण्यास सांगू लागली. ते काका मला ‘बिजनेस क्लास’ मध्ये अपग्रेड करा म्हणून भांडू लागले. त्यावर एक कॅप्टन आला आणि चायनीज काकांना बाजूला घेऊन गेला. ह्या सगळ्या गोंधळात मला आणी बायकोला एकत्र बसता येते की नाही ह्या काळजीने मला घाम फुटत होता. तोच ती एअर होस्टेस एकदम मधाळ हसत माझ्याकडे आली आणि म्हणाली, “सर, वी आर अपग्रेडींग यू टू बिजनेस क्लास, प्लीज फ़ॉलो मी!” बायको काही बोलायच्या आत लगेच तिच्या हाताला धरून उठवले वरचे आणि सामान न घेताच बिजनेस क्लासच्या दिशेनं पळालो. न जाणो यांचा परत मूड चेंज व्हायचा आणि म्हणायचे, “इट वॉज अ मिस्टेक सर, प्लीज गो टू रो नंबर 37!” पण नाही, बिजनेस क्लास मध्येच सीट्स मिळाल्या. सावकाश सामान पण आले. चायनीज काकांना पण बिजनेस क्लास मध्येच सीट मिळाली. मॉरिशस सफरीची सुरुवात तर एकदम ‘फर्स्ट क्लास’ झाली होती... (क्रमशः)

वाचने 14545
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

अरे वा, सोत्रिंकडुन प्रवासवर्णन! मस्तच वाचतोय. पुभाप्र (फोटोसहीत)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हाय कंबख्त तुने पढ्या ही नाही ;) ही काही प्रवासवर्णनं तुमच्यासाठी: गोवा भा १ गोवा भाग २ मुरुड जंजिरा बहरीन - मध्यपुर्वेच्या वाळवंटातील मृगजळ - (भटक्या) सोकाजी

In reply to by सोत्रि

ओ सोत्रि, वाचलय बरं का गोव्याचे आणि मुरुड्चे पण आधीच, मस्त होते ते पण (बहरीन मात्र राहीलं, ते पण वाचतोच आता) पण कॉकटेलच्या, चावडीच्या फ्रीक्वेन्सीच्या, मानाने प्रवासवर्णन कधीमधीच येतात. असो लेखमालेतच मॉरिशसचे एखादे कॉकटेल दिसले तरी चालेल बरं का आम्हाला :)

हा डाव कळला -
मग जरा वेगळा डाव टाकून अर्थशास्त्रीय भाषेत समजावून सांगितले आणि कसाबसा होकार मिळवला.
तर उर्वरित आयुष्यात अत्यंत उपयोगी होईल.

ए साला सोकाजीशेट, मोट्टा ट्रीप करायला निगाला काय रे? मस्त मजा येनार हा आता. बाकी येकदम लक्की हां पन तू सोकाजी. कवापन टुजा नशीब टुला फेवर करते. बिजीनेस कलास काय? कलासच हां. बाकी काय काय मज्जा ;) केली ते बी सांग हा .

प्लॅनिंग आणि प्रस्थान पैकी प्रस्थानवर बरीच शब्दसंपदा खर्च झाली आहे. प्लॅनिंग म्हणजे नक्की काय काय केले? भारतापासून मॉरिशसला जायला व्हिसाची वगैरे काय भानगड असते की व्हिसा ऑन अरायव्हल मिळतो? सध्या तिथले हवामान कसे आहे? कांही थंडीचे कपडेवगैरे घ्यावे लागले का? एखादी रमची बाटली? राहण्याची व्यवस्था कशी केली? राहण्याचे हॉटेलचे दर काय आहेत? नुसते राहायचे की राहणे आणि नाश्ता असे दर आहेत? तेथील पर्यटन व्यवस्थापन कसे असते? कांही संपर्क क्रमांक, आंतरजालीय जोडण्या, दरपत्रक, सोयी आणि गैरसोयी आदींबद्दल माहीतीची अपेक्षा होती. अजूनही प्रतिसाद स्वरुपात दिल्यास इतर सदस्यांना एकेकटे, सह किंवा मॉरिशस कट्टा योजण्यास मदत होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर काका, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे निश्चीतच मिळणार आहेत. प्रत्येक भागात खास वेळी सर्व माहिती येंणार आहे. हे प्रवासवर्णन वाचून कोणालाही मॉरिशसची ट्रीप कसलाही त्रास न होता करता येइल याची खात्री बाळगा. जर लेखात उत्तरे नाही मिळालीच तर प्रतिसादातून द्यायचा नक्की प्रयत्न करेन. - (भटक्या) सोकाजी

In reply to by सोत्रि

हे प्रवासवर्णन वाचून कोणालाही मॉरिशसची ट्रीप कसलाही त्रास न होता करता येइल याची खात्री बाळगा. जर लेखात उत्तरे नाही मिळालीच तर प्रतिसादातून द्यायचा नक्की प्रयत्न करेन. द्या द्या. लवकरच करायचा प्लॅन आहे पण मुलाबाळांसकट.

मस्त सुरूवात. ते शिल्पा शिरोडकरचं लैच पटलं. मला मॉरिशसला जाण्याआधी उत्सुकता होती अग्निपथमुळे.

सोत्री......
मुलांना घरी ठेवून जाण्यासाठी बायकोला तयार करणे
याचे क्लासेस सुरु करा. मुलांच्या सुट्ट्या माझी सुट्टी तिच्या नातेवाईकांच्या सुट्ट्या यांचे गणीत इतकी वर्षे झाले तरीही सुटलेले नाहिय्ये.

वाचतोय

बरेच दिवसांनंतर मिपावर काहितरी इंट्रेस्टींग वाचायला मिळतय. आन्न्दो सोकाजीसेठ.

वा वा सोकाजीनाना! माॅरिशस प्रस्थानचा भाग आवडला. चावडीवरून थेट माॅरिशसच गाठलंत की हो तुम्ही.:-)

मस्त जमलय इमानात तर.. आता काय भिती, मेलेले कोंबडे आगीला भीत नाही! =))

त्रिलोकेकर नाना, भारी जमलाय हा भाग. (पु भा प्र आधी) फक्त ते 'मुलांना घरी ठेवून जाण्यासाठी बायकोला तयार करणे' ह्यासाठी खास "भाग ०-अ" काढावा अशी णम्र विनंती! (अगदी मॉरिशस नाही, पण ते वाचून असं आम्हाला महाबळेश्वराला, गेला बाजार लवासाला जायला जमलं तरी तुम्हाला एक कॉकटेल्...हीहीही)

In reply to by संजय क्षीरसागर

अहो ट्रेड सिक्रेट आहे ते! एकदा 'बैठक' जमवूयात मग सांगतो. इथे बायकोचा वावर असतो :) - (डावपेची) सोकाजी

In reply to by सोत्रि

>>इथे बायकोचा वावर असतो Smile -- वैनी मिपावर वावरतात तरी तुम्ही अगदी उजागरीने ट्रेड शिक्रेट मिरवता?? तुमच्या हिमतीला आणि कॉन्फीडन्सला दाद द्यावी लागेल भौ

In reply to by अर्धवटराव

काय गेम केली होती ती तिला माहिती आहेच, मग कुठे राहिलं सिक्रेट?

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षी, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? हत्तीला दोन प्रकारचे दात असतात म्हणे :) -(हुशार नवरा)सोकाजी

In reply to by सोत्रि

लग्न झालंय असं मी मानतच नाही! त्यामुळे ती मला नेहमी पर-स्त्री समान आहे. काम करणं किंवा न करणं हे वर्षातल्या फक्त काही टाईमलाईन्स सोडल्या तर निव्वळ ऑप्शनल आहे. सो द लाईफ इज अ पिकनिक अँड रोमान्स. तिला कुठे घेऊन जायचं म्हटलं तर काहीही ट्रिक करावी लागत नाही. इट इज अ सिंपल अँड ऑनेस्ट प्रपोजल इन म्युच्युअल इंटरेस्ट. माझ्या सगळ्या सहली तिच्याबरोबर आणि फक्त दोघांच्या असतात. त्यांच्या घोळका ट्रिप सुरु असतात त्याला फार क्वचित जातो. आता तू म्हणशिल मग पहिल्या प्रतिसादात असं का विचारलं? तर - "मग जरा वेगळा डाव टाकून अर्थशास्त्रीय भाषेत समजावून सांगितले आणि कसाबसा होकार मिळवला" हा प्रकार नवा वाटला आणि अर्थशास्त्रात सोत्रिनी काय ट्रिक केली असावी अशी उत्सुकता वाटली म्हणून.

जरा पटापट लिवा हो, पयला भाग आला म्हणून मुलाला लगेच विचारलं की बाबारे, मी आणि डॅडी मॉरिशसास जाऊन आलो तर आजी आजोबांकडे र्‍हाशील का? तर लग्गेच चित्कारला की मला सोडून नाही जायचं म्हणून! झाली आमची ट्रिप हितंच! आता लिहा म्हणजे वाचून तरी घेता येईल.

In reply to by रेवती

आज्जे, मी मुलांना विचारले नाही सांगितले. :) असो, पण जेव्हा नोव्हें. मध्ये जायचे असे फयनल झाले तेव्हा मार्चपासूनच त्यांची तशी मानसिक तयारी करायला सुरुवात केली होती. बरेच प्रयोग केले. त्यांना घरी ठेवून ३/४ तास मॉल मध्ये जाणे ते त्यांना काकाकडे मुक्कामी रहायला ठेवणे असे बरेच. त्यामुळे नोव्हें. पर्यंत त्यांची मानसिक तयारी इतकी झाली होती की "आता ५ दिवस आमची मज्जा" असे म्हणण्याइतपत ते धीट झाले होते :) - (गुणी मुले असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

म्हणजे अजून एक, नुसतं बायकोला गंडवून भागत नाही, मुलेही गुणी पाहिजेत ना तेवढी :)

सोत्रिची लेखमालिका असल्याने पुढचे भाग पटापट येणार याबद्दल निश्चिंत आहे!

वाचतेय :)

पुभाप्र....