Skip to main content

भारतीय सणांचे अनर्थशास्त्र

Published on शुक्रवार, 30/08/2013
                    भारतीय सणांचे अनर्थशास्त्र

                 त्या दिवशी भल्या पहाटेच चक्रधर माझ्याकडे आला होता. त्याला माझ्याकडून प्रवाशीबॅग हवी होती पंढरपूरला जायला. असा अचानक चक्रधर पंढरपूरला जायची तयारी करतोय हे ऐकून मी उडालोच. आदल्या दिवशीच माझे त्याच्याशी बोलणे झाले होते. एका खासगी कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला चलतोस का म्हणून विचारले तर म्हणत होता की, त्याला निदान एक पंधरवडा तरी अजिबात फुरसत नाहीच. शेतीची आंतरमशागत करायचीय, फवारणी करायचीय, निंदन-खूरपण करायचेय. अर्थात तो खोटेही बोलत नव्हता. त्याचे शेत माझ्या शेतापासून थोड्याशाच अंतरावर असल्याने मला त्याच्या शेतीची आणि शेतीतील पिकांची इत्थंभूत माहिती होती.

                 चक्रधर शेती करायला लागल्यापासून पहिल्यांदाच त्याच्या शेतीत इतकी चांगली पिकपरिस्थिती होती. यंदा त्याने छातीला माती लावून सार्‍या गावाच्या आधीच कपाशीची धूळपेरणी उरकून टाकली होती. पावसानेही आपला नेहमीचा बेभरंवशाचा खाक्या सोडून चक्रधरला साथ दिली आणि त्याची कपाशीची लागवड एकदम जमून गेली. नशीब नेहमी धाडसी लोकांनाच दाद देत असते याची प्रचिती यावी असाच हा प्रसंग होता. त्यामुळे हुरूप आलेला चक्रधर दमछाक होईपर्यंत शेतीत राबायला लागला होता. त्याला विश्वास होता की, यंदा आपली "इडापिडा टळणार आणि सावकाराच्या पाशातून मुक्ती मिळणार". भरघोस उत्पन्न आले आणि कर्मधर्म संयोगाने जर भावही चांगले मिळालेत तर ते अशक्यही नव्हते. त्यामुळे कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला येत नाही म्हटल्यावर मलाही फारसे नवल वाटले नाही. 

                 पण चक्रधर आता असा अकस्मात पंढरपूरला जायची तयारी करतोय हे मला अनपेक्षित होते. नेमके काय गौडबंगाल आहे हे जाणून घ्यायची माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी प्रथम त्याच्या हातात प्रवाशी बॅग दिली, प्रवासाला शुभेच्छा दिल्या, येताना माझ्यासाठी पांडुरंगांचा प्रसाद घेऊन यावा, अशी विनंती केली आणि मग हळूच विचारले होते,

"काय चक्रधर, असा अचानक कसा काय बेत आखला बुवा पंढरपूरचा?"
"आरं, मी कसला काय बेत आखतो पंढरीचा? तो पांडुरंगच मला बोलवायला आलाय ना स्वतःहून" इति चक्रधर.
"स्वतःहून थेट पांडुरंगच आला तुला निमंत्रण द्यायला?" आश्चर्याने डोळे विस्फारून मी विचारले. 
"हं मग? इच्छा त्या पांडुरंगाची. दुसरं काय?" चक्रधर निर्विकारपणे सांगत होता.
"अरे, पण मी तर ऐकलंय की पांडुरंग निर्गुण-निराकार असतो. शिवाय तो बोलत पण नसतो" या विषयातील आपले तुटपुंजे ज्ञान उगाळत मी बोललो.
"तसं नाही रे, पंढरीचा विठोबा स्वप्नात आलाय तो त्या रावसाहेबांच्या" माझ्या प्रश्नाचा उबग आल्यागत चक्रधर बोलत होता. पण आता मला संवाद थांबवणे शक्य नव्हते. माझी उत्कंठा शिगेला पोचली होती.
"रावसाहेबांच्या स्वप्नात? रावसाहेब आणि तुला, दोघांनाही बोलावलं होय?" मी प्रश्न फेकलाच.
"आरं बाबा, तसं नाही रे. आत्ता पहाटेपहाटे विठोबा-रुक्मिणी दोघंबी रावसाहेबांच्या स्वप्नात आलेत आणि रावसाहेबांना आदेशच दिला की चक्रधरला तातडीने पंढरीला पाठवून दे. बिचारे रावसाहेब धावतपळत माझ्याकडे आलेत आणि म्हणालेत की, तू आताच्या आत्ता सकाळच्या गाडीने तातडीने पंढरपूरसाठी नीघ. मी पैशाची अडचण सांगायच्या आधीच रावसाहेबांनी माझ्या हातावर जाण्यायेण्याला पुरून उरतील एवढे पैसे पण ठेवलेत. लई मायाळू माणूस आहे बघा आपले रावसाहेब." माझ्या प्रश्नाच्या सरबत्तीला वैतागलेल्या चक्रधरने एका दमात सगळे सांगून टाकले आणि झपाझप पावले टाकत निघून गेला.

                 पंढरीची वारी करून चक्रधर जेव्हा परतला तेव्हा सारेच काही बदललेले होते. फवारणी अभावी कपाशीची वाढ खुंटून झाड खुरटले होते. मशागत व खुरपणी अभावी तणांची बेसुमार वाढ झाली होती. आल्याआल्या मशागत सुरू करावी तर पाऊस सुरू झाला होता. पाऊस नुसताच सुरू झाला नव्हता तर ठाण मांडून बसला होता. आकाशातील ढग पांगायचे नावच घेईना. म्हणजे झाले असे की, जेव्हा उघाड होती आणि मशागत करण्यायोग्य स्थिती होती तेव्हा चक्रधर पंढरपुरात होता आणि आता चक्रधर शेतात होता तर पावसामुळे मशागतीचे काम करणे अशक्य झाले होते. शेवटी तणाची वाढ एवढी झाली की शेतात जिकडेतिकडे गवतच गवत दिसत होते. कपाशी गवताखाली पूर्णपणे दबून गेली होती. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. एकावर्षात सावकाराच्या म्हणजे रावसाहेबाच्या कर्जाच्या पाशातून मुक्त व्हायची गोष्ट दूर, उलट कर्जबाजारीपणाचा डोंगरच वाढत जाणार होता. 

                 रावसाहेब सावकार मात्र आनंदी होते. त्यांनी स्वप्न पडल्याची मारलेली थाप त्यांना मस्तपैकी कामी आली होती. ऋणको जर स्वयंपूर्ण झाला तर धनकोची दुकानदारी कशी चालेल? त्यासाठी ऋणको नेहमीच कर्जात बुडूनच राहावा, हीच धनकोची इच्छा असते. त्यासाठीच नाना तर्‍हेच्या कॢप्त्या लढविण्याचे कार्य धनकोद्वारा अव्याहतपणे चाललेले असते. 

                 मी जेव्हा ही गोष्ट अनेकांना सांगतो तेव्हा त्यांना सावकाराचाच राग येतो. कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याचीही भाषा केली जाते मात्र शेतीच्या ऐन हंगामातच पंढरपूरची यात्रा का भरते? याचे उत्तर कोणीच देत नाही. पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तवर्गामध्ये शेतकरी समाजच जास्त आहे. ज्या वेळी शेतकर्‍यांनी आपल्या शेतीतच पूर्णवेळ लक्ष द्यायची गरज असते, नेमकी तेव्हाच आषाढी किंवा कार्तिकीची महिमा का सुरू होते? याचा धार्मिक किंवा पुराणशास्त्रीय विचार करण्यापेक्षा तार्किक पातळीवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

                 संपूर्ण भारतवर्षात शेतीचा हंगाम सर्वसाधारणपणे जून महिन्यामध्ये सुरू होतो आणि डिसेंबर मध्ये मुख्य हंगाम म्हणजे खरीप हंगाम संपतो. विचित्र गोष्ट अशी की, भारतातील सर्व मुख्य सण याच काळात येतात. जून मध्ये हंगाम सुरू झाला की शेतीच्या मुख्य खर्चाला सुरुवात होते. आधीच कर्ज काढून शेती करणार्‍याला हे सण आणखीच कर्जात ढकलायला लागतात. या सणांच्या खर्चातून शेतकर्‍याला बाहेर पडताच येणार नाही, अशी पुरेपूर व्यवस्था झालेली आहे, हेही ठळकपणे जाणवते. या काळात येणार्‍या सर्व सणांचे त्या-त्या सणानुरूप करावयाच्या पक्वान्नाचे मेनू ठरलेले आहेत. नागपंचमीला करंजी, लाडू, चकल्या कराव्या लागतात. रक्षाबंधनाला राखी बांधायला भावाने बहिणीकडे किंवा बहिणीने भावाकडे जायचेच असते. मग एकाचा खर्च प्रवासात होतो तर दुसर्‍याचा पाहुणचार करण्यात. पोळा आला की बैलाला सजवावेच लागते. घरात गोडधड रांधावेच लागते. त्यातही एखाद्या चाणाक्ष काटकसरी शेतकर्‍याने पोळ्यानिमित्त घरात पंचपक्वान्न करून खाण्यापेक्षा तेवढ्याच पैशात शेतामध्ये दोन रासायनिक खताची पोती घालायचे ठरवले तरी ते शक्य होत नाही कारण या दिवशी शेतकर्‍याने आपल्या घरी गडीमाणूस जेवायला सांगणे, हा रितिरिवाज लावून दिल्या गेला आहे. परका माणूस घरात जेवायला येणार असल्याने पंचपक्वान्न करणे टाळताच येत नाही. अशा तर्‍हेने शेतकर्‍याला खर्चापासून परावृत्त होण्याचा मार्गच बंद करून टाकल्या गेला आहे. शिवाय पोळा हा तीन दिवसाचा असतो. वाढबैल, बैल आणि नंदीपोळा. हे तीन दिवस बैलाच्या खांद्यावर जू देता येत नाही. मग होते असे की जेव्हा उघाड असते आणि शेतात औतकाम करणे शक्य असते, त्यावेळेस पोळा असल्यामुळे काम करता येत नाही. पोळा संपला आणि जरका लगेच पाऊस सुरू झाला तर मग पावसामुळे काम करता येत नाही. कधी कधी या तर्‍हेने आठवडा किंवा चक्क पंधरवडा वाया जातो. मग त्याचे गंभीर परिणाम पिकांना भोगावे लागतात.

                 हरितालिका, ऋषिपंचमी, मंगळागौर, कान्होबा, महालक्ष्मी-गौरीपुजन, श्रावणमास याच काळात येतात. आखाडी व अखरपख(सर्व पितृदर्श अमावस्या) या सणांचा मारही खरीप हंगामालाच सोसावा लागतो. गणपती बाप्पा आले की ठाण मांडून बसतात. शारदादेवी, दुर्गादेवी यांचे नवरात्र पाळायचे नाही म्हटले तर त्यांचा प्रकोप होण्याची भिती मनात घर करून बसली असते शिवाय यांना यायला आणि जायला गाजावाजा व मिरवणूक लागते. बाप्पांना दहा-पंधरा दिवस मोदक पुरवावेच लागतात. बदाम, नारळ खारका द्याव्याच लागतात. दुर्गादेवीची ओटी भरावीच लागते. ते संपत नाही तोच दसरा येतो, दसर्‍याची नवलाई संपायच्या आधीच भुलोजी राणाच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या भुलाबाई येतात. भोंडला, हादग्याला जुळूनच कोजागरी येते. 

                 शेतीचा हंगाम अगदी भरात असतो. ज्वारी हुरड्यावर, कपाशी बोंडावर आणि तुरी फ़ुलोर्‍यावर येण्याला सुरुवात झालेली असते. अजून पीक पक्व व्हायला, बाजारात जायला आणि शेतकर्‍याच्या घरात पैसा यायला अजून बराच अवकाश असतो आणि तरीही आतापर्यंत डबघाईस आलेल्या शेतकर्‍याचे कंबरडे मोडण्यासाठी मग आगमन होते एका नव्या प्रकाशपर्वाचे. दिव्यांची आरास आणि फटक्याच्या आतषबाजीचे. एकीकडे कर्ज काढून सण साजरे करू नये म्हणून शेतकर्‍याला वारंवार आवाहन करणार्‍या शहाण्यांचे पीक येते मात्र दुसरीकडे हे सर्व सण शेतकर्‍यांच्या दारासमोर दत्त म्हणून उभे ठाकत असते. दिवाळी जसा प्रकाश आणि आतषबाजीचा सण आहे तसाच पंचपक्वान्न व वेगवेगळे चवदार पदार्थ करून खाण्याचा सण आहे. शेतकर्‍याने जरी सण साजरा करायचे नाही असे ठरवले तर शेजार्‍याच्या घरातून खमंग वासाचे तरंग उठत असताना शेतकर्‍याच्या मुलांनी काय जिभल्या चाटत बसायचे? दिवाळीला नवे कापड परिधान करायचे असते. नवीन कापड खरेदीसाठी पुन्हा कर्ज काढायचे किंवा कापड दुकानातून उधारीवर खरेदी करायची. लक्ष्मीपूजनासाठी स्पेशल दिवस नेमला गेला आहे. शेतीत पिकविलेला कोणताच शेतमाल जर विक्रीस गेला नसेल तर शेतकर्‍याच्या घरात लक्ष्मी तरी कुठून येणार? मग लक्ष्मीपूजन तरी कोणत्या लक्ष्मीचे करायचे? शेतकरी ज्या लक्ष्मीचे पूजन करतो, ती लक्ष्मी उसणवारीची असून तिचे मालकीहक्क सावकार किंवा बॅंकेकडे असतात. त्याच्या घरावर झगमगणार्‍या आकाशदिव्यांचे कॉपीराईटस जनरल स्टोअरवाल्याच्या स्वाधीन आणि घरात तेवणार्‍या दिवावातीतील तेलाचे सर्वाधिकार किराणा दुकानदाराच्या ताब्यात असतात. शेतीचे खर्च आणि या सर्व सणांचे खर्च भागवण्यासाठी शेतातील उभे पीक शेतकर्‍याच्या घरात पोचायच्या आधीच गहाण झालेले असते. या सर्व सणांनी शेतकर्‍याला पुरेपूर कर्जबाजारी करून त्याच्या कमरेला धडूतही शिल्लक ठेवायचे नाही, असा निर्धारच केलेला दिसतो.

                 आणि सर्वात महत्त्वाची आणि उपराटी बाब अशी की डिसेंबरमध्ये माल बाजारात जायला लागला आणि शेतकर्‍याच्या घरात पैसा यायला लागला की अचानक सणांची मालिका खंडीत होते. गाढवाच्या सिंगाप्रमाणे सण नावाचा प्रकारच गायब होतो. डिसेंबर नंतर जे सण येतात ते निव्वळच बिनखर्चिक असतात. "तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला" असे म्हणत तिळगुळाच्या भुरक्यावरच तिळसंक्रांत पार पडते. बारा आण्याच्या रंगामध्ये होळीची बोळवण केली जाते. तांदळाची खीर केली की अक्षय तृतीया आटोपून जाते. खरीप हंगामात येणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी घराघरात साजरी केली जाते. मात्र उन्हाळ्यात येणारी रामनवमी व हनुमान जयंती केवळ मंदिरातच साजरी केली जाते आणि शेतकर्‍यांना पदरचा खडकूही न खर्च करता फुकटातच प्रसाद खायला मिळतो. म्हणजे असे की शेतकर्‍याच्या घरात जेव्हा त्याच्या कमाईचा पैसा येतो, तेव्हा त्याने त्या पैशाने सण वगैरे साजरे करण्याची अजिबात सोय नाही. स्वतः मिळविलेल्या मिळकतीतून नवीन कपडे खरेदी करायचे नाहीत. स्वत:च्या मिळकतीच्या पैशाने गोडधड-पंचपक्वान्ने करून मुलाबाळांना खाऊ घालायची नाहीत. बहिणीने भावाच्या घरी किंवा बापाने पोरीच्या घरी जायचे नाही. केवळ आणि केवळ माल विकून पैसा आला की त्याने किराणा, कापड दुकानाची उधारी फेडायची. बॅंका किंवा सावकाराची कर्जफेड किंवा व्याज फेड करायची आणि पुढील हंगामातील शेतीसाठी नव्याने कर्ज घ्यायला तयार व्हायचे. अजबच तर्‍हा आहे या कृषिप्रधान म्हणवणार्‍या देशातील सणांच्या संस्कृतीची.

                 सणांच्या निर्मितीमागचे ऐतिहासिक महत्त्व विशद करणारे पुराणशास्त्री काहीही म्हणोत, परंतु शेतीमधल्या मिळकतीचा संचय शेतकर्‍याच्या घरात होताच कामा नये, शेतकरी कायमच कर्जबाजारी राहावा हा उद्देश स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेवूनच सणांची निर्मिती आणि रीतिरिवाज अगदी प्राचीन काळापासून नियोजनबद्धरितीने आखल्या गेले आहे, हे उघड आहे. ज्या हंगामात शेतीमध्ये शेतकर्‍याने स्वतःला झोकून देऊन कामे करायची असतात त्याच काळात इतक्या सणांचा बडेजाव शेतीव्यवसायाला उपयोगाचा नाही. उत्पादनासंबंधी आवश्यक तो खर्च करावयाच्या काळात सणासारख्या अनुत्पादक बाबीवर अनाठायी खर्च करणे, शेतीव्यवसायाला कधीच फायदेशीर ठरू शकणार नाही. सणांचे अनर्थशास्त्र शेतीच्या अर्थशास्त्राला अत्यंत मारक ठरले आहे, ही खूणगाठ मनाशी बांधूनच पुढील वाटचाल होणे अत्यंत गरजेचे आहे.

                                                                                                                             - गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(पूर्वप्रकाशित - देशोन्नती दिवाळी अंक-२०१२)
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 16524
प्रतिक्रिया 69

प्रतिक्रिया

आवडलं. परवाच कुठल्यातरी प्रतिसादात शेतीच्या कामात वारीचा कोणताही अडथळा येत नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता.

In reply to by दादा कोंडके

हो! मीच सांगीतल होतं. अन अजुनही सांगेन. कारण शेतकर्‍याची आहे, पश्चीम महाराष्ट्रातली आहे. दसरा ...एक दिवस...पोळ्या केल्या, संध्याकाळी सोन लुटलं, घरच्या देवाला, थडग्याला(पूर्वज) नमस्कार केला, संपला. असा काही फार वेळ खर्ची पडत नाही. दिवाळी जरा लांबते, पण बहुतेक फराळ दोन दिवसात करुन होतो. शेतकरी पद्धत...एका रात्रीला आठदहा कुतुंब एकत्र जमतात. दोन चुलाण्या लावल्या जातात, एकजण बुंद्या पाडायला बसतो. एकिकडे चिवड्याची तयारी. प्रत्येक जण आपापल सामान आणतो. एकाच्या पिठानंतर दुसर्‍याच्या पिठाच्या बुंद्या पाडल्या जातात, वेगवेगळ्या ठेवल्या जातात, वेगवेगळे लादु बनतात, बाकिचे सगळे करंज्या, चकल्या, जवळ जवळ एका रात्रीत दहा घरचा फराळ तयार होतो. मे बी मुटेंचा भाग वेगळा आहे. आम्ही सहकारी तत्वावर आहोत. आम्हाला सोसायटीकडुन कर्ज मिळते. वर्षाच्या शेवटी सोसायटी भरायची. कामकरी वेगळे. त्यांना काहीच भ्रांत नसते, बर्‍याच गोष्टी एकमेकाला अदलाबदली मदत करुन पार पडतात. अन समोर जमिन बोलवत असणारा पंढरपुराला पळणारा शेतकरी मी तरी पाह्यला नाही. जो आळशी असेल तो नक्कीच मरेल. आळसाने मरेल. आणि एका कुटुंबातला एक माणूस देवाला गेला तर बाकिचे काय करत होते? बायको काय करत होती? ती नाही सुरु करत शकत ही कामे? शेतीच्या कामात बाई-माणसाचा फरक हा फक्त बैल जुंपण्यावर अन अवजड उचलण्यापुरताच असतो. खुरपण, निंदणी, फवारणी आमच्या भागात स्त्रीयासुद्धा करतात, उसाच्या शेतात फुल प्यांटा अन शर्ट अथवा शर्टच्या बाह्या बांधुन काम करतात म्हणुन बर्‍याच वहिण्यांना चिडवायचे मी. शहाणपणाने राबणार्‍याचा कधीच तोटा पाह्यला नाही मी. कदाचित शाहू महाराजांची पुण्याई!

In reply to by स्पंदना

पश्चीम महाराष्ट्रातली आहे.
ओहो. इथे ही प्रांतवार फरक आहे का. म्हणजे प्रत्येक भागातल्या शेतकर्‍यांचे प्रश्न (असले तर) वेगळे आहेत.

सारं नाही पण बहुतेक लिखाण पटतंय. सणांची निर्मिती आणि उद्देश दोन माणसांचे, परिवारांचे आणि पर्यायाने समाजाचे एकमेकांशी असलेले संबंध सुधारावेत, त्यातून एकमेकांना पूरक फायदा व्हावा हा होता आणि तो असला पाहिजे तरच तो खरा सण नाही तर सण आणि जत्रा ह्यात फरक काय राहिला. ही सारी दुर्दशा आततायी देखाव्यामुळे आलेली आहे. आपण प्रत्येक सण त्यातील देखाव्यापायी आणि पैशापायी खराब आणि फक्त खराब केलेला आहे. कशाला प्रत्येक सण विकत घेतलेल्या नव्या कपड्यांनी, मिठायानी साजरा करायाला हवा. विशेष करून प्रत्येक सणामागे जे पैशाचे जे शेपूट जोडले जाते ते आधी प्रत्येकाने बंद करायला हवे.

In reply to by स्पंदना

आहो तुम्ही तिकडे AC मध्ये बसून नोकऱ्या करताय, मनाला वाटेल तेव्हा शनिवारी रविवारी मोठ्या mall मध्ये जावून खरेदी करून येवू शकता त्यामुळे तुम्हाला कदाचित सणावाराला घेतलेल्या कपड्याची नवलाई नाही वाटणार. पण जरा स्वताच्या गावाकडच्या लोकांची आठवण करा, त्यांना वर्षभरात केव्हा वेळ मिळतो त्याचे जरा गणित करून बघा. सणवार हे ह्याच्यासाठीच असतात कि सर्वांनां १ २ दिवस रोजच्या कामातून सुट्टी मिळावी, थोडाफार गोडधोड थोडीफार खरेदी करावी आनंद साजरा करवा. उद्या तुम्हाला उठून कोणी म्हणाले कि स्वताची खर्च करायची ऐपत नसताना कशाला क्रेडीट कार्डे वापरून खरेदी करता; तर चालेल का ? हा उगाचच भरमसाठ कर्ज कडून सणवार साजरे करणे मलासुद्धा पटत नाही; माणसाने अंथरून पाहून पाय पसरावेत पण बहुतेक शेतकरी/लोक आपली ऐपत बघूनच कर्ज कढतात आणि कष्ट करून ते फेडतात पण.

In reply to by खबो जाप

उद्या तुम्हाला ऊठून कोणी म्हणाले कि स्वताची खर्च करायची ऐपत नसताना कशाला क्रेडीट कार्डे वापरून खरेदी करता; तर चालेल का ?
अहो त्यांना चालले किंवा नाही चालले तरी बँकेला चालेल का? मी ही सुरुवातीला क्रेडीट कार्डावर भरमसाठ खर्च करून वेळेत खात्यात पैसे भरू शकलो नाही. शेवटी ८५०००/- (मुद्दल+व्याज+दंड आकारणी) भरून मान सोडवून घ्यावी लागली. कानाला खडा लावला.

In reply to by खबो जाप

एखाद्या सदस्याबद्दल काहीही माहित नसताना सरळ सरळ एवढे जेनेरीक स्टेटमेंट आणि शाब्दिक गोंधळ कशाला. मी सरळ आणि स्पष्टच सांगतो होय गावाकडच्या लोकांना कामा व्यतिरिक्त भरपूर वेळ असतो. त्याच्या निम्मा जरी नीट वापरला ना तरी कोणापुढे हात पसारावे लागणार नाहीत.

In reply to by खबो जाप

शेतकरी सणासाठी कर्ज काढतात म्हणुन कोणी सांगीतल तुम्हाला खंबो जाप? मी शेतकर्‍याची आहे ते नुसत नावाला नाही! मी शेतकर्‍याचीच मुलगी आहे. स्वतः उभा राहुन शेत बघितलय. तिकडे काय परिस्थीती आहे ती मी नुसती जाणत नाही ती परिस्थीती मला जाळते. मला सणावारांबद्दल, परंपरांबद्दल फारशी जरी नसली तरी थोडीफार आस्था आहे. उगा उठायच अन प्रत्येक परिस्थीतीच खापर भारतिय परंपरा अन देवादिकांवर कशाला फोडायच? आता सणांबद्दल. आपले सण हे आपल्या लोकांच्या आड येण्यासाठी बनवेल का कोणी? निदान माझ्या भागात सणांमुळे कोणाचे शेतीचे नुकसान झालेले मला दिसले नाही. नाही जमला सण करयला दाखवा गुळाचा खडा देवाला चला पुढे अस अ‍ॅटीट्युड असतो आमचा.

In reply to by स्पंदना

शेतकरी सणासाठी कर्ज काढतात म्हणुन कोणी सांगीतल तुम्हाला खंबो जाप?>> कर्जच काय वेळ पण देत नाहीत. भात कापणी आधी मग काय ते दिवाळीच बघु अस मावशीच्या गावात सर्रास पाहिलय. आमच्या मातोश्री त्यावेळी दिवाळीचा फराळ मावशीला, आत्याला, मामाला पाठवत असे. मग कापणी झाली की मळणी वै बाप्या लोकांवर सोडुन बाया दिवाळीचे खडूगळी, कानवलं करायला बसायच्या.

In reply to by झकासराव

सगळेच शेतकरी कर्ज काढतात असे म्हणायचे नाही मला पण जे नाईलाजाने काढतात त्याचे बोलत होतो मी; मला पण हेच म्हणायचे आहे
"उगा उठायच अन प्रत्येक परिस्थीतीच खापर भारतिय परंपरा अन देवादिकांवर कशाला फोडायच?"
मी स्वतः शिक्षण बरोबर शेतातच काम करत होतो आगदी म्हशी धुण्यापासून ते मळणी करण्यापर्यंत. माझ्या घरी सुद्धा तुमच्यासारखे पहिले शेतातले काम बघितले जते. फक्त मुद्दा एव्हढंच होता कि आपण सगळे सध्या चांगल्या सोयीसुविधा मुले हळूहळू सणांची नवलाई / मज्जा विसरत चाललो आहोत. माझे नाव खंबो जाप नाही बो जाप आहे (टक्यावर बोजाग्यावर लटी) ;-) स्वगत :- च्यामारी id बदलावा का ?

In reply to by खबो जाप

तुमच्या आयडीवरून तो कशाचा शॉर्टफॉर्म असेल असा आजिबात बोध होत नै. स्वाक्षरीत लाँग फॉर्म ठेवला तर लग्गेच कळेल. बाकी लाँग फॉर्मवरून तांबड्या-पांढर्‍याचे गाव कळ्ळे ;)

In reply to by बॅटमॅन

इतके दिवस सण-वार हे शेती आणि पर्यायानी शेतकर्‍याशी संलग्न आहेत असं मानत होतो (वारीचा अपवाद). पण हा नजरिया वेगळा आहे. आवडला. जे.पी.

In reply to by जे.पी.मॉर्गन

सहमत.

खूप नीट आणि कालक्रमाप्रमाणे लिहिल्याने अतिशय संगतवार लिहिलेला लेख आहे. आणि शेतकर्‍यांच्या दृष्टिकोनातून एक वेगळा विचारही आहे. पण अनेक गोष्टी पटल्या नाहीत. १. रावसाहेब सावकाराचा कावेबाजपणा हा एका धूर्त माणसाचा डाव आहे ज्याला चक्रधर फसला. त्यात सणाचे किंवा वारीचे कारण कितपत आहे हा चर्चेचा मुद्दा आहे. २. कापूस हे परंपरागत पीक नसावे असा अंदाज आहे. नगदी पीक म्हणून गेल्या काही दशकात वर आलेले आणि दुर्देवाने कर्जाच्या विळख्याने आणि आत्महत्यांमुळे कुप्रसिद्ध झालेले आहे. पूर्वी - अगदी दोन एकशे वर्षामागे इतक्या मोठ्या प्रमाणावर कापूस लावला जात होता का की ज्याचा शेतकर्‍याच्या आयुष्यावर परिणाम होईल आणि या सणवारांचा असा उलटा 'उपयोग' केला जाईल? ३. नागपंचमीला करंजी, लाडू, चकल्या -- बाप रे .. कल्पना नव्हती की गरीब शेतकर्‍यांकडे हा सण दिवाळीइतका मोठा असतो. पश्चिम महाराष्ट्रात कणकेचे गूळ किंवा पुरणाचे दिंड तेवढे पाटावरच्या नागोबाला पुजेला नैवेद्याला असतात. चुभुदेघे ४. राखी हे पूर्वी बहिणीला जरा माहेरवाशीण होण्याचे किंवा भावाला भेटण्याचे निमित्त होते. पंचक्रोशीतल्या नात्यागोत्यात खूप जास्त प्रवास खर्च होत नसावा. ५. बैलपोळा तीन दिवस हाही स्थानिक रिवाज असावा. ६. श्रावण व्रतवैकल्यांचा महिना. त्यात इतर खर्चिक सण कुठले असतात.. ७. दिवाळी ही सुगी साजरी करण्यासाठी असते असे पूर्वी वाचले होते. ८. संक्रांतीला सुगडात तेव्हाची पिके काही प्रमाणात ठेवून प्रतिकात्मक रित्या आलेल्या पीकाचा आनंद किंवा कृतज्ञता व्यक्त होते असे सांगतात. संक्रांतिलाही गुळाची पोळी, तिळगूळ.. काही प्रकार होतात. ज्यात खर्च होऊ शकतो! ९. होळी रे होळी पुरणाची पोळी.. इथेही साजरा करायला वाव आहे. १०. नंतर येतो गुढीपाडवा. वर्षाचा पहिला दिवस. गोडधोड करण्याची संधी.. ११. आकाशदिवे हे घरी बनवले जायचे.. खूप काही खर्चिक प्रकार २०-२५ वर्षांमागे नव्हता तर जेव्हा ही पद्धत पडली तेव्हाही नसावा. हे मुद्दे माझ्या अल्प माहितीप्रमाणे आहेत. शेतकर्‍यांच्या अडचणी / आयुष्य याचा अर्थात प्रत्यक्ष अनुभव नाही. त्यामुळे काही कमीजास्त असेल. पण एकूण मुद्दा इतकाच की सण हे बरेचदा त्या त्या ऋतूमानानुसार योजलेले आहेत. श्रावणात हवा खराब असताना वातूळ खाऊ नये याचे निर्बंध, दिवाळीत थंडी येते तेव्हा तेल लावून गरम पाण्याने शरीराची काळजी घेतली जाते, जानेवारीच्या कडाक्यात तीळ आणि गूळ शरीराला उष्णता देतात. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या धर्मकर्तव्याचा / परंपरांचा मुलामा लावून दिल्या आहेत ज्यायोगे त्या पाळल्या जाव्यात आणि त्यामागचे कारण न समजताही सामान्य लोकांना त्याचा फायदा व्हावा. पण त्यात परंपरांची भर पडत पडत न पेलवणारे रुढींचे ओझे तयार होते. आणि मूळ उद्देश बाजूला राहून अशा प्रकारची विमनस्कता आणि डिटॅचमेंट (मराठी?) येते. कालमानाप्रमाणे योग्य त्या चांगल्या गोष्टी चालु ठेवून समाजाचे दडपण - peer pressure न ठेवता सण साजरे केले तर त्यातला आनंद घेता येऊ शकतो. प्रत्येक समाजघटक हा बाकी समाज माझ्यावर अन्याय करण्यासाठीच टपलेला आहे अशा विचारात राहिला तर त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. त्यामुळे लेख चांगला असला तरी हे तात्पर्य मात्र अजिबात पटले नाही : "परंतु शेतीमधल्या मिळकतीचा संचय शेतकर्‍याच्या घरात होताच कामा नये, शेतकरी कायमच कर्जबाजारी राहावा हा उद्देश स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेवूनच सणांची निर्मिती आणि रीतिरिवाज अगदी प्राचीन काळापासून नियोजनबद्धरितीने आखल्या गेले आहे, हे उघड आहे. "

In reply to by मैत्र

पण एकूण मुद्दा इतकाच की सण हे बरेचदा त्या त्या ऋतूमानानुसार योजलेले आहेत
खास शेतकर्‍यांना टारगेट करण्यासाठी असं केलं असेल असं वाटत नाही. उलट शेतकरी हा पुर्वीपासुनच समाजाचा खुप मह्त्वाचा घटक आहे. सावकारी नंतर आली असणार. सावकारांनी हे सण असे आखले हे म्हणणं हास्यास्पद आहे. हो पण कुठल्या का कारणाने होईना, शेतकर्‍याच्या आर्थिक गणितांवर सणवाराच्या चक्रामुळे फरक पडत असेल हे मान्य..

हुशार शेतकरी कधीच कर्जबाजारी होत नसतो ... आमच्या एकडे पश्चिम महाराष्ट्रात उस शेतकरी एकरी किमान १ -२ लाख (किमान) कमावतात !! कर्‍हाड कोल्हापुरच्या शेतकर्‍यांच्या दारात स्कॉर्पियो ...पजेरो लागल्या आहेत ... पंजाब मध्येही शेतकरी श्रीमंतच आहेत . बंगाल तमिलनाडु इथेही नक्कीच असतील ... शेतकर्‍याच्या कर्जबाजारी होण्याला इतर अनेक कारणे आहेत ... त्यातले एक हे सण आणि त्यावर होणारा पैशाचा अन वेळेचा अपव्यय हेही एक कारण असु शकेल अगदीच नाही असे नाही . "पण केवळ हेच कारण आहे" असं सुचित करणं ...एका विशिष्ठ चॅनलायझिंग पोलरायझिंग चा प्रकार वाटतो . अवांतर : शेतकर्‍यांची कर्ज बाजारी होणाची कारणे असा एक सर्वसमावेशक लेख लिहावा अशी विनंती आहे . त्यातही विशेष करुन आधुनिक शेतीविषयीचे घोर अज्ञान ह्यावर लेख अपेक्षित आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

हे एक लिहायचे राहिले . शेती हा एक बिझीनेस आहे समाजसेवा नाही असे समजुन शेती केली , एक्स्पेन्सेस , टर्नओव्हर , रिव्हेनु ह्यांच्या व्यवस्थित ट्रॅक ठेवला आणि आलेल्या पृऑडक्टचे व्यवस्थित मार्केटिंग केले तर फायदा व्हायला पाहिजे !! इथे मला तरी फक्त २ पृऑब्लेम दिसतात १) शेतकरी ह्यातल्या बर्‍याच गोष्टी ऑटसोर्स करतो , मग हे आऊटसोर्सड लोकं ज्यांना दलाल म्हणतात ते ह्याचा फायदा उचलतात ...सो हे सारं शेतकर्‍यांनी इन हाऊस करणे अत्यंत आवश्यक आहे . २) शेतकरी कृषी उत्पन्न समीती नावाचा काहीतरी प्रकार आहे जो म्हणे शेतमालाच्या किमती ठरवतो . ( ह्याबद्दल ठोस माहीती नाही , करेक्ट मी इफ आय एम रॉन्ग ). हे असं जर काही असेल तर ते अन्याय्य आहे , शेतकर्‍यांनी घाम गाळुन पिकवलेल्या शेती उत्पन्नाचा दर ठरवण्याचा अधिकार शेतकर्‍यालाच असला पाहिजे . हे आणि असे इतर काही प्रॉब्लेम जर व्यवस्थित सोडवले तर आर्थिक अपयशाचे खापर सण संस्कृतीवर फोडायची वेळ येणार नाही .

In reply to by प्रसाद गोडबोले

शहरी लोकांच्या शेतीबद्दलच्या चुकीच्या कल्पना हाही एक मोठा प्रॉब्लेम आहे...

In reply to by प्रसाद गोडबोले

आमच्या एकडे पश्चिम महाराष्ट्रात उस शेतकरी एकरी किमान १ -२ लाख (किमान) कमावतात !! कर्‍हाड कोल्हापुरच्या शेतकर्‍यांच्या दारात स्कॉर्पियो ...पजेरो लागल्या आहेत ... पंजाब मध्येही शेतकरी श्रीमंतच आहेत .
मुद्दा अत्यंत योग्य.. अन्य कारणेच जास्त असतात.. पण उदाहरणं सर्वच बागायती.. :) लहान लहान शेतकर्‍यांनी एकेक एकरात रडतखडत आणि अडचणींचे डोंगर उपसत, तक्रार करत शेती करत राहण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर शुद्ध व्यावसायिक यांत्रिक शेती वाढण्याच्या दृष्टीने इंडस्ट्री डेव्हलप होण्याची काही जादू झाली तर उत्तम होईल.. शेतकर्‍यांचं काय? त्यांनी कुठे जायचं असा प्रश्न येईलच. पण तो आत्ताही आहेच. त्यावर उपाय काढला पाहिजेच. फक्त बुडीतखाती व्यवसाय आहे याची खात्री असतानाही तोच करत राहण्यात अर्थ नाही हेही खरं. सध्याही शेतकरी अन्न तयार करण्याचं पुण्य करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मानवजातीचं एरवी काय होईल अशा उच्च भावनेतून नक्कीच शेतीत रखडत राहात नाहीत. दुसरा पर्याय नाही आणि दुसरं स्किल नाही म्हणूनच करतात.

In reply to by अनिरुद्ध प

ज्या शेतकर्‍यांना शेती तोट्यात चालण्याशी संबंधित समस्या आहेत. ज्या शेतकर्‍यांना मालाचे भाव रास्त न मिळाल्याने ते आणखी गाळात जातात. ज्यांची मध्यस्थांकडून पिळवणूक होते.. ज्यांना योग्य बियाणे रास्त दरात मिळत नाही.. इत्यादि अनेक समस्यांनी जे कर्जबाजारी अथवा पूर्ण नरकासमान अवस्थेत शेती करत आहेत त्या विशिष्ट शेतकरीगटाला तो व्यवसाय सोडून अन्य काही करणं शक्य नाही (स्वाभाविकपणे शेतीतच असल्याने अन्य स्किल डेव्हलप न झाल्याने, अन्य फॉर्मल शिक्षण नसल्याने, भांडवल नसल्याने, वय झाल्याने, बदलाची तयारी नसल्याने अशा अनेक कारणांनी) म्हणून तो तोट्यात असूनही तेच करत राहतो. अन्य व्यावसायिक / नोकर इत्यादि ज्यांचा काहीतरी व्यवसाय अथवा नोकरी वर्षानुवर्षे तोट्यात / बिनपगारी जात आहे, उत्पन्न देत नाही, मिझरेबल स्थितीत जगायला लावते आहे, निराशाजनक आहे अशा स्थितीत ते तीच करत राहात नाहीत. जर दुसरे ऑप्शन्स असतील तर आतबट्ट्याचा धंदा बंद करतात आणि अन्य काही करतात. कारण ऑप्शन्स असतात. अन्ननिर्मिती हे उदात्त कार्य आहे. ते कोणीतरी केलंच पाहिजे. अन्यथा अखिल मानवजात खाणार काय? हे मुद्दे कितीही सत्य असले तरी ते मनात ठेवून शेतकरी शेती करत नाहीत. तस्मात मजबुरीने एकेकटेपणाने लहान लहान तुकड्यात, हालअपेष्टांत शेती करण्याऐवजी सरकारी आणि खाजगी पुढाकाराने एकत्र (बल्क) उत्पादन, निव्वळ व्यावसायिक बुद्धीने आणि केवळ यिल्ड बेस्ड असलेली, यांत्रिक्-एफिशियंट मार्गाने, तांत्रिक आणि अपडेटेड ज्ञानयुक्त नोकरदार अधिकार्‍यांनी मॅनेज केलेली शेती सुरु झाली तर शेती हा एक ठसठसणारा आणि भळभळणारा प्रॉब्लेम न राहता किफायतशीत उद्योग होईल अशी आशा. दोन पिढ्यांमागे माझंही कुटुंब १०० टक्के शेतीवर अवलंबून होतं. त्यामुळे मी कोणीतरी बाहेरचा उपदेश करतोय असं नव्हे. इति.

In reply to by गवि

मी काही शेतकरी नाही,त्यामुळे जास्त काही बोलणे हे योग्य नाही पण पश्चीम महाराष्ट्रात बहुतेक शेतकरी हे शेती सोबत काही जोडधन्दे सुद्धा करतात जसे कि दुग्ध व्यवसाय ई,अर्थात या साठी त्याना बरीच मेहनत घ्यावी लागते तसेच त्यामुळेच त्याना अधीक आर्थिक फायदा होतो,बाकी शेतकर्यानी जर उद्या धान्यच पिकवले नाही तर आमच्या सारख्याना (शहरी माणसाना) उपाशी रहायची पाळी येइल.

In reply to by अनिरुद्ध प

पश्चीम महाराष्ट्रात बहुतेक शेतकरी हे शेती सोबत काही जोडधन्दे सुद्धा करतात जसे कि दुग्ध व्यवसाय ई,अर्थात या साठी त्याना बरीच मेहनत घ्यावी लागते तसेच त्यामुळेच त्याना अधीक आर्थिक फायदा होतो.
हेच ते वर म्हटलेल्याचं उदाहरण - न चालणार्‍या धंद्याखेरीज काही (पूरक अथवा वेगळे) करणे.. पण सगळेच तसं करत नाहीत. त्यासाठी जमिनीचा प्रकार, पाण्याची अनुपलब्धता , मूळ व्यवसाय (शेती) याचा आकार अशा अनेक गोष्टींवर हे अवलंबून आहे. मूळ मुद्दा हा शेती किफायतशीर नाही असं ज्यांना दिसतं / जाणवतं त्यांनीही ती तशीच पुन्हापुन्हा करत राहण्याविषयी आहे.
बाकी शेतकर्यानी जर उद्या धान्यच पिकवले नाही तर आमच्या सारख्याना (शहरी माणसाना) उपाशी रहायची पाळी येइल.
चोक्कस.. पण ही भीती आपल्यासारख्या शहरी माणसांच्या बाजूने सत्य आहे. पण आपल्यासारख्या शहरींबाबत तशी भीती खरी ठरु नये (पक्षी: आपण शहरी लोक्स उपाशी मरु नये) अशा मानवतावादी हेतूने शेतकरी हलाखीतही हा व्यवसाय ओढत राहात नाहीत. ते मुळात व्यवसाय / प्राप्ती या इच्छेनेच शेती करतात आणि (सरकारच्या उदासीनतेमुळे, चुकीच्या सरकारी व्यवस्थेने इ इ इ) तोट्यात जाऊनही तोच करत राहतात यामागे दुसरे काही येत नाही म्हणून करत रहावं लागतं, हा मुद्दा होता.

In reply to by गवि

+१ गवि. माझ्या गावात शेती नसली तरी गो़कूळ कडुन म्हैशी घेउन त्याचा दुधाचा धंदा + शेती काम केलं जात. एका पुरुष मजुराचा ५० रुपये मजुरी असा भाव आहे, स्त्री ४० किंवा ४५. + संजय निराधारचे पैसे जर घरात कमावता नसेल तर+ मुलींसाठीचे भत्ते+ शेती नसेल तर त्याचे आण़खी काही रोख पैसे मिळताहेत. माझ्या गावत एकही पुरुष ग्रॅज्युएट झाला नाही असा नाही आहे या पिढीचा. बाहेर नोकर्‍या नाहीत म्हणुन निवांत शेती करतात, त्याची लाज नाही कारण शिकत असताना या कामाची कंटीन्युटी होती. काहीजण इचलकरंजीला गेले, मागावर, पण मग तेथे इतकी व्यसन वाढली की आईबापांनी शिव्या देउन परत आणल, अन शेतकामावर लावल. एकुण शहरात जाऊन बकाल आयुष्य जगण्याऐवजी शेतात राबुन जगण प्रिफर केल जातय यातच सगळ आल.

गावोगाव असलेल्या बाजार समित्या शेतकर्‍याच्या वाटोळाला कारणीभूत अहे असा मत अहे

सणापेक्षा लोक( शेतकरी आणि इअतर सर्व तशीच प्रवाह्पतित/ peer pressure खाली जगणारी सामान्य माणसं) लग्नसमारंभावर जास्त खर्च करतात असे निरिक्षण आहे. पण त्यासाठी लग्न्ससमारम्भ हा प्रकार सर्व्सामान्य माणसाला बुडवण्यासाठीच श्रीमंतांनी तयार केला गेलेला आहे, असं आपण म्हणणं योग्य नाही. वरच्या गोष्टीतल्या चक्रधराकडे 'विवेक' नाही याला बाकी कोण काय करणार?

मुटे साहेब - असा विचार करा, की चक्रधर सारखे मूर्ख शेतकरी आहेत त्यामुळे तुमच्या सारख्या शहाण्या शेतकर्‍यांचा फायदा होतो. मूर्ख शेतकर्‍यांमुळे उत्पादन कमी होत असेल आणि तुमच्या सारख्या शहाण्या शेतकर्‍यांच्या मालाला जास्त भाव मिळेल.

रोचक धागा. उलट-सुलट मते वाचायला मिळत आहेत, हे उत्तम. माझ्या माहितीप्रमाणे 'राखी' हा सण उत्तर भारतियांकडून आलेला असून मराठी लोकात फार पूर्वीपासूनचा नाही. माझ्या लहानपणी भाऊबीज असे, पण मध्यप्रदेशात रहात असूनही तिथल्या (इंदौरी उच्चार: 'तिथल्ल्या') मराठी लोकात राखी हा सण नव्हता. ... सिनेमा व दूरदर्शन मुळे राखीचे महत्व जास्त प्रचारित झालेले आहे.

जुन्या मराठी साहित्यात (लोकगीते, आत्मचरित्रे, धार्मिक साहित्य, आठवणी इ. सर्व) साहित्यात 'राखी' चा उल्लेख येतो का? असल्यास तो केव्हापासूनचा आढळतो, हे कुणाला ठाऊक असल्यास कळवावे. जुन्या सणांचे ठाऊक नाही, मात्र हल्लीचे अनेक 'डे' उदा. वालेंटाईन डे, फादर्स डे, मदर्स डे, एवढेच काय, 'हॅप्पी बर्थ डे' वगैरे मात्र निव्वळ गिफ्ट, कार्डे इ. विकले जावे म्हणून प्रचारित केले जात आहेत, असे वाटण्याजोगी परिस्थिति आहे. असे नित्य नवनवीन 'डे' प्रचारात येत आहेत.

In reply to by चित्रगुप्त

साहेब राखी म्हणु नका रक्षाबन्धन असे म्हणा,हिन्दीत राखीचा अर्थ वेगळा होतो हे आपल्याला माझ्यापेक्षा जास्त माहीत असेल कारण आपले बरेच आयुष्य हे मध्यप्रदेशात गेले आहे.

In reply to by अनिरुद्ध प

"हिन्दीत राखीचा अर्थ वेगळा होतो " मी आजपर्यंत समजत होतो हे मराठी संस्थळ आहे. वरचं सगळं हिंदीत लिहिलं आहे हे आत्ताच समजलं. "राखीपौर्णिमा" हा शब्द कुठे वापरावा की तो हिंदीत नाही म्हणून व्याकरणदॄष्ट्या चुकीचा आहे?

In reply to by रामपुरी

माझ्या बोलण्याचा चुकिचा अर्थ घेवु नका आणि चित्रगुप्त यानी आधी असेच उध्रुत केले आहे की राखी हा सण महाराष्ट्रात आधी नव्हता आणि माझ्या माहिती प्रमाणे आपण़ मराठी माणसे नारळीपौर्णिमा हा शब्द वापरतो राखीपौर्णिमा असा नाही (चु भु द्या घ्या )

"शेतकरी कायमच कर्जबाजारी राहावा हा उद्देश स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेवूनच सणांची निर्मिती आणि रीतिरिवाज अगदी प्राचीन काळापासून नियोजनबद्धरितीने आखल्या गेले आहे, हे उघड आहे " अतिशय विद्वत्तापूर्ण लेख.

लेखाची मांडणी आवडली. सर्वच पटले नाही. पण लेखनातल्या काही पैलूंना दाद दिली पाहिजे. बाकी,मागे गेलेल्या चार लेखांची लेखमालिका या निमित्तानं विसरता आली. धन्स :) दिलीप बिरुटे

ब-याचश्या मुद्याशीं सहमत..

शेती करण्याशी दुरान्वये संबंध नाही पण तरीही बरेचसे मुद्दे पटतात. तथापि सणवार, अन्त्य्संस्कारातील खर्च, लग्न कार्यातील खर्च...हे ग्रामीण भागातील प्रमुख ..(top ३)मुद्दे आहेत असे ऐकतो... शेतीसाठी काढलेले कर्ज निदान येणाऱ्या उत्पन्नाशी निगडीत आहेत ... परंतु वरील गोष्टींसाठी काढलेली कर्जे पूर्णपणे अनुत्पादक खर्च आहेत तेही वार्षिक उत्पन्नाच्या कित्येक पट बाय द वे...सावकाराकडे कर्ज काढणारे शेतकरी कोण? (काही एकर) जमिनीचा मालक / काम करणारा मजूर कि आणिक कोणी?....

आमचा एक आय टी मधला मित्र सांगत होता. आपल्या घरातल्या सणांना सुटी मिळत नाही. पण परदेशी सणांना मात्र मिळते. सगळं क्लायेंटच्या मनावर. अमेरीकन, युरोपियन क्लायेंट असेल तर ख्रिसमस, बॉक्सिंग डे, थँक्सगिविंग वगैरे. आखाती देशातला असेल तर त्यांचे सण, उपास तापास, आखाती व्रतवैकल्ये वगैरे महत्त्वाचे.

गोष्टीचे तात्पर्यः नास्तिक लोक लबाड आणि श्रीमंत सावकार वगरै असतात. आस्तिक लोक बावळट आणि गरीब असतात! =))

लेखातील मुद्दे कै च्या कै आहेत. सण म्हणजे सरकारी फतवा नाही कि सगळ्यांनी पाळलाच पहिजे. एखाद्या शेतकर्याला जमा नसेल तर त्याने करू नये. उगाच शेतकरी म्हणून पुळका आणू नये.

१०००-२००० वर्षांपूर्वी निर्माण झालेले 'सामाजिक सण' आणि आजची 'शेतकीय अर्थव्यवस्था' असे शब्द एकत्र जोडले कि लोकांना रोचक वाटतील असा शेकडानी गोष्टी सांगता येतील. मुटेसाहेबांचा लेख 'गरीब' शेतकार्‍यांनी आजच्या घडीला काहीच 'मनोरंजनात्मक्/उत्सवात्मक' करू नये इतके सांगून थांबवता येतो. पण वाचकांना नसलेले ज्ञान लेखात पाहिले कि वाचक इंप्रेस होतात आणि मग त्यांना तो मुद्दाच 'काही कारण नसताना' पटू लागतो. बोनस मिळण्याची वेळ आणि नोकरदारांनी विमा/गुंतवणूक/लग्नकार्य्/पर्यटन्/जबरदस्त खरेदी करण्यावर असाच जबर्‍या लेख लिहिला जाऊ शकतो आणि वाचकांना इंप्रेस करत कंपन्या हे सगळं कसं 'गैर' वळी होत असतं हे पटवता येऊ शकतं.

In reply to by arunjoshi123

बोनस मिळण्याची वेळ आणि नोकरदारांनी विमा/गुंतवणूक/लग्नकार्य्/पर्यटन्/जबरदस्त खरेदी करण्यावर असाच जबर्‍या लेख लिहिला जाऊ शकतो आणि वाचकांना इंप्रेस करत कंपन्या हे सगळं कसं 'गैर' वळी होत असतं हे पटवता येऊ शकतं.
जबर्‍या एकदम!!!

हां... आजकाल उगाचच काहीही सांगत असतात, म्हणे राम वनवासातुन परतला, उत्तरायन-दक्षीणायन, तीळ-गुळ-थंडी-उष्णता, श्रावण्-हिरवळ, विजय-गुढी, अभ्यंग स्नान, कसले शास्त्र? कसले विज्ञान? कुणाची मौज? कसली सुगी न कसलं काय? सगळे सण शेकडो-हजारो वर्षापुर्बीच्या सावकारांनीच चालु केले असणार. ;)

अर्थशास्त्राशी पूर्ण फारकत घेऊन बादरायण संबंधाची परिसीमा गाठणारं उत्कृष्ट उदाहरण म्हणुन हा लेख अमुल्य आहे.

आपले सण हाही एक ** कावा आहे. - नरोत्तम खोडकर

In reply to by प्रसाद गोडबोले

सगळं समजलं तुम्हाला मग २ काय आणि ३ चांदण्या काय...

लेख अजिबातच पटला नाहि. सण हे कारण नाहिये शेतकर्यान्च्या अधोगतीच. मी स्वतः अनुभवलेला आहे शेतीचा बेभरवशेपणा. त्यातुन आलेली प्रचंड गरीबी. कर्जबाजारीपणा अन व्यसनाधीनता. यावरुनच सांगतेय. मला वाटते त्या प्रमाणे १. शिक्श्णाचा अभाव (formal किंवा शेतीसंबधी) २. सगळे failurs साठी दारु हि उपाय वाटणे. (ती easyli available पण असते.) ३. सरकारी योजना कधिच शेतकर्यान्पर्यन्त पोहोचत नहित. बर्याच जणानां माहीतीच नसते की अश्या काही योजना पण आहेत ४. आपापसातले हेवे दावे. ५. नविन काहि, जोड धंदा करुन पाहण्याची तयारी नसणे. वर सांगीतलेला शेतकरी त्याच्य शेताकडे बघायला सांगुन गेला नाहि कोणाला? हे सहसा कधी होत नाहि.

सद्ध्या सणवार म्हटले की पारंपारिक प्रथांबरोबर बॅनर्स लावणे, डीजे बोलावणे, व्हिडिओ शूटिंग, सेलेब्रिटी बोलावणे असले अत्याधुनिक आणि आचरट प्रकार असतात. त्यामधे खर्च वाढतात... पूर्वी तमाशा, जत्रा हेसुद्धा असायचे. आता तमाशा पार्ट्यासुद्धा मजबूत बिदागी घेतात. गावं जास्त आणि तमशा पार्ट्या कमी ! गावातच काय सगळीकडेच पारंपारिक पद्धतीने सणवार साजरे करण्याबरोबर उधळपट्टीलाही महत्व आलेय... उगाच शेतकर्‍यांवर टीका करण्यात पॉइन्ट नाही.

सद्ध्या सणवार म्हटले की पारंपारिक प्रथांबरोबर बॅनर्स लावणे, डीजे बोलावणे, व्हिडिओ शूटिंग, सेलेब्रिटी बोलावणे असले अत्याधुनिक आणि आचरट प्रकार असतात हे खरे आहे. दहिहंडीला हॉलिवूडच्या सेलिब्रिटी सनीताई लिओन आल्या होत्या.

१. देशोन्नती दिवाळी अंक-२०१२ कधीही वाचणार नाही. २. शेती नि शेतकर्‍यांच्या समस्या माहिती अस(ण्याचा आव आणणा)रांनी लिहीलेलं वाचणार नाही. मुटे साहेब, नका हो नका. बैलपोळा का साजरा होतो हे त्या बैलाला पण ठाऊक असतंय. नि नागाला का दूध पाजतात ते नागाला पण! किमान माहिती तरी घ्यायची हो सणवारांची. असो.

कमी माहितीवर काहीही लिहिले आहे . वारीला जाणारा बहुसंख्य वर्ग शेतकरी आहे. पाऊस पुढे मागे झाला कि त्याप्रमाणे वारीलाही गर्दी कमी जास्त होते . दरवर्षी बातम्यान्माधेही आपण हे वाचत असतोच . बहिणीने भावाकडे किंवा भावाने बहिणीकडे जाणे आणि गोड धोड करणे यात वाईट काय आहे ? इतकी बचत केली पाहिजे का ? जो बैल वर्षभर सेवा करतो त्याचा सन शेतकरी उत्साहानेच करत असतो. त्यात बळजबरी कुठे दिसते ? वर्षातून एक दिवस शेतावर राबणाऱ्या लोकांना घरी जेवायला बोलावले आणि चार चांगले पदार्थ केले तर लगेच दिवाळे निघते का ? महिन्यात एक सण धरला तरी शेतकऱ्यांनी इतकेही गोड खावू नये कि काय ? पिक आले कि खरे खर्चाचे कार्यक्रम सुरु होतात - लग्न वगैरे . शिवाय जत्रा त्यात गोड , तिखट , पिणे , तमाशा अशा सर्व योग्य अयोग्य हौस मौज . . पूर्वी कपडेही शिमग्याला नाहीतर पाडव्याला घ्यायची पध्दत होती . आता दिवाळीला घेतात .

फक्त खाली दिली, तेवढी वाचली, तर मोपासा वगैरेंच्या तोडीची कथा वाटते: >>>>>>>>> " त्या दिवशी भल्या पहाटेच चक्रधर माझ्याकडे आला होता. त्याला माझ्याकडून प्रवाशीबॅग हवी होती पंढरपूरला जायला. असा अचानक चक्रधर पंढरपूरला जायची तयारी करतोय हे ऐकून मी उडालोच. आदल्या दिवशीच माझे त्याच्याशी बोलणे झाले होते. एका खासगी कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला चलतोस का म्हणून विचारले तर म्हणत होता की, त्याला निदान एक पंधरवडा तरी अजिबात फुरसत नाहीच. शेतीची आंतरमशागत करायचीय, फवारणी करायचीय, निंदन-खूरपण करायचेय. चक्रधर शेती करायला लागल्यापासून पहिल्यांदाच त्याच्या शेतीत इतकी चांगली पिकपरिस्थिती होती. यंदा त्याने छातीला माती लावून सार्‍या गावाच्या आधीच कपाशीची धूळपेरणी उरकून टाकली होती. पावसानेही आपला नेहमीचा बेभरंवशाचा खाक्या सोडून चक्रधरला साथ दिली आणि त्याची कपाशीची लागवड एकदम जमून गेली. नशीब नेहमी धाडसी लोकांनाच दाद देत असते याची प्रचिती यावी असाच हा प्रसंग होता. त्यामुळे हुरूप आलेला चक्रधर दमछाक होईपर्यंत शेतीत राबायला लागला होता. त्याला विश्वास होता की, यंदा आपली "इडापिडा टळणार आणि सावकाराच्या पाशातून मुक्ती मिळणार". भरघोस उत्पन्न आले आणि कर्मधर्म संयोगाने जर भावही चांगले मिळालेत तर ते अशक्यही नव्हते. त्यामुळे कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला येत नाही म्हटल्यावर मलाही फारसे नवल वाटले नाही. पण चक्रधर आता असा अकस्मात पंढरपूरला जायची तयारी करतोय हे मला अनपेक्षित होते. नेमके काय गौडबंगाल आहे हे जाणून घ्यायची माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी प्रथम त्याच्या हातात प्रवाशी बॅग दिली, प्रवासाला शुभेच्छा दिल्या, येताना माझ्यासाठी पांडुरंगांचा प्रसाद घेऊन यावा, अशी विनंती केली आणि मग हळूच विचारले होते, "काय चक्रधर, असा अचानक कसा काय बेत आखला बुवा पंढरपूरचा?" "आरं, मी कसला काय बेत आखतो पंढरीचा? तो पांडुरंगच मला बोलवायला आलाय ना स्वतःहून" इति चक्रधर. "स्वतःहून थेट पांडुरंगच आला तुला निमंत्रण द्यायला?" आश्चर्याने डोळे विस्फारून मी विचारले. "हं मग? इच्छा त्या पांडुरंगाची. दुसरं काय?" चक्रधर निर्विकारपणे सांगत होता. "अरे, पण मी तर ऐकलंय की पांडुरंग निर्गुण-निराकार असतो. शिवाय तो बोलत पण नसतो" या विषयातील आपले तुटपुंजे ज्ञान उगाळत मी बोललो. "तसं नाही रे, पंढरीचा विठोबा स्वप्नात आलाय तो त्या रावसाहेबांच्या" माझ्या प्रश्नाचा उबग आल्यागत चक्रधर बोलत होता. पण आता मला संवाद थांबवणे शक्य नव्हते. माझी उत्कंठा शिगेला पोचली होती. "रावसाहेबांच्या स्वप्नात? रावसाहेब आणि तुला, दोघांनाही बोलावलं होय?" मी प्रश्न फेकलाच. "आरं बाबा, तसं नाही रे. आत्ता पहाटेपहाटे विठोबा-रुक्मिणी दोघंबी रावसाहेबांच्या स्वप्नात आलेत आणि रावसाहेबांना आदेशच दिला की चक्रधरला तातडीने पंढरीला पाठवून दे. बिचारे रावसाहेब धावतपळत माझ्याकडे आलेत आणि म्हणालेत की, तू आताच्या आत्ता सकाळच्या गाडीने तातडीने पंढरपूरसाठी नीघ. मी पैशाची अडचण सांगायच्या आधीच रावसाहेबांनी माझ्या हातावर जाण्यायेण्याला पुरून उरतील एवढे पैसे पण ठेवलेत. लई मायाळू माणूस आहे बघा आपले रावसाहेब." माझ्या प्रश्नाच्या सरबत्तीला वैतागलेल्या चक्रधरने एका दमात सगळे सांगून टाकले आणि झपाझप पावले टाकत निघून गेला. पंढरीची वारी करून चक्रधर जेव्हा परतला तेव्हा सारेच काही बदललेले होते. फवारणी अभावी कपाशीची वाढ खुंटून झाड खुरटले होते. मशागत व खुरपणी अभावी तणांची बेसुमार वाढ झाली होती. आल्याआल्या मशागत सुरू करावी तर पाऊस सुरू झाला होता. पाऊस नुसताच सुरू झाला नव्हता तर ठाण मांडून बसला होता. आकाशातील ढग पांगायचे नावच घेईना. म्हणजे झाले असे की, जेव्हा उघाड होती आणि मशागत करण्यायोग्य स्थिती होती तेव्हा चक्रधर पंढरपुरात होता आणि आता चक्रधर शेतात होता तर पावसामुळे मशागतीचे काम करणे अशक्य झाले होते. शेवटी तणाची वाढ एवढी झाली की शेतात जिकडेतिकडे गवतच गवत दिसत होते. कपाशी गवताखाली पूर्णपणे दबून गेली होती. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. एकावर्षात सावकाराच्या म्हणजे रावसाहेबाच्या कर्जाच्या पाशातून मुक्त व्हायची गोष्ट दूर, उलट कर्जबाजारीपणाचा डोंगरच वाढत जाणार होता. रावसाहेब सावकार मात्र आनंदी होते. त्यांनी स्वप्न पडल्याची मारलेली थाप त्यांना मस्तपैकी कामी आली होती."

कालांतराने चक्रधर आणि रावसाहेब कालवश होऊन पुढली पिढी आली. चक्रधराच्या मुलाने रावसाहेबाच्या मुलाला सांगितले की त्याच्या स्वप्नात अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंटीण आले आणि त्यांनी सांगितले की रावसाहेबाच्या मुलाला ताबडतोब लास वेगासला पाठव. भारतातील तारण ठेवलेल्या जमिनी, वस्तु इ. ज्याच्या त्याला देऊन उरलेली सर्व संपत्ती लास वेगासच्या कसिनो मधे लाव, तुला शंभरपट परत मिळेल. रा.च्या मु. ने तसेच केले, सर्व संपत्ती हारला आणि लास वेगासच्या सडकांवर भीक मागू लागला... .......अमेरिकेचे अनर्थशास्त्र भारताच्या अर्थशास्त्राला अत्यंत मारक आहे, ही खूणगाठ मनाशी बांधूनच पुढील वाटचाल होणे अत्यंत गरजेचे आहे. ... साठा उत्तरची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण. .