मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दम आलू काश्मिरी

रेवती · · अन्न हे पूर्णब्रह्म
मंडळी, सध्या या विभागात आपण काश्मिरी पदार्थांचा आस्वाद घेत आहोत. 'दम आलू काश्मिरी' हा पदार्थ देण्याचे ठरवले तेंव्हा पदार्थाची जी चव जिभेवर होती त्यापेक्षा मूळ पदार्थ वेगळ्याप्रकारे कसा केला जातो हे लक्षात येण्यासाठी बर्‍याच पाककृती जालावर व पुस्तकात पाहिल्या. मूळ 'दम आलूच्या' अगदी जवळ जाणारी कृती शेफ संजीव कपूर यांची आहे. त्यात गरजेनुसार थोडेफार बदल करून कृती येथे देत आहे. साहित्य: छोटे बटाटे ४०० ग्रॅम, १ टेबलस्पून बडीशेपेची पूड, १ टेबलस्पून काश्मिरी मिरचीचे तिखट, एक टीस्पून सुंठपूड, मध्यम वाटीभर दही, २ वेलदोडे, तीन लवंगा, इंचभर दालचिनीचा तुकडा, ४ मिरे, फोडणीसाठी शहाजिरे व हिंग, मीठ, बटाटे तळण्यासाठी तेल, पाणी. कृती: बटाटे न फुटतील असे उकडून घ्यावेत. तळणी तापत घालावी. बटाटे सोलून तळून घ्यावेत. आता कढईत फोडणीसाठी अगदी चमचाभर तेल घ्यावे. शहाजिरे व हिंगाची फोडणी करावी. चमचाभर पाणी घालावे म्हणजे फोडणी जळणार नाही. नंतर तिखट, अख्खे मसाले, बडीशेपेची पूड, सुंठपूड घालून परतावे. वाटीभर दही घालून तेल सुटेपर्यंत परतावे. मीठ घालावे. आता त्यात दोन कप पाणी घालून उकळी येऊ द्यावी. नंतर तळलेले बटाटे सोडावेत. झाकण ठेऊन १५ मिनिटे मध्यम आचेवर भाजी उकळू द्यावी. चविष्ट दम आलू काश्मिरी तयार आहे. a टीपा: १) मूळ कृतीमध्ये ५०० ग्रॅम बटाटे घेतले आहेत, जे मसाल्याच्या मानाने मला जास्त वाटले म्हणून येथे ४०० ग्रॅम घेतले आहेत. २)दही थोडे जास्त घेऊन चव आवडली म्हणून मूळ कृतीपेक्षा जास्त घेतले आहे. ३)बटाटे घातल्यानंतर १५ मिनिटे उकळणे आवश्यक आहे. त्याने चव जास्त चांगली आली. तळलेल्या बटाट्याचे तेल भाजीत येते व भाजी तेलकट वाटते म्हणून फोडणीसाठी तेल थोडे कमी घ्यावे. ४)गोल बटाटे मिळत असल्यास वापरावेत. मला ते मिळाले नाहीत. मोठ्या बटाट्यांच्या फोडी करूनही आपण वापरू शकतो.

वाचने 65007 वाचनखूण प्रतिक्रिया 43

श्रीरंग_जोशी Wed, 05/01/2013 - 07:45
दम आलू बरेचदा विवाह सोहळ्यांतील स्वरूची भोजनात खायला मिळतात. पण मोठ्या प्रमाणात बनत असल्यामूळे बरेचदा उकडलेल्या बटाट्यासारखी चव लागते म्हणून मला कधी फारशी आवड निर्माण झाली नाही. सदर पाकृ मात्र रोचक दिसत आहे. फोटो बघून तोंडाला पाणी सुटले.

प्रभाकर पेठकर Wed, 05/01/2013 - 09:58
वॉव! अतिशय चविष्ट पाककृती आणि आकर्षक छायाचित्र. अभिनंदन. दम आलू काश्मिरीच्या अनेक पाककृती आहेत. माझी पद्धत थोडी वेगळी आहे. पण आता ही पाककृतीही नक्कीच शिकून घेईन.

अनन्न्या Wed, 05/01/2013 - 10:48
मी पण वाचलेय कॄती पण बटाटा फारसा आवडत नाही घरच्याना! आणि त्याला मीठ वगैरे लागेल का असे वाट्ते. बाकी तुझी भाजी बघून करण्याचा मोह होतोय!

सस्नेह Wed, 05/01/2013 - 11:07
लहान बटाटे बाजारात खूपदा पाहिलेत पण त्याचं काय करायचं माहित नव्हतं . आता दम आलू करून बघते. या भाजीला ग्रेव्ही जास्त दिसत नाही. आमच्याकडे ग्रेव्हीच जास्त लागते.

दिपक.कुवेत Wed, 05/01/2013 - 11:27
छान आहे कि सोपी, सुटसुटित आणि पटकन होणारी पाकॄ. असं एकलय कि तळलेले आख्खे बटाटे ग्रेव्हित घालण्याआशी फोर्कने टोचे मारुन सोडावेत जेणेकरुन मसाला/ग्रेव्हि पार आतपर्यत मुरते.

In reply to by दिपक.कुवेत

प्रभाकर पेठकर Wed, 05/01/2013 - 12:52
फोर्कने टोचे मारुन सोडावेत
बरोबर. बटाटे तेलात न तळता तुपात तळल्यास जास्त चांगली चव येते. तळण्याआधी फोर्कने टोचे मारावेत आणि तळताना मधे मधे पाण्याचा हबका मारावा म्हणजे तुप आत शिरुन बटाटा आंत पर्यंत 'तळला' जाऊन जास्त चविष्ट होतो.

In reply to by दिपक.कुवेत

गणपा Wed, 05/01/2013 - 12:53
तळलेले आख्खे बटाटे ग्रेव्हित घालण्याआशी फोर्कने टोचे मारुन सोडावेत जेणेकरुन मसाला/ग्रेव्हि पार आतपर्यत मुरते.
असेच म्हणतो. फोटो टेंम्टींग आहे आणि पाकृ ही सुटसुटीत, मस्त :)

इरसाल Wed, 05/01/2013 - 12:22
बटाटा म्हणजे जीव की प्राण,कुठल्याही भाजीत, पदार्थात अवढच काय मटण्/चिकन मधेही टाकतो. माझ्या मुलीला आवडणारी एक छोटीशी रेसेपी. बटाटे किसुन घ्यावे, नॉनस्टिक पॅन मधे थोडेसे बटर टाकुन सगळ्या तळाला लागेल असे फिरवावे.मग त्यात हे किसलेले बटाटे टाकुन त्यावर चवीनुसार मीठ टाकुन झाकण ठेवावे. व्यवस्थित शिजले की झाकण काढावे वरची बाजु फिक्कट पांढुरकी व खालील बाजु सोनेरी व कुरकुरीत होते खाण्याअगोदर त्यावर पिझ्झावर टाकतो ते ओरॅगअ‍ॅनो टाकुन खावे.

स्पंदना Wed, 05/01/2013 - 12:24
व्वाह!! अग सांगायच राहिले, तुझी मेथीगोळे करुन पाहिली अगदी मस्त झाली. एक मिपाकर फॅमीली होती नेमकी त्या दिवशी. सगळ्यांना आवडली. आता हे पण करुन पहाते.

मस्त कलंदर Wed, 05/01/2013 - 14:08
मस्त दिसताहेत दम आलू. मी कोणतीही पाकृ करताना तिचे चार-पाच प्रकार वाचते आणि मला जे पटेल ते तसे फ्युजन करते. मी एके ठिकाणी बटाटे तळण्याऐवजी मायक्रोवेव्ह मध्ये टोचे मारून वफवून घेतले तरी चालतील असं लिहिलं होतं. तो प्रकारही चवीला चांगला झाला होता.

Mrunalini Wed, 05/01/2013 - 14:56
मस्त्च रेवती.... एकदम सही दिसतायत दम आलु... मला बटाटा जास्त आवडत नाही, त्यामुळे कधी करुन नाही बघितली आणि कधी खाल्ली पण नाहिये. फोटो बघुन एकदा ट्राय करायला पाहिजे वाटते. :)

अभ्या.. Wed, 05/01/2013 - 15:00
अरेवा रेवतीतै. मस्तच. अशी बिनकांद्याची अन गवताळ रेशिपी आली की मन असं भरुन येतं की बस्स. :) लै भारी एकदम. धन्यवाद.

बॅटमॅन Wed, 05/01/2013 - 17:48
फटू अन वर्णन तितकेच चविष्ट!!!! लय भारी. एक तद्दन अज्ञानी प्रश्नः ह्या डिशचे नाव दम आलू आहे, बर्‍याचदा आलू का दम या नावानेही बटाट्याची भाजी मिळते. तिच्यात अन हिच्यात नक्की फरक काय असतो म्हणे?

पैसा Wed, 05/01/2013 - 18:09
सोपी सुटसुटीत पाकृ. काश्मिरी पदार्थांमधे बडिशेप आणि सुंठपूड असे सौम्य मसाले असतात आणि ते पदार्थ अतिशय चविष्ट असतात.

रेवती Wed, 05/01/2013 - 18:13
आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद मंडळी! मनोज जोशी, उपहारगृहात मिळणारा दम आलू जरा गोडसर आणि ग्रेव्हीवाला असतो. ही भाजी तयार झाल्यावर तुम्हाला पडले ते सगळे प्रश्न मलाही पडले पण चव छान, मसालेदार होती. दिपकजी, पेठकरकाका, गणपा, बटाटे तळण्याआधी फोर्कने टोचून घेतात पण हे बटाटे अगदी छोटे होते म्हणून तसेच तळले. श्रीरंगपंत, या मसाल्यात ५०० ग्रॅम बटाटे घातले असता भाजी बेचव लागली, म्हणून त्याचे प्रमाण बदलून ४०० ग्रॅ. केले. दही थोडे वाढवले. बॅटमॅन, आलू का दम हे नाव पहिल्यांदाच ऐकते आहे. ही भाजी शाही करण्याची एक पद्धत आहे. त्यात थोडे मोठे बटाटे उकडून, पोखरून, आत नटस् व खव्याचे/पनीरचे सारण भरतात. सर्वांचे पुन्हा एकदा आभार. रामदासांचे स्पेशल आभार. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे धाग्याला शोभा आलीये. ;)

In reply to by रेवती

बॅटमॅन Wed, 05/01/2013 - 18:18
माहितीकरिता धन्यवाद :) मी खाल्लेला आलू का दम म्हंजे स्टफ्ड बटाटा नव्हता. तुम्ही दिलेल्या डीटेलनंतर लक्षात आले.

छानचं दिसातायेत दम आलू . मला बटाटा खूप आवडतो व पाकृ पण सोप्पी दिसतेय त्यामुळे ह्या पध्दतीने करून बघेन. फोटो ही सुरेख गं :)

खादाड Wed, 05/01/2013 - 18:30
आज कामगार दिवसाच्या निमीत्ताने करुन पाहुन खाण्यात आला !! छान जमला !!

धनुअमिता गुरुवार, 05/02/2013 - 12:25
तोंपासु........... कधी केली नाही, पण आता करुन बघणार.फोटो हि खुप सुंदर आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/30/2013 - 09:07
पदार्थाला 'दम देणे' म्हणजे पातेल्यावर झाकण ठेवून त्यावर जड वजन ठेवून अथवा झाकण कशाने तरी (जसे: कणीक) घट्ट बंद करून अगदी मंद आंचेवर, आंत कोंडलेल्या वाफेवर, पदार्थ शिजविणे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 05/30/2013 - 09:14
बर्‍याच वर्षांचे अज्ञान दूर झाले. म्हणल की विचाराव एकदा. फार तर काय होईल लोक अज्ञानाला हसतील मनातल्या मनात. आत्ताच एक प्यांपलेट आले होते पेपर सोबत त्यात होम डिलिव्हरीत पाठवायच्या अगोदर दम लावून पाठवली जाईल असे लिहिले होते.