जनरेशन गॅप

चाफा's picture
चाफा in दिवाळी अंक
28 Oct 2013 - 4:30 am

वेळ : अपरात्र
स्थळ : कुणाच्याही घराचा असू शकेल असा हॉल
“हाय डॅड”
“आलास? बापाला डॅड केलाच आहेस, आता उशिरापर्यंत बाहेर उनाडून त्याला डेडपण कर.”
“पण आता मी मोठा झालो बाबा, काळजी कशाला करताय?”
“आधी मला सांग, कुठे उधळला होतास इतक्या रात्री?”
“चांदण्या बघत होतो!”
“निर्लज्जपणे सांगतोयस हे?”
“का? तुम्हीच तर लहानपणी दाखवायचात की, कधी कधी मोजायचातसुद्धा.”
“त्याला नाइलाज होता. घर गर्ल्स हॉस्टेलसमोरच होतं, म्हटल्यावर..”
“काय सांगताय बाबा, ही बातमी आईला द्यायलाच हवी. आई, ए आई”
“अरे, मस्करी केली रे, लगेच प्रश्न संसदेत नेऊ नको. उगीच तोडफोड व्हायची., आता भेटलाच आहेस तर मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय.”
“बोला बाबा. करा एकदाचं मन मोकळं. तुम्हाला तरी दुसरं कोण आहे?”
“चेष्टा करू नको कार्ट्या, तुला काही विचारायचं होतं.”
“रिझल्टबद्दल विचारायचं असेल तर राहू दे. उगीच दुसरा अॅुटॅक यायचा.”
“म्हणजे रिझल्टबद्दल विचारायचं नाही?”
“नाही, दुसरंच काहीतरी.. सीरियसली घेणार असलास तर.”
“ओके बाबा, थांबा जरा. सीरियस पोझ घेतो. हं, आता बोला.”
“बाळा, आता तू मोठा झालास..”
“हे सिरीयस आहे?”
“नीट ऐकून घे रे, आता तू मोठा झालास म्हणजे काही गोष्टींबद्दल तुला माहित असणं गरजेचं आहे.”
“उदाहरणार्थ?”
“म.. म..म्हणजे, म्हणजे तुझे अधिकार तुझी कर्तव्य....”
“बाबा, इतक्या रात्री नागरिकशास्त्राचा क्लास कसला घेताय हो?”
“नागरिकशास्त्र नव्हे रे, जीवशास्त्राबद्दल बोलायचंय मला. तू नीट बोलून देशील का?”
“ठीक आहे, सांगा जीवशास्त्रातले अधिकार आणि कर्तव्ये सांगा.”
“हेच ते आपलं... झाडं कशी वाढतात, त्यांची दुसरी रोपं कशी तयार होतात, वगैरे...”
“झाडं कशी वाढतात हे मला शिकवायला रात्री साडेदहा वाजता जागताय? काय नोकरी सोडून बागाईत करताय का?”
“नाही त्याची गरज नाही. मला जरा वेगळ्या विषयावर बोलायचंय.”
“नक्की कोणत्या विषयावर बोलायचंय तुम्हाला बाबा?”
“ सेक्स..”
“ काय ?????”
“स..स.. सेट्स रे, तुझ्या नव्या पुस्तकांचे सेट्स मिळाले का?”
“सकाळीच आणलेत ना! तुमच्या समोर तर कपाटात ठेवलेत. दाखवू का?”
“नाही, तसं नाही म्हणायचं मला. पण हल्ली कुठली पुस्तकं वाचतोयस?”
“अॅहगाथा ख्रिस्ती., तुम्हाला झोप येत नाहीये का? देऊ का तुम्हाला?”
“अरे नाही रे, म्हणजे मला बोलायचंय तो विषय जरा कठीण आहे.”
“मराठीबद्दल बोलायचंय का?”
“मराठी आणि कठीण? अरे, मातृभाषा ती”
“बाबा, कॉन्व्हेंटमधल्या कुठल्याही मुलाला विचारा. तो मराठी हेच उत्तर देईल. पण तुमचा विषय हा नाहीये, बरोबर?”
“खरं तर हा नाहीच रे, म्हणजे बघ आपल्या समोर ती चिंगी राहते ना! तिच्याकडे हल्ली फार पाहत असतोस..”
“बाबा, उलटतपासणी कसली घेताय? मी तिच्याकडे नाही, तिच्या भावाकडे बघत असतो.”
“बाप रे, राँग नंबरवर कॉल करतोय की काय हा?”
“काय बडबडताय बाबा?”
“तेच ते. चिंगीचा भाऊ..”
“त्याचं काय?”
“त्याच्याकडे का बघत असतोस?”
“त्याची बॉडी, बाबा. त्याला एकदा विचारणार आहे मी.”
“काय???”
“कोणत्या जिममध्ये जातो ते. मलापण तिथेच अॅहडमिशन घ्यायचीय बाबा.”
“मग ठीक आहे.”
“हे विचारायला इतके जागत होतात? की आणखी काही आहे?”
“काही नाही. आता बघ, आपल्या घरात मांजर आहे ना! तिला पिल्लं झाली नुकतीच. ती कशी झाली असतील .. हुश्श्य”
“जशी वाघ, सिंह, कुत्र्यांना होतात, तशीच.. बाबा, नक्की काय म्हणायचंय? आता काय मार्जारपालन केंद्र उघडताय का? कुक्कुटपालन केंद्रासारखं?”
“तसं नाही रे, पण तिला पिल्लं होण्यासाठी कारणीभूत कोण? .. हुश्श”
“आपल्याकडे एक काळा बोका येतो ना! तोच असावा बहुतेक. सगळी पिल्लं काळीच आहेत.”
“म्हणजे तुला थोडंफार कळायला लागलंय तर! पण मला सांग, नक्की कसा कारणीभूत असणार तो बोका?”
“क्लोन केलं असणार हो, आपल्याला काय करायचंय?”
“असं कसं? आपल्या चर्चेचा विषयच आहे तो.”
“मांजरीची पिल्लं? काय दत्तक घेताय का त्यांना?”
“मला प्रजोत्पादन म्हणजे ब्रीडिंगबद्दल बोलायचंय.. हुश्श”
“परत अभ्यासाकडे वळलात? बाबा, ब्रीडिंगवर आख्खा एक धडा आहे आम्हाला.”
“म्हणजे अभ्यासाच्या पुस्तकातून या विषयांवर थोडीफार माहिती मिळतेय, असं म्हणायला हरकत नाही.”
“खूप किचकट आहे तो, त्यात तर हायब्रीड कसं करावं हेसुद्धा सांगितलंय. ते तर महाकठीण.”
“काय????? हा.. हा.. हायब्रीड? अरे, कशात आहे हे सगळं?”
“शेतीविषयक माहितीच्या धड्यात.”
“अरे देवा, मी समजावतोय काय, हा समजतोय काय.. बरं. लास्ट ट्राय. तुझ्या बर्याआच मैत्रिणी आहेत ना?”
“कॉमन आहे हो ते..”
“मग मला सांग, असं होतं हल्ली तुला की एखाद्या मैत्रिणीसोबत तू कॉलेजच्या कँटीनमध्ये बसलायस आणि कितीही महत्त्वाचं काम असेल तरी ती उठेपर्यंत तुला उठावसं वाटत नाही?”
“होतं ना. कित्येकदा होतं.”
“म्हणजे नक्की कशा भावना असतात तेव्हा तुझ्या मनात?”
“कसल्या भावना? आम्ही टी टी एम एम करतो.”
“हा काय प्रकार आहे?”
“तुझं तू, माझं मी’ असा बिल भरायचा प्रकार हो..”
“त्याचं काय आता?”
“अहो, पोरीच्या आधी उठलं तर वेटर सरळ आपल्याकडे बिल मागतो ना! परवडत नाही तुमच्या इतक्याशा पॉकेटमनीत.”
“अरे, मघापासून मी तुला काय सांगायचा प्रयत्न करतोय...”
“दॅट्स युवर प्रॉब्लेम बाबा. तुम्हालाच आठवत नाही काय सांगायचा प्रयत्न करताय ते?”
“अरे, मी तुला झाडांची उदाहरणं दिली, प्राण्यांची दिली, थेट विचारून पाहिलं. तुझ्या टाळक्यात काही प्रकाश पडत नाहीये का?”
“थोडाफार पडतोय, पण नक्की कळत नाहीये तुम्हाला त्याच विषयाबद्दल बोलायचंय का, ते.”
“नशीब, आता जरा मलाही कळू दे तुला काय कळलंय ते...”
“बाबा, तुम्हाला ढिंग चँग ढिच्यांगबद्दल बोलायचंय का?”
“हे आणखी काय नवीन?”
“आता हे तुम्हाला समजवण्यात माझी रात्र जाईल. त्यापेक्षा ही घ्या ‘बालक पालक’ची सीडी आणि तुम्हीच बघा.”
“अरे कार्ट्या, मघापासून शब्द शोधताना चाचपडतोय मी आणि तू सरळ ढिंग चॅक ढिचँग बोलून मोकळा?”
“त्यात काय आहे बाबा? समोर काय दिसतंय ते समजून घ्यायच्या वयात टीव्हीवर सदानकदा लागलेली आयटेम साँग, कथानकाची गरज या नावाखाली टाकलेले हॉट सीन्स; हे कमी पडलं तर न्यूज चॅनलवर पीडितांच्या मुलाखती, नाहीतर ते `चैन से सोना है तो जाग जाओ' वाल्या क्राईम स्टोरीज. जे समजायचं होतं ते कधीच समजलं. काळाची गरज म्हणून मुलांच्या हातात महागडे मोबाईल ठेवताना त्यात मुलगा काय काय साठवतो, इकडे कधी लक्षच दिलं नाहीत तुम्ही. लहानपणीच निरागसपणा हरवलेल्या आजच्या नवतरुण पिढीला तुम्ही झाडांची, प्राण्यांची उदाहरणं देऊन सांगताय? ती वेळ टळून गेली बाबा आता..”
“म्हणजे?”
“जे शब्द उच्चारताना तुमची जीभ टनभर वजनाची होते, त्याबद्दल आजकाल शाळाकॉलेजात बिनदिक्कत चर्चा होते. काळजी करू नका, अगदी स्पेशालिस्ट डॉक्टर बोलावून शाळेनंच आम्हाला या सगळ्याची माहिती दिलेय कधीच.”
“म्हणजे मी कशाबद्दल बोलतोय हे तुला माहीत होतं?”
“पहिल्या वाक्यापासून..”
“मग आधी का नाही बोललास? घशाचं वाळवंट झालं माझ्या. शोधलेस तर दोनचार उंटही सापडतील आता तुला तिथे...”
“आपल्यातल्या जनरेशन गॅपची गंमत बघत होतो बाबा..”

------- चाफा

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

लॉरी टांगटूंगकर's picture

1 Nov 2013 - 1:55 pm | लॉरी टांगटूंगकर

जमलंय.

चित्रगुप्त's picture

1 Nov 2013 - 3:44 pm | चित्रगुप्त

छान संवाद आहेत.

प्यारे१'s picture

1 Nov 2013 - 4:58 pm | प्यारे१

मस्तच. जमलंय.

दारु म्हणजे काय रे भौ ची आठवण आली.

पैसा's picture

1 Nov 2013 - 8:32 pm | पैसा

आताची जनरेशन लै हुशार बर्का!

भावना कल्लोळ's picture

6 Nov 2013 - 5:22 pm | भावना कल्लोळ

सहमत

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Nov 2013 - 9:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

मुक्त विहारि's picture

1 Nov 2013 - 10:16 pm | मुक्त विहारि

जबरा...

जनरेशन गॅप = सांडणीस्वार ते इ.मेल

सोत्रि's picture

1 Nov 2013 - 11:19 pm | सोत्रि

हा हा हा,

पैसातैशी बाडिस, आजची जनरेशन लैच हुशार है!

- (आजच्या जनरेशन्ची २ मुले असलेला) सोकाजी

शिद's picture

2 Nov 2013 - 1:34 am | शिद

मस्त… ई-टीवी सुपरफास्ट कोमेडी एक्स्प्रेस वरच्या पार्थ अणि त्याच्या बाबांची आठवण झाली. :)

दिपक.कुवेत's picture

2 Nov 2013 - 1:46 pm | दिपक.कुवेत

चला आता बालक-पालक पि. आता परत बघायला हवा.

कानडाऊ योगेशु's picture

3 Nov 2013 - 11:34 pm | कानडाऊ योगेशु

जनरेशन गॅप जरी असली तरी बाप आणि मुलांतला मोकळा ढाकळा संवाद व दोघांनी मधे मधे घेतलेली एकमेकांची फिरकी जाम आवडली.

चतुरंग's picture

5 Nov 2013 - 10:55 am | चतुरंग

लिखाण आवडले!

(जनरेशन ग्यापमधून स्क्वेअरकट मारणार्‍या चिरंजिवांचा बाप)रंगा

दिपोटी's picture

5 Nov 2013 - 12:48 pm | दिपोटी

अस्सल जनरेशन गॅप आहे खरी.

लेख छान जमून आला आहे.

- दिपोटी

स्पंदना's picture

6 Nov 2013 - 6:57 am | स्पंदना

काय बोलाव कळत नाही आहे.

(हुश्शार पोरीची आई)

भ ट क्या खे ड वा ला's picture

6 Nov 2013 - 9:26 pm | भ ट क्या खे ड वा ला

जे समजायचं होतं ते कधीच समजलं. काळाची गरज म्हणून मुलांच्या हातात महागडे मोबाईल ठेवताना त्यात मुलगा काय काय साठवतो, इकडे कधी लक्षच दिलं नाहीत तुम्ही. लहानपणीच निरागसपणा हरवलेल्या आजच्या नवतरुण पिढीला तुम्ही झाडांची, प्राण्यांची उदाहरणं देऊन सांगताय? ती वेळ टळून गेली बाबा आता..”

लय भारी

भटक्य आणि उनाड's picture

7 Nov 2013 - 8:13 pm | भटक्य आणि उनाड

छान जमलय....