Skip to main content

निरक्षर

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 17/01/2013 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
कधीही न भेटणार्‍या, पण जिवलग मित्रांची ही स्टोरी. न भेटता (किंवा भेटण्याची शक्यता नसताना) ते जिवलग कसे झाले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. तो भेटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा चालतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायच नाही.... फक्त वाचायच. _________________________________ मुक्कामाचं ठिकाण ठाऊक नाही पण चालयच,... वेड्यासारखं चालायच. आजूबाजूच्या गर्दीला जुमानतय कोण? उन्हातान्हातून वणवण त्यात सावली कुठली बोंबलायला ? आपलीच पावलं म्हटल्यावर झक मारत चालणारच आणि पावलं चालतायत म्हटल्यावर रस्ता न सरून सांगतोय कुणाला? अरे एक सांगायच राहिलं, वाळवंटातनं चालायच....फार मजा येते. अचानक वाळूत अक्षरं उमटलेली दिसतात. कोण लिहून गेला कसं कळणार? चालायची ताकद संपली पण बघायची आहे ना? (बघा!) ...पण दिसलं काहीच नाही. तरी कुणीतरी आहे असं भासलं...(मला भास होतायत वगैरे निष्कर्ष काढू नका वाळूवरची अक्षर दिसली म्हटलयना?) चला आता वाळूवरच्या अक्षरांशी खेळू . डोळ्यांची वाट लागली तरी हरकत नाही... ‘आत’ शांत वाटायला हवं. त्या लिहित्या हाताला उत्तर देतो. ‘कसं देणार’ काय विचारताय? मगाशी सांगीतलं ना ‘कुणी रेखाटलीयेत माहिती नाही’ तरी आपल्याकडे आयडीया आहे ना!.... त्याच वाळूत अक्षरं लिहून उत्तरं द्यायची! आह..! झाला संवाद चालू! (स्वत:चा स्वत:शी का होईना)...‘काही तरी चालू झालं’ हे महत्त्वाच. सुरुवातीला वेड्यासारखा वाटणारा हा अनोखा संवाद हळूहळू.. पावलागणिक वाढत गेला (तुम्हाला काय वाटलं थांबलो? छे, .....चालता चालता लिहीतोय ). अक्षरं उमटत राहिली. कधी वरून खाली कधी खालून वर. (मायला वाचणारेय कोण? मीच ना?) मग कशी लिहीली काय विचारताय? तू. मी. मी. तू. ..... मी काय वाळूतली हुतूतू खेळत नाय, नीट वाचा... तू. मी. मी. तू. ..आय एम रायटींग संवाद फ्रॉम बोथ साइडस. आता पुन्हा ‘कश्याला लिहीतोय’ विचारू नका... न भेटणार्‍या `जिवलग मित्रांची' स्टोरी आहे ही (एकदा सांगीतलय ना) आता वाळूतली अक्षरं डोक्यात गेली. सगळीकडे अक्षरं... पानापानांवर, फुलाफुलावर. कधी वार्‍याच्या झुळकीवरदेखील. कधी तर थेट मोठ्यांदा वाचायलाच लागलो. अक्षरांच्या सोबतीनं आता जगणं आलं. इतकं इतकं बोलतोय तुझ्याशी. तुझ्याच शब्दात सांगायचं तर स्वतःशी बोलावं इतकं. (पब्लिक माझ्याकडे विचित्र नजरेनं बघतय,... बघू दे) येड्यावाणी उर्दू-मराठीची भेसळ चाललीये पण अजूनही अक्षरंच. लिहिणारा हात नाही. त्या अक्षरांना तुझा चेहरा नाही.. कधी येशील समोर? या प्रश्नाला उत्तरही अक्षरीच. समोर येऊन नाही.... (अजून सॅंडवरच चाललय सगळं, आलं ना लक्षात?) माझ्याकडे तुझा फोन नाही, पत्ता नाही, इ-मेल नाही, फेसबुक कश्याला म्हणतात मला माहिती नाही. अगम्य अश्या `संपर्कमाध्यमांतून आपण एकमेकांचे मित्र आहोत. पण आपण एकमेकांना कॉंटॅक्ट करायचा नाही. आपण फक्त बोलायच. वन वे...वाळूत अक्षरं लिहून. काही क्षणांत.. किंवा कुठेसं म्हटलंय तसं दोन क्षणांच्या गॅपमधे का होईना पण तुझ्याशी जोडलं राहण्याचं अक्षराशिवाय साधन नाही, हे जाणून फार येड्यासारखं होतं. (तरी मी लिहीणार!) नुसतेच शब्द, त्यांचे कधी तू, कधी मी, आणि कधी आपण मिळून लावलेले अर्थ. कळतयं ना तुला? मीच लावतोय अर्थ पण तुला मधे ओढतोय.... (नायतर पब्लिक ट्यांपोत बसवेल) आनंद देणार्‍या इतर कोणत्याच गोष्टी तुझ्यासोबत करता येत नाहीत. (....ते केलं तर पारच कामातून गेला म्हणतील सगळे) स्वतःला दिवसातून केव्हाही आरशात बघतो तेंव्हा तूच दिसायला लागलायस..नाही नाही... असाही दिवस येईल कधी तरी . ( अजून तरी आरश्यात बघीतल्यावर मीच दिसतोय) तुझंमाझं नातं ते काय मग? निव्वळ शब्द?... नाही नाही... निदान तू तरी असं म्हणू नकोस. ‘आरशाच्या पलिकडे’ बघतो कसलाच शोध लागत नाही. मग तुला बघण्याचा हा विलक्षण सोस तरी का लावून घ्यायचा जिवाला? तू दिसलास कदाचित, तर काय होईल त्याने? स्वप्नपूर्ती? अपेक्षाभंग?.... छे, छे, तू दिसावास अशी अपेक्षा तरी कशाला? (वाळूतली हुतूतू काय कमी मजा आणतेय?) याच विचारात मग्न असताना कुणीतरी एफेम लावला..... मेरे फोटोको, मेरे फोटोको सीनेसे यार, चिपकाले सैंय्या फेविकॉल से! ....अचानक उत्तर मिळूनही गेलं. . तू आहेस अशी पाटीच गळ्यात अडकवून घेतली! आता एकदम झ्याक झालं.. एकरूप असणे, समरस होणे अनुभवतोच आहे प्रत्येक क्षणी. हे ‘नसलेल्याच असलेल्याशी नातं’.... अशी फेविकॉल सोबत मिळणे हे माझं परमभाग्यच! तेव्हा तुझंमाझं नातं. निरंतर टिकणारं.... फेविकॉल कशाला हवा? कल्पनेची पकड काही कमी नाही. निरक्षर म्हणजे अक्षर ओळख नसलेला असा नाही. त्याला लिहीता वाचता येतं, पण अर्थ समजत नाही. आता आपलं नातं निव्वळ शब्दात बांधलेलं नव्हे, तर कधी न मिटणारं.... फेविकॉलपेक्षा मजबूत....निरक्षर भ्रमाच्या लेपाचं. आता तू असलास काय आणि नसलास काय, दिसलास काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही... माझ्या बाजूनं नातं पक्कं आहे! त्याला स्थळाकाळाचं बंधन नाही....कल्पना हेच त्याचं लिमिट आणि तीच त्याची पॉवर.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 29109
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

In reply to by अर्धवटराव

अध्यात्म काय म्हणतं आणि विज्ञान काय म्हणतं या दोन्ही बाजू अतिशय संयतपणे आणि चांगल्या रितीने मांडल्या आहेत.
प्रचलीत वैद्यकशास्त्रानुसार जीवन हे एक विशिष्ट प्रकारचं केमीकल कंपाऊण्ड आहे. ते नेमकं काय आहे आणि ते कसं डेव्हलप झालं याचा अभ्यास अजुनही सुरु आहे. त्यांच्यानुसार मन देखील ठायरॉईड व इतर ग्रंथी जे काहि स्त्रवतात त्याचा परिपाक आहे. त्यामुळे वैद्यकशास्त्र आणि मानसशास्त्र अल्टीमेटली शरीरातील केमीकल लोचे दुरुस्त करण्याचं शास्त्र आहे.
माझ्या मनात अगदी हेच विचार होते. म्हणूनच तुम्ही जेव्हा मानसशास्त्र आणि वैद्यकशास्त्राचा उल्लेख केलात तेव्हा मी ते समजावून सांगण्याची विनंती केली.
आध्यात्मानुसार जीवन हे स्थळ-कालाबाधीत चिरंतन तत्व आहे. या घटकेला ते एका विशिष्ट शरीर रुपाने वावरतय. भविष्यात हे शरीर टिकुन राहणार नाहि, किंबहुना हे विश्व आता दिसतय तश्या फॉर्ममधे देखील राहणार नाहि, पण जीवन त्यापासुन अबाधीत असेल. जीवन इतर दुसरा कुठला शरीर फॉर्म डेव्हलप करेल. आध्यात्मात मन देखील एक एक इंद्रीय मानण्यात आलय. एक शरीर नष्ट झाल्यावर त्याशरीरामार्फत केलेल्या कर्मांचे संस्कार दुसर्‍या शरीरात वाहुन नेण्याचं काम मन करतं. मनाचे भ्रम केवळ केमीकल लेचे नाहित तर कर्मसंस्कार आहेत व ते धुतल्या जाऊ शकतात.
वैद्यकशास्त्राच्या मते पेशी हा सजीवांचा मुलभूत घटक आहे. जोपर्यंत पेशी जिवंत आहेत तोपर्यंत त्या सजिवाच्या जीवात जीव असतो. तो सजीव जेव्हा मृत होतो तेव्हा खरं तर त्या सजिवाच्या शरीरातील एकुण एक पेशी मृत पावतात. तोच त्या सजिवाचा "दी एन्ड" असतो. तिथून पुढे त्या सजिवाला दृश्य वा अदृश्य स्वरुपात अस्तित्व नसतं. विज्ञानाच्या दृष्टीने मनाचे भ्रम हा पुर्णपणे केमिकल लोचा असतो. कुठलं केमिकल कधी कसा लोचा करतं हे त्या व्यक्तीचा पिंड आणि त्या व्यक्तीवर लहानपणापासून झालेले संस्कार यावर ठरत असतं. तुमचं मत पुनर्जन्म या संकल्पनेवर (माझ्या दृष्टीने :) ) आधारीत आहे. पुनर्जन्म या संकल्पनेबाबत भारतीय साहीत्यात अगदी योगवासिष्टापासून ते परमहंस योगानंदांच्या आत्मचरीत्रापर्यंत आश्चर्य वाटावं इतकी एकवाक्यता आहे. चौर्‍याऐंशी लक्ष योनींचा फेरा झाल्यानंतर एकदा मानव जन्म मिळतो. हे ते मत. आणि या जन्मात येणारी सु:ख-दु:खं ही आधीच्या जन्मात केलेल्या पाप पुण्यांवर आधारीत असतात, ज्याला तुम्ही कर्मांचे संस्कार म्हटलं आहे. आणि तुमच्या मते ही पाप पुण्याची माहिती एका जन्मातून दुसर्‍या जन्मात नेण्याचं काम मन करतं. जर पुनर्जन्म आहे असं मानलं तर तुमचं म्हणणं योग्य आहे. :) (अवांतरः पाश्चात्यांनी मात्र आपली चौर्‍याऐंशी लक्ष योनींच्या कल्पनेला पद्धतशीर बगल दिली आहे. त्यांच्या मते आत्म्याचे एका पाठोपाठ एक असे कितीही मानवजन्म होऊ शकतात. आणि या जन्मांमध्ये लिंगबदलही होऊ शकतो. संदर्भः लाईफ बिफोर लाईफ आणि मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स) देवाविषयीच्या मतांबद्दल मी काहीच बोलत नाही. ती ज्याची त्याची वैयक्तिक श्रद्धा असते. :) जाता जाता, पातंजल योगशास्त्र भारतीय मानसशास्त्र आहे असं कुठेतरी वाचलं. कुठे वाचलं ते आठवत नाही, पण असं लिहिणार्‍याला मानसशास्त्र म्हणजे काय हे कळलंच नसावं. पातंजल योगशास्त्राचा भर "मनोनिग्रहा"वर आहे. पण मनाचा निग्रह करण्यासाठी आधी मनाला काय होतंय हे तर कळायला हवं ना. :)

तुम्ही म्हटलय :
देव, भक्ती हि आकाराची साधना नाहि, ति व्यक्तीची साधना आहे. हा मूळपुरुष (किंवा मूळ तत्व) चिरंतन आनंदी स्वभावाचा आहे.
आणि तो निराकार आहे.
मनुष्य या भक्तीत जसं जसं रममाण होत तसं तसं अभेदाची जाणिव व्याप़क होते, तीव्र होते... आणि एका क्षणी आपण त्याच सच्चिदानंदाचा अभेद अंश आहोत हा उलगडा होतो.
आपण मुळात निराकार असल्यानं अभेद्य आहोत (म्हणून गीतेच्या सांख्ययोगात `नैनं च्छिंदती शस्राणि' असा उल्लेख आहे)
आता एक तासभर पुरेल एव्हढं पेट्रोल साठवण्याची क्षमता असलेली गाडी डेव्हलप करायची आहे, कारण माझ्या गाडीची कॅपेसीटी फार कमी आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो, अष्टावक्राचा देह आठ ठिकाणी वक्र होता. त्याला पद्मासन काय साधं सुखासनात बसणं मुष्किल होत. ही कुडंट इवन स्टँड स्ट्रेट. त्याची एनर्जी वर्टिकल होणं असंभव होतं. पण अष्टावक्र संहिता आजमितीला सांख्ययोगातला सर्वोच्च ग्रंथ मानला गेलाय. असा ज्ञानयोगाचा दिग्गज अष्टावक्र म्हणतो `अनुष्ठान हेच बंधन आहे' .... कोणत्याही साधनेची काहीएक आवश्यकता नाही. कारण मुळात तुम्ही सत्यापासनं विलग झालेला नाहीत. आणि कितीही प्रयत्न केला तरी होऊ शकत नाही. कारण निराकार अविभाज्य आहे.
शरीर, मन, बुद्धी, चेतना... ही सर्व एकाच चैतन्याची रूपे आहेत.....
येस! आपण निराकराशी एकरूप आहोतच या अनुभूतीक्षणी तुम्ही भाररहित होता, आनंदी होता, निश्चिंत होता.
भ्रम म्हणजे एकवाक्यतेचा अभाव.
हे सायकलॉजिकली बरोबर आहे. पण प्रॅक्टीकली भ्रम म्हणजे जे नाही त्याचा आभास. अध्यात्मात भ्रमाची व्याख्या वेगळी आहे. भ्रम म्हणजे आपण त्या निराकारापासून वेगळे आहोत असा समज आणि त्याच्याशी एकरूप होण्यासाठी केलेली साधना. _______________________________________ मित्रत्वाच्या नात्यानं सांगतो. तुम्ही जो प्रयत्न करताय तो तंत्रमार्गातला आहे. आणि अत्यंत दुष्पुर आहे. (गविची माफी मागून लिहीतो) इथल्या एका सदस्यान तो केलाला आहे. त्यानं काहीही साध्य होत नाही. भक्तीमार्ग नक्की काय आहे. तो आकरातून निराकाराकडे कसा नेतो ती वेगळी मेथडॉलॉजी आहे. प्रचलित भक्तीमार्गाच्या ती काहीशी विपरित आहे. आणि परमहंस त्यातनं (रामपुरी या औलियामुळे) कसे मुक्त झाले ती वेगळी हकिकत आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

भक्ती हि अवस्था आहे, मार्ग नाहि. ज्यामार्गे ति अवस्था उमलते त्याला भक्तीमार्ग म्हणतात एव्हढच. >>आणि तो निराकार आहे. -- भक्ती मार्गात मुळात आकारालाच काहि महत्व नाहि. भक्तीचा सगळा एम्फसीस सच्चिदानंदाच्या चैतन्यत्वावर आहे. अक्षुण्ण आनंदतत्वाचा उलगडा झाला कि मग अ‍ॅब्सोल्युट आणि मोडीफायेबल अशा दोन्हीरुपात भक्ती अक्षुण्ण राहाते. भक्तीला आकार म्हणजे काय हेच माहित नाहि (किंवा भक्तीला आकाराचं तसंही काहि महत्व नाहि)... सो डज निराकार. >>आपण मुळात निराकार असल्यानं अभेद्य आहोत (म्हणून गीतेच्या सांख्ययोगात `नैनं च्छिंदती शस्राणि' असा उल्लेख आहे) -- अभेद्यता आणि अभेदता या भिन्न बाबी आहेत. चैतन्य उत्पत्ती-स्थिती-आणि लयीची सायकल चालवत राहुन देखील आपली अखंडता सोडत नाहि. त्याअर्थी ते अभेद्य आहे. मूळ प्रेमानंदी स्वभावामुळे चैतन्याला मी-तु हा भेद उरत नाहि याअर्थी ते अभेद आहे. >>तुमच्या माहितीसाठी सांगतो, ...असा ज्ञानयोगाचा दिग्गज अष्टावक्र म्हणतो `अनुष्ठान हेच बंधन आहे' .... कोणत्याही साधनेची काहीएक आवश्यकता नाही. कारण मुळात तुम्ही सत्यापासनं विलग झालेला नाहीत. आणि कितीही प्रयत्न केला तरी होऊ शकत नाही. कारण निराकार अविभाज्य आहे. -- पिवळाधम्म रसभरीत हापुस आंबा बघा. कुणाला त्याचं ते सोनपिवळं रूप आकर्षीत करेल, कुणाला त्याची गोड चव आवडेल, कुणी त्याच्या कॅलरीज आणि इतर पोषक घटकांवर फिदा असेल तर कुणी एका आंब्यात शेकडो आंबे देणारं झाड बीजरूपाने कसं काय नांदतय या चिकित्सेत असेल... इट्स अ मॅटर ऑफ व्हॉट अपील्स यु. सांख्यांनी योगमार्गाची खोडी काढु नये किंवा योग्यांनी भक्तांना नावं ठेऊ नये किंवा भक्तांनी या दोघांच्या नावे नाकं मुरडु नये. जो मार्ग आपल्याला भावतो तो चालावा, शक्य असल्यास माहितीचं आदान-प्रदान करावं. कुणाच्याही मनात इतरांबद्दल कुठल्याही कारणाने किंतु-परंतु आले कि त्याचा मार्ग हमखास भरकटला म्हणुन समजा. सांख्यांचच म्हणावं तर श्रद्धेशिवाय सांख्ययोग जमणं अशक्य आहे. अश्रद्धाचा सांख्ययोग म्हणजे फक्त पढतमूर्खता. (श्रद्धा म्हणजे "टेण्डंसी ऑफ एक्सेप्टींग द ट्रुथ... सत्य स्विकारायची क्षमता). "श्रद्धावान लभते ज्ञानम्" हे गीतावचन त्याच अर्थाचं आहे. >> पण प्रॅक्टीकली भ्रम म्हणजे जे नाही त्याचा आभास. -- येस. शरीर-मन-बुद्धी-चेतना यापैकी कुणालाही निरपेक्ष आनंदतत्वाशिवाय इतर कुठल्या गोष्टीत रस वाटला तर तो भ्रम आहे. सत्य गवसलं तर ते सर्व पातळ्यांवर गवसेल. >>मित्रत्वाच्या नात्यानं सांगतो. तुम्ही जो प्रयत्न करताय तो तंत्रमार्गातला आहे. आणि अत्यंत दुष्पुर आहे. (गविची माफी मागून लिहीतो) इथल्या एका सदस्यान तो केलाला आहे. त्यानं काहीही साध्य होत नाही. -- धन्यवाद संजयजी. मला या दुष्पुरतेची कल्पना मागेच आलि होती. म्हणुनच आमचा योगाभ्यास सुदृढ शरीर या एकाच उद्देशाने सुरु राहिला. तंत्रमार्गाच्या वाटेला आपण कधी जाणार नाहि. >>भक्तीमार्ग नक्की काय आहे. तो आकरातून निराकाराकडे कसा नेतो ती वेगळी मेथडॉलॉजी आहे. प्रचलित भक्तीमार्गाच्या ती काहीशी विपरित आहे. आणि परमहंस त्यातनं (रामपुरी या औलियामुळे) कसे मुक्त झाले ती वेगळी हकिकत आहे. -- तुम्हाला जे काहि माहित आहे, कुठली मेथडॉलॉजी, परमहंसांचं नक्की काय झालं... वाचायला आवडेल. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

भक्ती मार्गात मुळात आकारालाच काहि महत्व नाहि
आकाराची आराधना निराकाराकडे नेणं शक्य नाही.
भक्तीचा सगळा एम्फसीस सच्चिदानंदाच्या चैतन्यत्वावर आहे.
ते तुम्ही ऑलरेडी आहतच! कारण ते अस्तित्वाचं (आणि पर्यायानं तुमच) मुळ रूप आहे.
अभेद्यता आणि अभेदता या भिन्न बाबी आहेत
नाही, तो फक्त पाहण्याचा अँगल आहे : `नैनं च्छिंदती शस्राणि' ही अभेद्यता आहे, आणि `पूर्णम् इदम् पूर्णम् अद:' ही अभेदता (किंवा एकरूपता आहे)
जो मार्ग आपल्याला भावतो तो चालावा, शक्य असल्यास माहितीचं आदान-प्रदान करावं.
लेखनाचा उद्देश तोच आहे.
श्रद्धेशिवाय सांख्ययोग जमणं अशक्य आहे. अश्रद्धाचा सांख्ययोग म्हणजे फक्त पढतमूर्खता
आपण निराकारापासून वेगळे होऊ शकत नाही ही नि:संशय खूणगाठ म्हणजे श्रद्धा. आणि तो स्वतःचा अनुभव होणं हे ज्ञान!
धन्यवाद संजयजी. मला या दुष्पुरतेची कल्पना मागेच आलि होती. म्हणुनच आमचा योगाभ्यास सुदृढ शरीर या एकाच उद्देशाने सुरु राहिला. तंत्रमार्गाच्या वाटेला आपण कधी जाणार नाहि
माझ्याविषयी कुणीही काहीही लिहू दे... तुमच्या या एका उत्तरानं मला सर्व मिळालं!
तुम्हाला जे काहि माहित आहे, कुठली मेथडॉलॉजी, परमहंसांचं नक्की काय झालं... वाचायला आवडेल.
अत्यंतिक राळ उडवली गेलीये लेखनाबद्दल, हेतूबद्दल आणि शैलीविषयी. त्यामुळे त्या विषयी पुन्हा केंव्हा तरी.