काटो सें खीच के ये आचल ...
कुसुमाग्रज म्हणाले होते- सर्वात सुंदर आवाज कुठेतरी कोणाच्या तरी पायातील बेड्या खळ्ळकन तुटल्याचादेव आनंद हा किमान चार पिढ्यांचा लाडका चॉकलेट हीरो. राज व दिलीप ह्या समकालीनांप्रमाणे त्याने कधी अभिनयकौशल्याचा दावा केला नाही. त्या काळातील नायिका जे करीत, किंबहुना कोणत्याही काळातील हिंदी चित्रपटाच्या नायिका जे करतात, ते त्याने नायक म्हणून केले. उदा. –छान छान कपडे घालून स्टाइलिश दिसणे व बागेत, डोंगरदऱ्या त गाणे म्हणत नाचणे. त्याने गंभीर भूमिकांना फारसा हात घातला नाही. त्याला विनोदाचे अंग नव्हते. वीर व करुण हे हिंदी चित्रपटातील महत्त्वाचे रस. पण देवला मारामारी करताना पाहणे म्हणजे डोळ्यांना व डोक्याला शिक्षा. करुणरसाविषयी तर बोलायलाच नको. देख सकता हूँ मैं कुछ भी होते हुए नहीं मैं नहीं देख सकता तुझे रोते हुए (मजबूर, १९७४) हे गाणे आनंद बक्षींनी बहुधा देव आनंदलाच उद्देशून लिहिले असावे असा संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे. असे सारे असूनही देव चालला. अगदी धोधो चालला. त्याचे कारण हिंदी सिनेमांच्या गाभ्यात असणाऱ्या शृंगाररसाच्या आविष्कारावरील त्याची हुकुमत. देव नसता तर धोतर-सदऱ्यातल्या भारतीय पुरुषांना ‘ष्टाइल’मध्ये रहायला,पोरींवर इंप्रेशन मारायला कुणी शिकवले असते अन् भारतीय स्त्रियांनाही लव्हरबॉय ‘दिसतो कसा आननी’ हे कसे कळले असते? देवच्या यशाचे बरेच मोठे श्रेय त्याच्या तमाम मर्यादांसकट त्याला एका नयनरम्य प्रतिमेच्या चौकटीत प्रस्थापित करणाऱ्या विजय आनंदचे व त्या प्रतिमेला अधिक जिवंत, उत्कट बनविणाऱ्या गाण्यांचे आहे. ‘१९८० पूर्वी पडद्यावर दिसला तो खरा देव, त्यानंतर त्याच्या नावाने वावरली ती त्याची सावली’ असे म्हणतात, ते उगाच नव्हे. देवपटातून विजय आनंद व गाणी बाहेर काढली तर देवचे देवपण कितपत उरते, ह्याचा विचार करून पहा. प्रेमाच्या विविध विभ्रमांचे लोभस चित्रण करणारी ‘देव’गाणी हाच मुळात एका लेखमालेचा किंवा स्वतंत्र ग्रंथाचा विषय होऊ शकेल. सिच्युएशन, शब्द, आशय, सूर, चाल, टेकिंग –ह्या साऱ्या गोष्टी जेव्हा परस्परांत मिसळून जातात, तेव्हा उत्तम गाणे तयार होते. त्याची कितीतरी उदाहरणे देवपटात विखुरलेली दिसतात. ती पडद्यावर साकार करणारा देव मग आपल्याला विविध रूपांत भेटतो. कधी ‘जॉनी मेरा नाम’ मध्ये तो- पलभरके लिए कोई हमें प्यार कर लें, झूठा ही सही --- असे आर्जव करतो, तर कधी प्रेयसीला तेरे घरके सामने एक घर बनाउंगा, तेरे घरके सामने दुनिया बसाउंगा असे वचन देतो. देव आनंदची ही सारी रूपे विलोभनीय आहेत हे खरे, पण ती सारी त्याच्या रोमॅंटिक चौकटीतीलच आहेत. त्याच्या ह्या भावमारू, शैलीबाज प्रतिमेला तडे देणारे मोजकेच चित्रपट आले. त्यातला सर्वात महत्त्वाचा होता ‘गाईड’. १९६५ सालचा हा सिनेमा म्हणजे हिंदी सिनेमातील मैलाचा दगड. इतका हटके, इतका कलात्मक आणि तरीही व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी चित्रपट क्वचितच निर्माण झाला असेल. हा चित्रपट काळाच्या किती पुढे असावा? सिनेमातली कॅबेरे डान्सर ‘रोझी’ असायची त्या काळात ह्या सिनेमाच्या ‘नायिके’चे नाव ‘रोझी’ असे होते. तिचे लग्न झालेले. नवरा पुरातत्त्वशास्त्रज्ञ. (त्या काळात पढालिखा, काबिल हीरोदेखील बी. ए. असायचा.) नायिका नवऱ्याशी भांडून, त्याचे घर सोडून गाईडचे काम करणाऱ्या नायकाच्या- राजूच्या घरात येऊन राहते. (पासष्ट साली लिव्ह इन रिलेशनशिप!) तोही तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. तिच्यासाठी जिवलग मित्राशी मारामारी करतो. मामाशी वाद घालतो, जन्मदात्या आईचे मन दुखवून नायिकेसोबत आपले घर सोडतो. वेगळ्या जातिधर्माच्या, वयाने मोठ्या, विवाहित बाईसाठी तो हे सर्व करतो, अन् तेही त्या दोघांच्या अनामिक नात्यासाठी. घरदार, दुनियादारी नाकारून दोघेही नव्या दुनियेच्या शोधात निघालेत. एका उघड्या ट्रकमधून त्यांचा प्रवास सुरू आहे. बंधने तोडण्यास उत्सुक स्त्री व तिच्या पाठीशी ठामपणे उभा, नात्याने तिचा कोणीही न लागणारा पुरुष. लो वेस्ट जीन्स घालणाऱ्या व त्यासोबतच करवॉ चौथ, वटसावित्री पुजणाऱ्या आजच्या जमान्यातही धाडशी वाटावी अशी ही सिच्युएशन व ती फुलवणारे हे गीत.
रोझी चालत्या ट्रकमध्ये राजूने दिलेले घुंगरू पायात बांधून उघड्या आकाशाखाली मुक्तपणे नाचायला सुरुवात करते. तिचे भावविभोर मन उन्मुक्त आहे, निर्भर आहे. सारी बंधने झुगारून, संकेत, नीतिनियम धाब्यावर बसवून, लोकनिंदेची किंमत मोजून तिने हे स्वातंत्र्य कमावले आहे. तिला आता मुक्त पक्षाप्रमाणे आकाशात विहरायचे आहे. तिचे हे उड्डाण आता कोणी रोखू शकणार नाही. कारण कुणाच्या थांबवण्याने ती आता थांबणार नाही.काँटों से खिंच के ये आँचल, तोड़ के बंधन बांधी पायल कोई ना रोको दिल की उड़ान को, दिल वो चला आज फिर जीने की तमन्ना हैं आज फिर मरने का इरादा हैं अपने ही बस में नहीं मैं, दिल हैं कही तो हूँ कही मैं जाने क्या पा के मेरी जिन्दगी ने, हँस कर कहा आज फिर ... मैं हूँ गुबार या तूफ़ान हूँ, कोई बताये मैं कहा हूँ डर हैं सफ़र में कही खो ना जाऊ मैं, रास्ता नया आज फिर ... कल के अंधेरों से निकल के, देखा हैं आँखे मलते मलते फूल ही फूल जिन्दगी बहार हैं, तय कर लिया आज फिर .. काहीशा अशाच वळणाचे आणखी एक गाणे आहे. राजकपूर-नर्गिसच्या ‘चोरी चोरी’ मधले. पंछी बनूँ उडती फिरूँ मस्त गगन में आज मैं आजाद हूँ दुनियाके चमन में (हसरत जयपुरी, १९५६) ह्या गीतातही उत्फुल्लपणे बागडणारी, स्वातंत्र्याकांक्षी नायिका आहे, पण तिला केवळ तिच्या बापाने अतिमायेपोटी बांधलेल्या बंधनांचा पिंजराच तेवढा तोडायचा आहे. तिचा रोमॅटिसिझम भाबडा आहे. ‘गाईड’मध्ये मात्र स्वातंत्र्य हे रोझीच्या अस्तित्वाचे मर्म आहे. म्हणूनच, आनंदाच्या शिखरावर असतानाच ती व्याकुळ झाली आहे. जगण्याची आकांक्षा इतकी उत्कट असते तेव्हाच ह्या क्षणी मरण आलं तर ते आपण सहज स्वीकारू अशी उर्मी दाटून येते. एकाच क्षणी ‘जीने की तमन्ना’ आणि ‘मरने का इरादा’ मनात नांदतात, तेव्हा ही व्यक्ती स्वतःला सांगत असते- “घाबरू नकोस, Live dangerously” आतापर्यंत आयुष्यात फक्त काळोखी रात्र होती. पण आज नवी प्रभात उगवली आहे. मी डोळे चोळतचोळत समोर बघतेय, तर काय? नजर पोहोचेल तिथवर फुलांचे ताटवेच्या ताटवे बहरलेले दिसतात. आयुष्य आनंदाने ओतप्रोत भरले आहे. मी ठरवलेय् मनाशी – आता मागे वळून बघायचेच नाही. इतके सुंदर आयुष्य समोर वाट बघतेय् माझी.) मी सांगतेय् मनाला – “Live dangerously” मी एवढी कशी बदलले अन् इतक्या कमी वेळात? मी स्वतः आहे तरी कोण हे मला स्वतःलाच कळेनासे झाले आहे. माझ्या आत मला जाणवतेय ते काय आहे- आयुष्याची खुमारी की जागं होऊ पाहणारं वादळ? मी आहे तरी कुठे? ह्या नवीन वाटेने चालताना मी हरवणार तर नाही ना? फिकीर नाही.मी चालतच राहणार आहे---- भारतात स्त्रीमुक्तीची चळवळ सुरू होण्याच्या एक दशकापूर्वीच स्त्रीच्या मुक्ततेचा अहसास स्पंदित करणारे गीत आपल्या पॉप कल्चरचा भाग बनले होते ही गोष्ट किती हृद्य आहे! शैलेन्द्रच्या साध्या, अर्थवाही शब्दांचे हे गाणे काळजीपूर्वक ऐका. मनाच्या कानाने ऐका. रोझीच्या पायातील घुंगरासोबत तुम्हाला आणखी एक आवाज ऐकू येईल.कुसुमाग्रज म्हणाले होते- सर्वात सुंदर आवाज कुठेतरी कोणाच्या तरी पायातील बेड्या खळ्ळकन तुटल्याचा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अप्रतिम.
सुरेख
एकदम मस्त लिहिलंय
फारच सुंदर लिहिलंय. वाचत
+१
आवडला
अप्रतिम देव-रसग्रहण!
मस्त
अगदी अगदी आवडेश .....
वा........
गाईड बघुन आज देखील स्वप्नं
वाह
सुंदर लिहिलं आहेत.
आर के लक्ष्मण ?
हो, आर. के नारायण.. चुकून
लेख आवडला.
लेख छान.
सुरेख!
वाचतो आहे
अप्रतिम लेख
हे गाण या आधी खरच इतक भिडल
मस्तच!
फारच सुंदर लिहिताय सर.
छान लिहिलय........
सुंदर!
आवडता सिनेमा, आवडते गाणं....
मस्त लेख!
सुंदर लेख
किती छान लिहीलय.