Skip to main content

नाटेकर

लेखक गोगट्यांचा समीर यांनी गुरुवार, 28/03/2013 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
नाटेकर , आम्ही सगळे त्यांना नाटेकर म्हणूनच ओळखायचो , त्यांचं नाव माहित करायच्या भानगडीत बहुधा कोणीच कधी पडलं नाही. मी रत्नागिरीचा मूळचा, तिथे आजुबाजूला जमीनीवर खटले हे चालुच असतात. नाटेकर ही तिथलेच . रत्नागिरी च्या बाजुलाच केळ्ये गाव आहे , तिथले सर्वात मोठे खातेदार ,म्हणजे सर्वात जास्त सारा भरणारे, पण तो आहे केवळ कागदावरचा हक्क , प्रत्यक्षात त्यांच्याकडे एक गुंठाही नाही. लहानपणापासून जेव्हा बघत आलोय तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे अनेक पिशव्या दिसत.नंतर कळलं , की यात सर्व खटल्यांची कागदपत्रं आहेत. स्वत:चे खटले चालवता चालवता ते यात इतके तरबेज झाले की ते इतरांचेही कज्जे घेऊ लागले. ते स्वतः खटले चालवतात. पण नाटेकरांची खरी ओळख मला यामुळे नाही झाली , तसंही कोर्टकचेरीतलं अजुनही विशेष कळत नाही , त्यावेळी तर बिलकुलचं नाही. आमचही गाव केळ्ये , तिथे त्रिपूरी पौर्णिमेचा ऊत्सव मोठ्या जोरात साजरा होतो , दिवाळीच्या दरम्यान जी काकडे आरत चालू होते ती त्रिपूरीला संपते, आणि मग त्यादिवशी गावजेवण असे. असाच पहिल्या पंक्तीला बसला असताना, नाटेकर समोर बसले होते,आणि जिलबीचं ताट वाढायला आलं , आग्रह वगेरेच्या भानगडीत न पडता , ते पूर्ण ताट तिथे रिकामं झालं . नाटेकरांची ब-याच जणांना ओळख ह्याचीच होती , खाण्याच्या बाबतीत केळ्ये पंचक्रोशीत त्यांची ख्याती होती.त्यांच पान नेहमी पंगतीच्या कडेला घेतलं जात असे , कारण एका पंक्तीला जो साधारण वेळ लागतो , तो त्यांच्या 'सावकाश ' भोजनाला फार कमी होता , किमान दोन पंगतीना ते सहज साथ देत असंत. साधारण सहा फूट उंची , दाढी वाढलेली ,अंगात एखादा जुनाटसा शर्ट कमरेला लुंगी, हातात ५-६ पिशव्या ज्यात त्यांची कोर्टाची असंख्य कागदपत्रे ,असा एकूण आवेश असे,चेहरा मात्र तरुणपणी देखणा म्हणावा असा होता. नाटेकर आमच्याकडे कसे आले ते आठवत नाही , वडिलांचा स्वभाव तसा भिडस्त , ते कोणाला कधी नाही म्हणाले नाहित,आणि नाटेकर येत राहिले. ते आल्याची वर्दी लगेच आत आईला द्यावी लागत असे, ते जेवायला थांबणार असले तर त्याकाळात देखील स्वयंपाकाचा परत आढावा घ्यावा लागत असे. पण जेवणात त्यांची खोडी नसे मात्र भरपूर असावे हा एकाच निकष , मग नुसता दही भात असो की किंवा मसाले भात , एकाच गोडीने तो खाल्ला जाई . ते चहा मात्र पीत नसत, त्यामुळे नाटेकर आले कॉफी हमखास बनत असे. नाटेकर यायचे ते कोणती तरी बातमी घेऊन -'आज अभ्यंकराकडे गेलो होतो शिरगावातल्या , तिथे ऐकले की सुमन काकूंची तब्बेत जरा बिघडली आहे ' , असे त्यांचे बोलणे चालू होत असे. त्यांना बोलायची फार आवड होती .विषय कोणताही असो ते आपले मत मांडत असत. संपूर्ण पंचक्रोशीतली गावांची त्यांना माहिती होती ,तिथल्या सगळ्या घडामोडी ठाऊक होत्या त्यामुळे गप्पांना कमी नव्हती ,त्यातून नाटेकर म्हणजे नात्यात रमणारा माणूस. त्यांची नाती लक्षात ठेवण्याची लकब अजब होती . "काल खेरांकडे गेलो होतो, माधव खेर म्हणजे माझ्या आईच्या चुलत मावशीचा मोठा मुलगा" . असे ते बोलले की मी ते नाते जोडायला चालू होत असे. स्कॉलाराशिपच्या परीक्षेला याचा चांगला फायदा झाला . त्यांना सर्वच नाती जवळची वाटत असत . आणि ओळखीच्या गावातला माणूस म्हणजे नात्यातलाच माणुस असेच ते मानत असत. गावतील अनेक माणसांचा तोंडी परिचय मला नाटेकरांमुळे झाला . कोणत्याही घरातील जुनी मंडळी नाटेकरांसाठी माहितीचा स्त्रोत होती . "हा बेबी ताई लग्न होऊन सातारयला गेल्या , शिरीष आणि माधव म्हणजे त्याची मुले ना, त्यापैकी शिरीष डॉक्टर झाला आणि माधव शेतकी खात्यात आहे मिरजेला बरोबर ना ? " वगेरे प्रश्न सर्रास विचारले जात . असे करता करता त्याच्या नात्यांचा विश्वकोश तयार झाला होता. खूप वर्षांच्या अशा तपस्येने ते कोठेही परके वाटत नसत, कारण आपल्या घरातील व्यक्तीबद्दल आपल्यापेक्षा जास्त माहिती त्यांना असे. त्यांनी लग्न केले नाही पण अशी अनेक माणसे त्यांनी आपल्या वाक्चातुर्यावर जोडली . जसा जसा त्यात मोठा झालो तसे थोडे कळायला लागले की नाटेकर जी नाते सांगत त्यात नाते गौण असे, महत्व जे नाते आहे ते जपण्याला आणि वाढवण्याला असे. चरितार्थासाठी त्यांनी काय केले हा खर तर मोठा गहन प्रश्न आहे. काही थोडे बहुत कोर्ट केसेस मध्ये ते सल्ला देत असत. पायाला भिंगरी ही लागलेलीच होती . आज रत्नागिरी मध्ये केस उद्या मुंबई मध्ये , मग ४ दिवसांनी काय पुणे असे चालू असे. परंतु वकिलीची डिग्री नसल्याने त्यातून त्यांना उत्पन्न तटपुंजेच असावे. पुढे पुढे जसे त्यांना जाणणारे लोक कमी होत गेले तसे तसे त्यांचे आयुष्य थोडे हलाखीचे झाल्यासारखे वाटले. वयोमानपरत्वे प्रकृती साथ देत नसल्याने भटकंतीवर निर्बंध आले. साधारणपणे आता कुठे कोणाच्या घरी रहात नाहित. हल्ली ऐकायला देखील कमी येते , त्यामुळे त्यांचे महत्वाचे अंग ,गप्पा मारणे हे देखील कमी झाले आहे. त्यातून लोकांना वेळ नसतो. कॉफीवर नाटेकरांना कटवले जाते . एकूणच हल्ली नात्यात रमणारे नाटेकर एकटे पडलेले दिसतात. जे लोक काळाच्या पुढचा विचार मांडतात त्यांना आपण लोकोत्तर म्हणतो , काळाच्या एक पाउल पुढे आहेत असे म्हणतो. पण काही व्यक्तीच मुळी थोड्या उशीरा जन्माला येतात. नाटेकर ही असेच मागल्या शतकाच्या सुरुवातीला अत्यंत शोभून दिसले असते. ताटभर जिलेब्या खाणारे , गावोगावी उत्सवास जाणारे, नात्याताली माणुसकी जपणारे . सध्याच्या फास्ट जगात मात्र त्यांना कमीच जागा दिसते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2748
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

धावत्या जगात नात्यांचा पोत आणि जपण्याची पद्धतसुद्धा बदलत आहे. प्रत्यक्ष भेटणारे नाटेकर जाऊन तिन्हीत्रिकाळ चेपुवर पडीक रहाणारे वाढले आहेत. कदाचित पुढच्या पन्नास वर्षांत आजच्या चेपुपटूंचाही नाटेकर होईल. कालाय तस्मै नमः... असो. लेख आवडला. पुलेशु!

बहुतेक हेच नाटेकर आजोबा माझ्या माहेरीही पुण्याला येतात. आमचा सगळा कुलवृत्तांत त्यांना पाठ आहे. आजी आजोबांच्या काळात वरचेवर यायचे ते घरी. नंतर वयोमानानुसार आपोआप कमी झालंय त्यांचं येणं. पण अजुनही छान आठवतं की जेव्हा ते यायचे तेव्हा आजी आईला सांगायची, जोवर जेवताहेत, तोवर पोळ्या लाटायची थांबू नकोस हो...... जेवताना काही कमी नको पडायला..

व्यक्तिचित्रण छानच झालं आहे पण नेहमीच्या पठडीतलं वाटलं, म्हणजे शेवटची हळहळ वगैरे. बाकी नाटेकर म्हटलं की फिल्मी चक्कर मालिकेत एकदा पाहिलेला मकरंद देशपांडेचा "पापा नाटेकर" आठवतो हा आमचा स्मृतीदोष.

सुमारे १५ वर्षे झालि या गोष्टिला. आमचे कुलदैवत 'लक्ष्मि पल्लिनाथ' रत्नागिरिच्या पुढे पालि येथे आहे.तेथे प्रथमच़ जाण्याचा योग आला. माझे आई-वडिल हि तेव्हा बरोबर होते. माझे कुटुम्ब, माझ्या भावाचे कुटुम्ब असे ७/८ जण होतो. पालिला पल्लिनाथाच्या उत्सवाला गेलो होतो, चैत्र महिन्यात. आमचे मुळ गाव ' चान्दोर' हे पावसच्या जवळ पास कुठेतरी आहे असे ऐकुन होतो, माहित मात्र नव्हते. उत्सवाला 'चान्दोरकर भजनी मण्डळ - चाण्दोर' यान्चे भजन असल्याचे कार्यक्रम पत्रिकेत वाचले आणि इथे आपल्याला आपल्या गावाचा शोध लागेल म्हणुन आम्हि सर्व निघालो. पालिला मुक्काम केला. तिथे हे सद्ग्रुहस्थ भेटले. ताम्बुस गव्हाळ रन्ग,तब्बेतिने दणकट,[ब्र्ह्मचारि असल्याचे पण कळले],बडबडा स्वभाव आणि सगळ्यांशि ओळख. हा माणुस सगळ्यात उठुन दिसत होता. बरे सगळ्यांच्या मदतिला तयार. आम्हि चांदोर गावाचा विषय काढला, स्वारि मदतिला तयार. त्यांना गाडीत घेवुनच आम्हि सर्व चांदोर ला गेलो. या माणसाचि प्रत्येक घरात चुली पर्यंत ओळख. त्यामुळे आमचे स्वागत सर्वत्र छान झाले. गप्पा तर अखंड चालु होत्या. माझि आत्या-तिचि मुले, माझि चुलत आत्या-तिच्झि मुले, माझे चुलत भाउ-त्यांचि मुले आणी कितीतरी या सर्वांचे संदर्भ आणि ओळखी हा माणुस लिलया देत होता.आम्हि दिग्मुढ ! पालिला २ दिवसच होतो, पण हा माणुस आमच्या कायम लक्ष्यात राहिला. त्या नंतर १० वर्षांनी माझ्या मोठ्या मुलाचे लग्न झाले.डोंबिवलिचे सप्रे आमचे व्याही. तर त्यांच्या कडेही या नाटेकर महाशयांचि ओळख! अजुन ही कधी कधी नाटेकरांचा कुठेतरि विषय निघतो आणि ती मुर्ति डोळ्यासमोर येते.

नक्कीच माणुस भारी असणार. अहो मि.पा वर लेख टाकल्या टाकल्या ४ प्रतिसादात दोघांनी ओळख सांगितली!! तुम्ही लिहीलय पण छान!! पण काळजी वाटली नाटेकरांची... आता त्याम्च्या खाण्या पिण्याची काळजी कोण घेत असेल? अशी एकटी माणसे फार केविलवाणी वाटतात.

मीही ओळखतो नाटेकरांना ,आम्ही त्यांना नातेकर म्हणतो. कोकणातल्या व विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतेक वार्षिक उत्सवाच्या वेळी / लग्न ,मुंज इत्यादि कार्यात हे नाटेकर महोदय नक्की हजर असतात. समोर येणार्‍या कोणत्याही व्यक्तीच्या मागच्या कमीत कमी 3 पिढ्यातले नातेसंबंध त्यांना माहीत असतात. जेवणाच्या बाबतीतही हा मनुष्य चॅम्पियन आहे !

जे लोक काळाच्या पुढचा विचार मांडतात त्यांना आपण लोकोत्तर म्हणतो , काळाच्या एक पाउल पुढे आहेत असे म्हणतो. पण काही व्यक्तीच मुळी थोड्या उशीरा जन्माला येतात. नाटेकर ही असेच मागल्या शतकाच्या सुरुवातीला अत्यंत शोभून दिसले असते. ताटभर जिलेब्या खाणारे , गावोगावी उत्सवास जाणारे, नात्याताली माणुसकी जपणारे . सध्याच्या फास्ट जगात मात्र त्यांना कमीच जागा दिसते.
एका परिच्छेदात अख्ख्या लेखाचे सार सांगितलंत राव!!! मान गये _/\_

In reply to by श्रीरंग_जोशी

मिपावरही याप्रकारचे काही गृहस्थ आहेत
उदाहरणार्थ? म्हणजे जिलब्या खाण्यातले वगैरे की खटले लढविण्यात जाणकार? की गावोगाव घरोघरी ओळखी असणारे? जरा डिट्टेलमधे सांग की श्रीरंगा.

आवडलं. पण इतक्या ओळखि असल्याने आता म्हातार्णाआट्त त्यांना त्रास नसावा हिच इछा .