सार्वजनिक उत्सव "मूळ उद्देशापासून" बाजूला पडत आहेत का?
अनेकदा अनेक चर्चांमध्ये सार्वजनिक उत्सव आणि त्यांचे महत्त्व वगैरेवर मतांचा गलबला वाचनात येतो.
नुकतेच मिपावरही वारी या विजुभाऊंच्या धाग्यात ते म्हणतातः
गणपती उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ उद्देश बाजूस राहील आणि भलतेच रूप घेवून उत्सव खंडणी बहाद्दूर / व्यापारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी पर्वणी बनला आहे.जनजागृती हा उत्सवांचा उद्देश कधीच मागे पडला आहे.प्रतिसादांतही काहींनी सार्वजनिक उत्सव त्यांच्या मूळ उद्देशापासून बाजुला पडत आहेत असे म्हटले आहे. या निमित्ताने गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवांच्या मुळ उद्देशाकडे पुन्हा पाहवे असे वाटल्याने हा धागा काढतो आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास आणि त्यामागे टिळकांचे असलेले उद्देश वगैरेवर आपण अनेकदा एका दृष्टिकोनातून पाहिले आहे. मात्र एका बाबतीत एकमत व्हावे की टिळकांचे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागे असलेले उद्देश हे जितके "राजकीय" होते तितके ते सामाजिक नव्हते. या उत्सवांचा उद्देश प्रामुख्याने राजकीय कसा होता हे स्पष्ट करायला टिळकांच्या या सार्वजनिक उत्सवांच्या आधी भारतात राजकीय परिस्थिती कशी होती याचा (किमान अतिशय धावता) आढावा घेणे अगत्याचे ठरेल. त्यावेळी भारतात दूरवर पोचलेल्या (पॅन इंडीया प्रेझेन्स) भारतीय संघटनांची यादी करायची म्हटली तर काँग्रेस या एका नावापाशी यादी संपेल. त्यावेळी काँग्रेसमध्ये मवाळ पंथीयांचा बोलबाला होता. गोपाळ कृष्ण गोखले आदी मवाळ नेत्यांनी सामाजिक सुधारणेला बळकटी आणि प्राथमिकता देण्याचे धोरण अवलंबिले होते. अर्थातच भारतीय समाज हा विखुरलेला होता व त्यांना एका धाग्याने बांधता यावे असे समान सूत्र मिळणे काँग्रेसला जड जात होते. अश्या वेळी टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरू केला आणि त्याचे परिणाम दूरगामी आहेत. त्याची मूळ उद्देशे कोणती असावीत असा अंदाज केल्यास पुढिल उद्देश लक्षात येतो: -- एका राजकीय विचारधारेमागे (जसे इंग्रजांविरूद्ध लढा देण्यासाठी) जनतेला एकत्र जमविणे. -- विविध प्रश्नांवर जनमत ढवळून काढून असंतोषाला वाचा फोडणे -- समारंभाला धार्मिक रूप दिल्याने पक्षाचा प्रभाव अधिक खोलवर पोहोचवत संघटनात्मक बळकटी आणणे आणि त्यायोगे राजकीय कार्यकर्ते तयार करणे. -- त्यायोगे नवे रोजगार निर्मिती होऊन जनमत पक्षाच्या बाजूने वळणे काही परिणामः (हे परिणाम अपेक्षित होते की नाही सांगता येणार नाही पण टिळकांसारख्या मुत्सद्याने याचा विचार केला नसण्याचे कारण दिसत नाही) -- बहुसंख्य भारतीयांना जोडणारा धार्मिक (हिंदू) धागा तयार झाला. (व अर्थातच धार्मिक आधारावर राजकीय दुफळीची बीजेही रोवली गेली) -- समाजमन हे सामान्यतः ठोस कार्यक्रम देणार्या अग्रेसीव्ह नेतृत्त्वाकडे झुकते. सार्वजनिक उत्सवांची सुरूवात झाल्यावर मवाळ पंथाचा प्रभाव आणि व्याप्ती दोन्ही घटू लागले. -- भारतीय राजकारणात टिळक आणि त्यायोगे जहाल पंथीयांचे वर्चस्व निर्माण झाले. -- अधिक जनमताच्या पाथिंब्यामुळे काँग्रेस हा इंग्रजांना टक्कर देणारा पक्ष म्हणून मान्यता पावत असल्याने अर्थातच पक्षाला मिळणारी अनुदाने, कार्यकर्ते यांच्यात वाढ झाली तसेच काँग्रेसची आर्थिक तब्येतही सुधारली. अनेक सामाजिक सुधारणांबद्दल टिळकांची कधी तटस्थ तर क्वचित प्रसंगी प्रतिगामी म्हणता येतील अशी मते प्रसिद्ध आहेत. तेव्हा तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहता त्यांचा मुख्य उद्देश समाजसुधारणा होता असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मात्र या उत्सवांमुळे झालेले परिणाम बघता तो खचितच 'राजकीय' होता असे म्हणता यावे. अजूनही बहुतांश गणेशोत्सव मंडळे ही राजकीय पक्षांच्या आशिर्वादाने चालतात. किंबहुना ही मंडळे राजकीय कार्यकर्ते, नेते घडवण्याच्या प्रयोगशाळा / कार्यशाळा समजल्या जातात. या सणांमध्ये आता दहिहंडी आदी सणांचीही भर पडली आहे. आता सध्याचे स्वरूप काय आहे ते बघुया: -- एका राजकीय विचारधारेमागे जनतेला एकत्र जमवण्याचा प्रयत्न होतो. (आता त्यावेळी इंग्रजांनी गणेशोत्सवात भाग घेऊन, मंडप उभारून, त्यांचे म्हणणे मांडणारे देखावे केले असते, त्यांच्या बाजूने भाषणे देणार्यांना पैसे दिले असते तर काय झाले असते? असाही विचार मनात येतो ;) ). -- विविध सामाजिक प्रश्नांवर जनमत ढवळून काढणे व प्रसंगी असंतोषाला वाचा फोडणे. -- पक्षाचा प्रभाव अधिक खोलवर पोहोचवत संघटनात्मक बळकटी आणणे आणि त्यायोगे राजकीय कार्यकर्ते तयार करणे. -- खंडणी उकळणे, व्यापार करणे वगैरे वगैरे. आता मूळ उद्देशापासून गणेशोत्सव किंवा तत्सम सार्वजनिक उत्सव दूर गेले आहेत का? तर तसे वाटत नाही. सर्व क्षेत्रांप्रमाणे याही क्षेत्रात काही अपप्रवृत्ती जरूर शिरल्या आहेत. अनेक ठिकाणी या उत्सवाचे स्वरूप काळानुसार आधुनिक झाले असेल मात्र मुळ राजकीय उद्देशांपासून फार बाजूला पडले आहेत का? अजूनही उत्सव "राजकीय"च आहेत असे दिसते की आता हे उत्सव राजकीय राहिले नसून तसा केवळ आभास निर्माण होत आहे? तुम्हाला काय वाटते?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हो
उत्सव स्वरुप ही समूहाची गरज
मूळ उद्देश तसंही काहि कामाचे नाहित.
उत्सवांचा जो सामाजीक
+१
चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीचे
-
लेख आवडला
आभार
ओह!
स्वार्थी राजकारणी.
टिळकांचे सार्वजनिक गणेशोत्सव
सार्वजनिक गणपतींचे पूर्वी
सहमत आहे