टाईम पास
आपल्याला आपल्या सभोवती असे बरेच लोक दिसतात ज्यांना "काय कस काय" असे विचारल्यास " काही नाही यार कसातरी टाईम पास सुरु आहे. वेळच जात नाही, बोअर होते. काय करावे कळत नाही, कुठे जावे, कसेबसे दिवस ढकलणे सुरु आहे." असे उत्तर मिळते.
याचा अर्थ त्यांच्या साठी वेळ कसा घालवावा हीच मोठी समस्या आहे. मग अशावेळी हे लोक पत्ते कुटत बसतात, मोबाईल वर गाणे ऐकत बसतात किंवा गेम्स खेळत बसतात. तासन तास टि.व्ही बघत बसतात किंवा चार लोक जमवुन कट्टयावर गप्पा छाटत बसतात. किंवा कुणाच्या घरी जावुन तिथे गप्पा मारतात. किंवा फालतु आणि निरर्थक गोष्टींमध्ये वेळ घालवतात. किंवा काहीच जमले नाही तर कुणा दुसर्याच्या बद्दल निंदा नालस्ती किंवा चहाड्या करणे यात वेळ घालवतात.
यांच्यासाठी उरलेले आयुष्य हे पहाडासारखे कठीण आहे त्यांचा असा समज असतो की त्यांनी करण्यासारखे सर्व करुन झाले आहे, सांसारीक जवाबदार्या पार पाडल्या आहेत आणि करण्यासारखे आता काही उरले नाही आणि करण्याची गरज ही नाही.
अशा लोकांना त्यांच्या सारखेच टाइम पास करणारे लोक सुदैवाने न शोधताच बरेच भेटतात. यामुळेच अशा लोकांचा शोध घेण्याचा जर प्रयत्न केला तर शहराच्या कुठल्याही भागात अशा व्यक्ती २० ते ३० टक्के सहज आढळुन येतात जे टाईम पास करण्यासाठी आतुर असलेले दिसतात आणि टाईम पास करण्याच्या सर्व कलेत माहिर असलेले दिसतात.
सर्वसाधारण पणे मनुष्याची सरासरी वयोमर्यादा १०० वर्षे धरल्या जात होती पण आधुनिक काळात कलियुगाच्या प्रभावामुळे मानवी उर्जा व सामर्थ्याचे इतके क्षलन झाले आहे की सत्तरी गाठणे हे देखील मुश्कील झाले आहे. मग इतक्या छोट्या आयुष्यात ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चतुश्रामाचे नियम पाळणे कसे शक्य आहे?
काही अपवाद वगळता सगळयांसाठी गृहस्थाश्रम हेच आयुष्याचे एकमेव ध्येय होवुन बसले आहे. बाकीच्या आश्रमाबद्दल ना त्यांना माहीती आहे ना ती करुन घ्यायची गरज उरली आहे. खरे तर विद्यार्थ्यांसाठी ब्रम्हचर्याश्रम चे नियम व त्यातील शिस्त पाळणे ही आवश्यक बाब आहे परंतु त्यांचा देखील अध्ययनावर कमी आणि गृहस्थाश्रमातील भोगविलसाच्या साधन संपत्तीकडे आकर्षीत होवुन आपले आयुष्य आणि वेळ वाया घालण्याकडे अधिक कल दिसु लागला आहे.
टाईम पास चे हे भूत सगळ्याच वयोगटाच्या मानगुटीवर बसले असल्याचे आपल्याला आढळुन येते. विद्यार्थ्यांमध्ये देखील या घातक प्रवृत्तीचा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसुन येतो ते ना घरात आनंदी असतात ना शाळा कालेजात. अशा परिस्थितीत मित्रांसोबत बाहेर भटकणे, विनाकारण गल्लीत, चौकात, बगिच्यात कुठेही जमुन कुटाळक्य करणे, मोबाईल वर कानात वायर घालुन गाणे ऐकणे व गेम्स खेळणे इत्यादी सवयींनी ते ग्रासले गेले आहेत.
बालपण व किशोरावस्थेत अशा वाईट सवयींनी ग्रस्त झालेली ही तरुणाई पुढील आयुष्यातील कुठलेच ध्येय साध्य करण्यात कुचकामी ठरते आणि मग आपल्या आई-वडिलांच्या व स्वत:च्या आयुष्यावर भार बनुन राहतात. लक्ष्यापासुन भरकटलेली अशी पिढी मग समाज व देशाला निराश करते.
ज्या ज्या ठिकाणी किंवा जेंव्हा जेंव्हा टाईम पास च्या गोष्टी करणारे किंवा टाईम पास करणारे असे लोक तुम्हाला दिसतील तेंव्हा निश्चीत पणे तुम्ही असे समजु शकता की हे सर्व समाज व देशासाठी निरुपयोगी आहेत आणि हे जर नसते तर देशाच्या व समाजाच्या कित्येक समस्याचे निरसन झाले असते कारण यांच्या नसण्याने जे लोक आमच्या समोर असते ते नक्कीच समाज व देशासाठी उपयुक्त ठरले असते.
टाईम पास मध्ये रमलेले हे लोक ज्यांच्यासमोर वेळ न जाणे ही कायम मोठी समस्या असते आणि ज्यांना टाईम पास करण्यासाठी निरर्थक गोष्टींची गरज असते ते खरे तर निर्जीव मनुष्यापेक्षाही अधिक हानीकारक आहेत कारण निर्जीव व्यक्ती निदान हानीकारक कृती करित नाही.
या धरातलावर जन्माला आल्यानंतर, सेवा, परोपकार, जनकल्याण व कर्मयोग अशा असंख्य करण्यासारख्या संभावित गोष्टी असतांना जर कुणी टाईम पास ची चर्चा करत असेल तर असे निश्चीत समजावे की अशा लोकांनी हे अंतिम सत्य स्विकारले आहे की या धरातलावर त्यांची आवश्यकता नाही आणि जितके दिवस शरीरात प्राण आहेत तोपर्यंत कसेबसे जगुन या जगाचा निरोप घ्यायचा आहे. अशा लोकांमुळेच समाज व राष्ट्र कमकुवत होत आहे.
यावर मग उपाय काय? समाजात अनेक समाजोपयोगी संस्था असतात किंबहुन आहेतच. राष्ट्रीय सेवा भारतिच्या कामासंबधी दिल्लीत असतांना मला असे दिसुन आले की निव्वळ महाराष्ट्रात अशा हजारोंनी संस्था आहेत ज्या कित्येक वर्षापासुन अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यात निमग्न आहेत. त्यांच्या समस्या या आहेत की त्यांना मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने त्यांच्या कामाला हवा तो वेग येत नाही. अशा संस्थांची माहिती ही इंटरनेट वर NGO या सदराखाली उपलब्ध असते.
ही निष्क्रीय होत चाललेली तरुणाई व निवृत्त झालेली पण अजुनही कार्यक्षम असलेली पिढी या संस्थांना आपला थोडा वेळ देवुन या संस्थांसाठी संजीवनी ठरु शकते. गरज आहे ती यांच्या मध्ये इच्छा शक्ती निर्माण करण्याची. या लेखाद्वारे १० टक्के असे लोक जरी या दृष्टीने उद्युक्त होवुन या दिशेने मार्गस्थ झाले तरी देखील हा लेख लिहीण्यामागील उद्देश सफल झाल्याचे सार्थक होईल.
वाचने
3009
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही निष्क्रीय होत चाललेली
विचार चांगले आहेत....पण...
In reply to ही निष्क्रीय होत चाललेली by प्रकाश घाटपांडे
इच्छा शक्ती
In reply to ही निष्क्रीय होत चाललेली by प्रकाश घाटपांडे
Lost time is never found again. :--- Benjamin Franklin
Time you enjoy wasting, was not wasted!