Skip to main content

काही चीजाळलेले प्रयोग

लेखक अनुप कुलकर्णी यांनी सोमवार, 31/12/2012 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं झालं असं की डॉमिनोजनी चीज बर्स्ट पिझ्झा चालू केला आणि आम्ही त्याच्या प्रेमातच पडलो.. एकावर एक वेगवेगळे पिझ्झे पोटात रिचवता रिचवता आमच्या ध्यानात आलं की हे प्रेम पिझ्झा या प्रकाराबद्दल निर्माण झालेलं नसून, तुकडा मोडताच त्याच्या पोटातून वाहत येणाऱ्या वाफाळत्या क्रिमी चीज बद्दल आहे. या साक्षात्कारातून आणि देशाभिमानातून एक कल्पना सुचली, की हे वाफाळते चीज भारतीय पदार्थांच्या पोटातून बाहेर पडले तर... आणि यातून साकार झाले... काही चीजाळलेले प्रयोग! प्रत्यक्ष लिखाण सुरु करायच्या आधी ही गोष्ट नमूद करावीशी वाटते की हे सारे नेहमीचेच पदार्थ आहेत; बदल आहे तो फक्त चीजचा! त्यामुळे साहित्य,कृती इ. तपशीलवार सांगत बसत नाही. वाचकांनी फक्त कल्पना समजून घेऊन बाकीचे पदार्थही करून बघावेत! अजून एक महत्वाची गोष्ट जी या सगळ्या पदार्थांना लागू पडते: पदार्थ गार झाल्यावर चीज पुन्हा घट्ट होते त्यामुळे हे सर्व पदार्थ गरम-गरमच भारी लागतात. प्रयोग १: चीज गार्लिक परोठा हा पदार्थ बऱ्याच पंजाबी हॉटेल मध्ये मिळतो. पण त्यांची करण्याची पद्धत वेगळी असते. हॉटेल मध्ये नेहमीचाच परोठा करून तो पूर्ण तयार झाल्यावर त्यावर फक्त वरून किसलेले चीज घालतात. पण अशा वरवर शिंपडलेल्या चीजमध्ये बर्स्टिंग चीजची मजा नाही! त्यामुळे आम्ही याचे नवीन रूप तयार केले. स्टफिंगसाठी लसूणपेस्ट(किंवा लसणाचे अगदी बारीक चिरलेले तुकडे) आणि चीज स्प्रेड (ते मोझोरेल्ला, पारमेझान वगैरे काही आम्हाला कळत नाय ओ.. अमूल चीज स्प्रेड बेस्ट बघा) हे एकत्र करून घ्यावे. आम्ही एका परोठ्यासाठी २ पाकळ्या लसूण आणि २ चमचे चीज स्प्रेड वापरले(याचे प्रमाण व्यक्तीगत आवडीनुसार बदलू शकते). परोठ्यासाठी कणकेची(आम्ही गव्हाचे पीठ वापरले, मैदाही चालेल) पोळी लाटावी. या पोळीच्या आत चीज आणि लसणाचे मिश्रण लावून घ्यावे आणि करंजीप्रमाणे घडी घालून बंद करावे. आणि तसेच तव्यावर तेल सोडून मंद आचेवर खरपूस भाजावे आणि गरम गरमच खावे. (भाजताना घ्यायची खबरदारी म्हणजे परोठ्याला जर भोक पडले तर त्यातून चीज बाहेर ओघळून तव्याचा सत्यानाश होतो, त्यामुळे सांभाळून!) garlic-cheese-mixture garlic-cheese-mixture garlic-cheese-mixture garlic-cheese-mixture प्रयोग २: चीज आप्पे आप्प्यांसारखे आप्पे हो! पण पोटात चीज असलेले. त्यामुळे एरव्ही आप्पे करताना जसे पीठ करतो तसे पीठ करावे. पात्राला प्रथम तेल लावून घ्यावे. आप्पे पात्रात निम्मा गोल भरेल एव्हढे पीठ घालावे. त्यात चीज क्यूबचा छोटा तुकडा (अंदाजे १सेमीx१सेमीx१सेमी) अलगद घालावा. तुकडा घालताना तो पात्राला लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. आता वरून तो चीजचा तुकडा झाकला जाईल इतपत पीठ घालावे. आणि नेहमीसारखे तेल सोडून भाजून घ्यावेत. garlic-cheese-mixture garlic-cheese-mixture प्रयोग ३: चीज मसाला इडली इथेही वरच्या प्रमाणेच कृती: इडली पात्राला थोडे तेल लावून घ्यावे. ते अर्धे भरेल एवढे पीठ घालवे. त्यामध्ये चीज स्लाईसचा तुकडा घालावा. तो तुकडा झाकला जाईल एवढे पीठ घालावे. आणि नेहमीसारख्या इडल्या कराव्यात! आम्ही इडलीच्या पीठामध्ये चिरलेला कांदा आणि कोथिंबीर-मिरचीची पेस्ट घातली (पण ते ऑपशनल आहे). garlic-cheese-mixture garlic-cheese-mixture प्रयोग ४: चीज बॉल्स उकडलेल्या बटाट्यात तिखट मीठ घालून नीट मळुन घ्यावे. त्याच्या छोट्या छोट्या वाट्या कराव्यात. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि मिरची भरावी आणि चीज चा छोटा(पुन्हा १सेमीx१सेमीx१सेमी) तुकडा ठेवावा. अलगद हातानी वाटी उचलून तिचा अगदी हलक्या हातानी बॉल बनवावा. पुरण पोळी करणार्यांना हे अगदीच सहज जमेल.. बाकीचे प्रयत्न करा :) कॉर्न फ्लोर आणि पाण्याचे सरसरीत (भज्यांच्या पिठापेक्षा पातळ) मिश्रण करून घ्या. त्यात तयार केलेला बॉल घोळवून डीप फ्राय करा. आपला चीज बॉल तयार आहे !! garlic-cheese-mixture तयार चीज बॉल फोटो काढेपर्यंत संपून गेले. :P टीप: या सर्व पाकृसाठी चीज १५-२०मिनिटे आधीच फ्रीज मधून काढून ठेवा. म्हणजे छान चीज बर्स्ट इफेक्ट मिळेल!

वाचने 20499
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

फोटो बघुन खपलो आहे. अ‍ॅक्च्युअली पिझ्झा, सँडविच खरे तर फक्त चीजसाठीच खावा/खावे, बाकी काय असले काय आणि नसले काय. - (चीजप्रेमी) छोटा डॉन

झकास प्रयोग आहेत. खूप आवडले :)

खुपच आवडले हे प्रयोग. नक्की करणार.

यम यम यम........:) एका बदलाने साध्या पा.क्रु एकदम रिच्च वाटायला लागल्या बरे ;)

तुमचे प्रयोग अत्यंत आवडले आहेत. नक्कीच करून पाहिले जातील. चीज असल्याने चवीला मस्तच लागणार यात वाद नाही :)

मस्तच ! एकसे एक चीझी प्रकार. -चीझवेडा गणा

प्रयोग उत्तम जमलेत :) एकदम जबरदस्त इस नाचीज को यह चीज पसंद आ गयी ;)

मस्त मस्त मस्त! एकेक प्रयोगावर एकेक लेख लिहिता आला असता. फोटो तर अगदी जबरदस्तच आलेत! वा! पण किती मोह झाला तरी सध्या करणार नाही म्हणजे नाही! :D

In reply to by स्पंदना

दोन शिव्यांच्या मधे चीज घालून द्या, मस्त चीजी शेव्या होतील... :ड बाकी धागा उघडल्याचे चीज झाले... :) -सूर्यपुत्र.

'चिझ बर्स्ट्'च्या अत्यंत आकर्षक छायाचित्रांनीच मन तृप्त झाले. त्यातही, ६वे छायाचित्र, अप्प्यांचे, अगदी लाजवाब. मसालेदार प्रॉन्सच्या पाककृतीवरही चिझ किसून घातले की 'चिझी प्रॉन्स' झकास लागतात.

हे पदार्थ स्वादिष्ट असतीलच. आम्हाल चीज खूप आवडतं. पण डाएट चे काय? चरबी वाढते ना चीज खाऊन! त्यामुळे चीज खाणे कंट्रोल करावे लागते.

हे पदार्थ स्वादिष्ट असतीलच. आम्हाल चीज खूप आवडतं. पण डाएट चे काय? चरबी वाढते ना चीज खाऊन! त्यामुळे चीज खाणे कंट्रोल करावे लागते.

अप्रतिम. चीज हि आमची पन अतिशय आवडती चीज.. तुमचे कौशल्य मात्र वाखाणण्या जोगे आहे.

फार आवडल्या पाकक्रुती..

मस्तच फोटूज आणि कल्पनाज, अनुपराव! लवकरच तुम्ही गणपा, सानिकास्वप्निल, प्रभाकर पेठकर, रेवती... अश्या दिग्गज बल्लवाचार्य/ सुगरणींच्या ओळीत जाऊन बसणार असं दिसतंय !

एकदम झक्कास.....

लई बेक्क्काअर भारी, जर्मन टोस्ट हा देखील प्रकार करुन पहा. पुण्यात असाल तर या एकदा, बसुयात एखाद्या चीजबरोबर.

हे चीझ बॉल्स भारी चविष्ट लागतात. मागे एकदा केले होते. आता परत करणे आले.

लसुण (१० पाकळ्या ) + अमुल बटर + चीझ समप्रमाणात( २५ ग्राम प्रत्येकी) एकत्र करावे. पावावर लावुन ओवन मधे रोस्ट करावे. सोपा प्रकार आहे.