Skip to main content

काश्मिरी फिरनी (फिरुन)

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 24/04/2013 05:57 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मिरी फिरनी वुईथ लिटल ट्विस्ट :) . साहित्यः १ लिटर दूध १/४ वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून २-३ तास भिजवणे १/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १०-१२ भिजवलेले बदाम, सालं काढून १ टीस्पून वेलचीपूड पिस्त्याचे काप व केशर सजावटीसाठी खायचा चांदीचा वर्ख (ऐच्छिक) रोझ एसेन्स किंवा रोझ वॉटर (गुलाबजल) असल्यास जरूर घाला, माझ्याकडे नव्हते म्हणून नाही घातले. . पाकृ: भिजवलेले तांदूळ व बदाम एकत्र मिक्सरला लावून भरडसर वाटून घ्यावे. दुध उकळायला ठेवावे, दुधाला उकळी आली की त्यात भरडसर वाटलेली तांदूळ-बदामाची पेस्ट घालावी. मध्यम आचेवर तांदूळ शिजेपर्यंत सतत ढवळत रहावे. दुध हळू-हळू दाट होऊ लागेल. त्यात साखर घालून ती विरघळेपर्यंत ढवळावे. दुध कस्टर्ड्सारखे दाट झाली की त्यात वेलचीपूड, पिस्ते व केशर घालून मिक्स करावे व गॅस बंद करावा. तयार फिरनी वेगळ्या भांड्यात काढून ती रुम टेंपरेचरला थंड होऊ द्यावी. . पारंपारीक पद्धतीने सर्व्ह करायची असल्यास मातीच्या बाऊलमध्ये फिरनी घ्यावी,त्यावर बदाम-पिस्त्याचे काप पेरावे, केशर घालावे व वरून चांदीचा वर्ख लावावा. फिरनी थंडच सर्व्ह करावी. . पण मी इथे वेगळ्या पद्धतीने फिरनी सर्व्ह केली आहे. सर्व्हींग ग्लास मध्ये थोडी फिरनी घालून फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवली. स्ट्रॉबेरी जेलीच्या पाकीटावर दिलेल्या सुचनेप्रमाणे जेली बनवून घेतली. ती हलकी कोमट असतानाच थंड फिरनीवर ओतली व पुन्हा फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवली. सेट झालेल्या जेलीवर व्हिप्ड क्रीम व पिस्त्याने सजावट करुन सर्व्ह केली. आपण नेहमी फ्रुट कस्टर्ड बरोबर किंवा फ्रुट सॅलॅड वुईथ आयस्क्रीमबरोबर जेली सर्व्ह करतो, पण फिरनीबरोबर ही जेलीचे कॉम्बिनेशन सुरेख लागले :) .

वाचने 68237
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

सुरेख रेसिपी. क्यूटच दिसतीये फिरनी. स्ट्रॉबेरी जेलीमुळे आकर्षक आलेत फोटू. आता मात्र मी हा पदार्थ करणारच! अन्नपूर्णे, तुझे कौतुक करण्यासाठी नवे शब्द शोधायला हवेत!

हे घरात बनवलय? शक्यच नाही. मी हे अस काही इतक आकर्षक घरात बनवल तर घरातले एका सुरात " हम कहाँ है?" असं विचारतील.

फिरनी मस्तं दिसते आहे. पण, मला पारंपारिक पद्धतीने सादर केलेली, ती मातीच्या कटोरीतलीच आवडते. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

फिरनी मस्तं दिसते आहे. पण, मला पारंपारिक पद्धतीने सादर केलेली, ती मातीच्या कटोरीतलीच आवडते. असो. अगदी बरोबर पण काही वेळेला एखादा पदार्थ वेगळ्या पध्दतीने सादर्/सर्व्ह केला तर त्याचा स्वाद आणखीन छान खुलून येतो असे मला वाटते. लहान तोंडी मोठा घास घेतेय राग मानू नये....आता नेहमीच्या पध्दतीच्या आमरसात व्हिप्ड क्रिम घालून अगदी वेगळी, उत्कृष्ट पाककृती तुम्ही दिलीत ,नक्कीच त्याचा आस्वाद घेताना आनंद द्विगुणीत होईल ह्यात शंका अजिबातच नाही तसेच ह्या पदार्थाचे आहे साध्याशा दिसणार्‍या फिरनीला एक नवं रुप दिलय इतकेच. मला दोन्ही प्रकारे आवडते....शेवटी प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे बनवावी :) प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

In reply to by सानिकास्वप्निल

साध्याशा दिसणार्‍या फिरनीला एक नवं रुप दिलय इतकेच.
सहमत आहे. आमरसात व्हिप्ड क्रिम मिसळून सादर केलेल्या पाककृतीसही अनेक नापसंतीदर्शक प्रतिसाद आले आहेतच की. जसे, आमरस मिक्सर मधून फिरविणे किंवा आमरसात कांही मिसळणे अनेकांना पसंद नाही. चालायचेच. व्यक्ती तितक्या प्रकृती. 'लहान तोंडी मोठा घास' वगैरे काही नाही. मिपावर सर्व सारखे आहेत. उगीच अशा कांही विधानांनी मला संकोचवू नका आणि मखरातही बसवू नका.

सनिका तुम्ही या ज्या पाककृती करता त्या चांगल्या तर असतातत पण आपण पर्फेक्शनीस्ट आहात हेही यातून कळते. एकदा, एखाद्यावेळी असे करणे हा उत्साहाचा भाग असू शकतो पण कायम सातत्याने अशा पाककृती करणे व त्याचे एवढे चांगले सादरीकरण सातत्याने करणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे.

In reply to by जयंत कुलकर्णी

जयंत काका, बहुतेक मिपाकरांच्या मनातलं तुम्ही एकदम नेमक्या शब्दांत लिहिलंत.. केवळ परफेक्शन.. आणि त्या पाककृतींइतकंच जीवघेणं छायाचित्रण.. दर वेळी.. शेवटचा फोटो मग तो गोड पदार्थ असो, स्नॅक आयटेम, मसालेदार सामिष आहार किंवा अगदी परंपरागत शेवटचा फोटो म्हणजे केवळ अप्रतिम!! दंडवत सानिकातै --/\--

In reply to by सुधीर

खरचच अन्नपुर्णा आहेस तू...!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

पण मी इतके बारीक नक्षीकाम करत बसण्यापेक्षा तू भारतात कधी येणारेस त्याची वाट बघीन.

अप्रतिम सादरीकरण...सानिकाताई...तुमच्या पाककृती मी नेहमीच लक्ष देऊन वाचते..थोड्या हटके असतात..पण जबराट असतात...असह्य अश्या उन्हाळ्यात ही फिरनी म्हणजे काश्मीर दर्शनच...सुरेख

आई आई गं..... फिरनी ही लागली जीवा ;-) जबरदस्त पाककृती आणि सादरीकरणाबद्दल आता बोलायला शब्द नाहीत ... :) :)

रोझ एसेन्स किंवा रोझ वॉटर (गुलाबजल) असल्यास जरूर घाला, माझ्याकडे नव्हते म्हणून नाही घातले.
हे शक्य नाही.. तुमच्या कडे नाही?? असं कसं होईल गुरुमाते..!! (आज पासुन तुम्हाला गुरुमाते च म्हणणार..!! आपला फोटो पाठवुन द्यावा.. देवघरात अन्नपुर्णेच्या बाजुला ठेवण्यात येईल..)

पुन्हा तेच, तुमचं कवतीक करायला माझी शब्दसंपदा थिटी पडते. शेवटचा फोटो अप्रतिम आहे. पण तरीही कुल्हडमधली थंडगार फिरनी बेस्ट.

मला फिरनी दिसलीच नाहि, फोटो पाहिलेच नाहि आणि जळजळ तर त्याहुन झाली नाहि. पन हाय हात फिरुन फिरुन माउस कडे वळतोच आणि पहिलाच फोटो पाहुन जीव कासावीस होतो. मी हे नक्कि बनवणार.....

फिरनी फारशी आवडत नाही मात्र सादरीकरणाला ५ तारे!!

काय काकू बाईसारखं किचन एके किचन? स्त्रीपुरुष समानतेच्या या युगात एक शिकलेली मुलगी अशी स्वैपाक घरात अडकून पडते????????? छ्या! तुला बंड नाही करावंसं वाटत????????? एक काम कर. तू दोन शिफ्ट मध्ये नोकरी कर. स्वैपाकघरात (मराठीत किचनमध्ये) जाण्याची अज्जिबात एनर्जी राहिली नाय पायजे! बाहेरुन मागवायचं सगळं. काय?????????? - इनो संपलेला प्यारे

अप्रतिम !!!! दुसरा शब्दच नाहीयेमाझ्याकद्डे . ट्विस्ट फारच आवडला :)

__/\__

मी हे बघून न बघितल्या सारखे करत होतो... पण शेवटी धागा उघडलाच.. धाग्याने निराशा नाही केली... आता तुम्ही एकच काम करा.. जरा एक ४/५ दिवस कुठलीही पा.क्रु. टाकू नका.. नाही त्याचे काय आहे की सध्या मी घरापासून फार दूर राहतो.. हे असे काही बघीतले तर जीव फार कासावीस होतो... थोडी आमची पण काळजी घ्या..

अशक्य फोटू आहेत...लाजवाब

भिजवलेले तांदूळ व बदाम एकत्र मिक्सरला लावून भरडसर वाटून घ्यावे.
भरडसर म्हणजे किती भरड वाटायचे? रवा असतो तेवढे की अजून बारीक/जाड ?

In reply to by गौरीबाई गोवेकर

साधारण तांदळाच्या खीरीसाठी वाटतो तसे किंवा तांदळाच्या रव्याइतके बारीक :)

सानिका कशा काय सुचतात या कल्पना तुला? झकास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!

In reply to by जयवी

जयवीतै ला अशा प्रकारे अभिव्यक्त (हळहळलो एकदम ;)) व्हायला (मुळात प्रतिसाद दिला हे काय कमी असं कोण म्हणतोय रे तो?) भाग पाडणार्‍या मिपा गृहिणी सौ. सानिकातै स्वप्निलराव ह्यांना आमच्या मंडळातर्फे खण नारळ. :)

सानिका ताई, तुमच्या रेसिपीज तर झकासच असतात पण शेवटचे फोटो म्हणजे आहा... :) मी आजच मिपा वर आले पण मिपा आधी पासून वाचत होते आणि तुमच्या रेसिपीज सुद्धा रेफर करत होते [आईला बनवायला सांगण्यासाठी);-)]. आणि फोटो बद्दल काय बोलायच, आमच्या पोटात कावळे ओरडायला सुरुवात होते पण डोळ्यांचं पोट मात्र एकदम खुश होऊन जातं. तुमच्या सगळ्या रेसिपीज साठी धन्यवाद :)