Skip to main content

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 26/08/2013 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)


                   कलम नऊ मध्ये लिहिले आहे की, "कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे." एखादा निबंध, कविता किंवा एखादी म्हण वाचत जावे तसेच हे कलमही वाचले तर या कलमात गैर काय आहे? असा साहजिकच कुणालाही प्रश्न पडतो. शिवाय रुग्णाला त्याच्या मनाविरुद्ध बळाचा वापर करून जर एखादा मांत्रिक रोखत असेल तर त्याच्यावर कारवाई होणे उचितच आहे, असे वाटून बस्स एवढाच तर अर्थ आहे या एका ओळीच्या कायद्याचा. मग त्यालाही जर कोणी विरोध करत असेल तर तो विरोध करणारा स्वतः:च मांत्रिक असावा, किंवा धर्मवेडा तरी असावा, तेही नसेल तर अंधश्रद्धा बाळगणारा, अनपढ, गवांर, गावंढळ, बुद्धू, बिनडोक वगैरे तरी नक्कीच असावा, असे बर्‍याच लोकांना वाटायला लागते, आणि नेमकी येथेच फसगत होते.

                  पण या कलमात "वैद्यकीय उपचार" हा एकमेवच पर्याय दिल्याने ही "सक्ती"च झाली आहे. "वैद्यकीय उपचार" म्हणजे "ज्या व्यक्तीकडे सरकारी अधिकार्‍याने सही करून शिक्का मारलेले वैद्यकीय सेवा करण्याचे परवानापत्र आहे त्याने केलेले उपचार." असाच अर्थ घ्यावा लागणार. या व्यतिरिक्त अन्य सर्व उपचार मंत्रतंत्र, गंडेदोरे व जादूटोणा या प्रकारातच गणले जाणार. लेखांक-१ मध्ये दिलेले सर्व "पारंपरिक उपचार" देखील दखलपात्र गुन्हाच ठरणार, कारण या कलमाला "वैद्यकीय उपचार" किंवा "मंत्रतंत्र, गंडेदोरे" हे दोनच प्रकार मान्य आहेत. मग कायद्याशी पंगा घेऊन, वेळ पडल्यास सात वर्ष शिक्षा भोगायची तयारी ठेवून दुसर्‍याचा जीव वाचवण्यासाठी पारंपरिक उपचार कोण आणि कशाला करेल बरे? म्हणजे आता हे सर्व पारंपरिक उपचार पद्धती थांबणार आणि कालांतराने नष्ट होणार. होत असेल तर होऊ द्या, आपल्या बापाचे काय जाते? असे म्हणून दुर्लक्षही करता आले असते पण; सरकार कायद्यान्वये ज्या वैद्यकीय उपचार पद्धतीची जनतेवर सक्ती करायला निघाले त्या वैद्यकशास्त्रात तरी साप, विंचू आदि चावल्यास "रामबाण उपचार" आहेत काय? दुर्दैवाने याचेही उत्तर नाही असेच आहे. मग सक्ती लादण्याचे कारणच काय? तुम्ही देत असलेला पर्याय जर "पर्फेक्ट" नसेल तर अन्य पर्यायांच्या निवडीचे स्वातंत्र्य का हिरावून घेत आहात?

                  सध्या प्रचलित उपचार पद्धती मध्ये ग्रामीण जीवनाच्या आवाक्यात असलेल्या अॅलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी या प्रमुख तीन उपचार पद्धती आहे. त्यातही लोकप्रियतेत सिंहाच्या वाटा एकट्या अॅलोपॅथीचा आहे. वैद्यकशास्त्र अत्यंत प्रगत, अत्याधुनिक आणि बहुतांश रोगांच्या बाबतीत वैद्यकशास्त्राला पर्यायच नाही. पण काही रोग असेही आहेत की, अन्य उपचार पद्धतींच्या तुलनेने वैद्यकशास्त्र पिछाडीवर आहे. खुद्द वैद्यकशास्त्रालाही ते मान्य आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी मान्य केले आहे. उदा.

१) सर्दीपडसा आणि श्वसनाशी संबंधीत रोगांवर वैद्यकशास्त्रापेक्षा प्राणायामाने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, असे म्हणतात.

२) स्पॉन्डिलाइटिस सारख्या विकारावर वैद्यकशास्त्रापेक्षा योगाने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते. असे म्हणतात.

३) काविळसारख्या रोगावर वैद्यकशास्त्रापेक्षा जडीबुटी आणि पारंपरिक उपचार पद्धतीने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, असे म्हणतात.

                  या संदर्भात एक उदाहरण देतो, हे माहितीस्तव उदाहरण आहे, समर्थन नाही. माझ्या एका गोपाल नावाच्या मित्राला काही वर्षापूर्वी कावीळ झाला होता. त्याने सुरुवातीचे काही दिवस खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. पण कावीळ आणखी वाढतच होता. खाजगी डॉक्टरच्या सल्ल्यावरून तो थेट नागपूर मेडिकलला दाखल झाला. १५ दिवस लोटले खर्चही खूप झाला पण आराम नव्हता. डोळे, नखे वगैरे पिवळे आले होते. आरामच होईना म्हणून त्यांनी स्वमर्जीने इस्पितळ सोडले आणि एका घरगुती सेवाभावी नि:शुल्क औषध देणार्‍या ग्रामीण व्यक्तीकडून औषध घेतले. आराम मिळाला. 

                  ग्रामीण भागात अनेक लोकांना अनेक रोगांवर खात्रीने दुरुस्त होऊ शकेल अशी वनस्पती औषधे माहीत आहेत, याचा अनुभव मी बर्‍याचदा घेतला आहे. दु:खद बाब एवढीच की, आपले महत्त्व कायम राहावे म्हणून ही मंडळी अशी माहिती स्वतः:जवळच जपून ठेवतात. इतरांना अजिबात सांगत नाही. त्यामुळे या औषधोपचाराची चिकित्सा आणि संशोधन होत नाही. माझ्या गावावरून ८५ किलोमीटर अंतरावरील एका गावात एक सेवाभावी महिला आहे. ती कावीळ रोगावर औषध देते. ३० वर्ष झाले, कावीळ रोगाची साथ वगैरे आली की तिच्या घरासमोर रांगा लागतात. तिच्याकडील औषध घेणारे आजपर्यंत सर्वच दुरुस्त झालेत अशी चर्चा आहे. ते खरे की खोटे हे मला माहीत नाही पण हा औषधोपचार करताना कुठल्या वनस्पती वापरल्या जातात हा माझा नेहमीचाच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. हा लेखांक लिहिण्याच्या निमित्ताने या वेळेस मात्र मनावर घेतले आणि तिच्या गावात जाऊन तिची भेट घेतली. कावीळचे औषध ती कसे तयार करते, हे तिने मला सांगावे, मी त्यावर अधिक प्रयोग आणि संशोधन करून लोकांना फुकट वितरित करीन त्यामुळे लोकांचे भले होईल. तुला लोक आशीर्वाद देईल. तुला पुण्य लाभेल अशा तर्‍हेने खूप समजावले, पण ती राजी होत नव्हती. दोन दिवस सतत पाठपुरावा केल्याने कदाचित तिचे मन द्रवले असेल. शेवटी एकदाची ती राजी झाली.

तिने सांगितलेली औषधी तयार करण्याची पद्धत अशी.

शनिवार दिवशी सकाळी तळहाताच्या आकाराचे एरंडी या वनस्पतीची अडीच पाने घ्यावीत. त्यात १५ ग्रॅम मिरे घालावे. त्यात १/३ ग्लास पाणी टाकून ठेचावे. तयार झालेला रस उपाशी पोटी रोग्यास पिण्यास द्यावा. छोटासा गुळाचा तुकडा खायला द्यावा. नंतर दूध, भात आणि गूळ खायला द्यावा. गरज भासल्यास दुसर्‍या शनिवारी पुन्हा एक मात्रा द्यावी.

पथ्य - आंबट आणि कच्चे तेल अजिबात खायचे नाही.

हे औषध गुणकारी आहे किंवा नाही, याविषयी मी काही सांगू शकत नाही. केवळ मी मिळविलेली माहिती शेअर करणे, हा उद्देश आहे. भविष्यात कुणालाच कावीळ होऊ नये, ही सदिच्छा, पण झालाच तर थेट डॉक्टरकडेच जावे. 

३) वात, लकवा, अर्धांगवायू सारख्या रोगावर वैद्यकशास्त्रापेक्षा जडीबुटी आणि पारंपरिक उपचार पद्धतीने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, हा माझा अनुभव आहे.

                  दहा वर्षापूर्वी माझ्या आईला वात, लकवा झाला होता, अ‍ॅलोपॅथीचे खूप इलाज केले पण आजार दिवसेंदिवस वाढतच गेला. तालुक्याच्या इस्पितळात भरती केले. त्यांनी १०-१२ दिवसाच्या उपचारानंतर सेवाग्राम मेडिकलला रेफ़र केले. तिथे भरती केले पण प्रकृती सुधारणे ऐवजी बिकटच होत गेली. अर्धांगवायूचा झटका आला. काही दिवसानंतर तिला २० पैकी एकही बोट हालवता येत नव्हते. हात-पाय तर हालण्याचा प्रश्नच नव्हता. सर्व शर्थीचे प्रयत्न झाल्यानंतर तिथून नागपूरला रेफ़र करण्यात आले. तिथे भरती केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, बघा, तुमचा आग्रह असेल तर भरती करून घेतो, आपण प्रयत्न करू पण काही उपयोग होईल असे वाटत नाही. मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथून १६ किलोमीटरवर एक तिगाव आहे. तेथे एक हकीम आहे, मग त्याच्याकडे नेले. त्याने फक्त २०० रुपयात काही जडीबुटीची भुकटी आणि तेल दिले. २४ तासातच आराम दिसायला लागला. तीन महिन्यात आई तंदुरुस्त झाली, एवढी की तिला घेऊन वैष्णोदेवीला गेलो. १६ किलोमीटर डोंगर चढणे व १६ किलोमीटर डोंगर उतरणे आणि तेही वयाच्या ७० व्या वर्षी! लीलया आव्हान पेलले माझ्या आईने मृत्यूच्या दाढेतून परत आल्यावर. आजही ती स्वस्थ आहे.
मृत्यूच्या दाढेतून परत आलेली माझी आई

                  हे लिहिण्यामागे वैद्यकशास्त्राला कमी लेखण्याचा किंवा आव्हान देण्याचा प्रयत्न नाही पण या तर्‍हेने उपचार घेणे म्हणजे अंधश्रद्धा असते, औषध देणारा म्हणजे भोंदूच असतो, असे वगैरे काही नसते. १७ वर्ग शिकणे, १८ पुस्तके वाचणे म्हणजेच ज्ञान असते, उरलेले सगळे अज्ञान असते, असेही नसते, याचेही भान असणे गरजेचे असते. 

                                                                                                                - गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(.....अपूर्ण....)
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१) जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3666
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

वाचतोय....! -दिलीप बिरुटे

आईचा अनुभव आश्चर्यकारक आहे. पारंपारिक ज्ञानातून औषधे देण्याचा वारसा काही कुटुंबांमधे असतो. उदा. वैदूंना या कायद्यातून वगळले आहे. जे जे पारंपारिक ते ते सर्व त्याज्य ही भुमिका योग्य नाही हे मान्य. परंतु जे जे पारंपारिक ते ते सर्व ग्राह्य हे अमान्य. अभय बंगांनी या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करुन बालमृत्यू घटवले. बेअर फूट डॉक्टर ही संकल्पना ग्रामीण भागात खूप चांगली आहे. त्या धर्तीवर मला मांत्रिक तांत्रिक लोकांनाच योग्य प्रशिक्षण देउन मानसमित्र बनवले तर ते सायकियाट्रिस्टचा बराच भार हलका करतील.

आवडला,पु भा प्र.

लेखातील जनरलायझेशन अजिबात पटले नाही.
पण या कलमात "वैद्यकीय उपचार" हा एकमेवच पर्याय दिल्याने ही "सक्ती"च झाली आहे. "वैद्यकीय उपचार" म्हणजे "ज्या व्यक्तीकडे सरकारी अधिकार्‍याने सही करून शिक्का मारलेले वैद्यकीय सेवा करण्याचे परवानापत्र आहे त्याने केलेले उपचार." असाच अर्थ घ्यावा लागणार. या व्यतिरिक्त अन्य सर्व उपचार मंत्रतंत्र, गंडेदोरे व जादूटोणा या प्रकारातच गणले जाणार. लेखांक-१ मध्ये दिलेले सर्व "पारंपरिक उपचार" देखील दखलपात्र गुन्हाच ठरणार,
या तर्काला आधार काय? सदर कायद्याचा असाच अर्थ आहे याची तळटिप कायद्याच्या मसुद्यात आहे काय? अन्यथा कायद्याचा अर्थ लावायचे काम न्यायालयाचे आहे. जर तुम्ही म्हणता तशी केस आली तर फारतर न्यायालय सरकारला त्यांनी बनविलेल्या कायद्याचे स्पष्टीकरण मागवू शकते अथवा अधिकची तथ्ये मागवून स्वतःचे मत देऊ शकते. या कायद्याचा अर्थ असाच होइल आणि मग या या गोष्टींवर प्रतिबंध येतील वगैरे "हवेतली भिती" लोकांच्या मनात भरवण्यामागचे प्रयोजन समजले नाही.

नविन कायद्याने प्राणायाम किंवा योगासने करण्यावर बंदी येणार असल्याची नवीनच माहिती मिळाली. एकंदरच सरकारी मान्यता असणे, डिग्री घेणे या गोष्टींना तुमचा विरोध दिसतो. माझ्याकडे परंपरागत ज्ञान आहे असा दावा करुन कोणताही सोम्यागोम्या उपचार करेल. स्वतःच्या फायद्यासाठी कोणाचाही असा गिनीपिग करुन घेणार्‍या लोकांचा 'शस्त्राने बीमोड' करणारे एखादे 'सनातन' विधेयक पारित झाले तर मौज येईल.

बरंच काही म्हणता येईल.. पण एक नमुन्यादाखलः
माझ्या गावावरून ८५ किलोमीटर अंतरावरील एका गावात एक सेवाभावी महिला आहे. ती कावीळ रोगावर औषध देते. ३० वर्ष झाले, कावीळ रोगाची साथ वगैरे आली की तिच्या घरासमोर रांगा लागतात. तिच्याकडील औषध घेणारे आजपर्यंत सर्वच दुरुस्त झालेत अशी चर्चा आहे. ते खरे की खोटे हे मला माहीत नाही पण हा औषधोपचार करताना कुठल्या वनस्पती वापरल्या जातात हा माझा नेहमीचाच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. हा लेखांक लिहिण्याच्या निमित्ताने या वेळेस मात्र मनावर घेतले आणि तिच्या गावात जाऊन तिची भेट घेतली. कावीळचे औषध ती कसे तयार करते, हे तिने मला सांगावे, मी त्यावर अधिक प्रयोग आणि संशोधन करून लोकांना फुकट वितरित करीन त्यामुळे लोकांचे भले होईल. तुला लोक आशीर्वाद देईल. तुला पुण्य लाभेल अशा तर्‍हेने खूप समजावले, पण ती राजी होत नव्हती. दोन दिवस सतत पाठपुरावा केल्याने कदाचित तिचे मन द्रवले असेल. शेवटी एकदाची ती राजी झाली. तिने सांगितलेली औषधी तयार करण्याची पद्धत अशी. शनिवार दिवशी सकाळी तळहाताच्या आकाराचे एरंडी या वनस्पतीची अडीच पाने घ्यावीत. त्यात १५ ग्रॅम मिरे घालावे. त्यात १/३ ग्लास पाणी टाकून ठेचावे. तयार झालेला रस उपाशी पोटी रोग्यास पिण्यास द्यावा. छोटासा गुळाचा तुकडा खायला द्यावा. नंतर दूध, भात आणि गूळ खायला द्यावा. गरज भासल्यास दुसर्‍या शनिवारी पुन्हा एक मात्रा द्यावी. पथ्य - आंबट आणि कच्चे तेल अजिबात खायचे नाही. हे औषध गुणकारी आहे किंवा नाही, याविषयी मी काही सांगू शकत नाही. केवळ मी मिळविलेली माहिती शेअर करणे, हा उद्देश आहे. भविष्यात कुणालाच कावीळ होऊ नये, ही सदिच्छा, पण झालाच तर थेट डॉक्टरकडेच जावे.
वर हायलाईट केलेले शब्द वाचता असा प्रश्न पडतो की मग हे शोधून शेअर करण्याचं प्रयोजन काय? केवळ माहिती मिळवली आहे म्हणून शेअर करणं हे कारण पटलं नाही बुवा.

In reply to by गवि

आधुनिक वैद्यकशास्त्रातले दोष दाखवताना कावि़ळीचा दाखला हमखास दिला जातो. पण पारंपारीक औषधाचा गुण आल्याच्या गोष्टीपलिकडे जाउन ते पारंपारी औषध चाचण्यांतून तावून सुलाखून निघून सर्वमान्य होउन सर्वांना त्याचा फायदा व्हावा असे प्रयत्न होताना का दिसत नाहीत हे मोठ कोडं आहे.. आपलं ज्ञान आपल्याकडेच ठेवणे ही आपली परंपरा नक्कीच नसावी असे वाटते..

In reply to by बाळ सप्रे

काविळीविषयी मुख्य गोष्ट अशी की तो रोग नसून ते लक्षण आहे. "तापा"वर उपचार या वाक्यरचनेला जसा अर्थ नाही (कारण ताप व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरिया, कर्करोग, मलेरिया पॅरासाईट आणि अशा अन्य अनेक मूळ कारणांनी होऊ शकतो.). तसंच कावीळ म्हणजे साधारण पिवळे डोळे, पिवळी त्वचा वगैरे अशी समोर दिसणारी लक्षणं. ही सुद्धा लिव्हरला इन्फेक्शन (हेपाटायटिस), लिव्हरच्या कामात अडथळा (ट्यूमर, गाल ब्लॅडरचे खडे) अशा अनेक कारणांमुळे शरीरात बिलिरुबिन हे द्रव्य साठल्याने घडतात. यामागची कारणं एक नव्हे तर अनेकांपैकी एक किंवा कॉम्बिनेशन असू शकतं. पण त्याला कावीळ असं एकच नाव देऊन त्यावर ठिकठिकाणी उपाय केले जातात. याचाच अर्थ कार्यकारणभाव किंवा ठराविक मूळ कारणाशी संबंध प्रस्थापित न करता नुसती कावीळ या लक्षणासाठी उपाय करणं ही चुकीची उपचारपद्धती आहे. इथे आपल्याला फक्त पिवळेपणा घालवायचा नसून मूळ कारण नष्ट करायचं आहे.

In reply to by गवि

गवि साहेब, आपली खिळ्याच्या डोक्यावर नेमका घाव घालण्याची शैली एकदम पसंत पडली आणि आम्ही आपले पंखे झालो आहोत. कावीळ हे एक लक्षण असून रोग नाही एका तर्हेची कावीळ (obastructive jaundice) हि वेगवेगळ्या कर्क रोगांमुळे होते जसे यकृत पित्ताशय लहान आतडे स्वादुपिंड इत्यादी अवयव. या कर्करोगांचे असंख्य(अक्षरशः शेकडो) रुग्ण झाडपाले आणि तत्सम सर्व उपाय करून शेवटी आमच्या केंद्रात आलेले पाहिले आहेत. यात पित्त आतड्यात उतरणे बंद होते आणि रक्तात मिसळते म्हणून कावीळ होते त्याला "साधी" कावीळ समजून नाकात चूना घालण्यापासून बेंबीवर/ पोटावर तापलेल्या सळईने डाग देण्यापर्यंत उपाय करून थकले कि शेवटी येतात. तेंव्हा जुने ते सगळेच चांगले असा अतिरेक नको.

In reply to by गवि

याचाच अर्थ कार्यकारणभाव किंवा ठराविक मूळ कारणाशी संबंध प्रस्थापित न करता नुसती कावीळ या लक्षणासाठी उपाय करणं ही चुकीची उपचारपद्धती आहे. इथे आपल्याला फक्त पिवळेपणा घालवायचा नसून मूळ कारण नष्ट करायचं आहे.
लाखातले एक वाक्य आहे !

दहा वर्षापूर्वी माझ्या आईला वात, लकवा झाला होता, अ‍ॅलोपॅथीचे खूप इलाज केले पण आजार दिवसेंदिवस वाढतच गेला. तालुक्याच्या इस्पितळात भरती केले. त्यांनी १०-१२ दिवसाच्या उपचारानंतर सेवाग्राम मेडिकलला रेफ़र केले. तिथे भरती केले पण प्रकृती सुधारणे ऐवजी बिकटच होत गेली. अर्धांगवायूचा झटका आला. काही दिवसानंतर तिला २० पैकी एकही बोट हालवता येत नव्हते. हात-पाय तर हालण्याचा प्रश्नच नव्हता.
१. हळूहळू बिकट होत गेलेली लकवासदृश स्थिती. २. एकही बोट हलवता येत नव्हते (दोन्ही हात आणि दोन्ही पाय) आणि ३. नंतर काही दिवस / आठवड्यांनी त्यातली शक्ती परत आली आणि पुन्हा जवळजवळ पूर्ववत झाली या वर्णनावरुन "अर्धांग"वायू (मेंदूच्या गुठळीमुळे स्ट्रोक) असण्याची शक्यता शून्यवत वाटते आहे. या वर्णनावरुन गीयां बारे सिंड्रोम (Acute inflammatory demyelinating polyneuropathy) असावा असं तीव्रतेने वाटतं आहे. हा खूप गंभीर आजार आहे. पण आपणहून बरा होणारा आहे. माझ्या म्हणण्याचा मर्यादित अर्थ इतकाच की त्यावेळी डॉक्टर्सना योग्य डायग्नोसिस झालं नसण्याची शक्यता आणि कुठल्यातरी अनडॉक्युमेंटेड जडीबूटीला मिळालेलं श्रेय यांमुळे आपल्याला स्पष्टपणे जाणवलेल्या सक्सेस्-स्टोरीमागे वेगळा कार्यकारणभाव असण्याची शक्यता बरीच जास्त वाटते.

In reply to by गवि

हा नसावा असं वाटतं. कारण यात रुग्ण बर्‍याचदा कृत्रिम श्वसनयंत्रणेवर अवलंबून असतो. घरातल्याच व्यक्तीचे हाल हाल पाह्यलेत या आजारात. काय झालंय नक्की ते कळत नव्हतं, डॉक्टरांच्या रिपोर्ट्मध्ये Acute infective demyelinating polyneuropathy वाचलं. असो.

In reply to by सूड

माझ्या स्वतःच्या आईलाच या आजारात पूर्ण व्हेंटिलेटरवर राहून आयसीयूत अगणित काळ राहून शेवटी आशा जवळजवळ सुटल्यावर परत आलेली पाहिली आहे. पाहिली कसली, जगलोच आहे ते सगळं. होय.. कृत्रिम श्वास चालू ठेवावा लागतो. पण तो सर्वांना नाही. बर्‍याच केसेस या तुलनेत कमी तीव्रतेच्या स्टेजपर्यंत येऊन रिकव्हरी सुरु करतात. ट्रॅकिओस्टोमी (कृत्रिम श्वास) लागणं हे शेवटच्या टोकाचं लक्षण समजलं जातं आणि त्यानंतर रिकव्हरी किती होईल याबाबत निराशावादी रहावं लागतं हे खरं. पण बहुतेक रुग्णांचा सिंड्रोम श्वसनाच्या स्नायूंपर्यंत पोहोचत नाही. केवळ हातापायांवर डी-मायलिनेशन होऊन काही आठवड्यांनी हळूहळू परत येतात. कधीकधी फक्त पायांवरही निभावू शकतं. त्यामुळे तीव्रतेच्या निकषावरही गीयां बारे असण्याची शक्यता जास्त वाटते.. एस्पेशियली त्या नंतर खडखडीत बर्‍या झालेल्या असल्यावरुन. त्यांना दीर्घायुरारोग्यासाठी सदिच्छा..

In reply to by गंगाधर मुटे

मुटे साहेब एका श्वासाचे अंतर हे गविंच्या आईने लिहिलेले पुस्तक यावर आहे. राज जैंन यांच्या पुस्तकजत्रावर ते उपलब्ध आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

हे पुस्तक वाचतांना 'नचिकेत'चा उल्लेख आला, तेव्हा वाटलं होतं की गविंना विचारावं.. पण मग म्हटलं, अप्रिय विषय आहे.. :-( कशाला बोला?

पतत नाहीये ...पण वाचत आहे ...
सर्दीपडसा आणि श्वसनाशी संबंधीत रोगांवर वैद्यकशास्त्रापेक्षा प्राणायामाने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, असे म्हणतात.
हे अजिबातच पटले नाही . सर्दी पडसे असल्यावर प्राणायाम करु नये . मुळातच टीव्हीवर रामदेव बाबा दाखवतात ते पाहुन तर प्राणायाम कधीच करु नये. ( नाडी शुध्दी एकवेळ ठीक आहे... चालेलही पण अंतर्कुंभक हा डेंजरस प्रकार आहे , सो गुरुच्या सानिध्यात असल्या शिवाय मुळीच करु नये हे वै म. )

गवि, तुम्ही फारच सुंदर खंडन करताय. मी दुसर्‍या संस्थळावर हेच करतेय पण तुम्ही तर डॉक्टर नसूनही माझ्यापेक्षाही सुंदर आणि तर्कशुद्ध लिहिताय. अभिनंदन. आता तुम्ही सुरू केलेला धागा पण वाचते.

In reply to by साती

साती ताई अगदी मनातले बोललात. लेख वाचताना माझ्या मनात पहिल्यांदा हेच आले आणि आपण ते लिहावे असे वाटू लागले पण गाविनी इतके सुंदर लिहिले आहे कि त्यांच्या ताजमहालाला आपली वीत लावायचे काहीच कारण नाही.