इर्फान-ए-गम
अगदी लहानपणी महिन्यातून एकदा कटींग करायला न्हाव्याच्या दुकानात जायला लागायचेच. अर्थात हे वेळ सकाळची असायची. तेथे रेडिओ सिलोनवर जुन्या गीतांचा कार्यक्रम हमखास लागलेला असायचा व त्यात शेवटी स्व. सैगल साहेबांचे गाणे लागायचे. आता त्या कार्यक्रमाचे नाव आठवत नाही........त्यात पहिल्यांदी ही गज़ल स्व. सैगल यांच्या आवाजात ऐकलेली आठवते आहे आणि काहीतरी वेगळे ऐकल्याची भावना जी मनात आली ती आजही मनातून जात नाही. माझे आजोबा पखवाज उत्तम वाजवायचे व त्यांना संगिताची उत्तम जाण होती. मला वाटते त्यांना थोडेफार फारसीही यायचे. घरी आल्यावर मी त्यांना पहिल्या दोन ओळींचा अर्थ विचारल्यावर त्यांनी मोठ्या गंभीरपणे मला सांगितले, ‘तुला तो आत्ता कळायचा नाही...आणि जरा अभ्यासात लक्ष द्या’ आजोबांनी अहोजाहो केल्यावर गप्प बसायचे असते एवढे कळण्याइतके मला वाटते माझे वय असावे. असो....कॉलेजमधे गेल्यावर मात्र एखादी हवी असलेली वस्तू समोर आल्यावर काय त्रास होतो ते कळायला लागले नंतर पहिल्या दोन ओळींचा अर्थही चांगलाच कळला व काहीच वर्षांनी सगळ्या ओळींचा...
स्व. कुंदनलाल सैगल यांच्या आवाजात काय जादू आहे ते कळत नाही. जख्म-ए-दिल चिरके सिने से फेंक दे ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. ही गज़ल लिहिणारे थोर आणि म्हणणारेही थोर. काय म्हणतोय सिमाब............
अब क्या बताऊ मै तेरे मिलनेसे क्या मिला
इर्फान-ए-गम हुवा मुझे दिल का पता मिला.
तु मला भेटल्यावर माझा काय फायदा झाला ते कसे सांगू ? माझ्यात आता प्रचंड बदल झालेला दिसतोय तो तुझ्यामुळेच....
"वेदनांचा" माझा अभ्यास झाला आहे आणि त्या जेथे होतात ती जागाही मला माहीत झाली आहे - माझे ह्रदय !
जब दूर तक ना कोई फकीर आशना मिला
तेरा नियाझ मंद तेरे दरसे जा मिला.
या माझ्या आयुष्यात मला माझ्या ओळखीचा, आवडीचा, मला समजाऊन घेणारे कोणी भेटलेच नाही.
त्यामुळे एखाद्या आज्ञाधारक भक्ताप्रमाणे मी तुला तुझ्या दरवाजावर गाठले.
मंझ़िल मिली मुराद मिली मुद्दआ मिला
सब कुछ मुझे मिला जो तेरा नक़्श-ए-पा मिला
तु भेटल्यावर माझी इच्छापूर्ती झाली मला स्वर्ग ठेंगणा वाटू लागला.
तुझी सुंदर पावले माझ्या आयुष्यात पडली आणि मला जे पाहिजे होते ते सगळे मिळाले असे वाटू लागले.
या जख्म-ए-दिल को चिरके सिने से फेंक दे
या एतराफ कर की निशान-ए-वफा मिला
पण हाय ! तुला त्याचे काय ? माझे ह्रदय घायाळ करुन तू आता माझ्याकडी बघतही नाहीस. एक तर मला मारुन तरी टाक किंवा माझे प्रेम कुबुल कर !
सिमाब को शगुफ्ता ना देखा तमाम उम्र
कंबख्त जब मिला हमें कम आशना मिला...
आयुष्यात आम्हाला सुख असे लाभलेच नाही.......आम्ही कधी बहरलोच नाही..
हाय रे दैवा आत्ता कुठे वाटले होते की ह बहर वाट्याला येईल पण तेही फार अल्प काळच टिकणार असे दिसते आहे.......
सिमाब अकबराबादी यांचे खरे नाव आशिक हुसेन सिद्दिकी. यांचे घराणे तीनशे वर्षापासून आग्रा येथे स्थायिक आहे.
इस्लामच्या पहिल्या खलिफाचे हे वंशज. त्यांचे घर अजुनही आग्रा येथे काकू गल्ली येथे आहे. सिमाबचे वडीलही एक चांगले उर्दू कवी होते व त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली होती. ते टाईम्स ऑफ इंडियाच्या जयपूर कार्यालयात कामाला होते. हे घराणे जहांगिरच्या काळात बुखाराहून आग्रा येथे स्थायिक झाले होते असे म्हणतात. सिमाबला उर्दू, हिंदी, फार्सी व अरेबीक भाषा चांगल्या येत असत. त्यांनी तर्कशास्त्राचेही शिक्षण घेतले होते. १८९७ साली सिमाबला घर चालवण्यासाठी रेल्वेत नोकरी पत्करायला लागली. १९२२ साली या लोखंडाच्या जगात त्यांचा जीव रमेना व ते आग्र्याला परतले. १८९२ साली त्यांनी गज़ल लिहण्यास सुरवात केली. आर्थिक कटकटींमुळे व विवंचनेमुळे त्यांची पुस्तके व कविता घेऊन ते कराचीला कोणी प्रकाशक मिळतो का हे बघायला गेले व तेथेच ३१ जानेवारी १९५१ रोजी आजारात मृत्यु पावले. त्यांनी केलेले कुराणाचे भाषांतर नंतर तीस वर्षाने प्रकाशीत झाले.
ते गेले पण ‘इर्फान-ए-गम हुवा मुझे दिल का पता मिला.’ या ओळी या दुनीयेत सोडून गेले.....
पूर्ण गज़ल
अब क्या बताऊ मै तेरे मिलनेसे क्या मिला
इर्फान-ए-गम हुवा मुझे दिल का पता मिला.
जब दूर तक ना कोई फकीर आशना मिला
तेरा नियाझ मंद तेरे दरसे जा मिला.
मंझ़िल मिली मुराद मिली मुद्दआ मिला
सब कुछ मुझे मिला जो तेरा नक़्श-ए-पा मिला
या जख्म-ए-दिल को चिरके सिने से फेंक दे
या ऐतराफ कर की निशान-ए-वफा मिला
सिमाब को शगुफ्ता ना देखा तमाम उम्र
कंबख्त जब मिला हमें कम आशना मिला
-सिमाब अकबराबादी..
इर्फान: ज्ञान आशना:, ओळखीचा नियाजमंद: आज्ञाधारक, दर: दरवाजा, एतराफ: स्वीकार, शगुफा: बहर
सैगल यांच्या आवाजात........
स्मजले तसे............
वाचने
3882
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
सुंदर
उत्तम !
क्या बात है
बहुत बढिया
In reply to बहुत बढिया by शरद
अर्थ पटला
In reply to अर्थ पटला by राही
गझल आवडली आणि रसग्रहणही.
मस्त गझल.
मस्त!
किती श्रीमंत, किती सच्च्या
सगळ्यांना धन्यवाद !