"दुकानाचं बोर्डं ज्या भाषेत, ती त्या गावची भाषा", इती रावसाहेब.
आता पुलंच्या रावसाहेबांच्या ह्या उक्तीची पार्श्वभूमी थोडी वेगळी असली, तरी दुकानदारांची मानसिकता त्यातून व्यवस्थित प्रकट होते. कोणीही दुकानदार आपले दुकान-धंदा सुरू करतो तो पैसे मिळवण्यासाठी. त्यासाठी गरज असते ती गिर्हाईकांची. गिर्हाईकेच दुकानदाराला पैसा आणि नाव मिळवून देत असतात. अर्थात गिर्हाईकांची कदर राखणे हे त्या दुकानदाराचे प्रथम कर्तव्य (याला काही सन्माननीय अपवाद आहेत, असे ऐकिवात आहे. पण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्यामुळे त्याची जाहीर चर्चा येथे अपेक्षित नाही!).
आपण कसला व्यवसाय करतो हे आपल्या संभाव्य ग्राहकांना कळले पाहिजे हे इतर कोणाही पेक्षा दुकानदाराला अधिक समजते, यावर दुमत नसावे. साहजिकच, आपल्या संभाव्य ग्राहकांना समजेल अशाच भाषेत, स्वरूपात तो आपल्या दुकानाची पाटी लावील, जाहिरात करेल. कारण तसे करणे हे अंतीमतः त्याच्याच फायद्याचे आहे. तो काय विकतो हेच जर लोकांना कळले नाही तर त्याच्याकडे जाणार कोण?
मुंबईतील बहुसंख्य दुकानांच्या पाट्या ह्या इंग्रजीत (रोमन लिपीत) आहेत. याचे कारण त्या त्या दुकानांच्या सद्य आणि संभाव्य ग्राहकांना रोमन लिपी वाचता येते, याची दुकानदारांना खात्री आहे. रोमन खेरीज अन्य भाषेत वा लिपीतदेखिल पाट्या असतात पण ते सर्वस्वी ते दुकान ज्या परिसरात आहे वा त्यांचे ग्राहक ज्या भाषेचे आहेत त्यावर अवलंबून असते. एखाद्या तामिळ वा मल्याळम लिपीत पाटी असलेल्या दुकानात तुम्हाला बारीक छोटे कांदे वा कच्ची केळी मिळणार, हे नक्की! तीच गत गुजरातीची.
त्यामुळेच, मराठीत (खरे म्हणजे देवनागरीत) पाटी लिहिण्याची दुकानदारांना आवश्यकता भासतेच असे नाही.
युरोपातील काही देशांत एखाद्या जुन्या धाटणीचे घर असलेल्या घरमालकाला आपल्या घराची फेररचना करायची असल्यास निदान घराचा दर्शनी भाग रस्त्यावरील इतर घरांच्या तुलनेत विजोड वाटणार नाही, याची काळजी घ्यावी लागते, असे कुठेसे वाचले आहे. वरकरणी पाहता हा त्या घरमालकाच्या व्यक्तीस्वातंत्रावरील हल्ला आहे, असे वाटेल. पण अधिक खोलात जाऊन विचार केला तर असे लक्षात येईल की, घर हे केवळ त्या घरमालकाचे नाही तर ते त्या रस्त्याचा, वस्तीचा, शहराचादेखिल भाग आहे. आणि तो विजोड वाटू नये याची स्थानिक स्वराज्य संस्थेने दखल घेण्यास काहीच प्रत्यवाय असू नये.
कवी नीरज यांच्या कवितेतील एक ओळ आठवते, फूल नहीं डालीका, पहले उपवन का श्रुंगार है!
जी गोष्ट शहराच्या बाह्य सौंदर्याच्या जपणूकीची तीच गोष्ट एका मोठ्या समाज घटकाच्या भावनिक जपणूकीची. दुकानाच्या पाट्या ह्या केवळ दुकानाच्या नाहीत तर, त्या रस्त्याचा आणि शहराचाही अविभाज्य भाग आहेत. टक्का घसरत चाललेल्या मराठी भाषकाला मुंबईत एकेका मराठी प्रतिकाची जपणूक करणे, हे दुखर्या जखमेला जपण्यागत झाले आहे. त्यामुळेच, मुंबईत ४० टक्क्यांच्या आसपास असलेल्या मराठी भाषक समाजाच्या भावनेची (विशेषतः निरुपद्रवी भावनेची) कदर करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे.
स्वतःच केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची सरकार टाळाटाळ करीत असेल, तर सरकारला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणे भाग पडते. म्हणूनच, जी ज्या गावची भाषा, त्या भाषेत दुकानाचं बोर्डं, हा नवा डिक्टाट पुलंच्या रावसाहेबांपासून सुरू झालेल्या प्रवासाचे वर्तूळ पूर्ण करतो.
टीप - सदर लेखक हा कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही!
वाचने
2968
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुनीलराव,
भुमिकेशी सहमत..
रावसाहेब ते राजसाहेब
मस्कत मधील नियम...
लेखातील
राज ठाकरे
पण बेळगावात राहू द्या ना