अक्षम्य हेळसांड (दुर्लक्ष्) CRIMINAL NEGLIGENCE
ही मी विशाखापटणम येथे कल्याणी या नौदलाच्या रुग्णालयात काम करत असतानाची गोष्ट (१९९८) आहे. आमचा एक पंजाबी lab technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) होता. त्याच्या बायकोने एका मतीमंद मुलाला १९९० मध्ये पंजाबातील गावात जन्म दिला आणि त्यात तिचे दुर्दैवाने देहावसान झाले.त्याचे वय तेंव्हा २४ वर्षे होते त्या तंत्रज्ञाने नंतर या मुलाची देखभाल करण्यासाठी आणि परत पुढील आयुष्यासाठी दुसरे लग्न केले.दुसऱ्या बायकोपासून त्याला दोन मुले झाली. ही दोन्ही मुले व्यवस्थित होती. हे मतीमंद मूल जसे वाढू लागले तसे तसे त्याच्या अविकसित मेंदूचे कार्य अनियमित होऊ लागले.
आणि त्याला अपस्माराचे(fits) झटके येऊ लागले. त्याचा इलाज नौदलाच्या रुग्णालयात मेंदू विकार तज्ञ आणि बाल रोग तज्ञ यांच्या तर्फे चालू होता. दुर्दैवाने त्याच्या मेंदूची जडणघडण इतकी जटिल आणि अपुरी होती की औषधाचा जास्तीत जास्त डोस देऊनही त्याच्या फिटस वर पूर्ण नियन्त्रण होत नव्हते. शेवटी शेवटी तर इतकी वाईट परिस्थिती आली कि त्या मुलाला आठवड्यात दोन वेळा फिट्स येत होत्या. त्या मुलाला मुंबई आणि पुणे येथे वरिष्ठ मेंदूविकार तज्ञ यांना हि दाखवून झाले होते पण त्याचा रोग आटोक्यात येत नव्हता.तो तंत्रज्ञ केवळ रुग्णालयात कामाला असल्याने त्या मुलाकडे इतके लक्ष देणे त्याला शक्य झाले.
अशा परिस्थितीत एकदा तो तंत्रज्ञ कामावर असताना त्या मुलाला फिट्स येऊ लागल्या. रोज मरे तर कोण रडे या न्यायाने त्याने काहीच केले नाही. यावेळेला त्या मुलाच्या फिट्स काही थांबत नव्हत्या शेवटी १५-१६ तासांनी तो त्या मुलाला घेऊन परत रुग्णालयात आला. मी तेंव्हा casualty (आपत्कालीन)duty वर होतो. मी त्या मुलाची अवस्था पाहून त्याला ताबडतोब बाल अतिदक्षता विभागात (paediatric ICU) दाखल केले आणि त्याच्यावर ताबडतोब उपचार सुरु केले. बालरोग तज्ञानी पूर्ण प्रयत्न करूनही तो मुलगा वाचू शकला नाही. १५-१६ तास अपस्मार झाल्याने त्याच्या स्नायूचे विघटन(rhabdomyolysis) होऊन त्याची मूत्रपिंडे नाकाम झाली आणि त्याचा मृत्यू झाला.
आता प्रश्न हा होता कि मृत्यूचे प्रमाणपत्र(death certificate) कोणी द्यायचे? मी त्या मुलाला बघणारा पहिला डॉक्टर होतो आणि मला पूर्ण परिस्थिती माहित होती.
जर पोलिस तपासणी झाली तर त्या मुलाकडे १५-१६ तास फिट्स येत असताना अक्षम्य दुर्लक्ष झाले हे सहज सिद्ध झाले असते.
कायदा असे सांगतो कि एखाद्याचा मृत्यू जर २४ तासाच्या आत झाला तर प्रमाणपत्र देण्याच्या आधी शव विच्छेदन(post mortem) आणि पोलिस तपासणी करणे आवश्यक आहे. पण जर एखादा रोगी रुग्णालयात उपचार घेत असेल आणि रुग्णालयातील डॉक्टर्सना मृत्यू चे कारण माहीत असेल तर ते तसे प्रमाणपत्र देऊ शकतात उदा.एखादा कँसरचा रोगी शेवटच्या टप्प्यात असेल तर आम्ही त्याला घरी पाठवतो कारण घरी मुलाबाळांच्यामध्ये मृत्यू येणे हे रुग्णालयात मृत्यू येण्यापेक्षा सुसह्य असते.
मी जर पोलिसात तक्रार केली असती तर चौकशीत त्याचे अक्षम्य दुर्लक्ष (criminal negligence) सहज सिद्ध झाले असते. त्यावर त्याचे कोर्ट मार्शल होऊन त्याला नोकरीतून काढून टाकले गेले असते आणि कदाचित तुरुंगवास हि झाला असता.असे झाले असते तर त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असते.
आता हि शृंगापत्ती होती कि त्या मृत बालकाला न्याय द्यावयाचा तर दोन जिवंत बालकांवर अन्याय होत होता पण काही न करणे हे पण मनाला खात होते.एकीकडे तो तंत्रज्ञ त्या मतीमंद मुलासाठी किती कष्ट घेत होता ते मी स्वतः जवळ जवळ ६ महिने पाहत होतो. राजा घेऊन तो मुंबई आणि पुणे येथे जाऊन आला होता.त्या कुटुंबाचे आयुष्य त्या मुलाच्या आजाराभोवती फिरत होते. शेवटी त्या माणसाच्या सहनशक्तीचा अंत झाला असावा आणि त्याने त्या वैफल्यातून किंवा निराशेतून दुर्लक्ष केले असावे.
शेवटी मी त्या तंत्रज्ञा विरुद्ध पोलिसात तक्रार न करण्याचा निर्णय घेतला.त्याला रुग्णालयातून मृत्यूचे प्रमाणपत्र दिले गेले. मूकपणे साश्रू नयनांनी त्या तंत्रज्ञाने माझे आभार मानले.त्याला प्रतिसाद काय द्यावा हे मला कळत नव्हते.
हा निर्णय बरोबर कि चूक हे मला आजतागायत ठरवता आलेले नाही.पण त्या वेळेत मला जे बरोबर वाटले आणि माझ्या सद्सद विवेक बुद्धीला पटले ते मी केले.कारण एका मृत बालकावरील अन्यायाला वाचा फोडून दोन मुले आणि एका स्त्रीला वारया वर सोडावे हे मला पटले नाही.
शेवटी गणीतात २+२ =४ असतील पण आयुष्यात तसे होतेच असे नाही
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ठिकच केलेत
नंतर टोचणी लागली असली तरी हा
योग्य निर्णय..
--^--
योग्य तेच केलेत
शेवटी गणीतात २+२ =४ असतील पण
सुबोध जी तुम्ही खरंच वाईट
शेवटी गणीतात २+२ =४ असतील पण
अवघड असला तरी योग्य निर्णय.
क्लेश दायक अनुभव!
सुबोध सर तुम्ही अगदी योग्य
निर्णय योग्यच होता यात वाद
मतीमंद मुलांची शाळा
प्राप्त परिस्थितीत घेतलेला
निर्णय
परिस्थिती काहीही असली, तरी
@निल्या १
विवेकी निर्णय
+१