Skip to main content

स्ट्रॉबेरी फेस्टीवल २०१२

लेखक मोदक यांनी सोमवार, 09/04/2012 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
"मॅप्रो" दरवर्षी इस्टरच्या वीकांताला स्ट्रॉबेरी फेस्टीवल आयोजीत करते. गेली दोन वर्षे याकडे लक्ष ठेवून होतो पण कांही ना कांही कारणाने जाणे जमत नव्हते, मागच्या वर्षी तर विश्वचषक अंतीम सामना आणि स्ट्रॉबेरी फेस्टीवल एकाच वेळी आल्याने जाणे शक्यच नव्हते. यावेळी मात्र जानेवारीपासून प्लॅन करून आणि कोणत्याही परिस्थीतीत हे चुकवायचे नाहीच अशा तयारीने सगळे ठरवले. दरम्यान इव्हेंट मॅनेजरचा नंबर मिळवून त्याला प्रश्न विचारून जेरीस आणले होते. मित्रांची मोठी टोळी घेवून जायचे ठरले पण आयत्या बाकी सगळे मित्र कांही ना कांही कामात अडकल्याने मी आणि नितीन (हा मिपा सदस्य नाहीये) दोघेच गेलो. सकाळी ७ ला पुणे सोडले. जास्ती थंडी नाही, जास्ती उकाडा नाही अशा वातावरणात गाडी हाणायला मजा येत होती. कात्रज तलाव शिरवळ ला नाष्टा करून पांचगणी ओलांडायला ०९:३० झाले. मॅप्रो गार्डन ला १० वाजता पोहोचलो. गाड्या लावता लावता असे लक्षात आले की एक स्ट्रॉबेरी विक्रेता ५०० चे सुट्टे शोधत होता... मग एक मजेशीर संवाद झाला. मी - (त्याला आपणहून बोलावून) सुट्टे पैसे देतो पण स्ट्रॉबेरी चा रेट किती कमी करतोस सांग. (खुल्ली ऑफर :-)) तो - किती घेणार आहे..? मी - अमुक अमुक. पण रेट व्यवस्थीत मिळाला तरच. तो -(आमची खरेदीची क्वांटीटी ऐकून) मग चला माज्या शेतावर.. तिथेच तोडून देतो. अनपेक्षीतपणे शेतावर जाण्याचा बोनस मिळाल्याने लगेचच शेताकडे गाड्या वळवल्या. नाशीकचा द्राक्षाचा शेतकरी (नितीन) एका दुसर्‍या शेतकर्‍याला मागे बसवून शेतात जाताना. विक्रेता + शेतकरी पण झकास माणूस होता.. शेतावर चार वेगवेगळ्या जातींची स्ट्रॉबेरी आम्हाला टेस्ट करायला दिली आणि कोणती हवी ती सांगा अशी त्याने खुल्ली ऑफर दिली. नंतर त्याच्याइथला एक वाफा हेरून आम्ही हल्ला बोल केला.. रसाळ, गोड आणि ताजी फळे आपल्या हाताने तोडून खाण्याचा आनंद वेगळाच. स्ट्रॉबेरी रासबेरी मलबेरी (तुतु चे फळ) आमच्या वेळेचे गणित तपासून त्याला ४ वाजता पुन्हा भेटू असे सांगीतले आणि आमचा मोर्चा पुन्हा मॅप्रो गार्डन कडे वळवला. तिथे लहान मुलांसाठी भरपूर खेळ, लेझीम, साहसी प्रात्यक्षीके वगैरे प्रकार सुरू होते. आम्ही तिकडे न जाता चॉकलेट फॅक्टरी बाहेरून बघितली आणि किरकोळ खरेदी केली. तिथले डार्क चॉकलेट मात्र आजीबात कडू नव्हते. ते मिल्क चॉकलेट सारख्याच चवीचे लागत होते. डार्क चॉकलेट खाल्यानंतर जी कडवटपणाची किक बसते ती आजीबात बसली नाही. :-( चॉकलेट फाऊंटन नंतर थोड्या लांब अंतरावरच्या मॅप्रोच्या शेतांमध्ये एक चक्कर मारली त्या शेतांमध्ये मंडप + (सुसह्य) डीजे वगैरे थाट होता. गेल्यागेल्या स्ट्रॉबेरी ज्यूस ने स्वागत केले गेले आणि "हे आमचे शेत.. हवी तितकी स्ट्रॉबेरी खा" असा प्रेमळ आग्रहही झाला. शेत शेता मधले बाकीचे टूरीस्ट... स्ट्रॉबेरी सारख्या रंगाच्या टीशर्ट मध्ये मी.. कॅमेरा गळ्यात लटकावून नितीन.. सकाळपासूनचा दिवस स्ट्रॉबेरीमय झाल्याने थोडासा बदल हवा होता.. तितक्यात एका झाडाला लगडलेल्या कैर्‍या दिसल्या. भूक जाणवायला लागल्यानंतर आम्ही पुन्हा मॅप्रो गार्डन मध्ये आलो आणी खादाडी सुरू केली. मॉकटेल - मॅनोरा (आंब्याचा गोडवा आणि संत्र्याची मिरमिरीत चव + बर्फाचा चुरा + थोडा चाट मसाल्यासारखा मसाला = अप्रतीम चव) मॉकटेल - नॉटी काऊबॉय. (लिची + खस + लेमन सिरप + लिंबूटिंबू -हा एक ज्यूसचा प्रकार आहे असे सांगीतले - हे ही चांगले होते) कोल्ड स्टोन आईसक्रीम यामध्ये आपल्याला हवे ते ३ आईसक्रीम फ्लेवर एका ग्रॅनाईटवर घेतात, ड्रायफ्रूटचा कीस सढळहस्ते वापरून सगळे एकत्र करतात आणि केशर सिरप, मँगो क्रश, बदाम पिस्ते आणि काजू चा फायनल लेयर देवून वॅफल कोन च्या बाऊलमध्ये सजवून देतात. केशर पिस्ता + मँगो + बटर स्कॉच आईसक्रीम आणि ड्रायफ्रूट कोल्ड स्टोन वर... फायनल डीश. प्रत्येक घासाला दाद देता देता ही डीश कधी संपली तेही कळाले नाही. सिझलींग हॉट चॉकलेट ब्राऊनी एका कडकडीत तापलेल्या प्लेटवर एक वॉलनट केक स्लॅब ठेवतात, त्या केकवर आपल्या आवडीचे दोन स्कूप आईसक्रीम + ड्रायफ्रूट, फायनल स्टेज ला आजूबाजूला भरपूर प्रमाणात चॉकलेट सॉस घालून (सिझलर्स सारखे गरम गरम) Serve करतात. पहिल्या राऊंडला बटरस्कॉच + मँगो आणि दुसर्‍या राऊंडला व्हॅनिला + केशरपिस्ता असे काँबीनेशन घेतले. (दिवसभर स्ट्रॉबेरी खात असल्यामुळे शेवटी शेवटी ऑर्डर स्ट्रॉबेरी सोडून आणखी कोणता फ्लेवर आहे याची चाचपणी करून जात होती. ) मॅप्रो गार्डन मध्ये आणखी एक मस्त प्रकार होता. प्रत्येक टेबलावर छोटी बुट्टी भरून स्ट्रॉबेरीज ठेवल्या होत्या. स्ट्रॉबेरी संपल्या की ते आणून भरत होते. देठ आणि पानांनीच आमची एक बुट्टी भरली.. तीही त्यांनी तत्परतेने (स्ट्रॉबेरीने) भरून दिली. :-) स्ट्रॉबेरी खावून मन तृप्त झाले होते तरीही शेवटी, फ्रेश स्ट्रॉबेरी विथ क्रीम अँड आईसक्रीम. (याच्या वर्णनाची गरज आहे का..? ;-)) मजबूत खादाडीने पोट आणि खरेदीने बॅग तुडूंब भरली होती. फुल्ली लोडेड... आता एका दृष्टीक्षेपात दिसणारा पसरणी घाट उतरायचा होता.. दिवस भर भरपूर खादाडी केली... मनसोक्त स्ट्रॉबेरी खाल्ली... गाडीवरून २५० किमी प्रवास झाला... पुढच्या ट्रेक / ट्रीपचा विचार करत १०:३० ला घरी पोहोचलो.. हा एक नितांतसुंदर दिवस होता. :-)

वाचने 23754
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

आहेत तेच दिसत नाही आहेत. आणी हा गणेशज्वर नाही. कारण फोटो असल्या जागी नुसती नावंच दिसतायत. आणी बाकीच्या दुसर्या लेखातील फोटो दिसतायत.

मोझीला मधे तर नुसती नावंच दिसतायत. आणी विंडोज इंटरनेट मधे फुल्ली असलेला बॉक्स आहे फक्त.

In reply to by सुर

शेवटी मोबाइल मध्धे मिपा चालु केलं तेव्हा कुठे दिसले फोटो..(चला इंटरनेट वाला मोबाइल घेतल्याचा फायदा झाला.) :)

नशीब माझे, फ्रीजमध्ये स्ट्रॉबेरी पडलीय. हे वाचून, खरे तर बघून, लागलेली दुधाची तहान तेवढीच ताकावर भागवता येईल.

@ मोदक, फोटो एकदम झकास आले आहेत...स्टॉबेरी पिकिंगसाठी कुठे नाव नोंदणी करावी लागते का? अजुन तपशील कुठे मिळेल?

In reply to by मृदुला सूर्यवंशी

मॅप्रो गार्डनला भेट दिल्यानंतर तिथे एक आटोपशीर कस्टमर हेल्पडेस्क असेल, सर्व माहिती तिथेच मिळेल. अगदी मागच्या वर्षापर्यंत नावनोंदणी वगैरे भानगडी नव्हत्या, यावर्षी काही बदल केला असेल तर कल्पना नाही. मी २७ तारखेला जावून आल्यानंतर अधिक माहिती देईनच ;-)

In reply to by मोदक

धन्यवाद मोदक! आम्ही पण २७ ला जाणार आहोत :) पण फेस्टीवल या तारखांनाच आहे ना नक्की? नाहीतर सगळ्यांचे फटके खावे लागतील :ड

माहितीसाठी परत एकदा धन्यवाद मोदक!