दगड्या !
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
कवडा हया पक्ष्याचा संदर्भ आज खूप वर्षांनी आला आणि भूतकाळात घेवून गेला.
मी ८ वीत असताना तुकाराम ( उर्फ तुक्या दुसरे उपनाम दग्ड्या ) हा एक काळाकभीन्न व मजबूत गडी आमच्या वर्गात दाखल झाला. मिसरूड फुटलेला हा पोरगा बाप्या शोभत असे.
त्याच्या गावात ७ वी पर्यन्त शाळा होती आणि म्हणून सुमारे दहा की.मी. वरून चालत तुक्या आमच्या गावातील शाळेत येत असे.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. तो त्याची आई आणि इतर ३ भावंडे . घरात कमावणारे कोणी नाही. वडील त्याच्या लहानपणीच वारले होते.बहुतेक हे कुटुंब १ वेळच जेवायचे. शाळेत तुक्या उर्फ दगड्या पूर्ण लक्ष रात्रीच्या जेवणाकडे असे. शाळेच्या खिडकीतून आजूबाजूच्या झाडा-माडावर नजर फिरत असे. पोपट , कवडे , होले , पाच्को , बोल्डो ,पाणकोंबडी , असे पक्षी पाहात स्वारी त्यांना फस्त करण्याचे मनसुबे करीत असे.
संपूर्ण निसर्गाशी एकरूप झालेला माणूस मी त्यानंतर पहिला नाही. झाडावर चढणे , पोहणे , मासे पागणे , बेचकीने अचूक नेम धरून शिकार करणे , फास लावणे , इ कला तो जणू जन्मजात शिकून आला होता.
पावसाळ्यात शाळा सुरु झाली आणि तो एक दिवस दप्तरा बरोबर एक मोठी पोतडी घेवून आला. आधी तो सांगत नव्हता काय आहे ते ....पोतडीच्या आकारावरून मुलांनी त्याला भंडावून सोडले .तेंव्हा समजले तो दप्तरात ३०/४० अंडी कासविणीची अंडी घेवून आला होता. पहाटे पासून तो समुद्रावर कासविणीची अंडी शोधत फिरत होता. शेवटी त्याला ती मिळाली पण शाळेची वेळ झाली होती म्हणून तो ती घेवून शाळेत आला होता.
एका निसर्ग प्रेमी मास्तराला हे समजले आणि त्याने ती सारी अंडी शिपाया करवी समुद्रावर परत नेवून ठेवली. आणि तुक्याच्या पदरी उपासाचे पुण्य घातले.
हया पहिल्याच कृतीने तो शाळेत एकदम प्रसिद्ध झाला.
एकदा शाळेत घोरपड शिरली होती. सगळी मुले ओरडत होती आणि थोड्या मुली जास्त किंचाळत होत्या. घोरपड खिडकी वर बसून होती, कोणाला काही समजायच्या आत दग्ड्या ने बाकावर चढून घोरपडीची शेपटी धरली .... खाली उडी मारली आणि हवेत भिरकावून जमिनीवर आदळली. घोरपड गतप्राण झाली आणि त्याच्या “शौर्याचे” शाळेत कौतुक झाले. मेलेली घोरपड टाकायला हा गेला तो बराच वेळ आलाच नाही.
कुतूहलाने मी विचारले तर म्हणाला “ लावून ठेवली आहे कवळ्या कुत्र्यापासून , जातानी घेवून जाणार , २ दिवस पुरेल. घोरपड खातात हा प्रकार मला तेंव्हा समाजाला.
तुक्या तथा दग्ड्या सकाळ पासून उपाशी असे. मधल्या सुट्टीत सिझन प्रमाणे आवळे , बोरे , चिंचा , जांभ , करवंद , कैऱ्या खावून तो गुजराण करीत असे.
अश्या परिस्थितीत तो काय अभ्यास करणार ? पण एकदम हसतमुख असे. कबड्डी खेळण्यात तो तरबेज होता. त्यावर्षी आमच्या आठवीच्या संघाने दग्ड्याच्या जोरावर १० च्या संघाला हरवले होते.
रात्रीच्या जेवणासाठी हा शिकार करायचा आणि आई मीठ मिरची करता मोलमजुरी. त्याचे दप्तर बेचकी , फासकी , गळ हया व असल्या असंख्य वस्तूंनी भरलेले असायचे.
बेचकीने कवडे मारणे , पावसाळ्यात मासे पागणे , छत्रीची तार वाकवून त्याचा फास करणे , त्यात सापडलेले पक्षी जिवंत घेवून फिरणे असले त्याचे उद्योग असत. मला त्याच्या हया धंद्यांचे जाम कुतूहल असे. मी त्याच्या जवळ तासन तास गप्पा मारीत असे. त्याचे ते भुकेने व्याकुळ झालेले पण प्राणी , पक्षी आणि माशांनी भरलेले विश्व मला जाम आवडायचे.
एकदा त्याच्या घरी काहीच खायला नव्हते . शिकारही काही मिळाली नाही. मग एका मोठया विहिरीत पठ्या उतरला – खेकडे पकडायला. ३/४ खेकडे पकडले आणि एका कपारीत असलेल्या विंचवाने हयाला नांगी मारली. २ दिवस झोपून होता. जाल जवळ मारायलाच टेकला होता पण वाचला.
एकदा माझ्यासाठी त्याने मधाचे पोळे आणले. त्यातून ठीबकाणारा मध प्यायला जाम मजा आली होती. थोडे दिवासांनी एका मधल्या सुट्टीत ते रिकामे पोळे कसे पेटते त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. ते प्रकरण भलतेच पेटले. मुख्याध्यापकांनी त्या प्रयोगाला गेलेल्या सगळ्या मुलांना झोडून काढले होते.
पुढे शाळेतील शिक्षकांनी त्याला शाळेचे पाणी भरण्याचे काम दिले. सकाळी लवकर येवून तो मुलांना पिण्यास लागणारे पाणी भारत असे . त्याचे त्याला ३० रुपये मिळत असत.
एकदा त्याने मला सांगितले – की बाबांना विचार बंदूक किती रुपयाना मिळते ? त्यावेळी जी काही ८००/१००० रुपये किमंत असेत ती मी सांगितली. तर तो हिरमुसला.
३ वर्षे पाणी भरून पण त्याला बंदूक घेता येणार नव्हती.
त्यावेळी मला खरेच वाईट वाटले. त्याला खर्च कुणी तरी बंदूक द्यायला हवी होती.
नववीत तो नापास झाला आणि त्याने शाळा सोडली. त्याच्या बरोबर मी दोन वर्षे काढली. त्याचे ते निसर्गाशी तद्रुप जीवन मला आजही आठवते आणि वाटते त्या गरिबीतही तो किती श्रीमंत होता !
प्रतिक्रिया
दगड्या आवडला
लेख आवडला. नजरेतून सुटला होता.
समर्पक प्रतिसाद ,
अरेरे! फक्त तिसाव्या वर्षीच
लिखाण आवडले.
जिवंत चित्रण
सुरेख शब्दांकन.
छानच लिहलंय.
सुरेख व्यक्तिचित्र आवडलं
फारच छान!
मस्त
अशी
छान व्यक्तीचित्रण.
दगड्या आवडला
डोळ्यांसमोर 'दगड्या' उभा केलात!
लेखन आवडले. असे किती जीव जात
व्यक्तिचित्रण आवडलं.
अजुन लिहायला हवं होतं असं
+१
व्यक्ती चित्रण एकदम छान
लैई भारी. अजुन विस्तार असता
मस्त
धन्यवाद !
सुरेख जमलंय व्यक्तीचित्रण.
या आयडीनं लेखन का बंद केलंय?
भेष्ट
अरेरे!
सुंदर कथन.... चटका लावणारं
मस्त मस्त लेख!!!!!!
आठवी मध्ये असताना एक म्हस्कू
चांगल लिहिलय
निव्वळ अप्रतिम शैली!