फोडणी, पिठलं आणि भजी

नाना चेंगट जनातलं, मनातलं
कधी कधी संध्याकाळ झाली की भुक लागते. दुपारचं जेवण झालेलं असतं पण काहीतरी खावं असं मनापासुन वाटतं. काहीतई थोडा नाश्ता केला की बरं वाटतं. जास्त खाल्लं तर रात्रीच जेवण जात नाही अन मग भल्या पहाटे पोटात कावळे काव काव करतात. संध्याकाळी काय खावं हा मोठा प्रश्न असतो. आजकाल बाहेर जावून खाणं काही परवडत नाही. ज्यांना परवडतं त्यांनी खावं. तब्येतीला पण झेपत नाही. बाहेरचं खाऊ नका डागतर कानी कपाळी ओरडून सांगतो आणि माझ्यादेखत मदतनीसाला जरा वडापाव घेउन ये रे दोन चार नाना बर्‍याच दिवसांनी आलाय तर खाउ दोघे जण असं सांगतो. त्याच्या समोर काही बोलणं हा गुन्हा असतो. मुकाट्याने वडापाव किंवा जे असेल ते खाऊन घेत्तो आणि यापुढे बाहेरचं अजिबात खाणार नाही असं कबुल करुन त्याने दिलेल्या गोळ्या घेऊन येतो. तर नेहमीच काही असला हरीचा लाल उदार होऊन खाऊ घालत नाही मग आपलं आपण बनवायचं आणि खाऊन घ्यायचं. संध्याकाळी नाश्त्यासाठी फोडणी हा प्रकार सगळ्यात मस्त आहे. काही करा आणि फोडणी द्या. म्हणजे असं की कधी कधी उरलेला भात असतो. थोडा मोकळा करा. पातेलं गॅसवर ठेवा थोडं तेल टाका. जरा धुर आला की मिरची, हिंग, मोहरी टाका. तडतडली की त्यात हळद टाकून मोकळा केलेला भात टाका. मस्तपैकी हलवा. गरम गरम फोडणीचा भात म्हणजे वा ! स्वर्ग सुख. कधी कधी मोहरी बरोबर जिरे पण टाकून पाहिले. वेगळी चव आवडून गेली. भात नसला तर सरळ पोळी कुस्करुन घ्यावी. मउसुत पोळी छान पैकी कुस्करुन घ्यायची. पोळी असली की कांदा मात्र आवश्यकच. कांदा बारीक चिरायचा. आधी तेलावर लालसर होईस्तोवर परतायचा. मग मिरची, हिंग, मोहरी टाकून पोळीचा कुस्करा टाकायचा. छान वाफ यायला हवी. थोडी साखर चवीला टाकायची. तृप्ती कशी असते ते फोडणीची पोळी खाऊन कळते. पोळी खाउन खाऊन कधी कधी कंटाळा येतो. अशा वेळेस भाकरी केली जाते. भाकरी केली की मुद्दाम एखाद दुसरी भाकरी जास्त करतो. पोळी च्या जागी भाकरीचा कुस्करा अन त्यावर दही.. कितीवेळ जिभल्या चाटाव्या याची मोजदाद नको. फोडणी हा भन्नाट प्रकार आहे तो असा की ब्रेडला सुद्धा फोडणी मस्त लागते. फोडणीचे पोहे हा थोडा मला वेळ जास्त लागणारा प्रकार वाटतो. पोहे घ्या, नीट स्वच्छ करा. त्याला थोडा पाण्याचा शिपका मारा. मात्र एकदा का पोहे बनले की कढईतुन ताटलीत घेण्याचा पण धीर नसतो. पोहे अनेक प्रकारे बनवतांना मजा येते. कधी तसेच तर कधी कांदा घालून. बटाट्याचे काप टाकून केलेले पोहे मस्त लागतात पण बटाटा नीट शिजला नसला तर मजा किरकीरी होते. एकदा तोंडले घालून पोहे केले होते. बरे लागले होते पण परत काही केले नाही. कांदा घालून किंवा तसेच. फोडणीचे पदार्थ खाऊन सुद्धा कधी कधी कंटाळा येतो. मग सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे बेसनाचं पिठलं करायचं अन पोळीबरोबर हादडायचं. पिठल हा पदार्थ जितका अचानक ठरवून केला जातो तेव्हा त्याला जी चव येते ती ठरवून केलेल्या पिठल्याला येत नाही असं माझं तरी निरिक्षण आहे. पिठल हा घरीच करुन खाण्याचा प्रकार आहे. हल्ली पुण्यामुंबईत पिठलं खायला लोक हाटीलात जात असतात असं कुणीतरी म्हणत होतं. खरं खोटं तेच जाणे. एवढं सगळं असलं तरी कधी कधी संध्याकाळच्या नाश्त्याला काय करावं हा मोठा प्रश्न येतो. थोडा जास्त वेळ असला आणि घरात साधन सामुग्री उपलब्ध असली तर भज्यासारखा बेत नाही. बेसनाचं पीठ आवश्यकते नुसार घेऊन त्यात खाण्याचा सोडा, हळद, तिखट मीठ टाकायच. कांद्याचे उभे काप करुन त्यात मिसळायचे, कढईवर तेल तापवून एक एक भजं त्यात सोडायचं. चर्रर्र करुन भजं लाल व्हायला लागलं की जो वास दरवळतो अहाहा ! कधी भजी पोटात जातील असं होतं. करता करता खाणं की खाता खाता करणं हा भेद रहात नाही. कांद्याच्या ऐवजी गिलक्याचे काप सुद्धा मस्त लागतात. कधी कधी बेसनाच्या ऐवजी मुगाच्या डाळीची भजी. एखादा मित्र अशा वेळी आला असेल तर त्याला अगत्याने खाउ घालतो तेव्हा अस्सल गृहीणीला कसे वाटत असेल त्याचा अनुभव पुरुष असून येतो. दुसर्‍याला करुन खाऊ घातलं की समाधान मिळतं. कधी कधी एखादा मित्र फोन करतो आणि अर्ध्या तासात तुझ्या घरी येत आहे काहीतरी खायला कर असं हक्काने सांगतो तेव्हा आयुष्यात आपण काही तरी नक्की कमावलं आहे हा दिलासा मिळतो. उरलेले दिवस जगायला बळ मिळतं.
वर्गीकरण

30 टिप्पण्या 6,111 दृश्ये

Comments

मन१ नवीन

काय मस्त खमंग लिखाण आहे! झक्कास........

कवितानागेश नवीन

कधी कधी एखादा मित्र फोन करतो आणि अर्ध्या तासात तुझ्या घरी येत आहे काहीतरी खायला कर असं हक्काने सांगतो तेव्हा आयुष्यात आपण काही तरी नक्की कमावलं आहे हा दिलासा मिळतो.> मित्र मैत्रिणी म्हणजे आयुष्यातली फोडणी! -माउ दवणे ;)

मन१ नवीन

पुन्हा वाचलं. लिखाण फक्त खाण्याबद्दल नाही, अन्योक्ती सारखं काहीतरी आहे; हे जाणवलं. आता अजूनच आवडलं.

श्रावण मोडक नवीन

फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात यात मीठदेखील टाकत जा... म्हणजे ते पदार्थ, आणि त्यामुळं जगणं अळणी ठरणार नाही. ;-)

तुमचा अभिषेक नवीन

आजकाल मॅगीचा जमाना आहे भाऊ.. पण वर उल्लेखलेले सारे पदार्थ आवडीचेच.. :) बाकी अंडे आपले ऑलटाईम फेवरेट असल्याने पटकन एखादे हाल्फफ्राय तव्यावर बनवायला टाकायचे आणि पावाबरोबर फस्त.. स्वता पाककलेत `ढ' असल्याने घरी एकटे असताना भूक लागली अन मॅगी करायची इच्छा नसली तर कच्चे पोहे दूधात मस्त भिजवून गटकवायचे.. दुधात एक्स्ट्रा साखर टाकून त्याला गोड करायला मात्र विसरायचे नाही.. :)

सस्नेह नवीन

तडका हा शब्द जास्त प्रभावी वाटतो. पिठल हा पदार्थ जितका अचानक ठरवून केला जातो तेव्हा त्याला जी चव येते ती ठरवून केलेल्या पिठल्याला येत नाही ..सहमत. मुळात पिठले हा आयत्यावेळीच करायचा पदार्थ आहे !

चंबा मुतनाळ नवीन

In reply to by सस्नेह

आदल्या दिवशीचं थंड्गार पिठलं बुरून पावाबरोबर खाऊन बघा. लय खल्लास लागत.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

सहजसुंदर आणि खमंग लेखन ! फोडणीचा भात करतानाही फोडणीत कांदा परतून घ्या... बघा कशी चव वाढेल ती :) एवढं तोपासु करवल्यावर अर्ध्या तासात येतो म्हणून फोन करावा म्हटलं तर तुम्ही तुमचा फोन नंबर द्यायला विसरलातच की... ;)

वामन देशमुख नवीन

मुक्तक खरच आवडलं! तथापि; … की बरं वाटतं. … मग आपलं आपण बनवायचं आणि खाऊन घ्यायचं. … बरे लागले होते पण परत काही केले नाही. आणि … उरलेले दिवस जगायला बळ मिळतं. यामधून किंचित "गडद" ललित वाटतंय. अनेकदा लावण्यांत शृंगारापेक्षा आर्तताच अधिक जाणवते तसं वाटतंय. लिखाण फक्त खाण्याबद्दल नाही, अन्योक्ती सारखं काहीतरी आहे; हे जाणवलं. बव्हंशी सहमत!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

हम्म, मुक्तक का काय आहे ते बरं झालं आहे. हळवं बिळवं करण्याचा प्रयत्न काठोकाठ झालाय. पण हल्ली एक वाचक म्हणून अशा लेखनात काही मजा येत नाही, म्हणजे गहिवरुन वगैरे काही येत नाही. ना बेसनाची आठवण येते, ना फोडणीची. सॉरी शेठ....पुलेशु. -दिलीप बिरुटे

५० फक्त नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१००. असं झालंय हल्ली खरं, फोडणिचा भात म्हणजे काल रात्रिच्या स्वयंपाकाचा चुकलेला अंदाज हेच मनात येतं,

पैसा नवीन

शिळ्या झालेल्या आयुष्याला नवीन आप्त सुहृदांची फोडणी द्या नाना! जगण्यात चव येईल.

स्पंदना नवीन

In reply to by पैसा

सहवेदना सहचरा बरोबर वाटुन घ्यायची खरच फार गरज असते. थोड आपल वाटायच थोडं त्याच वाटुन घ्यायच.

आतिवास नवीन

'वाच्यार्थ' समजल्यासारखा वाटला. 'लक्ष्यार्थ' काय असावा याचा विचार करते आहे.

प्यारे१ नवीन

एकटेपणा त्रास देतोय का नाना? लग्न कर! शिव्या खायला नि द्यायला हक्काचं माणूस बरं असतं. ती पाच मिनिटं गेली ना की मग वेळ कसा जातो समजत नाही. :) - (विवाहीत) प्यारे.

चित्रगुप्त नवीन

......कधी कधी एखादा मित्र फोन करतो आणि अर्ध्या तासात तुझ्या घरी येत आहे काहीतरी खायला कर असं हक्काने सांगतो तेव्हा आयुष्यात आपण काही तरी नक्की कमावलं आहे हा दिलासा मिळतो. उरलेले दिवस जगायला बळ मिळतं.... ... हे फारच आवडलं... बाकी फोडणीच्या भातात शेंगदाणे घालणे, पोह्यांवर रतलामी (वा इंदुरी) शेव, कधीकधी कुस्करा (फोडणीची पोळी)कांदा वगैरे अगदी काही न घालता फोडणीत पोळीचा कुस्करा टाकून खंमंग कुरकुरीत परतून दह्याशी खाणे, वगैरे प्रकार मी पण करत असतो... भाजणीचं थालिपीठ ????

यसवायजी नवीन

>>हल्ली पुण्यामुंबईत पिठलं खायला लोक हाटीलात जात असतात असं कुणीतरी म्हणत होतं. खरं खोटं तेच जाणे >> काय करायच राव, आमी इथं पुण्यात. बेच्लर पोरांना कुठणं मिळणार घरचं पिठलं? मग जातो आम्ही मथुरा-सोहम सारखी हाटेलं शोधत.. :( जखमेवर मिठ चोळ्ळत.. :( गावी गेलो की मोठ्ठी लिश्ट तयार असते. मग त्यात पिठलं, वांग्याचं किंवा भेंडीचं भरीत, थालीपिठ, फो.भा., आणी ऑल्-टैम फेव्रेट 'कांदे-पोहे'.... एट्शेट्रा एट्शेट्रा असतच..

राही नवीन

फोडणीच्या भाताची अनेक वेरिएशन्स आहेत. हिंगमोहरीवर कढीपाने आणि हिरव्या मिरच्या टाकणे,नंतर ऑप्शनली त्यावर भरपूर कांदा टाकणे, हवे तर थोडे लाल तिखट टाकणे,पुन्हा वेगळ्या प्रकारात ओप्शनली किंचितसे मेथीदाणे आणि थोडीशी उडीदडाळ टाकणे आणि नंतर मीठमिश्रित भात त्यात चांगला परतून घेणे वगैरे. पण सर्वात सोपा आणि किंचित उग्र चवीचा प्रकार म्हणजे जास्त तेलावर जरा जास्तच असा/अशी ठेचलेला/ली लसूण लालसर परतून त्यावर चिरलेला भरपूर कांदा घालावा.तो मऊ होताच किंवा त्यावरच लाल तिखट (नुसती मिरचीपूड) आणि मीठ घालून एकजीव करून त्यावर भात घालून मध्यम आचेवर व्यवस्थित मिसळावे. स्वयंपाकघरात जर लसूण दर्प कोंदला तर सर्व खिडक्यादारे उघडून टाकावी. एक सैलसर मोकळेपणा येतो. विशेषतः सांजवेळी या लसूणदर्पाने सर्व ईवल थॉट्स, ईवल स्पिरिट्स पळून जातात. (आठवा : ड्राक्यूला चित्रपट.) चांगल्या स्पिरिटला जागा मिळते. हा भात कडसर लागतो खरा, पण कडवट चवीची सवय असेल तर त्याचे फारसे काही वाटणार नाही. कित्येक कातरवेळा सुसह्य झाल्याचा अनुभव आहे.