जयकिशन यांचा पुण्यस्मरण दिवस !
आज हिंदी चित्रपट संगीताच्या दुनियेचे बेताज बादशाह शंकर जयकिशन या जोडगोळी पैकी जयकिशन यांचा पुण्यस्मरण दिवस ! आजच्याच तारखेला (१२ सप्टेंबर १९७१) वयाच्या केवळ ३९ व्या वर्षी "जिना यहां मरणा यहां, इसके सिवा जाना कहां" म्हणणारा हा अवलिया यकृताच्या आजाराने हे जग सोडून निघून गेला. त्यांची आठवण येत असताना त्यांनी शैलेन्द्र, हसरत जयपुरी, वर्मा मलिक, नीरज, इंदीवर इत्यादी गीतकारांबरोबर संगीतबद्ध केलेल्या कर्णमधुर आणि आशयपूर्ण गाण्यांचा उल्लेख इथे मुद्दाम करावा वाटतो. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे या क्षेत्रातील आगमनानंतरचे करिअर घडवण्याचे कार्य त्यांना उत्तोमोत्तम गाणी गायला देऊन त्यांनी पूर्ण केले.
जयकिशन यांचे पूर्ण नाव जयकिशन दयाभाई पांचाल होते आणि यांचा जन्म गुजरात मध्ये झाला होता. यांचे हार्मोनियम वरती उत्तम प्रभुत्व होते. त्यांच्या या छंदाला नवीन आकार देण्याच्या वेडापोटी ते मुंबई सारख्या मायानगरी मध्ये आले. जिथे त्यांची भेट पृथ्वी थिएटर मध्ये तबला वाजवणाऱ्या शंकर यांच्याबरोबर झाली. हे दोघेही त्याकाळचे प्रसिद्ध संगीतकार हुस्नलाल- भगतराम यांच्या हाताखाली सहायक म्हणून काम करू लागले. पृथ्वी थिएटर ची निर्मिती "बरसात" या चित्रपटासाठी राज कपूर हे संगीतकार म्हणून नवीन जोडीच्या शोधात होते त्यांनी शंकर आणि जयकिशन यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. आणि १९४८ साली प्रदर्शित झालेल्या "बरसात" ची गाणी सुपरहिट झाली आणि इथून पुढे शैलेंद्र, हसरत जयपुरी, लता मंगेशकर, मुकेश आणि शंकर - जयकिशन यांनी भारतीय संगीत क्षेत्रात एक इतिहास घडवला.
प्रसिद्धीचे शिखर पादाक्रांत करत असतानाच त्यांनी आपल्यासाठी गोपनीयता म्हणून कुटच्याही गीताची चाल वैयक्तिक कुणी बांधली ते कुणालाही सांगायचे नाही असा एक अलिखित नियम पाळला होता. मात्र संगम चित्रपटातील एक गीत "ये मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज न होना कि तुम मेरी जिंदगी हो… !" हे बिनाका गीतमाला या नभोवाणीवरील एका कार्यक्रमामध्ये खूप दिवस प्रथम क्रमांकावर वाजू लागले आणि जयकिशन यांनी हे गीत मी रचले असे सांगून तो नियम मोडला. मग दोघांमध्ये काही काळ दुरावा निर्माण झाला. नंतर मो. रफी आणि राज कपूर यांनी त्यांच्यातील मतभेद मिटवून त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण केला. शंकर - जयकिशन या जोडीने जवळजवळ १७० हून जास्त चित्रपटांना संगीतसाज चढवला. ज्यामध्ये विशेष संगीतामुळे गाजलेले बादल, सीमा, बसंत बहार, चोरी - चोरी, कठपुतली, यहुदी, अनाडी, छोटी बहन, दिल अपना और प्रीत पराई, जिस देश मे गंगा बहती है, जंगली, प्रोफेसर, दिल अपना और प्रीत पराई, हमराही, राजकुमार, आम्रपाली, सुरज, तिसरी कसम, मेरा नाम जोकर, असली नकली इत्यादी चित्रपटाचा समावेश होतो.
त्यांना चोरी - चोरी , अनाडी, दिल अपना और प्रीत पराई, प्रोफेसर, सुरज, ब्रम्हचारी, मेरा नाम जोकर, पहचान, आणि बेईमान या चित्रपटासाठी एकूण नऊ वेळा सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून फिल्मफ़ेअर पुरस्कार मिळाला आहे.
त्यांनी संगीतबद्ध केलेली काही लोकप्रिय गीते आजही लोकांच्या ओठावरती रेंगाळून राहिली आहेत त्यापैकी उदाहरणा दाखल काही इथे देत आहे.
बहारो फुल बरसाओ मेरा मेहबूब आया है (सूरज)
आजा सनम मधुर चांदनी ( चोरी चोरी)
जाऊ कहा बताए दिल ( छोटी बहन)
तेरी प्यारी प्यारी सुरत को किसी कि नजर न लगे ( ससुराल)
दिलके झरोखे मे तुझको बिठाकर (ब्रह्मचारी)
जिंदगी एक सफर है सुहाना ( अंदाज)
जाने कहा गये वो दिन (मेरा नाम जोकर)
तेरा जाना दिल के अरमानोंका लुट जाना (अनाडी)
किसी कि मुस्कुराहटो पे हो निसार (अनाडी)
हम तेरे प्यार मे सारा आलम (दिल एक मंदिर)
जिना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहां (मेरा नाम जोकर)
या जोडगोळीने संगीत देऊन हिंदी चित्रपट संगीताच्या दुनियेत एक रेकॉर्ड बनवला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
- साजीद पठाण
प्रतिक्रिया
भावपूर्ण श्रद्धांजलि
छान ओळख.
माझे पहिले प्रेम ...
काउंटर मेलडी म्हणजे काय?
एक थर