Skip to main content

जगी हा खास वेड्यांचा पसारा..

लेखक नानबा यांनी बुधवार, 02/01/2013 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच लोकलने कामावर जात होतो. काही कारणांमुळे गाड्या उशिराने धावत(?) होत्या. (मुंबईत राहणार्‍यांना याची सवय असतेच म्हणा.) गाडीतल्या सर्वांनाच कामावर जायला उशीर होणार असल्यामुळे कार्यालयातल्या परिस्थितीचा अंदाज बांधत सगळेच जण रेल्वेवर शिव्यांची लाखोली वाहत होते. (त्यात मीपण होतोच.) तेव्हा गर्दीत उभ्या उभ्या मनात विचार आला, जसं मुंबईला आणि मुंबईकरांना वेळ या वस्तूत फार रस आहे, तसाच भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहराला एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल आहेच की. मग मी पाहिलेल्या शहरांबद्दल विचारचक्र सुरु झालं. पहिल्यांदा अर्थातच आठवली आमची मुंबई. पुलंनी म्हटल्याप्रमाणे, मुंबईला वेळेचं महत्त्व फार. सकाळी ५.५५ चा अलार्मपासून ७.३२ ची ट्रेन, ८.१५ ची ८४८ नंबरची बस अशा नुसत्या घड्याळाच्या काट्यावर मुंबईकर नाचत असतात. २६.११ होवो किंवा अजून काही, या शहराला थांबणं मंजूरच नाही. (अपवाद- बाळासाहेबांची अंत्ययात्रा. तेव्हा मात्र मुंबईकर स्वतःहून थांबला होता.) त्यानंतर येतं पुणे. पुणेकरांना सर्वात जास्त वेड कशाचं असलं तर तो म्हणजे त्यांचा बाणा. पुण्यात राहून जर तुमच्याकडे खास पुणेरी Attitude नसला, तर तुम्हाला तिकडे राहण्यास मनाई आहे. पुन्हा पुलंनी म्हटल्याप्रमाणे, "पुण्यात राहताना तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीचा जाज्ज्वल्य अभिमान असायला हवा. तो कशाचाही असेल, पण तो जाज्ज्वल्य हवा." नुकतंच काही कारणामुळे ३ महिने पुण्यात रहायचा योग आला. तेव्हा तर प्रत्येक क्षणी ही गोष्ट पटली. अहो, संध्याकाळी ६.३० वाजता डेक्कन जवळच्या प्रचंड रहदारीत माझ्या गाडीसमोर तू तुझी गाडी घातलीसच कशी, म्हणून भर रस्त्यात आपापल्या गाड्या पार्क करून एक्मेकांशी तावातावाने भांडणारे पक्के पुणेकर पाहिलेत मी. तेव्हा पुणेकरांचं वेड पुणेरी बाण्यात असतं एवढं मात्र नक्की. मुंबई आणि पुण्यानंतर येणारं मराठी शहर म्हणजे नागपूर. नागपूर, आणि सगळ्याच विदर्भाला "स्व" बद्दल अतिव प्रेम. मी, माझं यातच त्यांना रस असतो. आमचं नागपूर, आमच्या नागपूरची संत्री, आमच्या विदर्भातलं ताडोबा, आमची विदर्भी थंडी, आमचा नागपूरी वडाभात, आमचा वर्‍हाडी ठेचा... नागपूरकरांची ही आमचं ची यादी न संपणारी आहे. हे तर झालं आपल्या महाराष्ट्राबद्दल. गेले एक वर्ष कामानिमित्ताने इंदौर ला होतो. त्या शहराचं आणि इंदौरकरांचं प्रेमाचं ठिकाण म्हणजे खाणं. अस्सल इंदौरी माणूस पट्टीचा खवय्या आहे. सकाळी सकाळी मिळणा-या खास इंदौरी पोह्यांपासून दाल बाटी, गजक, रबडी, अशा सगळ्या पदार्थांमुळेच इंदौर खवय्या शहर म्हणून प्रसिद्ध आहे. इंदौरमधील खवय्यांचं पंढरपूर म्हणजे सराफा चौराहा. या भागात सराफांची मोठमोठी दुकानं आहेत. संध्याकाळी ही दुकानं बंद झाली, की दुकानांसमोरील कट्ट्यांवर पदार्थांचे ठेले लागतात, आणि खवय्यांची पावलं आपसूकच तिकडे वळतात. सराफा ला मिळणारे सगळेच पदार्थ बेफाट. मग तो आलू बोंडा (बटाटा वडा) असो, रुमाली रोटी आणि पनीर माखनवाला असो, प्रसिद्ध दहिवडा असो (हा देताना तो ठेलेवाला एका द्रोणात दही घेतो, आणि वडा एकदम स्टाईलमध्ये १०-१२ फूट हवेत उडवतो आणि थेट दह्याच्या द्रोणात पकडून आपल्या हातात देतो.), केसर रबडी असो, खास इंदौरी मटका कुल्फी असो, चिकन रेशमी कबाब असो, सगळंच जाम भारी. काही वर्षांपूर्वी भटकायला राजस्थानला गेलो होतो. तिकडे अजून वेगळंच. राजस्थानी माणसाचं प्रेम आहे ते त्यांच्या ऐतिहासिक ठेव्यांवर. राजस्थानात राजेशाही घराणी असल्यामुळे जवळपास प्रत्येक शहरात जुने मोठमोठाले राजवाडे आहेत. आणि नव्या पिढीनेसुद्धा अतिशय काळजीपूर्वक त्यांना जपलंय. (महाराष्ट्रातले गड किल्ले आणि त्यांची अवस्था आठवतेय ना? खरं तर आपले गड नीट जतन केले तर राजस्थानी राजवाड्यांच्या तोंडात मारतील असले भव्य दिव्य आहेत. पण सरकारी अनास्था, आणि आपला निष्काळजीपणा.) आता बर्‍याचशा राजवाड्यांचे ३ भाग करून एक भाग त्या घराण्याला रहायला, एका भागात पंचतारांकित हॉटेल, आणि तिसर्‍या भागात म्युझियम अशी त्यांनी वाटणी केली आहे. भारताचं नंदनवन असणार्‍या काश्मीर आणि काश्मिरी माणूस यांची कथा अजून वेगळी. काश्मिरी माणसाला काश्मिरच्या निसर्गाचं, दाल सरोवराचं, हजरतबल दर्ग्याचं, शंकराचार्य मंदिराचं वेड आहे. पण काश्मिरचे मुख्यतः ३ भाग पडलेत, एक पर्यटकांचं काश्मिर, एक दहशतवादाने होरपळणारं काश्मिर, आणि एक लेह लदाख. श्रीनगर, जम्मू, पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग या भागातल्या लोकांचं विशेष प्रेम तिकडे जाणार्‍या पर्यटकांवर, कारण पर्यटनातूनच त्यांचं घर चालतं. अनंतनाग, पुंछ, कुपवाडा या दहशतवाद्यांच्या भागातल्या जनतेला स्वतःचा जीवच इतका प्यारा आहे, की त्यांच्यासाठी तेच प्रेमाचं ठिकाण आहे. (बरोबरच आहे हो, जान है तो जहान है.) लदाखला जायचा योग अजून यायचाय. भारताची राजधानी दिल्ली. त्यांचं भलतंच. दिल्लीकरांना उगाचची नाटकं करण्यात रस आहे. (कॉलेजियन भाषेत आपण त्याला "फलवेगिरी" म्हणतो.) राजधानीच्या शहरात राहतात म्हणजे आपल्या डोक्यावर शिंगं आहेत, आणि फ**गिरी करणं हा आपल्याला सरकारने दिलेला हक्क आहे असं बहुधा यांना वाटत असावं. ही यादी उत्तरेकडच्या राज्यांची. दक्षिणेच्या राज्यांचं बोलायचं तर त्यांचं सर्वात जास्त वेड आहे ते धर्मात. मी कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या चारही राज्यात हिंडलोय. कुठेही गेलं तरी कुठल्या ना कुठल्या धार्मिक स्थळाचं दर्शन हमखास होतंच. हैदराबाद, सिकंदराबाद आणि कोस्टल कर्नाटक भागात बर्‍याच मशिदी आहेत, तामिळनाडूमध्ये गोपुरम आणि मंदिरं भरपूर, तर केरळात विपुल संख्येने चर्चेस. (बाकी धर्मस्थळंसुद्धा आहेत, पण त्या त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात ती ती स्थळं जरा जास्त आहेत.) दक्षिणेतलं हेवन म्हटल्या जाणार्‍या गोव्याबद्दल तर काही सांगायलाच नको. त्यांचं सगळं प्रेम काचेच्या बाटलीत भरलेल्या रंगीत पाण्यावर आहे. वास्कोच्या एका जेमतेम ७०-८० मीटर लांबीच्या बोळात रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे मिळून असणारे १४-१५ बार पाहिल्यावर तर मला याची अगदी खात्री पटली होती. असो, आपापली वैशिष्ट्ये आणि खासियत घेऊन सगळेजण राहतायत. "जगी हा खास वेड्यांचा पसारा, मांडला सारा" हे खरंच आहे. प्रत्येकाची अदा निराळी, ढंग निराळे, तरीही आपण सगळे गुण्यागोविंदाने एकत्र नांदतोय. हे मात्र फक्त भारतातच होऊ शकतं.

वाचने 18437
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

लेख छान आहे पण हे मुंबईचं जे नेहमी नेहमी 'वेळेचं महत्व' आणि 'मुंबई थांबत नाही' हे कौतुक सगळीकडे होत असतं ते मात्र अनाठायी आणि निरर्थक आहे. मुंबई थांबत नाही म्हणजे काय? कोण थांबतं? डांगसौंदाणे या नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातल्या एका लहानशा खेड्यात जरी बॉम्ब्स्फोट झाले तरी ते गाव चालूच राहणार ना? की सगळे गाव सोडून, कामधंदा सोडून पळून जातील? मालेगावात, पुण्यात स्फोट झाल्यानंतर ही गावे काय बंद पडली? त्यामुळे मुंबईचं हे कौतुक करतांना पाहिलं की हसू येतं. फक्त मुंबईतल्या लोकांनाच वेळेचं महत्व कळतं मग बाकीच्या शहरातले लोकं काय आट्यापाट्या खेळत आयुष्य कंठतात की काय? काहीतरी खुळचटपणा आहे. मरणाच्या गर्दीत लोकलमध्ये एकमेकांच्या घामाचा वास घेत तासंतास दवडण्यात कुठलं आलंय वेळेचं महत्व? ज्या शहरात प्रवासातच दिवसाचा निम्मा वेळ जातो आणि जिथे कामावर जाण्यासाठी आणि घरी परत येण्यासाठी ८०-१०० किमीचा रोजचा यातनादायी प्रवास करावा लागतो त्या शहरात वेळ महत्वाचा असणारच; यात कौतुक करण्यासारखे काय आहे? आणि थोड्या फार फरकाने आज बहुतांशी सगळ्याच शहरांमध्ये (पुणे, चेन्नई, बेंगळूरु, हैदराबाद, दिल्ली, नाशिक) अशीच परिस्थिती आहे. पुण्यात आज ३-३ तास प्रवास करणारे लाखो लोकं आहेत. वेळेचं महत्व सगळीकडे सारखंच असतं. फक्त घाई-घाईने वाघ मागे लागल्यासारखे आयुष्य व्यतीत करणे म्हणजेच वेळेचं महत्व समजणे असे नसते. हा मुंबईमधल्या लोकांचा प्रचंड मोठा गैरसमज आहे. एवढ्या दीड कोटी लोकांचे ओझे सांभाळत असतांना मुंबईची लोकलसेवा चालू राहते आणि उत्तम सेवा पुरवते याचेच मला आश्चर्य वाटते. एवढा प्रचंड पसारा सांभाळणे, अपघात टाळणे, इतक्या प्रचंड प्रमाणावर लोकांची ने-आण करणे, वाहतुकीचे गणित व्यवस्थित बसवणे आणि चालवणे ही किती कठीण कामगिरी आहे हे मुंबईकरांना कधी समजेल काय? फार क्वचित लोकलसेवा खंडित होते. इतक्या किरकोळ घटना नक्कीच क्षम्य आहेत. काही प्रॉब्लेम झाला की लोकलसेवेला शिव्यांची लाखोली वाहायला मुंबईकर तयार!! अरे पण वर्षानुवर्षे या लोकलसेवेमुळेच तुमचे जीवन सुसह्य होत असते हे कसे विसरता? आपण साध्या-साध्या गोष्टींमध्ये हजारदा चुकतो. एवढ्या मोठ्या पसार्यात बिघाड होणारच नाही अशी अवास्तव अपेक्षा फक्त मुंबईकरच करू शकतात कारण त्यांना स्वतःची सोय याखेरीज दुसरं काहीच दिसत नाही. असो.

In reply to by समीरसूर

+१०० सहमत.. मुंबईकर नेहमी पटकन सहमत होतात.

In reply to by गवि

+७ पाहिजे का? "उलट मुंबईला कुणी एक भिकार म्हटलं तर आपण सात भिकार असं सांगून मोकळं व्हावं" इती पुलं. :)

In reply to by दादा कोंडके

सहमत...!! :)

In reply to by समीरसूर

तमाम मुंबईकरांना वेळेचं किती महत्त्व असतं हे (मुंबईकरच असलेल्या)उपनगरी-रेल्-कर्मचार्‍यांना पुरतं ठाउक असल्याने ते रेल्वेने वेळा पाळाव्या यासाठी वेळेवर काम करतात आणि उरलेले मुंबईकर हे वेळेबाबत काटेकोर-मुंबईचा शब्द पर्टिक्युलर-(इतर कशाहीसाठी नाही,कुठल्या शेर्‍यासाठी नाही,ताशेर्‍यासाठी नाही,फक्त वेळेबद्दल)असल्याने लोकलला उशीर झाला की बोंबाबोंब करतात.

In reply to by समीरसूर

मुंबईकरांना वेळेचे महत्त्व किती आहे हे पुरतं ठाऊक असल्याने (मुंबईकर)उपनगरी-रेल्-कर्मचारी रेलवेळापत्रक सुरळीत राखण्यासाठी दक्ष असतात आणि उरलेले मुंबईकर वेळेबाबत काटेकोर-मुंबईचा शब्द पर्टिक्युलर्-(इतर कशाहीसाठी नाही,शेरेताशेर्‍यांबाबत नाहीच,तिथे तर ते कायमच 'सहमत' मोड आणि मूडमध्ये असतात)असल्याने लोकलला उशीर झाला तर बोंबाबोंब करतात.

In reply to by समीरसूर

डांगसौंदाणेच का आठवल्,तिथ कोण कशाला जाईल तिथे काही खुट्ट वाजल तरी तुमच नाव कळवतो पोलिसांना

बरेच पक्षी मारण्याचा प्रयत्न चांगला होता.पण दगड भलत्याच ठिकाणी लागल्याने आफत ओढवली. आधी गोवा, आणि मग मुंबईकरांकडून कडा प्रतिकार झाला असल्यामुळे पुणेकरांकडून अपेक्षा फारच वाढल्या आहेत.

In reply to by गवि

पुण्याच्या बाबतीत फ्क्त काडी म्हणणे हे देखील काडि टाकण्यासारखे नाही का, गेलाबाजार सरपण तरी म्हणायला हवे.

In reply to by किसन शिंदे

ठाण्याबद्दल काहीच लिहीलं नाही म्हणून ठाणेकरांनी शंख करायला सुरुवात करा. शतक सहज होईल, मग कदाचित पुणेकर येतील द्विशतकात हातभार लावायला.

In reply to by सूड

धागालेखक हा डोंबिवली (तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे) या गावाचा रहिवासी असून तो स्वतःस 'आम्ही मुंबईकर' म्हणवतो.

In reply to by योगप्रभू

मुंबई ही दादरला संपते, मुळूंद(मुलुंड)ला मुंबईच्या सेंट्रल लाईनची उपनगरं संपतात हे फार थोड्या लोकांना माहित असतं.

In reply to by सूड

घ्या, मुळात दादरची असणारी आणि ऑस्ट्रेलियात राहुन एम्बिए करणारी माणसं स्वताला (बहुतेक चिसौका) देवरुखकर म्हणवतात, त्यात डोंबिवली - मुंबईकरांची का गोष्ट करता ? अवांतर - कंसातले शब्द वाचुन, मुली शोधुन न सापडल्यांनी फ्रस्ट्रेट झालेल्यांनी खरडी वा व्यनि करु नयेत ही नम्र विनंती.

In reply to by ५० फक्त

>>अवांतर - कंसातले शब्द वाचुन, मुली शोधुन न सापडल्यांनी फ्रस्ट्रेट झालेल्यांनी खरडी वा व्यनि करु नयेत ही नम्र विनंती. हा हा !! अगदी अगदी, नायतर करायला गेलो नवस आणि आज निघाली अवस अशी गत व्हायची. ;)

समीरसूर साहेब पण फारच तापलेले दिसतात बुवा.. अहो, सध्या चालू असणारा लोकलचा गोंधळ कशासाठी चाल्लाय ठाऊक आहे का? काय तर म्हणे त्याने डोंबिवली ते ठाणे प्रवासातले २ मिनीटं वाचतील.. या २ मिनीटं वाचण्यासाठी लोकांनी आत्ता २-३ तास उशिरा ऑफिसला गेलं तर चालतं असं रेल्वे वाल्यांचं म्हणणं आहे का? की त्यांच्या मते सगळे प्रवासी हे सरकारी कारकून आहेत, की त्यांना लेट मार्क ची काळजी नसते?

शतकासाठी आगाउ अभिनंदन, बाकी प्रामाणिक आणि हुशार सोलापुरकरांबद्दल काही लिहिलं नाहीत याबद्दल दत्त्याला बोलावण्यात येईल हे लक्षात ठेवा.

अरे होय.. प्रामाणिक आणि हुशार सोलापूरकर, उपेक्षित कोकणकर (गवि साहेबांच्या मते), तिखट खाण्यावर नितांत प्रेम करणारे कोल्हापूरकर राहिलेच की... :)

प्रथम साहेब, सोलापूरात कधी आल्ता ? आणी काय पाहिलय ..प्रामाणिक आणि हुशार सोलापूरकराचे तुम्हाला आलेले अनुभव किंवा निरिक्शण वाचायला आवडेल .

In reply to by नि३सोलपुरकर

बास रे. एवढे बोलले बास झालं. (५०दादाच्या द्त्त्याला घाबरले दिसतय ;)) आपणच करु आपापले गुणवर्णन. शिक जरा पुणेकरांकडून. ;)

आमी नागपूरकर काउन बा नाय आलो तुमच्या नजरेत ?

मुंबई आणि पुण्यानंतर येणारं मराठी शहर म्हणजे नागपूर. नागपूर, आणि सगळ्याच विदर्भाला "स्व" बद्दल अतिव प्रेम. मी, माझं यातच त्यांना रस असतो. आमचं नागपूर, आमच्या नागपूरची संत्री, आमच्या विदर्भातलं ताडोबा, आमची विदर्भी थंडी, आमचा नागपूरी वडाभात, आमचा वर्‍हाडी ठेचा... नागपूरकरांची ही आमचं ची यादी न संपणारी आहे.
ब्बार्र... मग? नागपूरकरांना नागपूरचा अभिमान का असू नये? प्रत्येकाला त्याचं गाव आवडतं की राव.. अगदी ते गाव 'हागणदारी-मुक्त गाव' नसले तरी..

नि३ साहेब, माझं गाव आहे हो सोलापूर.. आमच्या मातोश्री सोलापूरातल्याच आणि पिताश्री अकलूजचे आहेत. त्यामुळे लहानपणापासून सोलापूर ला येतोय. शाळेत असताना दर वर्षी उन्हाळी सुट्टीत सोलापूरातच आजोळी असायचो २-३ महिने..

च्यामारी, डोंबोलीकरांविषयी लिहिलंच नाय!! आमच्याकडे सुद्धा वेडंवाकडं वाढलेलं कंस्ट्रक्शन आहे, पाण्याची सदैव टंचाई आहे, टप्पोरे टप्पोरे डास आहेत, फडके रोडवरती (टप्पोरी!) कन्या आहेत!!! आमालासुद्धा त्यांचा जाज्वल्य अभिमान आहे!!!! :)

ओ डांबिस, आपल्या डोंबोलीत बरंच काय हाय... कं र बाला वाले आगरी हायेत, खड्डेयुक्त रस्ते हायेत, फडके रोड हाये, यम आय डी शी हाये, रेल्वे टेशन समोरचे फेरीवाले आणि त्यांच्या मधून कसाबसा वाट शोधत रिक्शा स्टँडवरची लांबलचक रांग पाहून नाईलाजाने पाय घासत घरी जाणारा सर्वसामान्य मध्यमवर्गीय सुशिक्षीत पण लाचार डोंबिवलीकर सुद्धा आहे..

येवडीच नाय हो नागपुरकराची वळख. आजुन सिताबर्डी राहिली, सचिनचा टेकडीचा गनपती राहिला, राहुल द्रविडची सासुरवाडी म्हनून नागपुरची वळख राहिली. नावालाच उपराजधानी म्हनून हिवाळी आदिवेशनाच्या नावाखाली समद्या राजकारनी लोकांचं पिकनिक स्पॉट बी हाय आमचं नागपुर.

डोंबिवलीकर श्री. प्रथम फडणीस, आता कसं तुम्हाला ८.४२ च्या डब्बल फास्ट मध्ये लास्ट मोमेंटला घुसुन आत मिसळुन गेल्यासारखं वाटलं असंल ना.

(महाराष्ट्रातले गड किल्ले आणि त्यांची अवस्था आठवतेय ना? खरं तर आपले गड नीट जतन केले तर राजस्थानी राजवाड्यांच्या तोंडात मारतील असले भव्य दिव्य आहेत. पण सरकारी अनास्था, आणि आपला निष्काळजीपणा.) या मुद्द्यावर एक नमूद करावेसे वाटते, बऱ्याच इतिहास प्रेमींचा हेच मत आहे. याला कारण इतिहासाचे अज्ञान हेच! महाराष्ट्रातले प्रत्येक गड काय लहानशी गढी देखील परकीय आक्रमकांशी जीवाच्या कराराने शेवटपर्यंत लढवली गेली आहे. जर शिवाजी महाराजान्नंतारचा इतिहास वाचा. पण राजस्तानच्या राजे आणि महाराजांनी परकीय आक्रमकांशी सोयरिकी करून किंवा त्यांचे मांडलिकत्व स्वीकारून आपापले राज्य वाचवले. जोधाबाई किंवा राजा मानसिंग आठवा. एखादा राणा प्रताप वेगळा.