Skip to main content

डॉक्टर तुम्हीच सांगा

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 28/07/2013 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका लग्नाला गेलो होतो त्यानंतर आमच्या मित्राचे सासर शेजारच्या बिल्डींग मध्ये आहे म्हणून त्यांच्या घरी( तिसर्या -पुण्याच्या भाषेत चौथ्या मजल्यावर) गेलो होतो. मित्राचे सासरे बुवा म्हणाले कि डॉक्टर आजकाल जरा काही खाल्ले कि पोटाला तडस लागते. एकंदर त्यांच्या पोटाचा आकार पाहून ते "जरा काही" खात असतिल असे वाटत नव्हते. म्हणून मी त्यांना विचारले कि साहेब तुम्ही आता धावत जिना चढता का ? त्यावर ते म्हणाले कि अहो मी रिटायर झालो तिसरा मजल धावत चढणे कसे शक्य आहे? मग मी विचारले तुम्ही चष्मा का लावता? ते म्हणाले चाळीशीचा चष्मा आहे. मी परत विचारले कि तुमचे अर्धे केस गेले आणि उरले अर्धे पांढरे का झाले? त्यावर ते म्हणाले कि अहो माझे वय आता पासष्ट वर्षे आहे रिटायर होऊन पाच वर्षे झाली. यावर मी त्यांना म्हटले कि साहेब तुमच्या हृदयाची, गुढघ्याची पासष्टी झाली डोळ्याची पासष्टी झाली केसांची पासष्टी झाली मग तुमच्या पोटाची पासष्टी नाही का झाली ? यावर मित्राच्या सासूबाई पटकन म्हणाल्या अहो आत्ता लग्नात त्यांनी पाच गुलाबजाम खाल्ले. डॉक्टर आता तुम्हीच काही तरी सांगा. मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक दहावीतील मुलगी पाळी वेळेत येत नाही म्हणून सोनोग्राफी साठी आली होती. वय वर्षे पंधरा आणि वजन शहाण्णव किलो (९६). ती खुर्ची मावत नव्हती. त्यामुळे तिच्या बीजांड कोशाना(ovaries)ना सूज आली होती. तिला वजन कमी करायला पाहिजे असे मी तिच्या वडिलांना सांगितले तर तिचे वडील म्हणाले डॉक्टर तुम्हीच सांगा तिला. मला संतापच आला सरळ विचारावेसे वाटले पंधरा वर्षाच्या मुलीचे शहाण्णव किलो वजन होईपर्यंत तुम्ही काय गोट्या खेळत बसला होतात काय? पण संयम बाळगून मी त्यांना सांगत होतो कि काय करायला पाहिजे तर त्यांचे आपले एकच टुमणे डॉक्टर तुम्हीच सांगा तिला. अशाच एका लग्नाला शैलजाताई भेटल्या. त्यांचे बोलणे सुरु झाले कि आजकाल पायांची फार जळजळ होते. त्यांना मधुमेह आहे आणि त्या माझ्या बायकोकडे औषधोपचार घेत असतात.मधुमेह काही केल्या "कंट्रोल"च होत नाही अशी तक्रार करू लागल्या. (आई वडिलांपासून ओळख आहे त्यामुळे सुबोधला काय लहानपणापासून पाहीला आहे) हा एक उच्छाद असतो. डॉक्टर भटले कि वरिष्ठ नागरिकांना आपला कुठला तरी आजार आठवतो आणि ते पिच्छा पुरवतात त्यामुळे मी कोणत्याही सार्वजनिक प्रसंगांना वरिष्ठ नागरिकांना टाळू लागलो आहे. थोड्या वेळाने त्या लग्नातील बुफेचे ताट घेऊन जेवत होत्या.त्यात पाच पुर्या, वाटी भरून श्रीखंड, तीन चार भाज्या, पुलाव, सार पापड इ सर्व जीन्नसानी त्यांचे ताट भरगच्च भरलेले होते. मी विनायकरावाना विचारले कि एवढा त्रास होतो तरी त्या पथ्य करीत नाहीत मग औषधोपचाराचा फायदा कसा होणार? त्यावर त्यांचे म्हणणे हेच डॉक्टर आता तुम्हीच काहीतरी सांगा तिला. अंकिता पाटील चार वर्षे वय पोट दुखते आणि जळजळ होते म्हणून बालरोग तज्ञांनी तिला सोनोग्राफी साठी पाठविले होते. चार वर्षाच्या मुलीला आम्लपित्त होते हे पाहून मला पण जरा धक्काच बसला म्हणून तिच्या आजोबाना विचारले कि ती काय खाते? आजोबा तक्रार करून सांगत होते कि तिला रोज कुरकुरे लागतातच. त्याशिवाय ती ऐकतच नाही तुम्हीच काहीतरी सांगा तिला. मग मात्र माझा संयम सुटला आणि मी आजोबाना रागात विचारले अहो ती पैसे कमवत नाही कि दुकानात जाऊन कुरकुरे आणण्याची तिला अक्कल नाही मग ती रोज कुरकुरे कसे खाते? तुम्ही तिला कुरकुरे देणे बंद करा. हे सांगायला तुम्हाला डॉक्टर लागतो का ? आहान वय वर्षे ५ सारखा माझ्या दवाखान्यात या वस्तूला हात लाव त्या वस्तूला हात लाव. कॉम्प्युटरशी चाळे कर. मी आई वडिलांकडे रागाने पहिले तर आई सांगु लागली गप्प बस आता नाहीतर डॉक्टर तुला इंजेक्शन देतील. मी त्यांना विचारले कि दुसर्या ऑफिसात डॉक्टर नसतील तर काय सांगणार त्याला? त्यावर त्यांचे तोंड गप्प? मला या सर्व गोष्टीमध्ये एक मूळ सूत्र असे दिसते आहे कि आपण सर्व आपली जबाबदारी टाळू पाहतो आहे. आणि आपल्या जवळच्या माणसाना त्यांच्या हिताच्या पण कटू गोष्टी सडेतोडपणे सांगण्याची वेळ येते तेंव्हा एक सोपा मार्ग (शोर्टकट) शोधतो आहोत.या वृत्तीमुळे आपण आपल्या जवळच्या माणसाचे अपरिमित नुकसान करीत आहोत ह त्यांना कळत नाही का? बायकोशी/ नवर्याशी भांडण होऊ नये किंवा अप्रिय गोष्टी सांगायला लागू नयेत म्हणून वाईट पणा डॉक्टरच्या गळ्यात टाकतो आहोत. हे म्हणजे पाहूण्याच्या हातून साप मारण्याची कावेबाज वृत्ती आहे असे त्यांना वाटते काय? नातीला ती हट्ट करते म्हणून रोज कुरकुरे देणारे पालक/ आजोबा किंवा ७० टक्के अधिक वजन होई पर्यंत मुलीला काही न बोलणारे पालक हे याच गटात मोडत आहेत. स्वतःला वाईटपणा नको म्हणून आपल्या नातेवाईकचे नुकसान होऊ द्यायची हि कोणती वृत्ती? आपल्या लहान मुलाचे फाजील लाड करून आपण त्याचे नुकसान करीत आहोत हे त्यांना कळत नाही का?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 29884
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

In reply to by गवि

आणि.. विशेष म्हणजे अत्यंत परिणामकारक ठरलेला आवश्यक, योग्य असा प्रोटोकॉल तुम्ही एका मद्यपि व्यसनी माणसाबाबत पूर्वी वापरला आहे.. इथे उल्लेख आहे: http://www.misalpav.com/node/25044 शमीम तुमच्याकडे पोटदुखीसाठी आला. सोनोग्राफीत फॅटी लिव्हर निघाली. तुम्ही या फारशा पुढे न गेलेल्या साईनचा उपयोग करुन त्याला सुरुवातीला दारुच्या दुष्परिणामाची धास्ती उत्पन्न केलीत. पण तुम्हाला निश्चित माहीत होतं की अशा वन टाईम स्कोल्डिंगने कायमचे सुटणार नाही कोणतेच व्यसन किंवा आजार. उलट दारुमुळे तू घरच्यांची कशी वाट लावतो आहेस याच्या जाणिवेने येणारी गिल्ट ही व्यसनाधीनतेला आणखी वेगाने खड्ड्यात घेऊन जाते याची तुम्हाला जाणीव होती. म्हणून तुम्ही हे पूर्ण कौन्सेलिंग हातात घेतले नाहीत तर फक्त सुरुवातीचा एक पुश देऊन त्याला योग्य जागी पाठवले. म्हणजेच तुम्ही त्याला तुमच्या कलीग्जपैकी असलेल्या मनोविकार तज्ञाकडे "डी-अ‍ॅडिक्शन"ला पाठवला. त्या मित्राला आधीच कल्पना दिलीत की :
शमीम म्हणून एकाला पाठवतो आहे त्याला दारू सोडण्यात तुझी मदत हवी आहे त्याला सगळी पार्श्वभूमी सांगितली आणि हेही सांगितले कि त्याला लिव्हरचा आजार असा काही पुढे गेलेला नाही पण त्याला मी थोडी दहशत घातली आहे. पुढचे काम त्यानेच केले होते.
म्हणजेच खुद्द शमीमला किंवा त्याच्या घरच्यांना (ते सोबत नसल्याने?? )दारु पिण्यावरुन बोलण्याच्याही पुढे जाऊन तुम्ही त्याला सोडण्याची गरज आणि मार्ग समजावून सांगितलेत.. "याची दारु कमी केली पाहिजे" असे घरच्यांना सांगून.. "आता तुम्ही काय ते बघा.." असं त्याच्यावर किंवा नातेवाईकांवर सोडून नाही बसलात. एका घोटाचे इतके क्वार्टर्स होईपर्यंत काय करत होता असं म्हणून सोडून नाही दिलं. हे अत्यंत योग्य होतं आणि त्याची दारु सुटली हे सिद्ध झालं. लठठपणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा अजूनही त्या प्रकारचा नाही हे एक निरीक्षण या निमित्ताने समोर आणायचं होतं. बाकी वेळीअवेळी पार्टीत, रस्त्यात गाठून सल्ले विचारणारे आणि अन्य प्रकारच्या लोकांविषयीची तुमची मतं योग्यच आहेत. त्यामुळे संपूर्ण लेखातल्या फक्त काही मर्यादित भागाशीच असहमती..

In reply to by गवि

दोन्ही प्रतिसाद अप्रतिम आहेत. नुसते डॉ़क्टरांच्या दृष्टीकोनातून न पाहता एका रुग्णाच्या दृष्टीकोनातूनही पाहण्याची गरज असते. 'इतके दिवस काय नुसते गोट्या खेळत बसला होता काय?' हा प्रश्न मलाही खुपला होता पण माझे विचार तुमच्या इतके प्रभावीपणे मला मांडता आले नाहीत. असो. कांही वेळा डॉक्टरांच्या वैयक्तिक आयुष्य उपभोगण्याचा मुद्दा महत्त्वाचा असतो तर कांही ठिकाणी रुग्णाची आणि त्याच्या नातेवाईकांची हतबलता विचारात घेतली गेली पाहीजे. दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन वर्तन ठेवावे म्हणजे संबंधात कटूता येणार नाही.

In reply to by गवि

दोन्ही प्रतिसाद उत्तम. गवि तुमची निरिक्षणशक्ती दांडगी दिसते. तसेच मांडण्याची हातोटीही. डॉक्टर ही माणुसच असल्याने सर्वसामान्य माणसांमधल्या भावभावना या त्याच्यातही असतात. तो सदा सर्वदा विवेकी राहू शकत नाही. त्याचाही एक पिंड असतो.त्याच्याही काही मर्यादा असतात. त्याचीही चिडचिड होते. पण डॉक्टर हा विशेष माणुस असल्याने सर्वसामान्यांच्या त्याच्याकडून वेगळ्या अपेक्षा असतात. त्याचे ओझेही त्यावर येत असते.

In reply to by गवि

गवि, तुमचे प्रतिसाद अतिशय वाचनीय असतात. आधी कधी सांगायचं राहून गेलं असेल कदाचित... मी बऱ्याच वेळा विचार केलेला आहे की नक्की असं वेगळं काय असतं? पण या प्रतिसादांमधून एकदम ते जाणवलं. एखादी गोष्ट तुम्हाला खटकली हेदेखील तुम्ही अत्यंत हळुवारपणे सांगितलेलं आहे. आपल्या कुठल्याही शब्दाने समोरचा माणूस दुखावला जाणार नाही याची काळजी त्यातून दिसून येते. नुसतं तेवढंच नाही, तर दुसऱ्याबाबतचा तुमचा आदर व दुसऱ्याचा तुमच्याबाबतचा आदर याला धक्का पोचू न देता त्यात जवळीक साधून ते नाजूकपणे सांगता. त्यामुळे अर्थातच तुमचं म्हणणं बहुतेकांना पटतं. पूर्णपणे पटलं नाही तरी गवि या माणसाची ही अशी मतं का आहेत याबद्दल वाचणाराच्या मनात निश्चित सहानुभूती निर्माण होते. तुम्ही जेव्हा कोणाशी असहमती दाखवता तेव्हा मला राहून राहून वडिलांनी जवळ घेऊन आपल्या लहान मुलीच्या पायात गेलेला काटा काळजीपूर्वक अल्लदपणे काढून द्यावा तसं चित्र डोळ्यासमोर येतं. तो काटा काढायचा तर असतोच, आणि त्याने किंचित दुखणार असतंच, पण दुखवण्याचा हेतू नाही हे तुम्ही ज्या प्रामाणिकपणाने दाखवता त्यामुळे त्या जखमेवर अपमानाचं ओझं चढत नाही. आंतरजालावर, जिथे आपले शब्द लोकं हत्यारासारखे चालवत असतात (श्रेयअव्हेर पुल - 'पुण्यातले लोक आपली स्कूटर म्हणजे तलवार, दांडपट्टा चालवल्यासारखे चालवतात') तिथे तुम्ही ते सराईत शिल्पकाराच्या छिन्नी हातोड्यासारखे वापरता. त्यामुळे लोकांना तुमचं वाचल्यानंतर 'मला हेच म्हणायचं होतं, पण इतक्या चांगल्या शब्दात मला म्हणता आलं नसतं' असं राहून राहून वाटतं.

In reply to by राजेश घासकडवी

आंतरजालावर, जिथे आपले शब्द लोकं हत्यारासारखे चालवत असतात (श्रेयअव्हेर पुल - 'पुण्यातले लोक आपली स्कूटर म्हणजे तलवार, दांडपट्टा चालवल्यासारखे चालवतात') तिथे तुम्ही ते सराईत शिल्पकाराच्या छिन्नी हातोड्यासारखे वापरता. त्यामुळे लोकांना तुमचं वाचल्यानंतर 'मला हेच म्हणायचं होतं, पण इतक्या चांगल्या शब्दात मला म्हणता आलं नसतं' असं राहून राहून वाटतं.
सहमत आहे. त्यामुळे बर्‍याचदा मूळ लेखातल्या आख्यानापेक्षा, हे 'नचिकेताचे उपाख्यान' अधिक वाचनीय आणि चिंतनीय ठरतं :)

In reply to by गवि

गवि आणि पेठकर साहेब जे रुग्ण जाडी वाढताना सुरुवातीला येतात त्यांना मी फुकट बराच सल्ला देतो आणी योग्य आहार तज्ञाकडे नेहेमी पाठवतो. कारण लठ्ठ पणा हा मुलाचा आत्मविश्वास डळमळीत करतो आणी त्यामुळे मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम करतो हे मला चांगले माहित आहे (यावर कधीतरी वेगळा लेख लिहिण्याचा विचार आहे). लठ्ठ पणा चे दोन प्रकार आहेत एक म्हणजे पैथोलोजीकल ओबेसिटी आणि दुसरा म्हणजे अति खाण्यामुळे ( अति लाडाचा परिणाम सुद्धा) पहिल्या प्रकारातील लठ्ठ पणाची टोकाची उदाहरणे मी बरीच पहिलेली आहेत. लठ्ठपणावर शल्यक्रिया करणाऱ्या गटाचा मी एक भाग होतो तेंव्हा. ज्यात सर्वात जास्त वजन २३७ (दोनशे सदतीस फक्त)सुद्धा पाहिलेले आहे. हा प्रकार आणि दुसरा यात फरक आहे हे मला व्यवस्थित पणे माहित आहे.BARIATRIC SURGERY याचे किती इतर दुष्परिणाम आहेत हे मला चांगले माहित आहे आणी लठ्ठपणा आणी त्याचे मानसिक परिणाम हेही मला माहित आहेत. पण आठवीतील मुलगी हट्ट करते म्हणून रोज वेफर विकत घेऊन देणारे पालक किंवा चार वर्षाची मुलगी रडते म्हणून रोज कुरकुरे देणारे आजोबा मला आजही समजता येत नाहीत. एवढेच कि मी त्यांना तोंडावर बोलत नाही. वरील उदाहरणात त्या मुलीचे आई आणि वडील दोघेही माझ्या दवाखान्यात आलेले होते आणि दोघेही लठ्ठ नव्हते त्यामुळे तिला अनुवांशिक लठ्ठ पणा नक्कीच नव्हता. आईचे म्हणणे होते कि लहानपणी ती बारीक होती आताच (तीन वर्षात) ती जाडी झाली आहे. आपल्या मुलीची उंची जेमतेम पाच फुट आहे आणी तिचे वजन पंधराव्या वर्षी जास्तीत जास्त पन्नास किलो असायला पाहिजे पण ते शहाण्णव किलो आहे म्हणजे ब्याण्णव टकके जास्त आहे हे त्यांना इतके महिने जाणवले नाही? हे मान्य करणे जरा कठीण आहे. तिथे सुद्धा तिचे वडील सांगत होते कि तिला रोज एक लेज चं पाकीट लागतच. आता अशा लाड करणाऱ्या पालकांचे मी काय करणार? तीन वर्षे तिचे वजन वाढत होते तोवर काहीच केले नाही आणी आता जेंव्हा pcos मुळे पाळी उशिरा आली तेंव्हा ते जागे झाले. दुर्दैवाने आजही चांगल्या आहार तज्ञाकडे जायची त्यांची मनोवृत्ती दिसत नव्हती. शेवटी हे लोक लग्नाचे वय झाले कि जागे होतात. कारण लग्नाच्या "बाजारात" किंमत अतिशय पडून येते. (हीच परिस्थिती दातांच्या बाबतीत दिसते जोवर वाढीचे वय असते तोवर दात जास्त सहज सरळ होतात (१ ८ ते २०) . पण एकदा २२ -२४ वय झाले कि ते तितके सोपे राहत नाही आणी मग लोक दाताच्या डॉक्टर कडे घाई करतात) पोरांचा लठठपणा म्हणजे ऐदीपणे आणि वेळेवर पोरांना चांगले पळायबिळायला न लावल्याने अन पालकांच्या दुर्लक्षामुळे झालेला एक फाजील फुगवटा अशी समजूत सामान्यजनांत दिसतेच. यासाठी खालील दुवा पाहावा(असे अनेक दुवे गुगल वर सापडतील) http://fitbandits.com/laziness-is-the-top-cause-of-obesity-in-india/

In reply to by सुबोध खरे

आठवीतील मुलगी हट्ट करते म्हणून रोज वेफर विकत घेऊन देणारे पालक किंवा चार वर्षाची मुलगी रडते म्हणून रोज कुरकुरे देणारे आजोबा मला आजही समजता येत नाहीत. एवढेच कि मी त्यांना तोंडावर बोलत नाही.... ..तिथे सुद्धा तिचे वडील सांगत होते कि तिला रोज एक लेज चं पाकीट लागतच. आता अशा लाड करणाऱ्या पालकांचे मी काय करणार?
१०० टक्के पालकांची चुक आहे. पोषणमुल्य, उष्मांकांची गरज आणि सेवन ह्या विषयी पराकोटीचे अज्ञान. आणि मी म्हणतो तसे 'सुबत्तेचे बळी' ही त्यांची चुक आहे. पण सर्व पालकांचे असे नसते. ते कानीकपाळी ओरडत असतात पण मुलं कान बंद करून बसली असतात. जेंव्हा एखादी, अवास्तव वजनसंबंधी, व्याधी डोके वर काढते तेंव्हा लोकं डॉक्टरांकडे धावतात. पण आधी त्यांनी कांहीच प्रयत्न केलेले नसतात असे नाही. अशा समस्यांमध्ये, सरसकट सर्व पालक, 'गोट्या खेळत बसलेले नसतात' एवढेच मला म्हणायचे आहे. जेंव्हा माणसाकडे ज्ञान असते पण उपाययोजना करायला माणूस टाळाटाळ करीत असतो त्याला 'हलगर्जीपणा' म्हणता येईल.
जोवर वाढीचे वय असते तोवर दात जास्त सहज सरळ होतात (१ ८ ते २०) . पण एकदा २२ -२४ वय झाले कि ते तितके सोपे राहत नाही
हे सर्वसामान्यांमध्ये किती टक्के लोकांना माहित असते? शेवटी अज्ञान हेच ह्या समस्येचे मुळ आहे. मलाही हे ज्ञान आज प्राप्त झाले. माझ्या मित्राची मुलगी ६वीत आहे. अतिशय सुंदर आहे. तिचे दात पुढे (थोडेसेच) आहेत. त्यांनी तिला दंतवैद्यास दाखवावे असे मी त्यांना अनेकदा सांगितले आहे. त्यांना ते पटते पण ते तेवढे गंभीर वाटत नाहीत. आता ही नवीन माहीती मला तुमच्याकडून मिळाली आहे ती वापरून मी त्यांच्यावर दबाव आणू शकेन. मुलगी तर अजून लहान आहे. डॉक्टरच्या नांवनेच घाबरते आहे. Stitch in time saves Nine. ही उक्ती रोजच्या आयुष्यात अंगी बाणविली तर खुपशा समस्या टळतील.

In reply to by गवि

खूप प्रयत्न करुनसुद्धा तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होतो हे वाचून वाईट वाटले. तो एक आजार आहे किंवा अनुवांशिक आजार आहे हे विधान तुमच्या केसपुरते मान्य करु शकतो. पण चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठ झालेले बहुसंख्य लोक लठ्ठपणा हा आनुवंशिक आहे किंवा तो आजार आहे अशी कारणे पुढे करतात हेदेखील तितकेच खरे आहे. त्यामुळे डॉक्टरांचे मत तितकेसे चुकीचे वाटले नाही.

समजत असते सगळ्यांना सगळे ! पण सांगायचे मात्र डॉक्टरांनी !