शनिवार सकाळ! मुलांच्या क्लासेसची वेळ! मी न्याहरीसाठी बटाटेवडे करायला घेतलेले. त्यामुळे माझी सकाळ सोलणे, तळणे अन घोळण्यात आकंठ बुडालेली. "माझी बॅग"," माझे शुज?"," वॉटर बॉटल", अश्या आरोळ्या क्षणाक्षणाच्या अंतराने इंटेन्स होत होत्या. आम्ही दोघे किल्ला लढवण्यात गुंग. अन बघता बघता हे तिघेही बाहेर पडले. मी अजुनही वडे तळत असल्याने ते बाहेर पडल्याचे समजलेच नाही. पण मग घरातली किलबील ( हो! अस म्हणाव लागत. कितीही कलकलाट अन शब्दाशब्दाला वाद फुटत असला तरी मुल जे काही करतात त्याला किलबील अन किती गोऽऽड! असच म्हणायच असत.) बंद झाल्याच जाणवल. जरा हुश्श्य झाल.
आता मुलांना सोडुन हा परत येइल अन मग आम्ही दोघे निवांत ब्रेकफास्ट करु शकु. अजुन थोडे वडे तळायचे होते, अन अचानक; त्या निरव शांततेत कावळ्यांची "काव! काव!!" घुमली. घुमली म्हणजे अक्षरशः कावळे जीव खाउन ओरडताहेत अस वाटल. मला जरा आश्चर्य वाटल. नाही म्हणजे ऑस्ट्रेलियात अतिशय भांडखोर अन कर्कश्श्य आवाजात ओरडण्याचा मान काकाकुवा या शुभ्र धवल पक्ष्याला जातो. काय झाल असाव? तरीही, तसेच किचन मध्ये काम उरकत राहिले. पण क्षणा दोन क्षणात ती कावंकावं इतकी वाढली की बाहेर डेकवर गेले. घराच्या मागे चाळीस वर्ष जुना निलगीरी उभा आहे. पार मान नव्वद अंशात वर करुन त्याच्या फांद्यांकडे पहाव लागत. त्यावरच जवळ जवळ पाच सहा कावळे मोठमोठ्याने ओरडत बसले होते. ओरडणं कस? तर काऽव अस सुरु करुन मग अक्षरशः रडल्यासारखा तो "व" ते ओढत होते. त्यातच एकजण चक्क निलगीरीच्या फांद्यांची साल कुरतडत होता अन त्याचा काऽऽड काऽऽड असा आवाज ऐकु येत होता. आत गॅसवर अजुन वडे तेलात होते. पटकन आत आले अन वडे काढुन पुन्हा बाहेर गेले. अजुनही कावळे तसेच ओरडत होते. का कुणास ठाउक पण ह्रदय धडधडलं. एकुण मुड खराब झाला.
काय कराव? काय झाल असेल? आता पावेतो कावळ्यांचा आवाज कमी झाला होता. पण मन मात्र अशांत ! तशीच आत बाहेर करत राहीले अन मग फोन उचलला. नवर्याला मिस कॉल दिला. मिनिटभरातच मुलीने फोन केला. " येस आई?" म्हंटल आता काय बोलावं? मग म्हंटल , "ओह! यु आर स्टील ऑन रोड?" "येस" " ओके! आस्क पपा टु कॉल मी वन्स ही रिचेस "
पाच मिनिटात नवर्याचा फोन! अर्थात हा एक सवयीचा भाग. बाहेर पडल की हे आणं ते आणं म्हणुन घरी बसुन फोन करायचा बायकोचा हक्क मी पुरेपुर बजावतं असते. तसच काहीसं असावं अश्या अविर्भावात त्याचा फोन. अर्थात मला जे जाणवलं होत त्याची वासलात कोणत्या शब्दांत होणार, हे मला आता पाठ झालयं. “ तुलाच कस काय जाणवतं? कावळे कधी ओरडतं नाहीत काय? कुठेतरी कावळा मेला असेल . तुझं आपल काहीतरीच! एव्हढी शिकलीस तरी गावची ती गावचीच राह्यलीस. ऑस्ट्रेलीयातले कावळे असलं काही शास्त्र जाणतं नाहीत. " अश्या अनेक वाक्यांची बिनमांगी खैरात घ्यायची तयारी नव्हती.
"हॅलो?"
" हां ! हे बघ! जरा शिस्तीत ड्राइव्ह कर!"
"??????"
" हे बघ जरा शिस्तीत गाडी चालवं अस म्हणतेय मी."
अजुनही पलिकडुन काहीच आवाज नाही. मग मला बटाटेवडे आठवले.
"हे बघ वडे कूठे पळुन नाही जायचे. शिस्तीत ये, मग आपण चहा वडे खाउ काय?" मी आता आवाजात उसना ह्युमर आणायचा प्रयत्न केला.
अजुनही महाशय शांतच. मग मीच विचारल "ठेवु?"
"हां."
फोन ठेवला. अन आता घरी आल्यावर होणार्या चिडचिडीला अन सरबत्तीला कसं तोंड द्यायचं याचा विचार सुरु झाला. या नव्या प्रश्नाने आधीचा कावळेवाला धडधडाट जरा कमी झाला.
जरा किचन आवरायला घेतलं, अन गराजमध्ये धाडदिशी दार लावल्याचा आवाज घुमला. पाठोपाठ दार उघडुन नवरा आत आला. मी किचन मधुन वळुन त्याच्याकडे पाहिल. डायनिंगची एक खुर्ची ओढुन त्यावर बसत बसत त्याने माझ्याकडे रोखुन पाहिलं. मी नुसतीच गप्प. ते म्हणतात ना," बंद मुठ्ठी लाख की ...." तस काहीसं. त्याच्याशी स्वतःहुन बोलण्याऐवजी अन न विचारता अश्या बिनअर्थी फोनकॉलच स्पष्टीकरणं देण्याऐवजी गप्प बसणं शहाणपणाच होतं. मी चहा चढवला. उकळणार्या चहाच्या वासाबरोबर नवर्याचं मौन सुटलं.
घरातुन बाहेर पडलं की दोन मिनिटात 'फर्न ट्री गली' नावाचा रोड लागतो. ८०चा रस्ता. माझ्या अगदी चाकाखालचा. पण नवरा आठवड्यातुन एकदाच जातो. तेथे राईट घ्यावा लागतो आमच्या सबर्ब मधुन. इकडच्या तिन अन पलिकडच्या तिन अश्या सिक्स लेनस. अन मध्ये राईट घेणार्यांसाठीच आयलंड. याने अलिकडचा रस्ता क्रॉस केला अन आयलंडमध्ये एक क्षणबरसुद्धा थांबायची गरज नसलेला पलिकडचा मोकळा रस्ता. फक्त एक बायसिकल (मेलबर्नच्या रस्त्यावर फार म्हणजे फार सायकली असतात. ) पलिकडुन इकडे येणारी अन तिच्यामागे एक कार. याने गाडी हलवली, पण तोवर त्या कारवाल्याने बायसिकलवाल्याला ओव्हरटेक करण्यासाठी गाडी अतिशय वेगाने काढत फटक्यात राईट मोस्ट्ला टाकली. तो माणुस इतक्या वेगात होता की अर्ध्यालेनमध्ये याने करकचुन ब्रेक लावला अन थांबला. ती गाडी सुसाट निघुन गेली, अन समोर बसलेला मुलगा किंचाळला. क्षणसुद्धा जास्त होइल इतकाच वेळ् घडलेला इन्सिडंट!
अजुनही नवर्याची नजर तिक्ष्णच होती. ही वॉज रेडी टु लिसन माय साइड ऑफ स्टोरी. जमेल तितक्या साधेपणे जे घडल ते सांगितल. अर्थात नवर्याने "होय? खर?" अस काहीही रिअॅक्ट केलं नाही. घुम्यासारखा बसुन राहिला. म्हंटल "तूला राग आला का? माझा असा फोन ऐकुन?"
"आता काय! "नवरा नि:श्वासला."तूला कायमच सगळं कळतं. आमच गुपितं अस काही नाहीचं. मी मुलांना तूला हे सांगु नका म्हणुन सांगितलय."
__/\__
अपर्णा
वाचने
7900
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
सिक्थ सेंन्स
कावळा शहाणा आहे.
मस्त लिहिलंय
छोटासा प्रसंग. पण फर्मास
+१
In reply to छोटासा प्रसंग. पण फर्मास by मृत्युन्जय
सहमत
In reply to +१ by प्रचेतस
छानच लिहलाय सगळा प्रसंग!
?
छान लिहिलेय
खासच लिहिलंय.
चांगले ललित!
(No subject)
तुला कायमच सगळं कळतं!
छान लिहिले आहेस
अपर्णा हा लेख नाही पटला गं.
नाही रे बाबा! कावळ्यांऐवजी
In reply to अपर्णा हा लेख नाही पटला गं. by शुचि
असू शकेल तसं असेल तर मग, लेख
In reply to नाही रे बाबा! कावळ्यांऐवजी by स्पंदना
एकंदरीतच पक्ष्यांना
In reply to असू शकेल तसं असेल तर मग, लेख by शुचि
छोटासा प्रसंग आवडला, आपल्या
आयला
आवडला..
अपर्णाताई आधी ते
तुमचा लेख छान आहे आहे .!
हा योगायोग देखिल असू शकतो, नाही का?
आत्म्याच्या तृप्तीबद्द्ल काही
In reply to हा योगायोग देखिल असू शकतो, नाही का? by मनीषा
नक्की माहिती नाही.
In reply to आत्म्याच्या तृप्तीबद्द्ल काही by ५० फक्त
वेगळाच
खरं सांगायच तर हा लेख
छान ललित! शंकाकुशंकांनी
आवडेश
छान लेख. कावळ्यांनाही अशुभाची
लिखाण आवडले.