दंतकथा

अजया's picture
अजया in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 10:07 am

नात्यात नुकतेच एक लग्न झाले. वर-वधू दोघेही चेपु व्यसनी! लग्नाला जाता आले नाही तरी फोटो बघावे म्हणून चेपु उघडले, तर फक्त वधूचेच फोटो. नवरदेवाचा एकही नाही! नवऱ्याला फाट्यावर मारायला लग्न होताच शिकली का काय बया, म्हणून तिला फोन करून कारण विचारले; तर सायबांच्या झिजून बुटक्या झालेल्या दातांचा त्यांना जाम कॉम्प्लेक्स आणि त्रास आहे, म्हणून त्याचे फोटो टाकायचे नाहीत, असे त्यांचे ठरले होते.
चौदा वर्षाचा राहुल शाळेत जायला टाळाटाळ करतो, कारण त्याच्या दातांमुळे मित्र 'फावड्या' म्हणून त्याला चिडवतात.
राजसीच्या वेड्यावाकड्या दातांमुळे तिचे लग्न जमत नाहीये. कारण तोंड उघडले की ते फारच वाईट दिसतात.
आनंद एका मोठ्या कंपनीचा सी.ई.ओ. आहे. पण हसताना त्याच्या खालच्या दातांना पूर्णपणे झाकणारे वरचे दात दिसतात, त्यामुळे तो अजिबात हसत नाही. त्यामुळे ‘खडूस बॉस’ म्हणून ऑफिसमध्ये त्याची ख्याती आहे.
या सर्व उदाहरणांत एक गोष्ट कॉमन आहे - दातांची वेडीवाकडी रचना! आणि लहान वयातच ऑर्थोडाँटिक उपचार केले असते, तर हे सर्व उद्भवलेही नसते किंवा बरे करता आले असते. पण आपल्याकडे लहान मुलांना जनरल चेकअपसाठी डेंटिस्टकडे न्यायची पद्धत जवळजवळ नाहीच.
अंगठा चोखणे, बाटली इ. निरनिराळ्या सवयींनी मुलांच्या दातांच्या रचनेवर परिणाम होत असतात. वाकड्या दातांमुळे फक्त चावण्याचाच त्रास होत नाही, तर मुलांना इतर मुलांकडून चिडवले गेल्याने त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर परिणाम होऊन दिसण्याबाबत न्यूनगंड तयार होण्यात त्याची परिणती होते. जर लहान वयातच लक्ष दिले गेले, तर वेड्यावाकड्या दातांमुळे निर्माण होणार्याे समस्या पूर्णपणे बऱ्या करता येतात. त्यासाठी early intervention म्हणजेच लवकर हस्तक्षेप करून उपाय सुरू करणे आवश्यक असते.
त्यासाठी सर्वप्रथम दातांच्या वाकडेपणाचे निरनिराळे प्रकार पाहू या.
ओव्हरबाईट: वरचे समोरचे दात खूप पुढे असणे किंवा खालचा जबडा वरच्याच्या मानाने खूप मागे असणे.

अंडरबाईट: खालचे समोरचे दात खूप पुढे असणे किंवा वरच्या जबड्याच्या मानाने खालचा जबडा पुढे असणे.

डीपबाईट: वरच्या दातांनी खालच्या दातांना पूर्णपणे झाकून टाकणे.

क्रॉसबाईट: खालच्या दाढांच्या मानाने वरच्या दाढा आत किंवा बाहेर असणे.

ओपनबाईट: यात वरचे आणि खालचे दात एकमेकांशी फटकून असतात. त्यामुळे समोरून जबडा उघडा दिसतो.

दातांची गर्दी: दातांना उगवायला आणि राहायला पुरेशी जागा मिळाली नाही, तर गर्दी होणारच!

दातांमध्ये फटी असणे.

हे सर्व झाले वाकडेपणाचे प्रकार. ते का होतात, ते पाहू. याची वेगवेगळी कारणे सांगता येतील. सर्वात महत्त्वाची कारणे अशी -
आनुवंशिक
दुधाचे दात खूप उशिरा किंवा लवकर पडणे.
दुधाचा दात न पडता बाजूला कायमचा दात उगवणे.
अंगठा चोखणे, ओठ चोखणे, जीभ ओढणे इ. सवयी.
लहान मुलांना चोखण्या, बाटली जास्त काळ वापरणे.
जबड्याचा आकार लहान असणे.
चुकीच्या पद्धतीने भरले गेलेले दात, कॅप इ.
या प्रकारच्या दातांनी वेगवेगळे त्रास होऊ लागतात. उदा. नीट चावता न येणे, तोंडाची, दाताची स्वच्छता ठेवता न आल्याने दात किडणे, दुर्गंधी येणे, तोंडाने श्वास घ्यायची सवय लागल्याने हिरड्या, दात खराब होणे, बोलताना त्रास होणे, दिसण्याबाबत न्यूनगंड तयार होणे, तसेच जबड्याच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण आल्याने कायमचे दुखणे लागणे. काही वेळा दात अती झिजल्याने चेहेर्याेची उंची कमी होते, खायचे हाल होऊ लागतात. या सर्वावर इलाज काय?
लहान वयापासून मुलांना डेंटिस्टकडे नियमित तपासणीसाठी न्यावे. ते जरुरी असल्यास ऑर्थोडाँटिस्टला (दात सरळ करण्याचे तज्ज्ञ) दाखवायचा सल्ला देतात.
येथे मी कोणत्याही प्रकारातील वाकडेपणाच्या उपचारांबद्दल फार सविस्तर लिहीत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीप्रमाणे हे उपचार वेगवेगळे ठरवले जातात. जनरल डेंटिस्ट आणि त्यांच्याकडचे ऑर्थोडाँटिस्ट मिळून ते ठरवले जातात. मग ते मुलांचे दात लवकर पडले असतील किंवा पडलेच नसतील, मुलाला काही सवयी असतील, हे सर्व लक्षात घेऊन योग्य तो सल्ला देतात. म्हणूनच डॉक्टरांना मुलांच्या सवयीची माहिती जरूर द्यावी. दुधाचे दात पडणारच, त्यांच्यावर कशाला उपचार करायचे? असाही एक समज लोकांच्या मनात बर्याीचदा असतो. पण ते दात काही एकदम येऊन एकदम पडत नाहीत. त्यामुळे स्वतःच्या गैरसमजुतीमुळे मुलांचे नुकसान करू नये.
मुलांचे दात येण्याचे साधारण वय :
दुधाचे दात : वरचे, खालचे, पुढचे दात : अंदाजे सहा महिने (वर्ष-दीड वर्षापर्यंतसुद्धा कधीकधी दात येत नाहीत.)
दाढा : साधारण दीड वर्ष ते अडीच वर्ष

दात पडण्याचे वय :
सहाव्या वर्षी खालचे, पुढचे दुधाचे दात,
सात ते आठ वर्ष वरचे पुढचे दुधाचे दात,
नऊ ते अकरा वर्ष : खालच्या दाढा पडून छोटी दाढ (premolar) येते.
अकरा ते तेरा वर्ष: वरच्या दाढा पडून छोटी दाढ येते. साधारण याच वयात सुळा पडून कायमचा सुळा येतो.
अशा रीतीने सर्व दुधाचे दात पडायला साधारण तेरावे वर्ष येते. सर्व कायमच्या दाढा कोणताही दात न पडता स्वतंत्रपणे जबड्याच्या मागच्या बाजूला, एक सहाव्या वर्षी आणि एक बाराव्या वर्षी येते.

यामुळेच साधारण सातव्या-आठव्या वर्षापासून उपचार चालू करता येतात. या सुरुवातीच्या वर्षांमध्ये तोंडात किंवा चेहर्यामवर वापरायची ठरावीक प्रकारची साधने दिली जातात. त्यामुळे दात योग्य जागी येण्यास, तसेच चावण्याचा मार्ग योग्य प्रकारे तयार होण्यास मदत होते. पुढे जाऊन सर्जरीचे पर्याय लागत नाहीत. नंतरचे तार लावून दात सरळ करण्याचे उपचारही सुकर होतात. मुलांच्या सवयीही जातात. दात पुढे येण्याची शक्यता कमी होते. अन्यथा पुढे सर्व दात झिजल्याने इंप्लाटसारख्या महागड्या उपचारांची गरज भासते.
त्यामुळेच आपले नुकसान झाले ते झाले, पण आपल्या मुलांना सुहास्यवदन मिळण्यासाठी त्यांना वेळेवर आधुनिक उपचार मिळवून देणे, ही एक सुजाण पालक म्हणून आपली जबाबदारीच आहे!

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

अनन्न्या's picture

1 Nov 2013 - 5:22 pm | अनन्न्या

आजकाल मुलांच्या दातांच्या समस्या खूप वाढल्या आहेत. मी दर सहा महिन्यांनी लेकाला डेंटीस्ट्कडे घेऊन जाते, त्यामुळे छोटे प्रॉब्लेम वेळेत लक्षात येतात.

पैसा's picture

2 Nov 2013 - 12:54 am | पैसा

उत्तम माहितीपूर्ण लेख! मला अक्कलदाढ येताना नीट जागा नसल्याने भयंकर त्रास झाला होता आणि मग त्या किडक्या नसताना काढून टाकाव्या लागल्या होत्या त्याची आठवण झाली!

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2013 - 1:22 pm | प्रभाकर पेठकर

ह्या उलट मला अक्कल दाढ आलीच नसावी हा माझ्या आईचा संशय. (माझ्या पत्नीचा, ह्या विधानाला, क्षणाचीही उसंत न घेता फुल्ल्ल सपोर्ट.)

पैसा's picture

2 Nov 2013 - 8:20 pm | पैसा

=)) बाकी त्यांना हे नाव का दिलं असावं याबद्दल कुतुहल आहे!

प्यारे१'s picture

2 Nov 2013 - 6:43 pm | प्यारे१

सुंदर माहितीपूर्ण लेख पण तितकेच 'वाईट' फोटोज म्हणजे कायच्या काय बेक्कार दिसत आहेत ते जबडे.
माणसाला 'आतूनच' ओळखावा.

मुक्त विहारि's picture

3 Nov 2013 - 8:59 am | मुक्त विहारि

छान माहिती...

सुधीर मुतालीक's picture

3 Nov 2013 - 9:47 pm | सुधीर मुतालीक

माहिती अप्रतीम, फोटो बघून जरा ईस्स होतं. पण धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

4 Nov 2013 - 9:17 am | सुधीर कांदळकर

आवडला लेख. दात न विचकता धन्यवाद देतो.

स्पंदना's picture

11 Nov 2013 - 1:03 pm | स्पंदना

आपण बर्‍याचजणांना असे दात असलेले पहातो. त्याला नेमक काय म्हणायच हे सांगण्यासाठी असे फोटो पहावे लागणारच.
प्रॉब्लेम हा आहे की असे दात असल्याने चर्वण निट न झाल्याने प्रकृतीची हेळसांड होउ शकते, दात चुकीच्या पद्धतीने एकमेकावर रगडले गेल्याने लवकर खराव होतात. नुसते दात ब्रश करुन न सुटणारा प्रश्न आहे हा. त्यासाठी वर अजया म्हणताहेत तसे जरा लहाण वयातच डॉक्टरला दाखवल्याने जर खरच काही बेसिक बदल होउन मुलांचे पुढील आयुष्य सुलभ अन सुखावह होत असेल तर का नाही?
मी तर माझ्या दोन्ही मुलांना आताच डॉक्टरकडे नेउन आणेन अन काही फरक असेल तर उपाय करेन म्हणते आहे.
अजया, अतिशय धन्यवाद. आजवर फक्त दात पुढे असण्यालाच आपण जरा वाईट दिसते अस म्हणत होतो. पण आता त्यातसुद्धा किती प्रकार असतात ते जाणवल, कळल.