✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बुद्ध सरणं गच्छामि । (भाग १)

र
राजघराणं यांनी
Fri, 12/07/2012 - 14:47  ·  लेख
लेख
माझा देवावर विश्वास नाही. माझा धर्मावर विश्वास नाही. पण देव आणि धर्म यावर विश्वास असणारे लाखो लोक माझ्या भोवती आहेत त्यांच्या पासून तुटून पडण्यावारही माझा विश्वास नाही. त्यांना माझ्या बरोबर खेचून नेण्यासाठी आवश्यक असणारी व्यवहारातील तडजोड करण्यास मी तयार आहे. विचारात मात्र करणार नाही. याच कारण अस आहे की विचार हे तुम्हाला कोणीकडे जायचं आहे याची दिशा दाखवणारे असतात आणि व्यवहार तिथपर्यंत तुम्हाला टप्या टप्याने खेचून नेण्यासाठी असतो. - नरहर कुरुंदकर. या लेखमालेत विविध धर्मचिंतनांचा परिचय करून देणार आहे. *********************************************************************************************** अथातो धर्मजिज्ञासा - बुद्ध सरणं गच्छामि । (भाग १) *********************************************************************************************** ख्रिस्तपूर्व ५६३ सालच्या वैशाखी पूर्णिमेला क्षत्रीय शाक्य कुलात सिद्धार्थाचा जन्म झाला. त्याचा पिता राजा शुद्धोदन. आपल्या लाडक्या सुपुत्रावर दु:खाची सावलीसुद्धा नको असे त्याला वाटले. सिद्धार्थाच्या राजवाड्याभोवती त्याने सुखांची अशी कारंजी उडवून दिली की ; त्यांच्या तुषारपटलातून खर्‍या जगातील एकही भेसूर दृश्य सिद्धार्थाला दिसू नये. सुखाच्या कारंज्यांच्या थुयथुय आवाजात सत्य जीवनातील मानवी क्रंदन लुप्त व्हावे. पण वास्तव किती दिवस लपून रहाणार ? म्हातारपण, रोगराई आणी म्रुत्यू यांचे हिडीस व भयानक दर्शन राजपुत्राला झालेच ! सिद्धार्थ कळवळून गेला. करुणेचा महापूर त्याच्या अंतःकरणात दाटला. याचा अर्थ काय ? यातून मार्ग काय ? मानवी जीवनाची ही आर्तता कशी नाहीशी करायची? समस्त मानवजातीच्या दु:खाचे निराकरण करण्याचा मार्ग कोणता? तो कोठे सापडेल ? शोध घेतलाच पाहिजे. सुत्तनिपातात (९३५-३६) तथागत म्हणतात - " थोड्याश्या पाण्यात राहिलेल्या माश्यांप्रमाणे तडफडून एकमेकांवर हल्ले करणारे लोक पाहून माझ्या मनात (मनुष्यजातीच्या भविष्याबद्दल) भीती उत्पन्न होउन मला उबग आली. " बुद्धाच्या अस्सल सहित्यात हे वाक्य वारंवार आलेले आहे. लोकांचे दु:ख पाहून सिद्धार्थ कळवळून उठतो आणी त्याच्या मनात भीती किंवा उबग निर्माण होते. त्यातून चींतन घडते आणी धम्माचा जन्म होत जातो. ह्या सगळ्या मानसिक प्रक्रीयेचे आधुनिक मानशास्त्राच्या द्रुष्टीकोनातून केलेले विवेचन पुढे येणार आहे. त्याच्या संस्कारक्षम मनात हा डोंब उसळला तो त्याला स्वस्थ बसू देईना. दु:खाच्या नाशाच्या मार्गाच्या शोधार्थ तो निघाला; एकटाच, एकाकी, अज्ञाताची वाट काढीत. जगाच्या एतिहासात इतका नाट्यपूर्ण प्रसंग दुसरा नसेल! . . b . . एकोणतीस वर्षांचा, देखणा, मनोहर देहाचा राजपुत्र, आप्तजनांचा लाडका सिद्धार्थ. त्याच्या मुखाने एखाद्या इच्छेचा उच्चार होण्याचा अवकाश की ... की कुठलाही भोग्य पदार्थ त्यापुढे सिद्धच आहे.... असा हा भाग्यवान सिद्धार्थ - मध्यरात्री - शयनगृहात उभा आहे. रूपतारुण्यवती, नवप्रसवा, मानिनी यशोधरा ही त्याची पत्नी शांत झोपली आहे. तिच्या कुशीत तान्हुला राहुल पहुडला आहे. गौतम भरल्या डोळ्यांनी राहुलकडे पहातो.. क्षणभर त्याला वाटले की आपल्या ह्या छोट्या गोंडस प्रतिमेचे- राहुलचे चुंबन घ्यावे. पण नकोच ! न जाणो ... तेवढ्याने यशोधरा जागी व्हायची व आपल्या महाभिनिष्क्रमणाच्या मार्गात अडथळा यायचा. हाही मोहच. शेवटचा का असेना? सोडला पाहिजे. मुलाच्या चुंबनासाठी प्रस्फुरित झालेले ओठ त्याने घट्ट मिटून घेतले. पाठ न वळवताच. दृढ निश्चयाने एक एक पाउल तो मागे हटला. राजवाडा सोडला. राज्य सोडले. प्रेमळ पिता, प्रिय पत्नी आणी एक अजाण तान्हुला मागे राहिला. स्वजनातून विजनात, भोगातून चिकित्सेत, राजमहालातून अरण्याकडे सिद्धार्थ शोधार्थ निघाला. मानवतेच्या चिरकल्याणाच्या शोधार्थ तो निघाला. वाटेत पाच साधक मिळाले. हे पाच श्रमण शरिराला नाना प्रकारे कष्ट - क्लेश - पीडा देउन परमप्राप्तीसाठी प्रयत्न करत होते. सिद्धार्थ गौतम ही त्यात मिसळला. श्रमणांची परंपरा भारत देशात वेदकाळाच्या आधीपासून सुरू आहे. स्वतः च्या शरिराला श्रमण गौतमाने नाना प्रकारचे त्रास दिले. हाल करून घेतले. जे शोधत होता ते मिळाले नाही. त्याला वाटले - यातून काही मिळणार नाही. देहपीडे पासून त्याने अंशतः फारकत घेतली आणी स्वतःला मध्यम मार्गी म्हणू लागला. हा मध्यम मार्ग बुद्धाच्या वैचारिकतेचा रस्ता कसा झाला हेही आपण पहाणार आहोत. आधुनिक भारतीय मनाला गौतम बुद्धाविषयी कायम आकर्षण वाटत आलेले आहे. कारण बुद्धाच्या जीवनात काव्य आहे. बुद्धाचा जन्म वैशाखी पौर्णीमेचा, महाभिनिष्क्रमण झाले वैशाखीला आणी त्याला ज्ञानप्राप्ती झाली तो दिवसही वैशाखी पौर्णीमेचाच. बोधीवृक्षाखाली सिद्धार्थ दु:खा बद्दल चिंतन करत बसला आहे. त्याला तहान भुकेची पर्वा नाही. शाक्य कुलातले हे राजबिंडे पोर आता पार अस्थिपिंजर बनुन राहिले आहे. आणी वैशाखीच्या त्या पौर्णीमेला त्याला ज्ञानप्राप्ती झाली. ह्याचे बाह्य रूपक म्हणून की काय; पौर्णीमेच्या शीतल चंद्रप्रकाशात त्याचा देह उजळून निघाला. . . a . . त्याला समजलेले अंतिम सत्य माणुसकीच्या चिरकल्याणासाठी प्रसारित करायला तो निघाला. ह्यावेळी मात्र तो एकटा नव्हता , एकाकी नव्हता. त्याजवळ त्याला उमगलेले अंतिम सत्य होते. असा माणुस कधीही एकाकी असत नाही. बुद्ध धम्माचे पारंपारिक पंथ. मिटल्या डोळ्यांनी स्वतःकडे पहाणारा गौतम आणी डॉ. आंबेडकरांनी रेखाटलेला उघड्या डोळ्यांचा बुद्धही आपण उलगडणार आहोत. आधीचे पाच साधक पुन्हा भेटले. त्यांना बुद्धाने पहिले प्रवचन दिले. त्या प्रवचनाला म्हणतात धम्मचक्रप्रवर्तन. आपल्या झेंड्यावरचे अशोकचक्र त्याचेच प्रतीक आहे. बुद्ध म्हणाला - (क्रमशः)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
6937 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

छान सुरुवात.

प्रचेतस
Fri, 12/07/2012 - 14:59 नवीन
छान सुरुवात.
श्रमणांची परंपरा भारत देशात वेदकाळाच्या आधीपासून सुरू आहे
याला काही आधार मिळू शकेल काय?
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो. त्याला आधार काय

बॅटमॅन
Fri, 12/07/2012 - 15:48 नवीन
हेच म्हणतो. त्याला आधार काय आहे? जैनांचा सर्वांत जुना तीर्थंकर ऋषभदेव याचा श्रीमद्भागवतात उल्लेख आहे असे वाचले आहे, पण त्यापेक्षा जुना आधार माहिती नाही. अवांतरः वल्ली, महाभारतात आर्येतर पुरोहितांचा उल्लेख आलेला पाहिलाय का कधी? ऋग्वेदात "शिश्नदेवा:" या नावाने शिश्नपूजकांचा उल्लेख आलाय, पण आर्येतर समाजातील प्रीस्टहुड फारसे दिसले नाही कधी आत्तापर्यंतच्या वाचनात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

असुरांचे पुरोहीत

प्रचेतस
Fri, 12/07/2012 - 17:31 नवीन
असुरांचे पुरोहीत शुक्राचार्यांचा उल्लेख बर्‍याच ठिकाणी आला आहे पण शुक्राचार्यांना ब्राह्मण मानले गेले आहे. शुक्राचार्याची माता हिरण्यकश्यपूची मुलगी आणि पिता भृगू ऋषी. मातुल घराणे असुर असल्यामुळेच शुक्राचार्य दैत्यगुरु झाले. आर्येतर समाजात प्रीस्टहूड असावे पण त्याचे कुठलेही पुरावे नाहीत. अनार्यांच्या टोळीच्या प्रमुखाला गणपती म्हटले जात असे पण तो पुरोहीतसुद्धा असे का नाही ते माहित नाही. शिश्नपूजा वेदकालापूर्वीपासून अस्तित्वात होती असे खरे, ढेरे इत्यादी विद्वांनांचे म्हणणे आहे. या प्रथेपासूनच पुढे मूळच्या अनार्य रूद्राची लिंगपूजा सुरु होऊन त्याला वेदात स्थान मिळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सुरुवात चांगली झाली आहे

विटेकर
Fri, 12/07/2012 - 15:41 नवीन
..पण भाग फारच लहान आहे. प्रतिसाद सावकाशीने लिहीन. अपेक्षा आहेत
  • Log in or register to post comments

चित्रे आणि लालैत्यपूर्ण

विटेकर
Fri, 12/07/2012 - 15:42 नवीन
लेखन टाळून / कमी करून तत्वज्ञान मांड्ता येईल तर अधिक बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

ह्या लेखमालेत बुद्धाचे मानसशास्त्रीय

राजघराणं
Fri, 12/07/2012 - 18:08 नवीन
ह्या लेखमालेत बुद्धाचे मानसशास्त्रीय विवेचन करण्याचा विचार आहे . त्यामुळे चरित्राचा त्रोटक भाग यील. आणी तत्वज्ञान यील. दोन्हीतला संबंध आधुनिक मानसशास्त्रीय परिप्रेक्षातून उलगडला जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

राजघराणंजी, लेखमालेबद्दल खुप

५० फक्त
Fri, 12/07/2012 - 18:36 नवीन
राजघराणंजी, लेखमालेबद्दल खुप खुप धन्यवाद, फक्त एक विनंती हे सगळं लेखन शक्य तेवढ्या साध्या सोप्या मराठीत कराल काय ? ते वरचं परिप्रेक्ष वगैरे थोडं जड जाईल,निदान मलातरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजघराणं

छान सुरुवात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 12/07/2012 - 15:45 नवीन
डॉक्टर साहेब, लेखनाची छान सुरुवात झाली आहे. पुभाप्र. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

चांगली सुरूवात.. पुढील

ज्ञानराम
Fri, 12/07/2012 - 15:49 नवीन
चांगली सुरूवात.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments

बुद्धांची मूळ शिकवण फारशी

सस्नेह
Fri, 12/07/2012 - 16:01 नवीन
बुद्धांची मूळ शिकवण फारशी ऐकिवात नाही. धम्म अन पंथ याबद्दलच ऐकण्यात येते. यावर अस्सल असे काही वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

सुरवात आवडली आहे/

तर्री
Fri, 12/07/2012 - 16:12 नवीन
अपेक्षा वाढल्या आहेत .
  • Log in or register to post comments

खूप मस्त. पुढे वाचायला आवडेल.

हारुन शेख
Fri, 12/07/2012 - 16:34 नवीन
लेखन मस्त. जरा, व्याधी आणि मृत्यू यांच्या दर्शनाने गौतमास वैराग्य येईल अशी भविष्यवाणी त्याच्या जन्माच्या वेळेस ज्योतिषांनी केली होती अशी दंतकथा आहे. पण सिद्धार्थ ते गौतम असा प्रवास तर्कशुद्ध आणि मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून कसा होत गेला हे तुम्ही लिहिताहात ते खूप मस्त. पुढे वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

रामदास स्वामि पण लग्नाच्या

अविनाशकुलकर्णी
Fri, 12/07/2012 - 16:45 नवीन
रामदास स्वामि पण लग्नाच्या बोहल्या वरुन पळुन गेल्याचे वाचले
  • Log in or register to post comments

हम्म...

दादा कोंडके
Fri, 12/07/2012 - 18:22 नवीन
रामदास स्वामि पण लग्नाच्या बोहल्या वरुन पळुन गेल्याचे वाचले
हे इथं कशा संदर्भात आठवलं ते स्पष्ट कराल काय? बाकी लेखमाला मस्तच! पुढच्या भागाची वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

अकु स्पष्टीकरण देतील असे

प्रचेतस
Fri, 12/07/2012 - 18:23 नवीन
अकु स्पष्टीकरण देतील असे तुम्हांस वाटते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

अकु स्पष्टीकरण देतील असे

५० फक्त
Fri, 12/07/2012 - 18:33 नवीन
अकु स्पष्टीकरण देतील असे तुम्हांस वाटते काय? - त्यासाठी एखाद्या मिपाकराला बोहल्यावरुन पळुन जावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सिद्धार्थ

प्रचेतस
Fri, 12/07/2012 - 18:20 नवीन
बाकी सिद्धार्थ हे बुद्धाचे मूळ नाव नसून कवीकल्पना आहे असे डॉ. धर्मानंद कोसंबी म्हणतात. स शाक्यसिंहः सर्वार्थसिद्धः शौद्धोदनिश्च सः । गौतमश्चार्कबंधुश्च मायादेवीसुतश्च सः ॥ अमरकोशांत हीं बोधिसत्त्वाचीं सहा नांवें दिलीं आहेत. त्यांपैकी शाक्यसिंह, शौद्धोदनि आणि मायादेवीसुत हीं तीन विशेषणें व अर्कबंधु हें त्याच्या गोत्राचें नांव आहे. तर सर्वार्थसिद्ध विशेषण हे सुद्धा सर्व सिद्धी प्राप्त झालेला किंवा सर्व अर्थाने सिद्ध अशा अर्थाने वापरले गेले असावे. तर थेरीगाथेत बहूनं वत अत्थाय माया जनयि गोतमं । ब्याधिमरणतुन्नानं दुक्खक्खन्धं ब्यपानुदि॥ पुष्कळांच्या कल्याणासाठी मायेने गोतमाला जन्म दिला. व्याधी आणि मरण ह्यांनी पीडित झालेल्या जनांचे दु:ख त्याने नष्ट केले. तर त्रिपिटकांत बुद्धाचे सिद्धार्थ हे नाव आढळत नाही. अधिक माहितीसाठी हा दुवा बघा.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख आणी प्रतिसाद

टुकुल
Fri, 12/07/2012 - 18:49 नवीन
सुंदर लेख आणी प्रतिसाद --टुकुल
  • Log in or register to post comments

लेख

तिमा
Fri, 12/07/2012 - 19:00 नवीन
लेख,कुठलाही पूर्वग्रह न ठेवता वाचत आहे. पण अंतिम सत्य म्हणजे काय हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. कारण अजूनही या जगांत, दु:ख, भीति, क्लेश, रोगराई, म्हातारपण हे आहेतच.
  • Log in or register to post comments

जे वाचायला मिळत नाही, ते अता

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/07/2012 - 22:15 नवीन
जे वाचायला मिळत नाही, ते अता वाचायला मिळणार... अतिशय अल्हाद वाटला वाचतांना.. अता पु/भा. लवकर येऊ द्या. :-)
  • Log in or register to post comments

छान

विलासराव
Fri, 12/07/2012 - 23:26 नवीन
वाचायला आवडेल. येउद्या.
  • Log in or register to post comments

सुरूवात त्रोटक वाटली, पण

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 12/08/2012 - 02:07 नवीन
सुरूवात त्रोटक वाटली, पण उत्सुकता आहे. आधुनिक मानशास्त्राच्या संदर्भात विवेचन येईल ही आश्वासक गोष्ट आहे. कुरूंदकरांचं सुरूवातीचं उद्धरण फारच आवडलं.
  • Log in or register to post comments

विषय फार गहन आहे.

अर्धवटराव
Sat, 12/08/2012 - 04:34 नवीन
कधी कधी "मानसशास्त्र" आणि "अंतीम सत्य" या संज्ञा परस्परांविरुद्ध उभ्या ठाकतात. गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाधारे हे कोडे सोडवणे... फार रंजक कल्पना आहे. अत्यंत मौलीक विषय निवडलाय निरुपणाला. पुढील भागाची आतुरतेने वाट बघतोय. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

उत्तम विषय

चित्रगुप्त
Sat, 12/08/2012 - 05:10 नवीन
उत्तम विषय आणि छान सुरुवात. लेखनाचा विषय ऐतिहासिक असल्यामुळे लेखन कोण-कोणत्या संदर्भग्रंथांवरून केले जात आहे, हेही स्पष्ट करत जावे, ही विनंती.
  • Log in or register to post comments

विषय चांगला आहे.

आळश्यांचा राजा
Sat, 12/08/2012 - 08:32 नवीन
विषय चांगला आहे. पण
...ह्या सगळ्या मानसिक प्रक्रीयेचे आधुनिक मानशास्त्राच्या द्रुष्टीकोनातून केलेले विवेचन पुढे येणार आहे.
हे वाचून असे वाटले की आपल्याला असे म्हणायचे आहे की आधुनिक मानसशास्त्र हे मानवी मनाला बौद्ध दर्शनाच्या तुलनेत अधिक जाणते. ते तसे आहे किंवा नाही याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही, पण आपल्या म्हणण्याचा अर्थ असा असेल, तर मला वाटते हा पूर्वग्रह आहे आणि बौद्ध दर्शन मांडण्यात किंवा समजून घेण्यात यामुळे फार मोठा अडथळा येणार. आधुनिक मानसशास्त्र हे प्रगत, आणि बौद्ध दर्शन मागासलेले असे जर म्हणायचे नसेल, आणि तटस्थपणे बौद्ध दर्शन मांडायचे असेल, तर भाग निराळा.
  • Log in or register to post comments

तटस्थपणे बौद्ध दर्शन मांडायचे

सुहास..
Sat, 12/08/2012 - 09:24 नवीन
तटस्थपणे बौद्ध दर्शन मांडायचे असेल, तर भाग निराळा. >>> प्रथम भागात तटस्थपणे मांडताहेत असे तरी मला दिसते आहे , भाग छोटा झाला आहे ते ही मान्य ! पुभाप्र
  • Log in or register to post comments

गौतम बुद्धा नि नेमकि कोनाची

जोयबोय
Sat, 12/08/2012 - 11:05 नवीन
गौतम बुद्धा नि नेमकि कोनाची तप्श्चर्या केलि की जिने त्यांनाबोध प्राप्त्ती झालि
  • Log in or register to post comments

विषय उत्तम. मात्र अपेक्षा

नाना चेंगट
Sat, 12/08/2012 - 12:12 नवीन
विषय उत्तम. मात्र अपेक्षा पूर्ण व्हाव्यात.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख...पुढील भागाच्या

मालोजीराव
Mon, 12/10/2012 - 11:58 नवीन
सुंदर लेख...पुढील भागाच्या प्रतीक्षेत....वल्ली चे प्रतिसाद जोरदार अवांतर : बौद्धिक रित्या मागास असल्याने वल्लीचे काही प्रतिसाद बाउन्सर गेले
  • Log in or register to post comments

इंटरेस्टिंग

चित्रा
Tue, 12/11/2012 - 06:19 नवीन
काही उल्लेख कळले नाहीत - पण पुढे उलगडा होईल अशा अपेक्षेने वाचते.
  • Log in or register to post comments

सुंदर

सविता००१
Tue, 12/11/2012 - 13:14 नवीन
उत्तम लेखमालेची छान सुरुवात. आणि वल्लीच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांबद्दल तर बोलायलाच नको. आता खूप नवी माहिती कळेल. मस्त.
  • Log in or register to post comments

आवडले

श्रीरंग_जोशी
Wed, 12/12/2012 - 08:15 नवीन
मराठी जालविश्वात प्रथमच या विषयावर वाचायला मिळाले. नरहर कुरुंदकरांबद्दल सुरेश द्वादशीवारांचे एक वाक्य आठवले - 'एखाद्या विषयाचा झपाटून जाऊन अभ्यास केल्यास आम्ही जेथे पोचतो तेथूनच कुरुंदकरांच्या अभ्यासाची सुरुवात होत असे'. या लेखमालिकेची सुरुवात कुरुंदकरांच्या वाक्याने केल्याबद्दल लेखक महोदयांचे विशेष आभार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा