जॉर्डन ची वारी भाग 1
आज लिहायला बसलो आणि काय लिहू आणि काय नको असे झाले. इतका मोठा ,रोचक इतिहास आणि तो बघताना आलेले अनुभव आपल्याला भारावून टाकतात. डोक्यात विचारांचा नुसता कल्लोळ माजलाय. ही सगळी माहिती संरचित स्वरुपात मांडणे अवघडच जाणार आहे. असो . प्रयत्न करतो.
जॉर्डन विषयी थोडेसे:
जॉर्डन (अधिकृत नाव जॉर्डनचे हशेमाईट राजसत्ताक ) हा मध्यपुर्व आशिया मधील एक राजसत्ताक देश. इस्राईल , पॅलेस्टाईन, सिरीया ,ईराक आणि सौदी अरेबिया असे शेजारी लाभलेला हा देश जॉर्डन नदीच्या पूर्व तीरावर वसला आहे. ऐतिहासिक द्रुष्ट्या जॉर्डन चे महत्व खूप आहे. हिब्रू बायबलमधे पण जॉर्डनचा उल्लेख आढळतो. हजारो वर्षांपासून म्हणजे ई.स.पु. २३३५ ते २० व्या शतकापर्यंत जॉर्डनवर अनेक संस्कृतींचे अधिपत्य होते. त्यांनी मागे सोडलेल्या पाऊलखुणा आजही इथे पहायला मिळतात. जॉर्डन चे हवामान सुखावणारे आहे. कोरडी हवा , थोडाफार पडणारा पाउस आणि बर्फवृष्टी आणि सुसह्य उन्हाळा असे तापमान जॉर्डनमध्ये आढळते . देशाची अर्थव्यवस्था म्हणावी तितकी चांगली नाही . चलनाची किंमत मात्र खूप जास्त आहे. शेजारी देशांमधील २०११ च्या अरब क्रांती नंतर पर्यटन आणि उद्योगावर विपरीत परिणाम झाला. पण अमेरिकेशी चांगले संबंध आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या श्रीमंत देशांची परकीय मदत यामुळे अर्थव्यवस्था टिकून आहे. देशाची ९०% जनता अरब आहे . पॅलेस्टाईन, सिरीया ,ईराक मधील निर्वासितांची संख्या इथे जास्त आहे. जॉर्डनची राणी "रानिया" हिचे माहेर पण पॅलेस्टिनिच आहे.
आता पाहिल्या दिवसाच्या सहलीबद्दल.
दिवस पहिला : जेराशची सफर
सहलीची चौकशी करायची म्हणून सकाळी लवकर उठलो. हॉटेल मधे कमालीची शांतता होती. खाली जाऊन चौकशी केली तर सहा मजली हॉटेल मधे केवळ तीनच पाहुणे होते. बाकी हॉटेल रिकामेच. व्यवस्थापक सहलीसाठी ७५ दिनार मधे गाडी करून देतो म्हणाला. भाव बरा वाटला .मग मी तयार झालो. न्याहारीला काय मिळेल म्हणून विचारले तर सगळे मांसाहारी पदार्थ होते आता माझी पंचाईत झाली. मी शाकाहारी आहे असे सांगितल्यावर मला आम्लेट मिळेल म्हणून सांगितले . मी अंडे पण खात नाही म्हणाल्यावर व्यवस्थापकाला प्रचंड आश्चर्य वाटले. मग त्याने ब्रेड , लोणी आणि चीज दिले. तोपर्यंत गाडी आलीच. मग लगेच जेराशला निघालो. जायला रस्ता चांगला आहे. साधारण ४०-४५ मिनिटात पोचता येते.
जेराशच्या वाटेवर
जेराश :
जेराश अम्मानपासून साधारण ४८ किमी अंतरावर असलेले एक ऐतिहासिक गाव. प्राचीन आणि नवीन अशा २ भागात जेराशची विभागणी झाली आहे. ई .स .पु . २००० मधे स्थापन झालेले हे गाव खुप कमी राहिलेल्या सुसंवर्धीत रोमन शहरांपैकी एक आहे.प्राचीन जेराश हे तटबंद गाव. सगळ्यात जास्त वास्तुशिल्पे इथेच आढळतात. तीन साडेतीन किमि परिघात पसरलेली वास्तुशिल्पे नानाविध संस्कृतींचे दर्शन घडवतात. हे गाव बघायला ८ दिनार तिकीट आहे.मार्गदर्शक हवा असल्यास ३० दिनार वेगळे. हिवाळ्यात १० ते ४ तर उन्हाळ्यात ६ वाजेपर्यंत प्रवेश मिळतो . पैसे भरून मी आणि मार्गदर्शक श्री.अहमद पुढे निघालो. इथे काही लोक रोमन नाणी विकत होते . हि नाणी खोटी असतात .अशा भूलथापांना बळी पडू नये असे श्री. अहमद म्हणाले.
त्यांनी संक्षिप्त स्वरुपात जेराशचा इतिहास सांगितला तो असा.
असे म्हणतात कि इथे सगळ्यात पहिली मनुष्य वस्ती ६५०० वर्षांपूर्वी निओलिथिक संस्कृतीतल्या लोकांनी वसवली. प्राचीन जेराशचे खरे नाव गेरासा. ई.स.पु. ३३१ साली आलेल्या सम्राट सिकंदराने म्हाताऱ्या आणि थकलेल्या सैनिकांना इथेच सोडले आणि तो पुढे निघून गेला. इथले अनुकूल हवामान आणि मुबलक पाणी यामुळे मनुष्य वस्ती वाढली आणि गाव मोठे झाले. जेराशची खरी भरभराट झाली ती रोमन सम्राट पोम्पीच्या काळात (ई .स .पु .६३). शेजारच्या नेबेथिअन राज्याबरोबर होणारा व्यापार आणि दळणवळण ह्यामुळे जेराश हे एक मोठे व्यापारी केंद्र बनले. पोम्पीने सिरिया प्रांतामध्ये जेराशला सामावून घेतले. काही काळानंतर ई.स.१०६ साली सम्राट ट्राजनने नेबेथिअन राज्य जिंकले आणि जेराशचा सुवर्णकाळ सुरु झाला. ट्राजनने रस्ते बांधले , व्यापार वाढवला आणि दळण वळणाचे मार्ग सुरक्षित केले. व्यापार एकदम वाढल्यामुळे लोक श्रीमंत झाले त्यांनी जुने बांधकाम पडून नवीन प्रासादे, मंदिरे आणि प्रेक्षागृहे बांधली . एक प्रगत आणि मोठे शहर म्हणून जेराश आता ओळखले जाऊ लागले होते.
हे बोलता बोलता आम्ही आलो हेड्रिअन च्या कमानी जवळ.
हेड्रिअनची कमान. (आंतरजालावरून साभार )
अम्मान शहराकडे बघणाऱ्या ह्या कमानीला बाब अम्मान (अम्मानचे द्वार )असेही म्हटले जाते. ही कमान ई.स. १२९ मधे सम्राट हेड्रिअनने शहराला भेट दिली त्याच्या सन्मानार्थ बांधली गेली. काळानुसार पडझड झालेली ही कमान पुनरोद्धारानंतर आज दिमाखात उभी आहे. विशेष म्हणजे या कमानी वर कोरलेले "स्वतंत्र , पवित्र आणि आश्रयदाता" हे शब्द सम्राटाच्या हुकुमावरून लगेच पुसण्यात आले होते. हे त्यावेळच्या राजकीय मतभेदांचे प्रतिक आहे. या शहराने स्वतःला स्वतंत्र समजावे हे सम्राटाला आवडले नसावे
तिथून पुढे गेल्यावर आपण येतो The plaza इथे .
अंडाकृती स्वरुपातली ही रचना साधारणपणे ई.स. १ ते २ मधे बांधलेली आहे. प्रत्येक रोमन शहरामध्ये आपल्याला हे आढळून येईल. शहराचा मुख्य चौकच म्हणा ना. ह्या चौकाचा वापर खुली दुकाने व सभांसाठी होत असावा असा अंदाज आहे .
आता आपण आलोय ते "कार्डो मॅक्सिमस" पाशी. कार्डो म्हणजे रस्ता मॅक्सिमस म्हणजे मोठा किंवा महत्वाचा. रोमन नगर रचनेचे आणखीन एक वैशिठ्य म्हणजे इथे एक मोठा रस्ता आणि त्याला मिळणारे २ छोटे रस्ते असतात. ते इथेही पाहायला मिळते. साधारण ८०० मी लांबीचा हा रस्ता शहरातील व्यापार आणि वाहतुकीचे प्रमुख केंद्र. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे खांब आहेत ते एकेकाळी कमानिद्वारे जोडले गेले होते. या रस्त्यावरील फारश्या ह्या आजही तशाच आहेत .रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली दुकाने मोठी आणि दुमजली होती . ही दुकाने देवाला अर्पण करण्यासाठीची सामुग्री , पशु वगैरे विकत असत. या रस्त्याच्या खालूनच सांडपाण्याची पन्हाळी आहे. तसेच शहराजवळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी सगळीकडे पुरवण्यासाठी उत्तम व्यवस्था केली आहे. ही इथल्या प्रगत संस्कृतीचेच प्रतिक आहे.
रस्त्याच्या उजव्या बाजूला काही अंतरावर हमाम होते. हमाम म्हणजे सार्वजनिक अंघोळीची जागा. रोमन साम्राज्यात अंघोळ करणे हा एक सोहळा असे. त्यासाठी खूप मोठ्या आकाराचे हमाम बांधले गेले. जेराश मधे २ हमाम होते. एक सामान्य जनतेसाठी आणि दुसरे श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोकांसाठी. पण आज या हमाम चे काही अवशेष शिल्लक नाहीत.
शहराच्या बरोबर मध्यभागी असलेले हे निम्फेईयम (कारंजे ) .
हे आहे ग्रीक देव झ्यूस चे मंदिर . झ्यूस हा आकाश आणि विजेचा देव आहे . जेराश मधे झ्यूस ची दोन मंदिरे आहेत. त्याचप्रमाणे प्राण्यांची आणि शिकारीची देवता अर्तेमीस तसेच मद्य आणि सुरापानाचा देव
डिओनिसुस ह्यांचीही मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे पहिल्या आणि दुसऱ्या शतकात बांधलेली आहेत. अर्तेमीसच्या मंदिरा समोर १२ प्रचंड मोठे स्तंभ होते त्यापैकी ११ आजही उभे आहेत.
झ्यूसचे मंदिर
अर्तेमीसचे मंदिर- (आंतरजालावरून साभार)
आता जाऊया प्रेक्षागृहाकडे. रोमन साम्राज्यात कला, खेळ आणि मनोरंजनाला किती महत्व होते हे प्रसिद्ध आहेच. जेराश हि त्याला अपवाद नाही. जेराश मध्ये २ प्रेक्षागृहे आहेत शहराच्या दक्षिण आणि उत्तर दिशेला. ई.स. १६५ साली बांधलेले उत्तरेचे प्रेक्षागृह छोटे आहे. हे खासगी किंवा छोट्या कार्यक्रमासाठी वापरले जात असे. साधारण १५०० लोक ह्या मध्ये बसू शकत. ई.स ९२ साली बांधलेले दुसरे प्रेक्षागृह खूप मोठे आहे. साधारण ३००० लोक मावतील इतके. हे प्रेक्षागृह आजही सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरले जाते. प्रेक्षगृहांचे आणखीन एक वैशिष्ठ्य म्हणजे प्रत्येक रांगेच्या पहिल्या आसनावर लिहिलेले आसन क्रमांक. तेव्हा लोकांच्या बसायच्या जागा ठरलेल्या होत्या किंवा इथे तिकीट विक्री पण होत असे असा अंदाज आहे.
उत्तर प्रेक्षागृहात.....
दक्षिण प्रेक्षागृहात.. (आंतरजालावरून साभार)
ई.स ३३० साली सम्राट कॉनस्टनटीनने ख्रिश्चन धर्म स्वीकारला तोच आणि पूर्वेकडील अर्ध्या राज्याचा (बायझनटाईन ) धर्म म्हणून जाहीर केले. त्यानंतर इथे चर्चहि बांधले गेले. त्याकाळी चर्च हि खासगी बाब असे. जेराश मध्ये ३ चर्च आहेत. त्यावरील मोसैकच्या फरश्या अतिशय सुंदर आहेत. तिसऱ्या शतकापासून मात्र जेराश अस्ताला लागले. ईराक मधील सासेनाइट राज्याची वाढती शक्ती आणि त्यांनी बंद केलेले दळणवळणाचे मार्ग ह्यामुळे व्यापार कमी झाला. त्यात समुद्रमार्गे होणारा व्यापार अधिक सोयीचा झाल्यामुळे जेराशचे महत्व कमी झाले आणि हळूहळू हे शहर काळाच्या पडद्याआड गेले. एकेकाळी २० हजार पेक्षा जास्त लोकवस्तीच्या ह्या गावात नंतर ४ ते ५ हजार लोकच राहिले. रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर इथे मुस्लिम वसाहती आल्या . पण ई.स. ७४९ साली आलेल्या महाकाय भूकंपाने इथली उरली सुरली संस्कृती उध्वस्त केली.तर असे हे जेराश शहर. आपल्या संस्कृतीने आणि सुबत्तेने इतिहासाच्या पटलावर ठळकपणे नाव कोरून विलयास पावले. आज हि इथे उथ्खनन चालू आहे. इतिहासाची बंद कवाडे उघडली जात आहेत. जीर्णोद्धारासाठी जॉर्डन सरकार फ्रांस च्या मदतीने प्रयत्न करत आहे. जॉर्डनला जाणाऱ्या पर्यटकांनी इथे जरूर भेट द्यावी .
श्री. अहमद यांनी जॉर्डनची बरीच माहिती सांगितली . पॅलेस्टाईन आणि सिरीया बद्दल बोलताना ते म्हणाले जे काय घडत आहे ते दुर्दैवी आहे. फक्त एवढीच इच्छा आहे, निरपराध लोकांनी वाहलेले अश्रू आणि सांडलेले रक्त एवढी मोठी किंमत देऊन जी शांतता मिळेल ती टिकली पाहिजे. खरे आहे. लढा कुणाचाही असो,त्यात सामान्य माणूसच होरपळला जातो.
श्री.अहमद यांचा निरोप घेऊन मी निघालो. भयंकर भूक लागली होती. एके ठिकाणी फलाफल खाल्ले आणि पुढच्या प्रवासाला लागलो.
वाचल्या बद्दल आभार. पुढच्या लेखात अजलुन चा किल्ला, मदाबा आणि मृत समुद्राच्या सहली बद्दल लिहीन.
अवांतर: जेराश बघताना आणि माहिती ऐकताना मी इतका गुंग झालो होतो कि काही ठिकाणी फोटो काढायचे विसरूनच गेलो. त्यामुळे काही फोटो आंतरजाला वरून साभार घेतले आहेत.

वाचने
4626
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
*****
लै भारी.
मस्त
धन्यवाद
मस्तं !
छान वृत्तांत येतो आहे. और भी
पुभाप्र.
दोन्हि भाग वाचले
हा पण भाग मस्तच...