Skip to main content

२०१४ च्या निवडणुकीनंतरचा झांगडगुत्ता : एक सोल्युशन

लेखक खटासि खट यांनी गुरुवार, 07/11/2013 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
सालाबादप्रमाणे पाच वर्षांनी निवडणुका येणार. काही जण गुडघ्याला बाशिंग लावून बसले. काही काळजीत पडले, काही बोहल्यावर चढले, काही लाल किल्ल्यावर चढून बसले, काही टवाळ मोडात गेले, काही मवाळ मोडात गेले तर काही मौनात गेले. पण कर्णपिशाच्चाने सांगितलं कि सगळेच आपटणार म्हणून. च्यायला, सगळ्यांना कधी ना कधी चान्स मिळाला, आता कुणाला चुना लावताय या मोडात मतदार आहे. त्याला जास्त चुना लावायला गेलं तर जाळ होणार यात शंका नाही. तर एकंदर २०१४ च्या निवडणुकीनंतर जाम झांगडगुत्ता होणार हे दिसतंच आहे. कुणालाच लोणी नाही. दोन बोके आणि बरीच माकडं अशी नवीन गोष्ट ऐकायला मिळेल. बोके काय एकत्र येणार नाहीत आणि माकडाला पण लोणी खाउ देणार नाहीत. मग लोण्याचं काय ? वितळून जाईल ना बाप्पा ते ! यावर आम्ही एक उपाय काढलाय. शाळेतले मास्तर काढतात ना गावात झांगडगुत्ता झाल्यावर ? तसलाच. किती लागतात जागा तुम्हाला ? २७२ ना ? काम भागतंय ना ? मंग असं करायचं. वर्षाचे दिवस ३६५ गुणिले ५ वर्षे = १८६५ दिवस. भागिले २७२ = ६.७१ म्हणजे २७२ सदस्यांना प्रत्येकी ६.७१ दिवस आपण पीएम बनवू शकतो. पण तसं न करता आपण त्यांना सहाच दिवस पीएम बनवायचं. १८६५ मधून हे वजा केले तर १९३ दिवस शिल्लक राहतात. ते सध्या तसेच राहू द्या. तर हे सहा दिवस प्रत्येक सदस्याला एकदम द्यायचे नाहीत. तर २ + २ + २, किंवा ४ + २ या फॉर्ममध्ये आळीपाळीने द्यायचे. नाहीतर हे लेकाचे आपलं पद उपभोगून झालं कि मी चाललो म्हणणार आणि पाठिंबा काढून घेणार. ४ + २ या फॉर्ममधे केलं तर पहिल्या चार दिवसात समजून उमजून निर्णय घेतले जातील आणि पुढच्या टर्म मधे दोन दिवसात फॉलो अप ठेवता येईल. या पद्धतीत नाराज कुणीच राहणार नाही आणि खरीखुरी लोकशाही अस्तित्वात येईल. तसंच प्रत्येक समाज, प्रदेश यांना आपल्याला प्रतिनिधित्व मिळाल्याचा आनंद होईल. आनंदाची लहर येईल. राष्ट्रीय भावना वाढेल. प्रत्येकाच्या वाट्याला प्रातिनिधिक विकासखाऊ येईल. मग कुणाचीच काही तक्रार राहणार नाही. आता उरलेल्या १९३ दिवसांचं काय करायचं ? सांगतो ना भाऊ ! या २७२ व्यतिरिक्त १९३ लोकांना एकेक दिवस किंवा ९६ लोकांना प्रत्येकी २ दिवस किंवा ३२ लोकांना प्रत्येकी ६ दिवस पीएम बनवता येईल. हा एक तोडगा. किंवा ज्यांच्या निर्णयांना जास्तीत जास्त पाठिंबा किंवा गुण मिळेल त्यांना समप्रमाणात हे दिवस वाटून घेता येतील. या वाटपात एखादा मोठा पक्ष असेल आणि त्यांना त्यांच्या वाट्याचे दिवस एकालाच द्यायचे असतील तर चालेल. पण साचा ४ +२ चाच राहील. सगळ्याच अपक्षांनी एकत्र येउन सरकार स्थापन केले तरी चालेल. थोडक्यात काय तर लोणी वितळू द्यायचं नाही, बोके भांडत ठेवायचे नाहीत आणि माकडालाही जास्त चाळे करू द्यायचे नाहीत. कसं काय म्हणता मंडळी, कसं वाटलं हे सोल्युशन ?

वाचने 3158
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

ब्येष्ट हाये! खटाला सुचेल असाच हा फार्म्युला! लै झ्याक. पण ते बोके ऐकणार नाहीत असं वाटतं. माझ्या घरातले २ खर्रेखुरे बोके २ वर्षं झाली, रोज मारामारी करतात. हा खर्राखुरा आण्भव आहे. मग या ५० आणि ६० वर्षे मुरलेल्या बोक्यांचे काय सांगावे!

In reply to by पैसा

माझ्या घरातले २ खर्रेखुरे बोके २ वर्षं झाली, रोज मारामारी करतात. >> ते खर्रेखुरे आत्ता वाचलं नीट. कालधरनं इच्चारच करत व्हतो.. घुस्लं येकदाचं टकु-यात.

मी फक्त 'दोन बोके नि बरीच सारी माकडं' एवढंच वाचलं नि दाद दिली.

चोरांना जास्ती वाटेकरी चालत नाहीत हे माहीत नाही का ? तरी पण आयडीयाची कल्पना म्हणून छान.