Skip to main content

रसिकांतले काही 'अग्रणी'

लेखक तिमा यांनी सोमवार, 30/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच, पार्ल्याच्या एका संस्थेत, लताच्या रागदारीवर आधारलेल्या गाण्यांवर एक सुंदर कार्यक्रम झाला. सादर करणारे , स्वतः रागदारी गाणारे होते. एकेक राग थोडक्यांत गाऊन, त्यानंतर त्यावर आधारित लताचे हिंदी चित्रपटातील एक गाणे लावत होते. हजार रसिकांचा श्रोतुवर्ग, तल्लीन होऊन कार्यक्रमाचा एक भागच बनले होते. अतिशय सुंदर अनुभव होता तो. माझ्या बाजूला एक वृद्ध सरदार बसले होते. निव्वळ गाण्याच्या आवडीने ते लांबून आले होते. रागाचे नांव सांगितले की, कुठले गाणे लावणार, याचा त्यांचा अंदाज वाखाणण्यासारखा होता. काहीही ओळखपाळख नसताना ते माझ्याशी मोकळेपणे संवाद साधत होते. मनांत एक विचार येऊन गेला की, या हिंदी सिनेमाने आपल्या देशांत, राष्ट्रीय एकात्मतेचे काम उत्तम केले आहे. त्यातील मधुर गाण्यांच्या सुरांनी वेगवेगळ्या प्रांतातली अनेक माणसे जोडली गेली आहेत. अर्थातच यात, आपल्या सर्व उत्कृष्ट पार्श्वगायकांचे आणि संगीतकारांचे तितकेच योगदान आहे. या आनंदसोहळ्यामधे आम्ही रसिक अगदी बुडून गेलो होतो. तीन तास कसे गेले हे कळले सुद्धा नाही. तसे आता, कुठले गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, हे घरबसल्या जालावरही कळते. पण त्या रागाचे जिवंत प्रात्यक्षिक आणि लगेच ते गाणे ऐकणे हा अनुभव रोमांचक तर आहेच, त्याशिवाय त्या गाण्याचा राग कायम स्मरणांत ठेवणे जास्त सोपे झाले असे वाटले. पण, हा कार्यक्रम सुरु होण्याआधी तिथल्या काही 'रसिकाग्रणींचे' वर्तन मात्र अतिशय खटकणारे वाटले. असे कार्यक्रम हे बहुधा विनामूल्य असतात. त्यामुळे गर्दी जास्त होणार या हिशोबाने मी, चांगला अर्धा तास आधी, त्याजागी पोचलो. एका हॉलच्या मध्यभागी पण कडेला, सादर करणार्‍यांसाठी टेबल-खुर्च्या ठेवल्या होत्या. आणि त्याच्या सभोवताली अर्धवर्तुळाकार खुर्च्यांच्या रांगा होत्या. पहिली रांग पूर्ण रिकामी होती. पण ती आमंत्रितांसाठी असते, हे आता अंगवळणी पडले आहे. व्यवस्था चांगलीच होती. पण बर्‍याचशा खुर्च्या भरल्या होत्या. मधेमधे रिकाम्या जागा दिसत होत्या. पण रांगेत आत शिरल्यावर त्या सर्व रिकाम्या खुर्च्या, रुमाल, पिशव्या, डायरी, अशा तत्सम वस्तुंनी 'आरक्षित' होत्या. बसलेली मंडळी उच्चभ्रूच होती. पण निर्विकारपणे नकार द्यायला त्यांना कसलाही संकोच वाटत नव्हता. एरवी आरक्षणाविरुद्ध गळे काढणारे, या आरक्षणाला मात्र आपला हक्कच मानत होते. हळुहळू गर्दी वाढत होती. मी एका मागच्या रांगेत, एका विनाआरक्षित दिसणार्‍या खुर्चीवर बसलो. ती का अनरक्षित होती ते वर पाहिल्यावर कळाले. तिथे पंखा नव्हता. कार्यक्रम सुरु होण्याआधीच, सर्व खुर्च्या भरल्या. बरेच लोक उभे राहिले. अगदी पुढे सतरंज्या अंथरुन, आयोजक त्यांच्या परीने प्रयत्न करत होते. पण गर्दीच इतकी होती की त्यांचाही नाईलाज होता. आरक्षित मंडळी मात्र आयत्या वेळेला येऊन आपल्या गोटात येऊन बसली. त्या खास रसिकाग्रणींमधे मला बरेच ओळखीचे चेहेरे दिसू लागले. तो एक, मोठा समुदायच होता. या आधीही अनेक ठिकाणी, हाच समुदाय मला दिसला होता. अशाच एका खाजगी कार्यक्रमाला,'आपले सगळे आले का ?' असा प्रश्न विचारताना, माझ्याकडे तुच्छ कटाक्ष टाकणार्‍या एक काकूही त्यांच्यात दिसल्या. या सगळ्या रसिकाग्रणींचे व्याकरण फार पक्के असते. कुठलेही गाणे लागले तरी, त्यातील संगीतकार, गीतकार, वादक, चित्रपट आणि पडद्यावर ते कोणावर चित्रित केले आहे याची जंत्री त्यांना ठाऊकच असते. आणि आपले हे ज्ञान, प्रत्येक वेळी पाजळल्याशिवाय त्यांना रहावत नाही. त्यांच्या लेखी, सी. रामचंद्रांना 'अण्णा' म्हटले नाही, तर तो अरसिक ठरतो.अर्थातच असे ज्ञान नसलेले, फक्त सुरांत रमणारे लोक यांना तुच्छच वाटतात. अशा प्रसंगी आपण किती 'पारदर्शक' आहोत याचा मला साक्षात्कार होतो. कंपूबाजी ही फक्त संस्थळांवर असते असे नाही, तर अशा प्रत्येकच कलादालनात ती असावी असे वाटू लागते. कार्यक्रमाला आणखी एक वयस्क सरदार आले होते. त्यांनी मात्र, जागा न मिळाल्यामुळे, जरा वरचा आवाज लावल्यावर त्यांना बसायला जागा मिळाली. ते पाहून माझ्या शेजारचे सरदारजी आजोबा, माझ्याकडे बघून मिष्किल हंसले. काही न बोलताच, आम्हा दोन रसिकांचे सूर जुळले होते.

वाचने 3918
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

मी यात पहिला

एकूणच ढोंगीपणा वाढतोय, आपण फार तज्ञ हे दाखवण्याची अहमहमिका असते.

बसलेली मंडळी उच्चभ्रूच होती. पण निर्विकारपणे नकार द्यायला त्यांना कसलाही संकोच वाटत नव्हता.
अहो आमच्या क्यांटीन मध्ये सुद्धा सकाळी नउला नाष्ट्याची वेळ संपत आली की लाख-लाख रुपये पगारी असलेली लोकं त्यांच्या मित्रमंडळीसाठी प्लेटा भरू-भरू टेबलावर ठेउन त्यांची वाट बघत बसतं. येताना उशीर झाला तर २०-२५ रुपयांची इडली खाउन यायला त्यांना काय धाड भरते हा मला प्रश्न पडतो. आठ जणांच्या टेबलावर दोघं तिघं आठ प्लेटा भरून येणार्‍या-जाणर्‍यांना "ओ, जागा नैयेय" असं निर्लज्यपणे सांगत वीस-वीस मिनिटं वाट बघतात.

कुठल्याही कार्यक्रमाला येताना, निव्वळ त्या कार्यक्रमाचा आनंद लुटण्याचा हेतू फार कमी लोकांचा असतो. आम्ही आलो आहोत हो अशी आरोळी ठोकायलाच येणारे जास्त!

:) हा अनुभव अगदी नेहेमीचा आहे. ज्याक्षणी माणूस स्वतःपुरता कलेचा आस्वाद घ्यायचं सोडून "मला किती कळतं" ही दाखवेगिरी करायला लागतो त्याक्षणी हे असले नमुने पैदा होतात. (अगदी मिपावरही अशी काही उदाहरणं बघायला मिळतात) माझ्यापुरता यावरचा उपाय म्हणजे पार मागे कोपर्‍यात जाऊन बसायचं. :)

कंपूबाजी ही फक्त संस्थळांवर असते असे नाही, तर अशा प्रत्येकच कलादालनात ती असावी असे वाटू लागते. काय म्हणतात ते हं "जियो" ! ;)

खरे रसिक कसे असतात म्हैतीय ? सुधीर फडक्याना ते हमखास बाबुजी म्हणतात. नय्यर साहेबाना ओपी या एकेरी नावाने ओळखतात. भीमसेन 'लावल्याशिवाय' सुरेल होत नाही म्हणतात. पुलंना ओळख नसताना भाई म्हणतात. मैफिल न ऐकताच बाहेर उभे राहून " मग कुमारने त्या गायकाचा असा अब्बा केलाय म्हणून सांगू अशी सप्तसुरांपलीकडची मैफल जमवितात. को़णा गायकाच्या दोन दोन बायका आहेत याचे गुर्‍हाळ लावतात. ते साले किराणावाले " किराणा" म्हटले की कोण्त्याही ऐरागैर्‍याला 'सवाई' त चान्स देतात यावर चर्चा करतात. किशोरी आमोणकर कशी घनचक्कर आहे हे हिरीरीने दुसर्‍याला पटवतात. सर्वात मुख्य म्हणजे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाल न चुकता तोच तो ठरलेला झब्बा न चुकता घालून येतात व ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाला न विसरता जीन घालतात.

In reply to by चौकटराजा

अजून काही बेबीताई = रोहिणी भाटे अण्णा = भीमसेन / गदिमा / सी रामचंद्र भावड्या = गणपतराव जोशी तात्या = कुसुमाग्रज / ना सी फडके / व्यंकटेश माडगूळकर

असले हुच्चभ्रू आवर्जून सापडतात ते मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात. कमरेवरच्या मोबाईल पाऊचमध्ये ब्लॅकबेरी, खिशाला पार्कर, मों ब्लों की काय म्हणतात तसल्या नावाचं सोनेरी क्लिपचं पेन, एका हातात आयपॅड आणि दुसर्‍या हातात आम्हांला इंग्रजी(च) वाचता येतं हा आवेश दाखवणारं एखादं वर्तमानपत्र, सफाचट दाढी आणि कलोन परफ्युमने न्हाऊन माखून ब्रिलक्रिम लावून केस चप्प बसवून आणि महागडे (निदान बघून वाटणारे) कपडे, बूट, घड्याळ इ इ. घालून आम्ही हुच्चभ्रूचा टॅग मिरवतात, पण माणूस म्हणून सगळे दगड. बाकावर तिघेच बसणार, चुकूनही फोर्थ सिट देणार नाहीत, डोंबिवलीला बसलेला आणि सीएसटीला जाणारा माणूस शेवटपर्यंत उठणार नाही. त्यापेक्षा मग एकमेकांना सांभाळून प्रवास करणारे सेकंड क्लास वाले काय वाईट असा विचार आल्याशिवाय राहत नाही.

१५ रुपयाचं तिकिट काड्।अणार्‍याने फोर्थ सीट दिली तर त्याचं फक्त ५ रुपयाचं नुकसान होते. फस्र्ट क्लास वाल्याला त्याचे नुस्कान परवडत नाही. --- ह्यान्डिक्याप डब्ब्यातून फिरणारा लंगडा उद्दाम

पण उभा असणारासुद्धा फर्स्ट क्लास वालाच असतो, आणि आपणही कधीतरी सुपात जाणार आहोत याचं तरी भान ठेवावं की...

त्याच कसं आहे; आपण जेव्हा 'नाही रे' वर्गात असतो तेव्हा 'आहे रे' चा हेवा वाटतो. तुमचं म्हणणं चुकतय असं नाही; पण मी एखाद्या कार्यक्रमाला जात असेन आणि माझा कंपू माझ्याबरोबर असावा असे वाटण्यात चुक ते काय? त्यासाठी थोडा निर्लज्जपणा करायची पण तयारी आहे आपली. बाकी ज्ञाण पाजळण्यार्‍याच्याबद्दल तिटकारा आम्हाला पण आहे आणि मी हुच्चभ्रू नाहीये :)

मस्त! आवडलं. शो करणार्‍यांना खरं गाणं ऐकण्यात किती इंटरेस्ट असतो देवजाणे!

असंच काहीसं रॉक बॅन्ड स्टेज शोज / परफॉरमंस मधे बघितलं आहे. वाजवणा-याच्या तालामधे खरे डोलणारे किती आणि फक्त जोरजोरात मान,यो स्टाईल हात हलवणारे किती देवच जाणे. त्यातही जर केस मोठे असतील मुलांचे तर मग विचारायलाच नको, देवीच्या देवळामधे अंगात आलेल्या बाईलासुद्धा स्पर्धा करतील अशा थाटात मान हलवतात!

In reply to by क्रेझी

पटत नसेल तर आंवदा ब्रायन अ‍ॅड्म्सच्या रॉक कॉन्सर्टला उपस्थिती ठेवा मग कळेल आय वॉना बी योर अंडर्वेर च्या तालावर जोरजोरात मान,यो स्टाईल हात हलवणे म्हणजे काय झिंग असते ते...! अन्न काय हो, स्पर्धा आज कुठे नाइ म्हनतो मी ?