Skip to main content

रंगीत दहशतवाद

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 23/01/2013 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे पाहण्यात आले होते. प्रत्येक वेळेस केवळ अतिरेकी अमुक धर्माचा आहे म्हणून दहशतवादाला त्या धर्माचे नाव देता कामा नये हा नियम कटाक्षाने पाळला जात होता. तमाम साहेब, म्याडम व्यासपीठावरून उच्चरवात हेच ठासून सांगत होते. त्यामुळे दहशतवाद हा नेहमीच कृष्णधवल चष्म्यातून पहात होतो. पण आधुनिक काळाला अनुसरून आपले द्रष्टे गृहमंत्री शिंदेसाहेब ह्यांनी ह्या प्रकाराला फाटा द्यायचे ठरवले आहे. आणि रंगीत दहशतवाद हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे. च्यारिटी बिगिन्स आट होम ह्या न्यायाने सुरवातीला भगवा हा अस्सल भारतीय मातीतला रंग निवडला आहे. त्या धोरणाला अनुसरुन आजकाल भगवा दहशतवाद भारतात फोफावतो आहे, रा. स्व. संघाचे लोक मोठ्या प्रमाणात अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे चालवत आहेत. तिथे गठ्ठ्याने अतिरेकी बनत आहेत वगैरे रोचक विधाने आपल्या गृहमंत्र्यानी केली. आणि मोठीच खळबळ झाली. बहुधा काळेपांढरे टीव्ही जाऊन रंगीत आल्यावर अशीच खळबळ माजली असेल. अर्थात सिनेमा चालू असताना प्रेक्षकाने खलनायकावर ओरडणे, त्याच्या अंगावर धावून जाणे बावळटपणाचे वाटते तसे गृहमंत्री हा एकरंगी दहशतवादाचा खेळ तटस्थपणे बघत आहेत. प्रत्यक्ष मैदानात उतरून संबंधित संघटनेवर बंदी घालू, संबंधित संघटनांचे सदस्यत्व मिरवणारे आमदार, खासदार ह्यांचे पद रद्द करू, कुठल्या राज्यातील सरकार अशा वाईट नादाला लागत असेल तर ते बरखास्त करू असे काही म्हणत नाहीत. पण आता काही बुरसटलेले, जुनाट विचारांचे काँग्रेसी नेते ह्या रंगीत दहशतवादाला नाकारुन पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट दहशतवादाकडे वळू असे म्हणत आहेत. http://online2.esakal.com/esakal/20130123/5600019574208857395.htm पूर्वीही असे अप्रिय सत्य ठणकावून सांगणार्‍या द्र्ष्ट्या लोकांना हालअपेष्टा सहन करायला लागल्या होत्या. गॅलिलिओ, टॉलेमी अशा लोकांच्या तोडीस तोड आपले गृहमंत्रीजी आहेत असे वाटते. आपल्याला काय वाटते? रंगीत दहशतवादच बरा नाही का? रंगीत सिनेमे आल्यावर कुणी ब्लॅक अँड व्हाईटला विचारतो का? फक्त आपल्याला हवे ते रंग निवडायचे स्वातंत्र्य हवे, कसे?

वाचने 54833
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

शिंद्यांचे अत्यंत निराधार व अत्यंत बेजबाबदार आरोप भारताला किती महागात पडणार आहेत याची ही एक झलक. असा बेजबाबदार माणूस भारताच्या गृहमंत्रीपदावर आहे हे आपलं दुर्दैव. http://www.outlookindia.com/article.aspx?283697 भाजप/संघावर आरोप करताना आपल्याच काँग्रेस पक्षाचा गुजरातेतला एक मंत्री महंमद सुर्ती याला १९९३ च्या सुरत बॉम्बस्फोट प्रकरणी २० वर्षाचा तुरूंगवास झाला आहे हे शिंदे सोयीस्कररित्या विसरले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

सडके राजकारण लोकांचे लक्ष "महागाई, अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार" इत्यादी गोष्टींवरून उडवण्यासाठी जी आघाडी केंद्रातील सत्ताधारी पक्ष्याच्या नेत्यांनी उघडली आहे ते बधून अत्यंत वेदना होत आहेत. असल्या सडक्या राजकारणाने आपण देशाची प्रतिमा बिघडवत आहोत आणि सर्वात जास्त धोकादायक शत्रू म्हणजे अतिरेकी यांना बळ देत आहोत याचे भान केंद्रीय गृहमंत्र्यांना नाही हे त्याहून वाईट. काही दिवसांपूर्वी आपल्या सैनिकांची शिरे कापून पळवणाऱ्या पाकिस्तानी लष्करला हाफिज सईद हा चिथावणी देण्यासाठी सीमेवर हजर होता असे वक्तव्य करणारे मंत्रीमहोद पक्ष्याच्या शिबिरात संघावर घसरले. आधी चिदंबर गृहमंत्री होते त्यांनी जे वक्तव्य केले तसेच आताच्या गृहमंत्री आरोप करीत होते. "तुमच्या हातात पुरावे आहेत तर कारवाई का करीत नाहीत " याचे उत्तर ते देऊ शकणार नसल्याने फक्त फुत्कार टाकत आहेत. या फुत्कारांनी बळ मिळालेल्या "हाफिज सईद साहेब" याने लगेचच दुगण्याझाडल्या आहेत. (हाफिज सईदचा उल्लेख "साहेब" असा करणाऱ्या नेत्याबद्दल बोलायची इच्छा नाही.) शिंदेंमुळे दहशतवाद्यांच्या हाती आयते कोलीत हि बातमी सविस्तर वाचा. ही बघा हाफिज सईद याची मुलाखत. शिंद्यांनी दिलेल्या टोनिकमुळे बळ मिळालेले त्याच्या वक्तव्यात दिसून येईल. अमेरिकेलासुद्धा आवाज देत आहे तो. BJP and RSS should be declared as 'terrorist outfits': Hafiz Saeed हे सुद्धा बघा. LeT chief Hafiz Saeed praises Shinde's terror remark शिंद्यांनी दिलेल्या डोसमुळे हाफिज सईद साहेब सुटले आहेत. त्यांची मुक्ताफळे वाचा. शाहरुखनं पाकमध्ये स्थायिक व्हावं!- हाफिज सईद आणि भारताकडून काश्मीर काबीज करणारच!- हाफिज सईद त्याच्या जोडीने ISI उतरली आहेच. 'भारतीय जवानाचा शिरच्छेद केल्यास ५ लाख'...ISIची ऑफर आम्ही फक्त चिंता व्यक्त करणार. पाकनं आमची मैत्री गृहित धरू नये!- राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रणव मुखर्जींचे भाषण वृत्तसंस्था , नवी दिल्ली शेजारी देशांमध्ये मतभेद असू शकतात , सीमेवर तणाव असू शकतो. मात्र काही गटांच्या माध्यमातून दहशतवादाला प्रोत्साहन देणे ही देशासाठी चिंतेची बाब आहे. भारत मैत्रीचा हात पुढे करण्यास तयार आहे , परंतु आम्हाला गृहीत धरू नका , असा इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी पाकिस्तानला दिला. देशाच्या ६४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात मुखर्जी यांनी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने भारतीय जवानाचा शिरच्छेद केल्याच्या घटनेचा संदर्भ घेत पाकला ठणकावले. हे ठणकावणे आहे का? केंद्रीय गृह मंत्र्यांमुळे सर्व अतिरेकी संघटनांना बळ मिळाल्याचा हा अजून एक नमुना. मुसलमानांसाठी काश्मीरवर हल्ला करण्याची तालिबानची धमकी निष्पाप काश्मीरी मुसलमानांना काश्मीरातून हकलवून लावण्यासाठी भाजपने छुप्या पद्धतीने हिंदू दशहशतवादी शिबिरे चालवली आहेत , असा सूर तहरीक - ए - तालिबान पाकिस्तानने आळवला आहे . ती शिबिरे नष्ट केली नाहीत तर भारतावर हल्ला करू , असा इशारा या संघटनेने दिला आहे . पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने ही माहिती आपल्या वृत्तपत्रातून देण्यात आले आहे . तहरीक - ए - तालिबान पाकिस्तानचे प्रमुख एहसानुल्लाह एहसान याने डॉन या वृत्तपत्राकडे भारताचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा दाखला देत हा इशारा दिला आहे

In reply to by चिंतामणी

( अर्थात ती करण्याचे त्यांचे धैर्य काश्मुळे झाले हे सांगायला नको) शाहरुखला सुरक्षा द्या! : पाकचा आगाऊपणा (येथे सविस्तर बातमी वाचा) लष्कर-ए-तोयबा’चा म्होरक्या हाफिज सईदने अभिनेता शाहरुख खानला पाकिस्तानात स्थायिक होण्याची ऑफर दिल्यानंतर आता पाकिस्तान सरकारनेही या प्रकरणात तोंड खुपसले आहे. ‘शाहरुख खानला भारत सरकारने योग्य सुरक्षा द्यावी, असा आगाऊपणाचा सल्ला पाकिस्तानचे वादग्रस्त गृहमंत्री रेहमान मलिक यांनी दिला

जोपर्यंत (अगदी मेल्यानंतर मिळणार्‍या फायद्यांच्या) फुक्या गोड आश्वासनांवर भुलून जीव द्यायला / जीव घ्यायला तयार होणारे निर्बुद्ध लोक या जगात आहेत. अशा लोकांना उल्लू बनवून त्यांच्या चितेवर आपली पोळी भाजून घेताना शरम अथवा दु:ख न वाटणारे नराधम हजारो वर्षांपासून आस्तित्त्वात होते, आहेत आणि होत राहतील.... राजकारण्यांना (धर्माचा बुरखा घेतलेले राजकारणी यात समाविष्ट आहेत) कुठल्याही रंगाचे वावडे नसते. येशु ख्रिस्ताला ज्याने सुळावर चढवले त्याच रोमन साम्राज्याने नंतर ख्रिचियानीटीचा साम्राज्यवाढीसाठी खूप चांगला उपयोग होईल हा विचार करून ख्रिश्चन धर्मप्रसार आणि त्याच्या बळावर राज्यप्रसार हे धोरण यशस्वीपणे अवलंबले आणि बहुतेक सगळा युरोप आपल्या साम्राज्यात सामील केला. राजसत्तेच्या वाढीस फार उपयोगी आहे हे जाणून उथमान ने त्याकाळी आस्तिवात असणार्‍या ३६० पेक्षा जास्त कुराणाच्या प्रती जमा करून त्यांची एकत्रित एकच प्रत बनवली आणि इतर सर्व नष्ट केल्या. हे एकत्रित कुराण मुस्लिम जगतावर ऑटॉमान साम्राज्याचा एकछ्त्री अंमल आणण्यास कामाला आले. आता अफगाणिस्तानमध्ये चालेलेली तालिबानी दडपणूक आणि ड्र्गचा व्यापार हा पैसा व सत्तेचा खेळ नाही तर अजून काय आहे? आजच्या राजकीय / धार्मीक नेत्यांची भाषणे अथवा वागणूक ही मुख्यतः अशाच स्वयंकेंद्रित फायद्याकरिता आहे. जोपर्यंत त्यांच्यामागे धावणार्‍या समाजाला अक्कल येत नाही तोपर्यंत अश्या जनतेचा उपयोग नेत्यांच्या (गैर)फायद्याकरता होणे अपरिहार्य आहे.

चिदंबरम, शिंदेंवर ४२० चा गुन्हा तेलंगणा राज्याच्या निर्मितीचे आश्वासन देऊन केंद्रीय अर्थ मंत्री पी. चिदंबरम आणि गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लोकांची फसवणूक केली असून दोन्ही नेत्यांवर आयपीसीच्या कलम ४२० खाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश आंध्र प्रदेशमधील न्यायालयाने दिले आहेत. अधिक वरील दुव्यात वाचायला मिळेलच.

सुशीलकुमार शिंदेना फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही- असला मेंगळट माणूस भारताच्या गृहमंत्रीपदी जाऊन बसतो हेच आपलं दुर्दैव (आणि हफीज सईद सारख्यांची चंगळ) आहे. एक प्रश्न पडतो- ज्या ज्या मराठी नेत्यांना केंद्रात गृहमंत्र्यासारखी महत्त्वाची पदं मिळाली ते बहुतेक सगळे असले नगच कसे निघाले- उदा शिवराज पाटील, सुशीलकुमार किंवा राज्य पातळीवर आर्र आर्र पाटील इ. एकापेक्षा एक सगळे शेळपट आहेत.

सुशिलकुमार शिंदे खरे बोलले असतील तर पाकिस्तानने उगाच आरोप अंगावर घेतला म्हणायचा का? संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रस्ताव पण खोटा आहे का? तो प्रस्ताव काय म्हणतो? ‘लष्करे तोयबाचा अन्य सघटनांशी संबंध ठेवणारा प्रमुख संपर्काधिकारी कस्मानी आरिफ़ याने फ़ेब्रुवारी २००७ मध्ये भारतातील पानिपत येथे झालेल्या समझोता एक्सप्रेसच्या बॉम्बस्फ़ोटात महत्वाची भूमिका बजावली. त्याला व अलकायदाला निधी उभारणीसाठी दाऊद इब्राहिमने मदत केली. अन्यत्र आपल्या कृत्याला सहाय्य देण्य़ाच्या बदल्यात अलकायदाने तोयबाला समझौता स्फ़ोटात मदत केली.’ (प्रस्ताव क्रमांक १२६७) हा प्रस्ताव राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने २९ जुन २००९ रोजी संमत केलेला आहे. दोनच दिवसांनी १ जुलै २००९ रोजी आरिफ़सह अन्य तीन पाकिस्तान्यांची नावे घेऊन अमेरिकेच्या अर्थखात्याने (आदेश क्रमांक १३२२४ अन्वये) त्या चौघांनाही दहशतवादी म्हणून घो्षित केले होते. तरी पाकिस्तानने त्याची कबुली द्यायचे नाकारले होते. पुढे सहा महिन्यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी २४ जानेवारी २०१० रोजी कोड्यात टाकणारे विधान करत त्याची कबुली दिली. ज्यांना अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले त्या पाकिस्तान्यांचा समझौता स्फ़ोटात हात असल्याचे मान्य केले. पण तसे कस्मानी वगैरेंनी स्वेच्छेने केले नाही. त्यांना कर्नल पुरोहीतने भाडोत्री हल्लेखोर म्हणून सुपारी दिली असा रेहमान यांचा दावा होता. मग मालेगाव प्रकरणी पकडण्यात आलेल्या कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञा सिंग यांचा समझौता स्फ़ोटाशी संबंध कसा जोडण्यात आला? तर १४ नोव्हेंबर २००८ रोजी महाराष्ट्र एटीएसने मालेगाव आरोपीच्या विरोधात कोर्टामध्ये नवेच निवेदन सादर केले आणि त्यांचा समझौता स्फ़ोटाशी संबंध जोडला. समझौता स्फ़ोटासाठी कर्नल पुरोहित यांनीच आरडीएक्स पुरवले, असे ते एटीएसचे निवेदन होते. पण हे निवेदन किती खरे मानायचे? कारण तोपर्यंत समझौता तपास पुर्ण झाला होता आणि त्यात पकडलेल्या आरोपींनी गुन्हा मान्यही केला होता. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे समझौता स्फ़ोटासाठी आरडीएक्सचा वापरच झालेला नव्हता. मग महाराष्ट्र एटीएसने (ज्याचे प्रमुख तेव्हा हेमंत करकरे होते) त्या स्फ़ोटासाठी आरडीएक्स पुरोहितने पुरवल्याचा शोध कुठून लावला? कारण ज्या दिवशी समझौता स्फ़ोट झाला, त्याच्या दुसर्‍याच दिवशी तेव्हाचे मराठी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटिल यांनी त्या स्फ़ोटासाठी आरडीएक्सचा वापर झालेला नाही, अशी ग्वाही दिलेली होती. पुढे हरयाणा पोलिसांनी केलेल्या तपासात त्या स्फ़ोटासाठी पोटॅशियम क्लोरेट वापरण्यात आल्याचे सिद्ध झाले होते आणि तसा दावा कोणा मंत्र्याने नव्हे तर फ़ोरेन्सिक प्रयोगशाळेने केला होता, ज्यांना त्या विषयातले जाणकार मानले जाते. पुढे २० जानेवारी २००९ रोजी महाराष्ट्र एटीएसने अधिकृतरित्या समझौता स्फ़ोटासाठी पुरोहितने आरडीएक्स पुरवले नसल्याचे कोर्टात मान्य केले. म्हणजेच राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या झाला. पण जसजसा तपास पुढे सरकत गेला, तसतसा मुळात राईच नाही असे उघडकीस आले. पण नवे गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे मात्र आभासातल्या पर्वतावर स्वार झालेले आहेत आणि तिथून उतरायलाच तयार नाहीत. ते एकटेही नाहीत. त्यांच्यासह तमाम सेक्युलर अर्धवटरावही त्याच राईच्या पर्वतावर आरुढ होऊन भगव्या दहशतवादाच्या नावाने आरोळ्या ठोकत आहेत. जो पर्वत सोडा जिथे राईसुद्धा अस्तित्वात नाही. जयपूरमध्ये शिंदे यांनी जे राणा भीमदेवी थाटातले भाषण केले; त्यातही त्यांनी पुन्हा समझौता स्फ़ोटाचा दाखला दिलेला आहे. तो कसा धडधडीत खोटा आहे, त्याचे हे पुरावे आहेत. पण त्याचा उपयोग काय? ज्यांना पुराव्याच्या आधारे गुन्हा किंवा निरपराधीत्व सिद्ध करायचे असते त्यांच्यासाठी पुरावे कामाचे असतात. ज्यांनी आपल्या संशयिताला आधीच दोषी मानलेले असते, त्यांच्यासाठी पुरावे समोर असून उपयोग कुठला? या बाबतीत आपल्या देशातील सेक्युलर नेते, माध्यमे व विचारवंतांमध्ये एक कमालीचे साम्य आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्याचे शेकडो पुरावे भारताने आजवर पाकिस्तानला दिलेले आहेत. पण त्यांनी एकतरी पुरावा मानला आहे काय? उलट तोंडाने पाकिस्तान म्हणत असतो, पुरावा तर द्या; हफ़िज़ सईदच्या विरोधात. आता इथे वर दिलेली माहिती ही अमेरिका, राष्ट्रसंघ, भारत सरकार, महाराष्ट्र पोलिस, व तात्कालीन वृत्तपत्रात आलेली आहे, बघणार्‍यासाठी उपलब्ध आहे. पण घट्ट डोळे मिटुन बसलेल्यांना दाखवायचे कसे आणि कोणी? नसलेले काल्पनिक पुरावे निर्माण करायचे आणि त्याचा गवगवा करायचा. त्याच्या अतिरंजित बातम्या रंगवायच्या. मग ते पुरावे कोर्टात वा प्रयोगशाळेत खोटे पडले; तरी जुन्या खोट्या बातम्यांचा आधार घेऊन तेच तेच खोटे आरोप करतच रहायचे; ह्याला हल्ली सेक्युलर बुद्धीवाद व युक्तीवाद समजले जाते आहे. आणि खोटे पुरावे कसे निर्माण करतात वा करावेत त्याचा पाठ शरद पवारांनी घालून दिलेलाच आहे. मुंबईत १९९३ सालात झालेल्या स्फ़ोटात पाकिस्तान व मुस्लिमांकडे संशयाचा रोख जाऊ नये म्हणून त्यांनी एअर इंडीयाच्या इमारतीमध्ये झालेल्या स्फ़ोटात दक्षिणेकडुन आलेली स्फ़ोटके असावीत असे खोटेच सांगुन टाकले होते. त्यातून मुजाहिदीन वा तोयबाऐवजी तामिळी वाघ मुंबई स्फ़ोटातले आरोपी असावेत; असा खोटाच संशय लोकांच्या मनात भरवण्याचा आपण प्रयत्न केला, अशी कबुली पवारांनी इंडीयन एक्सप्रेसचे संपादक शेखर गुप्ता यांना कॅमेरासमोर दिलेली आहेच. त्यांच्या वृत्तपत्रात तशी बातमीही त्यांनी छापलेली होतीच. तेव्हा शिंदे आज जो अहवाल सांगत आहेत व मालेगावपासून अन्य कुठल्याही स्फ़ोटामध्ये पुरोहित वा साध्वी यांच्या विरोधातले किंवा अन्य कुणा हिंदू दहशतवाद्याच्या विरोधातले ‘सज्जड व भक्कम’ पुरावे; सापडतात कुठे व असतात कुठे त्याचा पत्ता मिळाला? हे सगळे पुरावे काल्पनिक असतात व सेक्युलर सुपीक डोक्यातून निघालेले असतात. त्यामुळेच ते खर्‍याखुर्‍या न्यायालयात आणता येत नाहीत किंवा सिद्ध करता येत नाहीत. म्हणूनच कर्नल पुरोहितने समझौता स्फ़ोटासाठी आरडीएक्स पुरवल्याचा आरोप व पुरावा न्यायालयात तोंडावर आदळला तेव्हा माघार घेण्यात आली होती. तसा पुरावा नसल्याची एटीएसने कबूली दिली होती. पवारांनीही आपल्या खोटेपणाची स्वत:च कबुली दिलेली आहे. पण सुशिलकुमार किंवा कॉग्रेसवाल्यांची अवस्था ‘थोर’ विचारवंत कुमार केतकर म्हणतात तशी असते. ‘सत्तातुराणां न भयं न लज्जा’. जे लोक सत्तेसाठी लंपट व हपापलेले असतात. त्यांना कसलीच लाज नसते, की फ़िकीर नसते. त्यामुळे ते खोटे बोलू शकतात व सतत खोटे बोलत राहू शकतात. किंबहूना आता सेक्युलर म्हणवणार्‍यांचे तेच व्यवच्छेदक लक्षण बनत चालले आहेत. त्यांना खोटे बोलल्याची लाज उरलेली नाही, की खोटे पकडले गेल्याची शरम वाटेनाशी झाली आहे. उलट खोटे कुठे दिसले, की मिटक्या मारीत ते त्यावर ताव मारताना दिसतात. त्यामुळेच अशा वखवखलेल्यांसाठी शिंदे यांनी जयपुरात पंगत वाढली आणि तमाम सेक्युलर त्यावर तुटून पडले. सोकावलेल्या बिबट्याला गावात धुमाकळ घालू लागला, मग पकडायला सापळा लावावा आणि त्यात तो सापडावा, तशीच सेक्युलर शहाण्यांची आज अवस्था झाली आहे. त्या सापळ्य़ात एका बाजूला शेळी बांधतात व अर्ध्या भागात सापळा असतो. कुठूनही शेळीपर्यंत पोहोचण्याचा हव्यासात उतावळा झालेला बिबट्या शेवटी सापळ्याच्या बाजू्ने पिंजर्‍यात शिरतो आणि जेरबंद होतो. तशीच अवस्था आता भगव्या दहशतवादाच्या सापळ्यात अडकलेल्या सेक्युलरांची होऊन गेली आहे. कारण हे तमाम मुर्ख शिंदे नावाच्या शेळीच्या मागे धावले आणि खोट्या पिंजर्‍यात आयते येऊन अडकले आहेत, दिवसेदिवस त्यांचे हे नाटक लांडगा आलारे आला सारखे होत चालले असून त्यातून सामान्य नागरिकांचा जो भ्रमनिरास होत आहे; तो त्याला मतदार म्हणून नरेंद्र मोदींकडे घेऊन जाणार आहे. जातो आहे. गुरूवारी एबीई व हेड्लाईन्स टुडे नावाच्या वाहिन्यांनी मतदाराचा कल घेऊन प्रेक्षकांना सादर केला. त्यात कॉग्रेसची, पंतप्रधा्नांची लोकप्रियता रसातळाला गेल्याचे स्पष्ट दिसते आहे. दुसरीकडे मोदींची लोकप्रियता वाढताना दिसते आहे. खरे तर ती मोदींची लोकप्रियता असण्यापेक्षा कॉग्रेस व सेक्युलर नाटकाला कंटाळलेल्या लोकांची प्रक्षुब्ध प्रतिक्रिया आहे. निकामी, खोटारड्या व घातक सेक्युलर सत्तेपेक्षा खमक्या व धाडसी नेत्याच्या शोधात लोक आहेत. आणि जितका सेक्युलर खोटेपणा वाढत जाणार आहे; तितका अधिक लोकसमुदाय पक्ष वा विचार नव्हेतर धाडसी व खंबीर नेत्याकडे आकर्षित होणार आहे. मोदींना वाढता पाठींबा प्रत्यक्षात सेक्युलर थोतांडाला झिडकारण्याकडला वाढता कौल आहे. पण ते खोट्या भ्रामक जगात जगणार्‍यांना सांगायचे कोणी व दाखवायचे कोणी?-भाऊ तोरसेकर

काल हैदराबादमध्ये दिलसुखनगर भागात सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या दोन स्फोटांत किमान २० ठार, तर १०० हून अधिक जखमी झाले. अजमल कसाब व अफझल गुरू यांच्या फाशीनंतर दहशतवादी संघटनांकडून त्याला प्रत्युत्तर दिले जाण्याची शंका हैदराबादमध्ये झालेल्या दोन स्फोटांनी खरी ठरली. ह्या दहशतवादाचा रंग कोणता ते आता सुशिलकुमार स्पष्ट सांगतिल का?

ह्या दहशतवादाचा रंग कोणता ते आता सुशिलकुमार स्पष्ट सांगतिल का?
हा हा. ते आता दहशतवादाला कुठलाच रंग नसतो असे म्हणतील.पुढच्या एक दोन दिवसात- ह्या स्फोटामागे आय्.एस्.आय. असल्याची स्टोरी सांगतली जाईल. मग पाकिस्तानला 'कडक' समज दिली जाईल.पाकवाले स्फोटाचा 'कडक' निषेध करतील. मनमोहन्,शिंदे जखमींची 'विचारपूस' करतानाचे फोटो दाखवले जातील.तपास यंत्रणा/पोलिस असला स्फोट होणार होता हे आम्हाला आधीच माहित होते असे सांगतील.

>>> आता दहशतवादाला कुठलाच रंग नसतो असे म्हणतील.पुढच्या एक दोन दिवसात- ह्या स्फोटामागे आय्.एस्.आय. असल्याची स्टोरी सांगतली जाईल. मग पाकिस्तानला 'कडक' समज दिली जाईल.पाकवाले स्फोटाचा 'कडक' निषेध करतील. मधूनच दिग्विजय, आर आर पाटिल इ. वाचाळवीर असे सांगायला सुरूवात करतील की या स्फोटासाठी हिंदू दहशतवादी संघटनांची देखील चौकशी करावी. मग लगेचच अबू आझमी, रशीद अल्वी इ. सांगायला सुरूवात करतील हिंदू दहशतवादीच या स्फोटामागे आहेत. या स्फोटांचे निमित्त करून साध्वी प्रज्ञासिंग इ. ची चौकशी करणारे एनआयएचे अधिकारी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करायला अजून मुदत मागतील व कारण सांगतील की आम्हाल असीमानंद, प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित इं. चे या स्फोटाशी कनेक्शन आहे का ते तपासायाला वेळ लागेल. लगेचच दिग्विजय, आबा पाटिल वगैरे शंका व्यक्त करायला सुरूवात करतील की अफझलच्या फाशीमुळे वातावरण तापलेले असताना या स्फोटांचे आरोप निरपराध मुस्लिम समाजावर जातील हे गृहित धरून संघपरिवारानेच हे स्फोट घडवून आणले असावेत. शेवटी या स्फोटांमागचे खरे आरोपी सापडणार नाहीत व संशयाची सुई मात्र संघपरिवारावर वळविली जाईल.

In reply to by नितिन थत्ते

असं म्हटलंय. म्हणजे खटला चालवावा. याचा अर्थ खटला भरण्यासारखे आरोप कर्नल पुरोहित यांच्यावर ठेवता येतील आणि पुरावा कोर्टासमोर मांडता येईल. त्यावरून कोर्टालाच ठरवू द्या पुरोहित दोषी की निर्दोष ते.

In reply to by बोका-ए-आझम

ते कोर्ट ठरवेल हे बरोबरच. फ़क्त भगवा दहशतवाद हा शब्द पुसून टाकायची परिस्थिती "अजून" आलेली नाही इतकेच.

In reply to by नितिन थत्ते

नितीन थत्ते, भगवा दहशतवाद हा शब्द पुसायचा कशाला? जो शब्द अस्तित्वातच नाही तो पुसून टाकता येईल काय? कर्नल पुरोहित दोषी ठरले तर आणि तरंच भगव्या दहशतवादाबद्दल चर्चा करता येईल. पण तरीही ही संज्ञा स्वीकारण्यात अडचणी आहेतंच. कारण की हिंदूंमध्ये धर्माच्या नावाखाली निरपराध्यांना ठार मारायची पद्धत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

>>कारण की हिंदूंमध्ये धर्माच्या नावाखाली निरपराध्यांना ठार मारायची पद्धत =))

In reply to by गामा पैलवान

हिंदूंमध्ये धर्माच्या नावाखाली निरपराध्यांना ठार मारायची पद्धत नाही.
अगदी बरोबर...पण जातीच्या नावाखाली चालते

In reply to by टवाळ कार्टा

पण जातीयवादामुळे होणाऱ्या हत्यांना काहीतरी कारण असतं, काहीतरी trigger असतो. हिंदू धर्मात एका जातीचे लोक दुस-या जातीच्या माणसाला केवळ तो त्या जातीत जन्माला आला म्हणून मारत नाहीत. कुठल्याही कारणावरून मारण्याचं समर्थन अजिबात नाही, पण केवळ वेगळ्या मानवसमुहात जन्माला आला म्हणून मारणं हे जास्त अमानुष आहे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत.

In reply to by बोका-ए-आझम

हत्या ह्या अमानुषच असतात. त्यात कमी वा जास्त अमानुष असे काही नसते. असतो तो फक्त दृष्टिकोन.