Skip to main content

फ्री बर्ड्स

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 14/10/2013 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
च्र्यांग च्र्यांग च्र्यांग च्र्यांग च्र्यांग च्र्यांग च्र्यांग च्र्यांग आयला किती वेळ नुसते उडत रहाणार? हो ना चला रे खाली एखाद्या फ़ांदीवर बसू. फ़ांदी? कसली फ़ांदी? अरे हा म्हातारा अजूनही जुन्या काळात उडतो आहे. त्याच्या काळात म्हणे खाली हिरवीगार जंगले होती त्यांत झाडे होती. झाडांना फ़ांद्या होत्या? च्र्यांग च्र्यांग... आई झाडे म्हणजे काय? फ़ांदी म्हणजे काय? अरे त्या टॊवरवर तो लोखंडी क्रेन पक्षी दिसतोय नां? त्याचे हवेत पसरलेले हात म्हणजे फ़ांदी. च्र्यांग च्र्यांग चल आई. मला आवडते फ़ांदीवर बसायला. यार च्रिंग, तू जपानला जाऊन आलास ना? इतक्या लवकर कां परतलास? च्र्ह्यांग, अरे तिथे फ़ुकुशिमाला जे पक्षी भेटले, ते खूप पिडलेले होते. काय झाले? अरे त्यांनी नेहमी प्रमाणे समुद्रातले मासे खाल्ले त्यानंतर खूप पक्षांच्या पंखाखाली फ़ोड आले. मासे पकडणे तर सोडाच, उडणे देखील कठीण झाले. हे ऐकल्यावर आम्ही सगळे उपाशीच उडत उडत तिथून दूर गेलो. अरे बाप्परे! कठीणच आहे हे सगळे. आपले काय होणार कोण जाणे! आणि च्रिंग चंग क्रॆक, इथे पण तर कठीणच आहे. आत्ता मागेच नाही कां केवढी धूळ, धूर हवेत पसरला होता! होना! उडतांना काही दिसणे देखील मुश्कील झाले होते. हं! आठवतेय. खाली सगळी माणसे मास्क घालून होती. आपल्याला तर मास्क देखील घालता येत नाहीत. अरे त्यावेळीस ह्या च्र्युंगनी एक मास्क ट्राय करायला खिडकीच्या काठीवरून उचलून आणला होता त्याचे काय झाले आठवतेय कां? हांह हाह्ह हाह्ह! मास्क ऐवजी त्याने कोणा बाईचाच कसलासा कपडा उचलून आणला! हो ना, तिने फ़ेकून मारलेला बटाटा मोठ्या मुष्कीलिने चुकवला होता! त्या कपड्याचेच मग च्र्युंगनी मस्तपैकी डुप्लेक्स घरटे बनविले होते ना? अरे खरच की! बाकी सगळे त्याला डुप्लेक्स घरट्यासाठी हे रेडीमेड मटेरियल कोठून आणले विचारीत होते. पण सांगितले नव्ह्ते पठ्ठ्याने! पण काहीही म्हण! पुर्वीसारखी मजा नाही राहिली चिडीयागिरी करण्यामधे. होना, आय व्हिटॆमिन कोठेच नाही! खाली सगळीकडे सिमेंटचा करडा रंग पसरलेला. जावे तरी कोठे? आणि हे शहाणे आपल्याला म्हणतात “फ़्री बर्ड्स” कोण रे कोण? कोण? अरे काल पुंगोलच्या खिडकीवर टेकलो होतो, तर तिथे एक माणूस आपल्या विषयी बोलत होता,. आपल्या विषयी? कां? काय? अरे आपला फ़ोटो अमेरिकेहून त्याच्याकडे आला होता. काय म्हणतोस! थेट अमेरिकेहून! मग! तर तो माणूस त्याच्या बायकोला सांगत होता.. च्र्यांग च्रींग! वाऒव! आपण खूप फ़ेमस झालेले दिसतोय! ए च्र्यांग च्रींग! गपरे! काय रे सांगत होता त्याच्या बायकोला? ऐक ना, तो म्हणे फ़्री बर्ड्स असे नाव फ़ोटोला द्यायलाच नको! हे मात्र पटले! आपण फ़्री राहिलोय कोठे? उडायला फ़्री आहे असे वाटते. पण इथे पंखाखाली फ़ोड, तिथे धूर, तिथे विमाने, तिथे पतंगी, मोकळे आकाश राहिलेय कोठे? आणि खाली देखील झाडे वगैरेची बोंबच आहे. अरे हो ना! खाली कोठेना कोठे झाडे कापून माणसांना रहायला घरटी तयार करीत असतात. आणि मग माणसे हिरवळ नाही म्हणून ओरडली की प्लास्टीकची खोटी झाडे लावतात. खरच की! मी पाहिली आहेत सिंगापूरमधे खोटी झाडे! आणि च्र्युंग तुला माहित आहे? त्या गार्डन बाय बे मधे मात्र खरी झाडे आहेत ती आपण येऊ नाही म्हणून डोम्स मधे बंद केली आहेत. होना! मला असा राग येतोय. मी तर नेहमी तिथून जातांना डोमवर शीट टाकतो! खरयं रे त्या पुंगोलच्या माणसाच म्हणणं! फ़्री बर्ड्स असे नाव आपल्याला मुळी शोभतच नाही. कोणास ठावूक, कदाचित पक्षी संग्रहालयात पेंढा भरून ठेवून आपल्यासमोर – “१२१०२०१३- सिंगापूर” अशी पाटीच लावली जाईल! ******************************************************
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2716
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

काही कळलं नाही .. मला वाट्ले , तिकडे पक्षी आणि प्राणि याचे नाव असणार्या आय डी वरुन गोंधळ चालू आहे त्यासंदर्भात काय तरी आहे. अरे कुणातरी रसग्रह्ण करुन इस्कटून सांगाल का ?

आपल्याकडेही बर्‍याच ठिकाणी आताच चिमण्या दिसत नाहीशा झाल्यात.
हांह हाह्ह हाह्ह! मास्क ऐवजी त्याने कोणा बाईचाच कसलासा कपडा उचलून आणला!
हा भाग मात्र मजेशीर आहे! ड्युप्लेक्स घरर!!!