Skip to main content

एक अध्यात्मिक संवाद

लेखक धन्या यांनी रविवार, 30/12/2012 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
"धन्या, अध्यात्मात खरंच ईतकी ताकद असते का रे?" ध्यानीमनी नसताना हा प्रश्न धाडकन कानावर आदळला आणि मी गोंधळून गेलो. "किस्ना, फोकन्या कोण चावला बे तुला? मी केव्हाचा वाट पाहतोय की हा वल्ली आता काहीतरी या लेण्यांमधील चित्रांबद्दल माहिती सांगेल, नंतर काहीतरी बोलेल. पण हा बावा केव्हापासून त्या क्यामेर्‍याच्या लेन्समध्ये डोळा मारत बसला आहे. देव जाणे कधी काही उघडया डोळयांनी पाहतो की जे पाहायचं ते क्यामेर्‍याच्या लेन्समधूनच असं ठरवलं आहे." "अबे मी आधी मी उघडया डोळ्यांनीच पाहतो आणि मग क्यामेर्‍याने टीपतो ते". वल्लीचं वाक्य कानावरुन निसटतं गेलं. निसटतं एव्हढयासाठी की त्यानंतर मला वल्ली काय म्हणतो आहे हे ऐकण्यापेक्षा किस्नाच्या चेहर्‍यावरील हळूहळू चढत जाणारा रागाचा पारा पाहणं जास्त विंट्रेष्टींग वाटत होतं. आताही तेच झालं होतं. माझ्या "फोकन्या" या संबोधनाने किस्नाला पुरेशी किल्ली दिली होती. आमच्या या सभ्य मित्राला अशा वावग्या शब्दांचं खुप वावडं आहे. आधीच मी गाडीत शिंदे बंधूंचं एक लोकगीत ऐकवून त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहीला होता. त्या गाण्यात तसं आक्षेप घेण्यासारखं काहीच नव्हतं. एक बाई शेजारच्या गावाला बाजाराला जातात, अचानक पाउस चालू होतो आणि मग परतताना गावच्या वाटेवर असणार्‍या ओढयाला बर्‍यापैकी पाणी येतं तेव्हा कुणीतरी तिला ओढा कसा ओलांडाल हे सांगतं याचं वर्णन त्या गाण्यात होतं. नाही आवडलं या पठठयाला. शेवटी ते गाणं बदलावं लागलं. असो. आताही चेहरा शक्य तेव्हढा कोरा करत मी विचारलं, "तुला कुणी सांगितलं की मला अध्यात्मामधलं काही कळतं?" "अरे तू एव्हढं वाचन करतोस, आपल्या एव्हढया चर्चा होतात तेव्हा तू समजावून सांगतोस ते काय तुला त्यातलं काही कळत असल्याशिवाय?" "किस्ना, अध्यात्मावर वाचन करणं, त्यावर चर्चा करणं आणि अध्यात्माची ओढ असणं, ते तसे अनुभव घेणं या वेगळ्या गोष्टी आहेत. मी भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी पुर्ण वाचलेली नाही. मी बुद्धाचं धम्मपदही पुर्ण वाचलेलं नाही. हे ग्रंथांमधले संदर्भ मी केवळ कुणाशीतरी वाद घालण्यासाठी किंवा एखादया चर्चेत माझं पांडीत्य पाजळण्यासाठी वापरतो. त्यामुळे तू जे काही विचारणार आहेस त्याचं उत्तर देणं मला जमेलच असं नाही." "असू दे ना. तू प्रयत्न तर कर. नाही पटलं तरी हरकत नाही." "ओक्के. गो अहेड" मी अक्कल पाजळायला तयार झालो. "ही समोरची बुद्धाची मूर्ती दिसतेय? तिच्या चेहर्‍यावरचे भाव बघ. किती शांत आहेत. अर्थात ही मूर्ती हे केवळ प्रतिक आहे. पण बुद्धही असाच शांत चेहर्‍याने वावरत असणार म्हणून तर मूर्तीकाराने तसे शांत भाव रेखाटले ना." "अर्थातच." "मग मला एक सांग, बुद्धासारख्या पूर्वाश्रमीच्या एका राजपुत्राला जी मनःशांती राजवाड्यात मिळाली नाही ती त्याला जंगलात एका पिंपळाच्या झाडाखाली मिळाली. खरंच अध्यात्मात एव्हढी ताकद असते का?" "किस्ना, माझ्या अल्पमतीनुसार बोलायचं झालं तर अध्यात्म माणसाला त्याची स्वत:ची खरी ओळख करुन देतं. अध्यात्म माणसाला "मी कोण आहे" या सनातन प्रश्नाचं उत्तर देतं. आणि एकदा का हे उत्तर मिळालं माणसाचं मीपण गळून जातं. तुला ती बोरकरांची कविता माहिती असेलच, जीवन त्यांना कळले हो… मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो..." "अरे पण मग आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी माणसं असतात जी स्वतःला अध्यात्माच्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती समजतात. पण जरा कुठे काही त्यांच्या मनाविरुद्ध झालं की आकाश पाताळ एक करतात." "ज्ञानदेवाने नऊ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली, पण पठठ्याने एका अक्षराने कुठे म्हटलं नाही की मी या ग्रंथाचा कर्ता आहे. जे काही केलं ते माझ्या सद्गगुरुंच्या आशिर्वादाने झालं असं तो जागोजागी म्हणतो. 'शके बाराशे बारोत्तरे, टीका केली ज्ञानेश्वरे' ही ओवी प्रक्षिप्त समजली जाते." "मग आजचे अध्यात्मावर लेखन करणारे, स्वतःला अध्यात्माच्या क्षेत्रातील अधिकारी, बुद्धाच्या शुन्यवादावर भाष्य करणारे काही लेखक सतत म ची बाराखडी का म्हणत असतात? विरोधी मताला सामोरं जाताना त्यांचा तोल का जतो?" "मित्रा, त्याचा अर्थ त्यांना अध्यात्म कळलंच नाही हा होतो." "तू जर एव्हढं सगळं कळतं तर तुला अध्यात्म कळतं असाच त्याचा अर्थ होत नाही का?" "दादा, मी जेव्हा स्वारगेटला बस स्टँडला जातो तेव्हा मुंबईला जाणार्‍या बसवरचा बोर्ड वाचून मी स्टँडवर उभा राहूनच तुला सांगू शकतो की ती गाडी मुंबईला जाणार आहे. इन फॅक्ट लिहता वाचता येणारा कुणीही ते करु शकतो. पण मुंबईला जाण्यासाठी मला गाडीत बसावं लागेल. आणि एकदा गाडी बसलो की फार फार तर गाडी सुटता सुटता तुझ्याशी दोन चार वाक्य बोलेन, टाटा बाय बाय करेन. पण एकदा गाडी सुटली की मी माझ्या प्रवासाला निघालो असेल. अध्यात्माचंही असंच आहे. मी आता हे जे काही बोलतोय हे केवळ मला बोर्ड वाचता येतोय म्हणून केलेली बडबड आहे. एकदा माझा अध्यात्माचा प्रवास सुरु झाला की मी तुझ्याशी फुटकळ वाद घालायला इथे थांबणार नाही. मला मुंबईला पोहचायचे वेध लागलेले असतील."
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 15675
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

मुळात 'मुंबई'त पोचल्यावर ऐश हीच आहे की पुण्यातल्या लोकांना खिजवता येतं!! :P आता एकदा इतक्या लांssssब गेल्यावर परत हे कसे काय करता येते असा फालतू प्रश्न कुणी विचारला तर मी पैसे घेइन. ;)

In reply to by धन्या

@मुंबै पुणे वाद सुरु नाही झाला म्हणजे झालं.>>>=))शतकी धाग्याची आस!त्याचाच का.. हा...?प्रयत्न...खास..?http://www.freesmileys.org/smileys/smiley-devil06.gif

शतकी धाग्याची आस!त्याचाच का.. हा...?प्रयत्न...खास..?
हेची फळ काय मम धाग्याला. (स्मायलीसम्राट, इथे कपाळावर मारुन घेतल्याची स्मायली आहे असं समजा.) सुश्री, अहो पुणे - मुंबई ही आत्मा - परमात्मा, संसार - मोक्ष अशा अर्थाने वापरलेली रुपकं आहेत. पुण्याहून मुंबईला जाण्याचा प्रवास सुरु होणे म्हणजे आत्म्याला परमात्म्याशी एकरुप होण्याची ओढ लागणे, संसारातून निवृत्तीचे वेध लागून मोक्षाच्या दिशेने प्रवास सुरु होणे असा आहे. डिस्क्लेमरः आता पुणे म्हणजे आत्मा किंवा संसार आणि मुंबै म्हणजे परमात्मा किंवा मोक्ष असंच का? उलट का नाही? तर याचं उत्तर लेख लिहिताना तसं सुचलं. तुम्हाला गैरसोयीचं असेल तर तुम्ही उलट समजा. मोक्ष मिळाल्याशी मतलब. ;)

In reply to by धन्या

@आता पुणे म्हणजे आत्मा किंवा संसार आणि मुंबै म्हणजे परमात्मा किंवा मोक्ष असंच का? उलट का नाही? तर याचं उत्तर लेख लिहिताना तसं सुचलं. तुम्हाला गैरसोयीचं असेल तर तुम्ही उलट समजा. मोक्ष मिळाल्याशी मतलब. >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing013.gif

धन्या, वेलकम ब्याक....! बाकी बोलण्यासारखं बरंच आहे पण.... ह्या ह्या ह्या!

विचार आवडले. :) अमोल केळकर मला इथे भेटा

संवाद आवडला ! एकदा कधीतरी बैठकीला बसुयात ह्या विषयावर . ज्ञानेश्वरी साठी हे पहा http://www.ednyaneshwari.com/ वाचणे नाही तर किमान ऐकणे तरी होईल तेही सुलभ मराठीत :) असो , "मुंबै"ची गाडी कित्ती तरी वेळ फलाटावर लागली आहे , अन आम्हीही "स्ट्यॅंड"वरच उभे आहेत ....पण "पुणे" इतकं भिकारी शहर असुनही पाय निघत नाही हो इथुन :(

In reply to by प्रसाद गोडबोले

भरोत, भरतिल नेत्र जरी रे, कळ पळभर मात्र, खरे घर ते !

अध्यात्म या शब्दाची फोडच खालीलप्रमाणे आहे. अ + धिः + आत्म - अ हे विरोधार्थी, धिः म्हणजे धिक्कार करणे आणि आत्म म्हणजे स्वतः. स्वतःचा अधिक्कार करणे म्हणजे स्वतःची लाल करणे असाच अध्यात्म चा अर्थ होतो. तेव्हा तुम्हाला इतकी मूलभूत गोष्ट लक्षात न येता तुम्ही केलेलं सगळं निरूपण सगळं फोल आहे. त्यामुळे हे मीपण गळून जाणं वगैरे संपूर्ण बकवास आहे. मीकाराला अध्यात्मात प्रचंड महत्त्व आहे. आपल्या आसपास जे बिलियनेर, मिलियनेर आणि वान्नाबी गुरु झळकताना दिसतात, ते काही आपणच श्रेष्ठ आहोत असं सांगितल्याशिवाय पुढे येतात? बाकी मुंबई-पुणे वगैरे लेखात टाकून ट्यार्पी वाढवण्याचा प्रयत्न मात्र अध्यात्मिक...

In reply to by राजेश घासकडवी

आज दुर्दैवाने तुम्ही म्हटल्यासारखीच परिस्थिती आहे.
बाकी मुंबई-पुणे वगैरे लेखात टाकून ट्यार्पी वाढवण्याचा प्रयत्न मात्र अध्यात्मिक...
नाही हो. ते केवळ ओघाओघात आलेलं उदाहरण आहे. तसा खुलासा मी वर केला आहे. :)

आज अचानक हा धागा परत वाचनात आला ...मस्त वाटलं :)

In reply to by प्रसाद गोडबोले

:)

"दादा, मी जेव्हा स्वारगेटला बस स्टँडला जातो तेव्हा मुंबईला जाणार्‍या बसवरचा बोर्ड वाचून मी स्टँडवर उभा राहूनच तुला सांगू शकतो की ती गाडी मुंबईला जाणार आहे. इन फॅक्ट लिहता वाचता येणारा कुणीही ते करु शकतो. पण मुंबईला जाण्यासाठी मला गाडीत बसावं लागेल. आणि एकदा गाडी बसलो की फार फार तर गाडी सुटता सुटता तुझ्याशी दोन चार वाक्य बोलेन, टाटा बाय बाय करेन. पण एकदा गाडी सुटली की मी माझ्या प्रवासाला निघालो असेल. अध्यात्माचंही असंच आहे. मी आता हे जे काही बोलतोय हे केवळ मला बोर्ड वाचता येतोय म्हणून केलेली बडबड आहे. एकदा माझा अध्यात्माचा प्रवास सुरु झाला की मी तुझ्याशी फुटकळ वाद घालायला इथे थांबणार नाही. मला मुंबईला पोहचायचे वेध लागलेले असतील."
हे सर्वात आवडले आणि पटले :)

In reply to by स्पा

@हे सर्वात आवडले आणि पटले >>> +++१११ खरं/खोटं..योग्य/अयोग्य..उपयुक्त/अनुपयुक्त..कसंही असो! पण जे आहे ते ठाम आणि निश्चित आहे, दांभिक नाही! हे जास्त महत्वाचं.

बरेचदा विचार करते आणि वाटते की जीवनाची इतिश्री "मोक्षप्राप्ती" मध्येच आहे हे कोणी ठरविले
तहान लागल्यावर पाणी पिण्यात मनाची तृप्ती आहे हे कुणी ठरवलं ? ह्या हि प्रश्नाचं उत्तर तसच आहे . सत्य फक्त असतं . ते कोणाला ठरवावं लागत नाही
हेल्दी अहंकार असणे हे आवश्यक नाही काय? अहंकार (मी पणा) सर्वथा त्यागून जगता येईल का?
अहंकार healthy कसा असतो ? हेल्द कोणाची ? स्वताची कि इतरांचीही ? अहंकार त्यागणे म्हणजे पूर्णपणे त्यागणे . healthy काय अन nonhealthy काय
मी त्यांचे का म्हणून ऐकायचे? खरं पाहता कोणतीही फिलॉसॉफी मी का मानायची?
ह्याचं उत्तर तुम्हीच देवू शकता न . त्याचं ऐकायची तुम्हाला कोणी सक्ती केलीये का ? मानायचं का नाही हे तुमचं तुम्ही ठरवू शकता
मी पणा सर्वथा त्यागून जगणं केवळ संतपदाला पोहचलेल्या व्यक्तीलाच शक्य आहे
मी पणा सर्वथा त्यागून जगल्यामुळे व्यक्ती संतपदाला पोचते . आधी संतपद आणि मग मी पणा सर्वथा त्यागून जगणं असं नाही होतं .
एकंदर अध्यात्मामधेही "या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असा पंथ आहे की नाही?
जगण्यावर प्रेम करू नये मरण्या वर करावं असं अध्यात्मामध्ये कोणी , कधी, कुठे सांगितलंय ?

आपल्या आसपास जे बिलियनेर, मिलियनेर आणि वान्नाबी गुरु झळकताना दिसतात, ते काही आपणच श्रेष्ठ आहोत असं सांगितल्याशिवाय पुढे येतात?
ते तसं सांगतात म्हणून पुढे येत नाहीत तर लोक त्याचं सांगणं ऐकतात म्हणून पुढे येतात . अध्यात्म आणि भोन्दुंचा संबंध लावणाऱ्या विषयी काय बोलायचं ? लोकांना खरं अध्यात्म नको असतं , त्यांना कष्ट न करता फुकटच सुख हवं असतं आणि अध्यात्माविषयी अज्ञानी असलेली च अशी लोकं बिलियनेर, मिलियनेर आणि वान्नाबी भोंदू गुरु निर्माण करतात . खार अध्यात्म समजलेले असल्या थापाड्या so called गुरूंना सावलीला सुधा उभं करत नाहीत

सुंदर ! माणसं कशी बदलत जातात नै ! मुळ धागा २०१२ सालातील आहे , त्यावर आमची पहिली प्रतिक्रिया २०१३ आअणि दुसरी २०१४ सालातील आहे . आता ही २०१५ सालातील प्रतिक्रिया : सर , ही सत्य घटना आहे का हो . ... नै म्हणजे तुमच्याकडे आणि किसनरावजीशिंदेपाटील साहेबांकडे पाहुन विश्वास बसत नाही ;) =))))